सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

आताशा,

आडोसा दूर नको करू
अंधार पळून जाईल ना
आताशा, उजेड नाही दुडदुडत येथे...

आवाज नको देऊ
आभास विरून जातील ना
आताशा, पावा नाही गुणगुणत येथे...

आठवण नको काढू
अजाणता उचकी लागते ना
आताशा, प्राजक्त नाही बहरत येथे...

ओळख नको दाखवू
ओठी सरगम येईल ना
आताशा कोकिळ नाही गात येथे...

अलगद स्वप्नी नको येऊ
अंतरी डोह डहुळतात ना
आताशा, किनार्यांचा भरवसा नाही येथे...

ओंजळ नको भरू पूर्ण
ओसंडून वाहील ना
आताशा, नेत्रांना पूर नाही येत येथे...

आसमंती नको विहरुस
आसमानी रंग खुलतील ना
आताशा, इंद्रधनू नाही फाकत येथे...

अत्तर नको लावू
अलवार गंध पसरतील ना
आताशा, चंदनही शांतवत नाही येथे...

- श्रीपाद कोठे
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा