शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

चिरंजीव वेदनेचे गर्भाशय

युगायुगातून वाहते आहे अविरतपणे
चिरंजीव वेदना;
वेगवेगळी रूपे घेत
वेगवेगळ्या नावांनी
वळसे घालत घालत
चाललाय अखंड प्रवास

होतायत प्रयत्न तिला रोखण्याचे
अनंत हातांनी
अदम्य साहसानी
अद्भुत उत्साहानी
असामान्य यत्नांनी
अलौकिक प्रतिभेनी

तीही चालतेय आपली वाट एकाकीपणे
साऱ्याकडे दुर्लक्ष करत
साऱ्यांचा घास घेत
ना थकवा, ना कुरकुर
ना कंटाळा, ना हुरहूर
ना आदि, ना अंत

कधी उघडपणे, कधी सुखाच्या पदराआडून
जीवनाच्या प्रत्येक गोफातील
एक पदर बनून
सुखाची छाया होऊन
दु:खाची सखी होऊन
वाहणे, फक्त वाहणे

आपल्याला रोखणाऱ्या
प्रत्येकाचा फडशा पाडत
जगाची स्वामीनी असल्यासारखी;
जणू आंदण दिलंय
हे जग, तिला कोणीतरी

कुठे असेल
या चिरंजीव वेदनेला
अखंडितपणे जन्मास घालणारे
ते अक्षय गर्भाशय

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १३ जुलै २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा