शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

आभाळफुले

नदीच्या पैलतीरावर
धुक्यातून उगवते
एक प्राचीन मंदिर,
आणि सुरु होते
अस्तित्वाचे पहाटगाणे

कुठूनशी येते, एक मुग्धा
फुलण्या, न फुलण्याच्या संभ्रमात
फुललेल्या फुलांची परडी
हाती घेऊन;
बसते गाभार्याजवळ
आणि गुंफू लागते फुलांची माळ
एकाग्रपणे...
भोवतालातून स्वत:ला वजा करून

एखाद्या चुकार क्षणी
तिच्या कंठाशी खेळून जाते
तोडी वा भूपाळी;
पण ती कळत नाही कोणालाही
रंगीबेरंगी फुले माळून घेतात- स्वत:ला
तिच्या इच्छेप्रमाणे,
फुलांची परडी ती ठेवून देते
हळूच गाभार्यात,
आपला आत्मस्वर काढून ठेवावा तशी...
जोडते दोन हात, मिटते दोन डोळे
आणि, दाटून येतो
शतसहस्र नेत्रांचा
अगणित युगे साठून असलेला
मौन कारुण्यकल्लोळ...

ती माघारी वळते
विश्वाचे अभयदान सोबत घेऊन
शेजारून वाहणार्या अनाथ नदीला
सोबत करण्यासाठी;
आणि फुलू लागतात
पृथ्वीच्या उदरातील आभाळफुले

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ९ डिसेंबर २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा