सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

जीवननौका

जीवननौकेचा प्रवास
अविरत चालू आहे,
अनेक वळणे घेत
अनेक थांबे घेत
नौका पुढे पुढे चालली आहे...
प्रवास सुरु झाला
तेव्हा सारेच नवीन होते
काही कळतही नव्हते
सार्याच नव्याची नवलाई होती
डोळ्यात थोडीशी भीतीही होती...
जगाशी हळूहळू ओळख झाली
रंगांची उधळण पाहत गेलो
अनेक प्रवासी आले गेले
कुणी लक्षात आहेत
कुणी विसरले गेलेत
सोबत बदलत होती
मी मात्र तोच होतो...
नौकेच्या अशाच एका वळणावर
एक अनोळखी प्रवासी भेटला
पूर्ण ओळखीचे देणे घेणे
व्हायच्या आतच निघून गेला...
वास्तविक,
त्यालाही विसरायला हवे होते
पण, माझा मी बदलला होता
खरा मी पळवला होता
त्या अनोळखी प्रवाशाने...
जाताना त्याने
नौकेला एक छिद्रही केले होते
छिद्रातून पाणी येत होते
नाव बुडण्याची भीती होती...
नाव बुडण्याआधी मला
माझा मी शोधायचा आहे
त्यासाठी, तो अनोळखी प्रवासी
किनार्यावरील अफाट जगात
शोधायचा आहे...
नौकेच्या ठिकर्या होणार की,
आपला प्रवासी मिळणार
काहीही ठाउक नाही...
जीवननौकेचा प्रवास मात्र
अविरत चालू होता
अविरत चालू आहे
अंतापर्यंत असाच चालू राहणार आहे...
फरक फक्त एकच आहे-
पूर्वी पाण्यात नौका होती
आता नौकेत पाणी आहे
प्रवास चालू आहे, प्रवास चालू आहे...

-श्रीपाद कोठे
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा