शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

आभाळ भरोनी आले

आभाळ भरोनी आले
मन काळोखाशी बोले
निस्तब्ध उषेच्या डोई
स्वप्नांचे अवजड ओझे

दारी उभा वासुदेव
झोळीत काय मी घालू
जो स्वप्न वाटतो त्याला
स्वप्नांचे मरणे सांगू?

मी उदास बसलेला
थिजलेल्या डोळ्यासंगे
स्वप्नांच्या कलेवराशी
मज बोलायचे आहे

जीव त्यांचा गेला आहे
तडफड होते माझी
निर्लेप मनाने स्वप्ने
आभाळी विरुनी जाती

घेऊन जा रे तिरडी
त्यांच्या कलेवराची
भंगून जाईल छाती
स्मरणांच्या भाराखाली

मी होतो मुक्त जरासा
पारावर वार्यासंगे
उरलेल्या श्वासांसाठी
राहायचे मज मागे

-श्रीपाद कोठे, नागपूर
मंगळवार, ८ मे २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा