सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

तेव्हा तू कुठे असतोस?

तू प्रार्थनेला धाऊन येतोस
हे तर अनेकांनी सांगितलय,
तू करूणेचा सागर आहेस
हेही अनेकांनी नमूद केलय
पण,
पोटचा गोळा गमावणार्या
मातेचा टाहो
आम्ही ऐकतो
तेव्हा तू कुठे असतोस?
घरात अन्नाचा कण नाही
आणि हाताला काम नाही
म्हणून,
कोणीतरी गळफास लावतो,
तेव्हा तू कुठे असतोस?
खूप आतुरतेने वाट पाहताना
प्रियकर येतच नाही
आणि प्रियेच्या डोळयात
अथांग डोह जमतात
तेव्हा तू कुठे असतोस?
कुठल्या तरी कारणाने
प्रेयसी निघून जाते
प्रियकर आयुष्यभर झुरत राहतो
तेव्हा तू कुठे असतोस?
वाघाच्या तोंडात सापडलेली शेळी
बें-बें करते
तेव्हा तू कुठे असतोस?
आपल्या सार्या अस्तित्वाचं दान
ओंजळीत घेऊन प्रार्थना करणार्याची
प्रार्थना विफल होताना पाहतो
तेव्हा तू कुठे असतोस?
करूणेची आर्द्रता सुकून जाताना पाहतो
तेव्हा तू कुठे असतोस?

- श्रीपाद कोठे
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा