सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

शेवटचं पान

माझ्या वहीचं शेवटचं पान
मी कोरंच ठेवलय
कधीतरी तू येशील आणि
कविता लिहिशील म्हणून...
दबलेल्या ओठातून,
झुकलेल्या नजरेतून आणि
थबकलेल्या लेखणीतून
केव्हा तरी...
तू तसं सुचवलं होतंस म्हणून...
पान भरण्यासाठी पुष्कळांनी
पुष्कळ कविता दिल्या
पण शेवटलं पान मी कोरंच ठेवलं
तुझीच कविता हवी होती म्हणून...
आयुष्यभर जपेन म्हणत होतो
तुझी कविता...
आयुष्याच्या उतार चढावावर
सोबत बरी होती
जीवापाड जपण्याएवढी जीवघेणी होती...
पण संधीच दिली नाहीस
तुझी कविता पेलायला असमर्थ वाटलो?
की अयोग्य वाटलो?
काहीही असो,
तू सुचवलं होतस म्हणून सांगतो
तुझ्या कवितेसाठी म्हणून
माझ्या वहीचं शेवटचं पान
मी कोरंच ठेवलंय...

- श्रीपाद कोठे
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा