सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

निष्पर्ण

निष्पर्ण आज झालो,
निष्पर्ण आज झालो...

झाडून टाकिली मी
ती जून पालवी,
पिवळ्यासवेच गेली
हिरवीही चांगली,
त्यागून आज अवघे
नि:स्तब्ध जाहलो...

बुन्धाच तेवढा तो
त्या शुष्क वृक्षशाखा,
शृंगारहीन झाला
तो देह-केवडा,
उमळून भाव सारे
नि:शब्द जाहलो...

निष्पर्ण आज झालो
परी निस्पंद मात्र नाही,
तुझीया मृणालस्पर्शे
उगवेल पालवी,
ऐसी उरात आशा
निश्चिंत जाहलो...

- श्रीपाद कोठे
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा