सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

आनंद, आपला, राजेश खन्नाचा...

कधी कधी माझ्या अंगात
आनंदचा संचार होतो...
आनंद, आपला, राजेश खन्नाचा...
मग मी कधीतरी
भाजीच्या दुकानातील
कुणा अनोळखी सेवानिवृत्ताशी
सहज गप्पा मारतो
इकडच्या तिकडच्या...
नाही तर, जाता येता
एखाद्या छोट्याश्या खट्याळ मुलाचा
गालगुच्चा घेतो
त्याच्या शाळेच्या रस्त्यावर...
कधी कधी माझ्या अंगात
आनंदचा संचार होतो...
आनंद, आपला, राजेश खन्नाचा...

अशाच एखाद्या ट्रांसमध्ये
रेल्वेतला कुणी सहप्रवासी
आपली दर्दभरी कहाणी सांगतो
तेव्हा मी त्याला छातीशी कवटाळतो
नयनातील आषाढ़मेघ बरसण्याकरीता ...
आणि आइसक्रीम पार्लरमधील
एखाद्या अनोळखी तरुणीची
सहज फिरकी घेतो... जाता जाता...
कधी कधी माझ्या अंगात
आनंदचा संचार होतो...
आनंद, आपला, राजेश खन्नाचा...

पायी अथवा गाडीवर
प्रवासात किंवा ठिय्यावर
असेच अनेक भेटून जातात
म्हातारे कोतारे, तरुण तरुणी
साधेभोळे, कधी इरसाल
आणि खट्याळही...
कधी अलभ्य असे दवबिंदू टिपतो,
कधी सोबतीनं हसतो
कधी हरखून जातो,
कधी होतो उदास...
पुन्हा एकदा आनंदचा संचार होतो
नवीन मुरारीलाल शोधू लागतो...
कधी कधी माझ्या अंगात
आनंदचा संचार होतो...
आनंद, आपला, राजेश खन्नाचा...

- श्रीपाद कोठे
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा