शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

गारुड

कशी लागली ओढ अचानक
काहीच कळले नाही,
कसे सावरू मन पळणारे
काहीच वळले नाही

खुण मायेची काय गवसली
अजून ठाऊक नाही
वाट पाहणे असे अनावर
अजून थांबत नाही

रूप लोचनी मम, ठसलेले
पुसले जातच नाही
दोन क्षणांचे तुझे बरसणे
मनास सोडत नाही

तव शब्दांची गोड मधुरता
श्रवणी गुंजत राही
तव नेत्रांची भाव मधुरता
मजला व्यापून राही

येणे आणिक जाणे अवचित
स्वरात गुंफून पाही
सात स्वरांची गोड सरगम
अपुरी अपुरी होई

भेट आपुली अशी कशास्तव
घडली असेल सांग
जादू असली कशी माझ्यावर
केलीस मजला सांग

- श्रीपाद कोठे, नागपूर
शनिवार, १९ मे २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा