शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

संध्याकाळला विनवणी

रोज सांगतो, त्या संध्याकाळला
रिकाम्या हाताने येत जा,
रोज इतकं काही घेऊन येतेस
किती आणि कसं सांभाळू मी?
तू दिलेल्या या इतक्या भेटी?
येताना येतेस ओंजळ भरून
अन, जाताना रिती करून जातेस
माझ्या ओंजळीत तुझी ओंजळ
ठेवून जातेस-
अबोल पायवाटा,
पिकूनही न गळलेल्या
पिवळ्या पानांसारख्या आठवणी,
थबकलेली पावले अन
अनंत योजने चालणारे डोळे,
श्वासांचे आभास
धुळीचे कण
प्रकाशाचे किरण
दुखावणारी सुखे
हंबरणारे मन
पक्ष्यांची किलबिल
वासरांची दुडदुड
मारव्याची व्याकुळता
यमनाची कातरता
भूतकाळाचे तुकडे
वर्तमानाचा पसारा
भविष्याचे धुके
आणि सोबतीस
अमाप अनोळखी सावल्या;
कसं सांभाळू?
संध्याकाळ एवढंच म्हणाली-
ही तुझीच ठेव आहे
माझ्याकडे ठेवलेली;
मी फक्त व्याज देते त्यावरील
मुद्दल तर तशीच आहे अजूनही...

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २२ सप्टेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा