वातावरण कसं प्रफुल्लित झालंय आज
वसतिगृहाची झाडझुड, स्वच्छता
कालपासूनच सुरू झालीय
आज मोठे पाहुणे येणार आहेत ना !!
मागच्या, पुढच्या, बाजूच्या आंगणात
छान पाणी शिंपडलंय
मघाशी त्या वडाखाली काय छान वाटत होतं...
सनई लागली आहे,
खूप सारी फुलं लावली आहेत
गुच्छ ठेवले आहेत
त्यांचा सुवास किती गोड वाटतोय
सगळी मुलं, मुली तयारी करताहेत
गणवेषाची इस्त्री, बुट-मोजे, वेणीफणी
सगळी लगबग चाललीय
खूप आनंदात आहेत सगळे
अन् छोटसं दु:खही
आनंद आणि दु:ख एकत्रच
कारणही एकच दोन्हीसाठी
आज आमचा कान्हा चाललाय
आमच्यापासून दूर, आम्हाला सोडून...
वेळ काय घालवतोय मी
तयार व्हायचय लवकर
आज मंचावर जायचंय मला...
आले, आले, पाहुणे आले
टाळ्यांचा कडकडाट झाला
स्वागतगीत छान म्हटलं या मुलींनी
बाईंनी परिचय करून दिला पाहुण्यांचा
स्वागतही झालं
सरांनीही सांगितलं आजच्या कार्यक्रमाबद्दल
आता माझी पाळी
बाईंनी माझं नाव पुकारलं
मी मंचावर चढलो
गुलाबांचा पुष्पगुच्छ
आणि शर्ट-प्यान्टचा डब्बा
कान्ह्याला दिला,
म्हटलं- हे तुझ्यासाठी
आम्हा सगळ्यांकडून,
मिठीच मारली त्याने मला,
मला पाठीवर उष्ण ओलावा जाणवला
मी बाजूला झालो हळूच...
कान्हा उभा राहिला
मनोगत व्यक्त करायला
आणि बोलू लागला-
`मित्रांनो,
कितीतरी वर्षं झालीत
मी तुमच्याबरोबर राहत होतो
आता नसेन तुमच्याबरोबर
मला सगळं आठवतंय
फिरायला जाणं, दंगामस्ती, मारामारी
खाणंपिणं, गाणी म्हणणं,
चोरून आंबे खाणं,
आजारी पडणं,
आपल्या बाई, आपले सर
आणि तुम्ही सगळे...
पण आज एक नवीन रस्ता
आलाय माझ्यासमोर
आता तोच माझा रस्ता
म्हणून साथ सुटणार तुमची
पण, त्याच रस्त्यावरून
मी परत येत जाईन
दर आठवडयाला, तुम्हाला भेटायला
आणि तुम्हाला सांगेनही
खूप काही,
आपल्या या होस्टेलबद्दल
तुम्ही दिलेल्या या फुलांबद्दल
आणि
मला दृष्टी देऊन सृष्टिची कवाड उघडणार्या
त्या डॉक्टरांच्या, त्या देवदूताच्या हातांबद्दल
मला दृष्टी देणारा तो दाता तर
ही सृष्टी सोडून केव्हाच निघून गेलाय
आपण सारे त्याच्यासाठी
टाळ्यांचा कडकडाट करू या...!!'
- श्रीपाद कोठे
नागपूर