शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

किती छान ना...

किती छान ना...
तुला कुठला आकार नाही
नाही कुठलं रंगरूप,
गुणदोषांचा पत्ता नाही
नाही ठावठिकाणा,
म्हणून तर नेता येतं ना
तुला कुठेही...
मावशील की नाही
हाही प्रश्न नाही,
साठवता येतं कुठेही, कसंही...
हाती धरता येतं
डोई घेता येतं,
डोळ्यात काय वा मनात काय,
कुठेही ठेवता येतं...
जागेपणी वा झोपेत
बसताना वा चालताना
नाही पडत प्रश्न,
कुठे ठेवू नी कसे ठेवू,
ना भीती हरवण्याची
ना विसरण्याची
ना अपहरणाची,
भांडलो तरी, ना रागावतो
हसलो तरी, ना लोभावतो
बोललो घालून पाडून जरी
साथ कधी ना सोडून जातोस,
कुणी उपलब्ध असो नसो
तू मात्र सतत असतोस,
हेही बरंच की तू भेटत नाहीस
म्हणूनच कधी सोडून जात नाहीस
************************
बराच आहेस, तू आहेस तसाच
असाच राहा,
निश्चिंतपणे
मान खांद्यावर टाकून राहण्यासाठी

-श्रीपाद कोठे, नागपूर
शनिवार, २५ ऑगस्ट २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा