रविवार, ८ डिसेंबर, २०१३

पत्ता

समोर बस आली
अन् चढलो त्या बसमध्ये;
कुठे जात होती बस?
कुणास ठाऊक...
कंडक्टर आला
म्हणाला- तिकीट?
म्हणालो- एक द्या...
अहो पण कुठले?
कंडक्टरचा प्रश्न...
कुठले तिकीट मागावे?
कुठे जायचे आहे आपल्याला?
संभ्रमित माझ्यापुढे
चिमटा वाजवला कंडक्टरने,
सावरून घेत म्हणालो,
द्या शेवटल्या स्टॉपचे...
तिकीट खिशात ठेवले
अन् पाहत बसलो खिडकीबाहेर
बराच वेळ फिरली बस
किती वेळ कुणास माहीत...
कंडक्टर सांगत होता-
उतरा आता,
आला शेवटला स्टॉप...
मी बसलेलाच, म्हणालो-
आता कुठे जाणार बस?
जाईल पुन्हा
तुम्ही जिथून बसला तिथेच...
मग द्या पुन्हा तिथलेच तिकीट...
तिकीट देताना म्हणत होती
कंडक्टरची नजर -
`किती वेडपट आहेस तू?'
जिथून चढलो होतो तो स्टॉप आला
मी बसलेलाच,
कंडक्टर स्वत:च म्हणाला,
काय? जायचे पुन्हा
शेवटल्या स्टॉपला?
मी फक्त, हो म्हणालो
त्याने तिकीट दिले
प्रवास सुरू झाला,
झाल्या दोन तीन फेर्या अशाच
अखेर तो बापडा म्हणाला-
आता बस डेपोत जाणार
आता उतरावेच लागेल
उतरलो चुपचाप खाली
थोड्याशा सहानुभूतीने
जवळ आला कंडक्टर
म्हणाला- काही प्रॉब्लम आहे का?
कुठे जायचे आहे?
म्हटले, तेच तर ठाऊक नाही
पत्ताच हरवलाय
बरेच दिवस झाले
शोधतो आहे,
उद्या दुसरी बस पकडणार
आणि पुन्हा शोध...
कंडक्टरने पाय काढता घेतला
वेड्याच्या नादी लागणे
बरे नव्हे म्हणून...

- श्रीपाद
मंगळवार, २८ फेब्रुवारी २०१२

क्षणभंगुर

तो उभा
आभाळावर नजर रोखून
डबडबल्या डोळ्यांनी
अनंत आकाश तोलून धरत,
त्याच्या इवल्याशा थेंबात
सामावलं आकाश आणि
गुडूप झालं त्याहूनही विस्तीर्ण मनात...
तोच थेंब ओघळला
अन् घरंगळला जमिनीवर
मातीवर सुकून गेला,
जाताजाता आपल्यातली
न विझणारी ठिणगीही
देऊन गेला...
त्या ठिणगीने उसळला
आगडोम्ब पृथ्वीच्या पोटात
अन् उसळल्या असंख्य ठिणग्या,
धरतीने फिरवला हात त्यांवर
अन् त्यातून फुले उमलून आली
पण संध्याकाळी कोमेजली...
अगदी त्याच्यासारखीच...

- श्रीपाद
शुक्रवार, १० फेब्रुवारी २०१२

तुला नाही ठाऊक

तुला नाही ठाऊक
तू माझ्यासाठी काय आहे?

तू माझ्यासाठी
हसण्याचं कारण आहे
रडण्याचं निमित्त आहे
उदासीचा बहाणा आहे...

तू आहे माझ्यासाठी
रुसण्याचं स्थान
बेहोशीचं गान
जगण्याचं भान...

तुला नाही ठाऊक
तू माझ्यासाठी काय आहे?

तू आहे
झाडांची हिरवाई
फुलांची नवलाई
रंगांची उधळण,
पक्ष्यांचा चिवचिवाट
नदीचं वाहणं
वार्याचं भुरभुरणं

तू आकाशीची कोर आहे
नाचणारा मोर आहे
पहाटेचं दवं आहे
रात्रीचं हिव आहे,
पावसाची धार आहे
थंडीची बहार आहे

तुला नाही ठाऊक
तू माझ्यासाठी काय आहे?

तू
मनातला पिंगा आहे
ह्रुदयातली हुरहुर आहे
नयनातली आस आहे
पावलातली ओढ आहे

माझं असणं आहे तू
माझं नसणं आहे तू
ओंजळीतल्या नाजूक
भावना म्हणजे तू

तुला नाही ठाऊक
तू माझ्यासाठी काय आहे?

तुला नाही ठाऊक,
जाग येते कधीतरी
रात्री वेळी अवेळी
खिडकीतल्या किरणांवर होतो स्वार
पोहोचतो आकाशी
अन् आकाशगंगेच्या सोबतीने
पोहोचतो तुझ्याजवळ

डोकावतो हळूच
तुझ्या स्वप्नमयी डोळ्यातून,
वेढून घेतो तुला अल्लद
रोखून धरतो माझ्या श्वासांनीही
तुझी झोप चाळवू नये म्हणून
आणि परततो आल्या पावली
पाऊलही न वाजवता
माझ्याच अस्तित्वाचं प्रयोजन घेउन
सतत साद घालणार्या
धूसर भास आभासांच्या पल्याड

तुला नाही ठाऊक
तू माझ्यासाठी काय आहे?

- श्रीपाद

कट्टी

अमनस्क फिरत होतो उद्यानात
एका झाडाखाली थांबलो, चाफ्याच्या
अगदी सहजच
हळूच आलं एक फूलपाखरू
आणि बसलं चक्क हातावर
थोड्या उड्याही मारल्या
त्यानं तिथल्या तिथे,
थोडी पटली असावी ओळख
म्हणून बसलं होतं निवांत
ठिपक्या ठिपक्यांचे पंख हलवत
थोडीशी हालचाल केली
तरीही नाही उडालं,
कधी डोळे मिचकावले
त्याच्याकडे पाहून,
कधी घातली फुंकर,
तेही डोलत होतं आनंदात,
आणि पाहतो पाहतो
तोवर गेलं उडून
अरे अरे म्हणत मारलेल्या
हाकाही न ऐकता...
असा कसा रे दुष्ट तू?
मला खूप राग आलाय तुझा
तुझं मन भरलं असेल खेळून
पण माझं खेळणं तर राहीलंच ना अर्धवट,
खेळतच होतो आपण दोघं
आनंदातही होतो
त्रास नव्हतो देत एकमेकांना
तरीही गेला, मन भरलं म्हणून
माझं मन भरण्याची वाट न पाहताच
आता कधीही नाही बोलणार तुझ्याशी
कट्टी कट्टी कट्टी...

- श्रीपाद

ज्वाला

कोरड्या ठणठणीत
आणि रिकाम्या मनात
काय चाललंय आज हे...
का भरल्या जातंय
आज हे पुन्हा?
खरवडून खरवडून
रिकामं केलं होतं हे मडकं
आणि आज अचानक, नकळत...
कोणाचा हा उपदव्याप? कशासाठी?
संताप संताप होतो आहे
आता आग पेटून उठावी
जळून जावं सारं काही
उडून जावी राख वार्यावर
पुन्हा एकदा मोकळ व्हावं
अन् लाभावं ते सुखद रितेपण
पण नाही,
आग नाही पेटत अजून
धूर धूर झालाय सगळा
चुलीत, ओली लाकड
टाकल्यावर होतो तसा
कोंडून गेलं आहे सगळ
कासाविस अस्वस्थता
असा धूर चांगला नाही
मला ज्वाला हवी आहे,
ज्वाला...

- श्रीपाद कोठे

प्रवाह

एक होती राधा
एक होता कृष्ण

एकत्र यायचे होते दोघांनाही
एकरूप व्हायचे होते दोघांनाही

तसे काही घडले नाही
ओढ मात्र संपली नाही

युगेयुगे तीच ओढ़
तशीच अजून वाहते आहे
कोटी कोटी मनांमध्ये
अजूनही तेवते आहे

राधा गेली कृष्ण गेला
तरी वाहणे सुरूच आहे
त्यालाच आज जगामध्ये
राधा-कृष्ण नाव आहे...

- श्रीपाद

`झाड कटवाना है क्या झाड?'

ओलिचिम्ब पहाट कानातून मनात उतरली
अन् डोळे उघडायला भागच पडले,
ऐकू येणार्या पाउसधारा दिसू लागल्या,
त्यांच्याशी गुजगोष्टी करत
तसाच लोळत राहिलो काही वेळ,
त्यांच्या आमंत्रणाला नकार देणे
शक्यच नव्हते, दार उघडलं
हिरवा आनंद
सगळीकडे भरून राहिला होता,
अनामिक धुंदीतच दिवस सुरू झाला
चहा झाला आणि
हाती पेपर घेउन दारातच बसलो,
खरं तर पेपर नावालाच होता हातात
अवतीभवती आणि मनातही होता फक्त
ताजा चैतन्यमयी हिरवा फुलार
झाडे नटली होती हिरवाईने
चैतन्याची, सृजनाची गाज देत
मरगळल्या मनाला साद देत,
सांदीकोपर्यातही उगवून आले होते
काही ना काही...
अन् अचानक कानी हाक आली,
`साब झाड कटवाना है क्या झाड??'

- श्रीपाद

रानबावरी...!!!

कधी गर्द झाडीतून
कधी विरळ झाडाझुडुपातून
नागमोडी पायवाट तुडवत जाते- ती!
कधी अल्लड अवखळ
कधी पोक्त गंभीर,
नाचत बागडत
हरिणांच्या साथीनं,
ठुमकत डौलदार
मोराच्या सोबतीनं,
कधी सुहास्यवदना
कधी गंभीर चेहरा करून,
पशुपक्ष्यांशी बोलत बोलत
गायीगुरांशी खेळत खेळत
नदीच्या प्रवाहासारखीच
नदीच्या काठाने,
कधी थबकलेली
कधी वाहती,
वेळी अवेळी
एकटीच भटकते
निर्व्याज निर्भयपणे,
कधी चंद्रकिरणे लेवून
कधी अवसेचे चांदणे पांघरून,
येताजाताना
कटाक्ष टाकते कधी एखादा,
कुठून येते?
कुठे जाते?
कोणालाच नाही ठाऊक
लोक म्हणतात-
दूर दूर, खूप दूर
जंगलाच्या टोकाला गुहा आहे,
तिथूनच येते ती
आणि तिथेच जाते परत,
बस्स... फक्त एवढेच,
तिचं नाव...
.........???
.........???
रानबावरी...!!!

- श्रीपाद

अलीकडे

होत नाही
तुझे येणे
अलीकडे
वारंवार

मानसीच्या
अशांतीला
आता नाही
पारावर

तुझा फोटो
घेतो करी
करावया
गोष्टी चार

आहेस तू
असा भास
नाही जरी
आसपास

कसे सांगू
आता तुला
मनातले
गुज खास

साधे पान
गळताही
घेतो तुझा
अदमास

नको आता
जीवघेणा
अंत माझा
पाहू प्रिये

तुझ्याविना
कसा राहू
उरात हा
श्वास अडे

- श्रीपाद

तुझे जाणे

तुझे जाणे
माझ्यासाठी
वेदनांचे
उमलणे

तुझे जाणे
अंगणीची
पाने-फुले
कोमेजणे

तुझे जाणे
आंब्यावरी
कोकीळेचे
मौन होणे

तुझे जाणे
पडवित
झोपाळ्याचे
खंतावणे

तुझे जाणे
मोगर्याने
सुवासाला
पारखणे

तुझे जाणे
माझे पुन्हा
आठवात
हरवणे

- श्रीपाद

चोकलेट

माझ्या दिशेने येणार्या प्रकाशाकडे
उत्सुकतेने पाहत होतो
तोच त्याच्या पाठी लपलेल्या अंधाराने
हळूच खुणावले,
मंद स्मित करीत म्हणाला तो-
ये इकडे,
न बोलता खुणेनेच सारं काही

मी नाही गेलो
तेव्हा त्याने चोकलेट काढले
त्याच्या जवळचे
आणि म्हणाला, हे घेणार?

चोकलेट पाहून जवळ गेलो
खूप गोड हसत होता तो
चोकलेट सारखाच,
हळूच हात पुढे केला
आणि चोकलेट घेतलं त्याने दिलेलं
त्याने हळूच पापाही घेतला माझा
छान वाटलं मला

मला चोकलेट का दिलं?
मी विचारलं...
तू जवळ आला ना माझ्या म्हणून!!
जो येतो माझ्याजवळ
त्या सगळ्यांना देतो मी
खूप चोकलेट आहेत माझ्याकडे
सगळ्यांसाठी
पण येत नाहीत
फारसे कोणी माझ्याजवळ

तू लपून का बसतो प्रकाशामागे?
म्हणून येत नाहीत कोणी
मला घाबरवायला नाही आवडत कोणाला
तो उत्तरला,
आणि हा प्रकाश ना
घाबरतो खूप मला
माझाच भाऊ असून
म्हणून बसतो लपून
पण जे येतात ना
त्या सगळ्यांना देतो
मी चोकलेट
भेदभाव न करता

सुंदर-कुरूप
चांगले-वाईट
स्त्री-पुरुष
श्रीमंत-गरीब
ज्ञानी-मूर्ख
सगळ्यांना

येत जा आठवण आली की...

- श्रीपाद

मन माझे

मन माझे
वेडेपिसे
देखोनीया
चिंब झाडे

झाडे वेडी
डोलतात
वार्यासंगे
बोलतात

बोलतात
शब्द असा
अंतरी जो
बिलगतो

बिलगणे
असे त्याचे
सुगंधात
जीव न्हातो

जीव मग
तरंगतो
आभाळाला
खेव देतो

खेव घाली
आभाळही
अज्ञाताचा
स्पर्श होतो

स्पर्श होता
गात्रोगात्री
जलधारा
झरतात

झरताना
पुन्हा पुन्हा
मने चिंब
करतात

- श्रीपाद

मालकंस

अशी भेट
धुंद धुंद
मीठी झाली
मुक्तछंद

मोगर्याचा
मंद गंध
श्वासलय
अनिर्बंध

विरले ते
जडबंध
हळू टिपे
मकरंद

गात्रान्नाही
चढे जोर
आता नको
लाज-बुज

कण कण
तुझा माझा
गाऊ लागे
मालकंस

- श्रीपाद

माझे मन

माझे मन
तुझे झाले
भेटीलागी
आसुसले

भेट घडे
तुझी माझी
माझे मन
नादावले

नाद असा
वेडापिसा
माझे मन
खुळावले

वेडा नाद
रुंजी घाले
माझे मन
उधाणले

कसे कथू
वेडे गुज
माझे मन
खंतावले

भेट पुन्हा
होण्यासाठी
माझे मन
वाट पाहे

- श्रीपाद

अंतरंग

काका मला तो पिवळा
मला हिरवा द्या काका
मला लाल
मला निळा

हे तुझे पैसे बेटा
तुझा झाला एक रूपया
तुला गं काय हवं

शाळेजवळच्या फुगेवाले काकांच्या
दुकानावर रोजचेच संवाद पार पडले
रोजच्या सारखेच

अन्,
अन् वेगळेच काहीतरी घडले आज
रोजच्यापेक्षा
रोज न येणारी ती मुलगी
हळूच जवळ गेली त्यांच्या
अन् म्हणाली-
`अहो फुगेवाले काका'
`काय गं बेटा'
काका, तो काळा फुगाही
उडतो का हो
हवेत उंच??
हो गं बेटा
तोही उडतो असाच
इतर फुग्यांसारखाच
हवा तुला?
आणि काकांनी फुगा दिला
त्या मुलीच्या हाती
आणि म्हणाले-
`घे तुला ही भेट
माझ्याकडून'
तीही निघून गेली आनंदाने
फुगा उडवत

आणि कुबड्या घेउन जाणार्या
त्या काळ्या मुलीकडे पाहात
काका स्वत:शीच पुटपुटले-
`फुगा रंगाने वर नाही जात बेटा
त्याच्या आतील हवेने जातो...'

- श्रीपाद

अदृश्य

हवेची झुळूक
खूप मोलाची आहे,
माझ्यासाठी....

तसाच देवही
खूप मोलाचा आहे,
माझ्यासाठी....

माझं मनही
खूप मोलाचं आहे,
माझ्यासाठी....

मोगर्याचा सुगंधही
खूप मोलाचा आहे,
माझ्यासाठी....

पण हे कधीच
भेटलेले नाहीत, दिसलेले नाहीत
मला प्रत्यक्ष...

जशी तूही
भेटलेली नाहीस, दिसलेली नाहीस
प्रत्यक्ष कधीही...

- श्रीपाद

विस्कटलेली लय

काय नातं आहे
माझं नी त्याचं,
निरंतर ओढीने
मन झेपावतं
आस लागून राहते- भेटीची,

काम तर काहीच नाही
बोलायला काही संदर्भही नाहीतच
तरीही ओढ, अनिवार

दुरून होणारं दर्शन केवळ
त्याला एकटक
निरखून पाहण्याचा
चाळा फक्त,

दोन्ही हात उंच उभारून
झेप घेतली मनाने- उत्तुंग
मिटून घेतले डोळे
आणि अचानक ते पुढ्यात
मंद स्मित करीत,

प्रदीर्घ प्रतीक्षा फळाला आली
आणि अवसान गळून पडलं
सारी शक्तीच संपून गेली
शब्दही फुटेना तोंडून,

तेही निघून गेलं
आसुसलेल्या समजूतदारीनं,

तेव्हापासून आभाळ मारवा गातय
नियमितपणे, रोज संध्याकाळी,
आणि मी प्रयत्न करतो
तो नि:शब्द मारवा ऐकण्याचा
विस्कटलेली लय शोधण्याचा
निसटलेले स्वर मुठीत धरण्याचा

- श्रीपाद

अनामिकेची अंगभूल

अदृश्य पाशांनी
आवळलेला
अस्तित्वभार वाहून नेताना
अस्पष्ट जाणवते
अनामिकेची अंगभूल...
आधीच बावरलेल्या मनाला
अकारणच उसवून जाते...
अल्लद छेडून जाते
अनोळखी वीणा...
अधिकार गाजवते
आपल्याच तोर्यात...
आत्मा पडून राहतो
अडगळीच्या कोपर्यात
आक्रोशणारे निश्वास मोजत
अतृप्तीची समजूत घालत
आणि तरीही सुटत नाही
अनिवार ओढ
अनामिकेची...

- श्रीपाद

अबोलणारी झांज

दाटून येते कधी अवेळीच, उदासवाणी सांज
देऊन जाते माझ्या हाती, अबोलणारी झांज

असाच होता एक दिवस तो, उधळीत होतो रंग
लाल गुलाबी हिरवा पिवळा, होते अवघे दंग

खेळ मजेचा चालू असता, आला कठीण प्रसंग
डोळ्यादेखत कोसळला तो, विटून गेले रंग

नूर बदलला; झाली पळापळ, कुणी घेतली धाव
गाडी काढली कुणी आणखी, कुणी लाविले फोनं

रुग्णवाहिका आली धावत, घेउन गेली त्यास
उपचारांची शर्थ जाहली, शून्य असे प्रतिसाद

वरचढ ठरला काळ त्या क्षणी, घेउन गेला त्यास
तेव्हापासून रंग फिकुटले, उदास झाली सांज

- श्रीपाद

किंकाळी

काळोखाला चिरून गेली
दर्दभरी किंकाळी
क्षणात झाली चैतन्याची
पाहा राखरांगोळी

गडद्द काळोखातून उठल्या
लवलवत्या ज्वाळा
घेऊन गेल्या आठ जीवांना
सोबत निजधामा

जुनेच होते वैर म्हणोनी
दिली लावूनी आग
चिल्लीपिल्ली होती झोपली
आली त्यांना जाग

काय करावे काही सुचेना
आगडोंब उसळला
चहू दिशांनी ज्वाळा ज्वाळा
दाखविती जिभल्या

तोंडून साधा शब्द फुटेना
देईल कैसी हाक
वाळून गेले अश्रू नयनी
दैवाचा हा खेळ

मायलेकरे बिलगून बसली
आला शेवटचा क्षण
काय बोलले असतील तेव्हा
कोण करी सांत्वन

उरली केवळ राख त्या स्थळी
जिथे होती झोपडी
आणि पलिकडे क्रौर्य गोठुनी
मान खाली घालुनी

अरे माणसा कैसी करणी
पशुपरी ही तुझी
यातून सुटका होईल का रे
देवा अमुची कधी?

- श्रीपाद
(सोलापूर जिल्ह्यात माढा येथे १५ फेब्रुवारी २०१० रोजी पारधी जमातीच्या २ स्त्रिया व ६ बालकांना त्यांच्याच जमातीच्या काही लोकांनी पूर्ववैमनस्यातून जाळून टाकले. त्या घटनेनंतर मनात उमटलेल्या भावना.)

येती भरून डोळे

येती भरून डोळे
पण थेंब ओघळेना
कंठात दाटलेला
तो हुंदका फुटेना...

आभाळ दाटलेले
बरसात मात्र नाही
कोंदाटल्या दिशांना
रस्ताही आकळेना...

तो पूर आठवांचा
येतो मनात दाटून
अस्वस्थ भावनांना
परी शब्द सापडेना...

- श्रीपाद

तुटता तारा

निराधार आभाळाखाली
आधारहीन पावले
निरंकुश, झपूर्झा स्थितीत
कीर्र झाडी
असून नसल्यासारखी
आकाशीची चंद्रकोर
असून नसल्यासारखी
रातराणीचा सुगंध
असून नसल्यासारखा
वाटेवरील पदरव
असून नसल्यासारखा
मनाचा वेगही
असून नसल्यासारखा,
दृष्टी मात्र निश्चल
करुण-कोमल, आर्त
एकटक आभाळाकडे
आभाळातल्या बापाला
मायमाऊलीला
साकडे घालत,
अधीर
रोखून ठेवलेली नजर
रोखून ठेवलेला श्वास,
क्षणार्धात
मोकळा झाला
तळमळणारा आत्मा,
आभाळातल्या मायबापांनी
साकड ऐकलं, अन्....
तुटत्या तार्याला नमन करीत
सारं अस्तित्व आक्रोशलं
`असेल तिथे सुखी ठेव'
*** *** *** *** ***
कोणाच्या तरी सुखासाठी
तार्याला तुटावेच लागते ना
आकाशी...
...वा धरतीवर सुद्धा...

- श्रीपाद

पुंजका

अबोध मनाच्या तळाशी
काही धूसर आकृती
पुंजके पुंजके
हळूहळू त्यांचेच आकार होतात
न कळण्यासारखे, चित्रविचित्र
मग होतात गडद
रेषा, रंग, सौष्ठव
धूसरता कमी कमी होत जाते
ठळकपणा येऊ लागतो
हळूच त्या आकृती
हाती धरु जातो
तोच
निसटतात त्या हातातून
आणि फेर धरत
विरून जातात
पुन्हा एकदा
पुंजके पुंजके होउन
अस्तित्वाचा एक पुंजका
मागे ठेवून

- श्रीपाद

त्यांनी कदाचित समुद्र पाहिला नसावा

एके दिवशी
सायंकाळच्या गप्पाष्टकात
खूप वाकून पाहिले त्यांनी
माझ्या मनात;
दिसले त्यांना
खूप काही
सांडलेले, विखुरलेले
इकडे तिकडे
आश्चर्य वाटले त्यांना
आणि निराशाही;
त्यांनी कदाचित
समुद्र पाहिला नसावा

एके दिवशी पाहिले त्यांनी
माझे आकांडतांडव
माझा आक्रोश, आवेश
माझे गरजणे, बरसणे
आवेगाने फुटून जाणे
वारंवार उसळणे
अन् पुन्हा कोसळणे
त्यांना भीती वाटली
अन् चिंताही;
त्यांनी कदाचित
समुद्र पाहिला नसावा

- श्रीपाद

तसेही

आता निवांतपण
उद्या सकाळपर्यंत
कोणीही येणार नाही
जाणार नाही
उगीच एखादं कुत्र येतं
कधी कधी चुकारपणे
पण बहुधा नाहीच... ...
गात गात पहाटे येईल
झाडाखालचा चहावाला
आणि सुरू होईल वर्दळ
रात्रीपर्यंत येत राहतील लोक
आपापले हसू-आसू घेउन
घेउन जातील सोबत
आपापले असे काहीतरी
किंवा जातील सोडुनही
हाती घेतलेले हात
दबलेले निश्वास
किंवा बिस्कीटान्च्या
पुड्याचा कागद सुद्धा... ...
हसतील, बोलतील, चालतील
वाद घालतील, भांडतीलही
करतील काळजी आणि विचारपुसही
मिठीतही घेतील क्वचित
आणि निघून जातील
हात हलवत, उड्या मारत
नाही तर डोळे टिपतही... ...
सारं माझ्याच साक्षीनं;
येत राहतील गाड्याही
आणि जातील निघूनही
नाही थांबणार कुणीही
फक्त माझ्याशिवाय,
आणि पुढे केलेले हात
गुंफून घेईन पुन्हा छातीवर
रात्र झाली की;
उसासा दाबून टाकण्यासाठी
किंवा पुन्हा
दणकटपणे उभे राहण्यासाठी
... ... ... ... ...
तसेही फलाटाला
उभे राहावेच लागते ना !!!

- श्रीपाद

भोवरा

शांतपणे वाहते रेवा
परवीनच्या `रजनी कल्याण'सारखी
एक मडके,
त्या प्रवाहाला सोबत करीत
अस्थिकलश... कुणा एकाचा
कधीतरी नाव, रूप लाभलेला
कधीतरी नाव, रूप हरवलेला
नक्षत्रवेडा की मित्र काट्याकुटयांचा
येताना ओठभर हसू आणलेच असेल
किमान एखादीच्या चेहर्यावर
जाताना डोळाभर रडले असेल कुणी?
असेलही...
दोन-चार हाडे कुठेतरी
मिसळून जातील मातीत
अन् संपेल सारे
एका चक्राची पूर्ति ! समाप्ती !! की प्रारंभ?
झगडा, `मी' चा...
कधीपासून, कशासाठी?
कोणाच्या इच्छेने?
प्रश्नांचे भोवरे
रेवेच्या पात्रात
अतृप्त, अस्वस्थ
भोवर्यान्ना जन्म देत

- श्रीपाद

राघववेळ

शरयूच्या तीरावर
अमनस्क, अपलक उर्मिला
सरत्या दिनकराकडे पाहत
राघववेळेच्या प्रतिक्षेत
लक्ष्मणाच्या शब्दांची शाल पांघरून... ... ...
अखेर फळास आली
१४ वर्षांची प्रतिक्षा
आणि शरयूचा संग सुटला... ... ...
युगे लोटलीत
तीरावर विसावणार्या प्रत्येकाला
शरयू उर्मिलेची कहाणी सांगते,
पण आज
मौन झाली शरयू
काय सांगू या पांथस्थाला
कशी उमेद बांधू याची
कोणत्या शब्दांनी?
कोणत्या कहाणीने?
कसा शांत करू याचा जीव?
ठाऊकच होते उर्मिलेला
अन् लक्ष्मणालाही,
प्रतिक्षा आहे, फक्त १४ वर्षांची
पण...
याची प्रतिक्षा?
किती काळ?
कोणत्या उर्मिलेसाठी?
याची राघववेळा कोणाला ठाऊक असेल?
मौनपणे शरयू वाहतेच आहे... ... ...

- श्रीपाद

धावत धावत ये

ये ना गं लवकर
नको अंत पाहूस,
कालपासून अंथरलेल्या
माझ्या नयनांच्या पायघड्या
सुकून जातील बघ,
रात्रंदिवस रोखून ठेवलेले श्वास
निसटून जातील कुठेतरी... ...
ये, लवकर ये
धावत धावत ये... ...
तुझी चाहूल घेउनच तर येते
माझी प्रिया
अन् तू निरोप घेताच
निघूनही जाते,
काही घटकांची भेट
तुझी नि माझी
तिची नि माझी...
तेवढीच तर वेळ असते
माझ्या जगण्याची
कान्ह्याची बासरी ऐकण्याची
हंबरणार्या कपिलेला गोंजारण्याची,
तेवढीच वेळ असते
झुळझुळणार्या झर्याची
चिवचिवणार्या पक्ष्यांची
खळाळणार्या हास्याची,
तेवढीच वेळ असते
कुजबुजणार्या शपथांची
टपटपणार्या फुलांची
मुसमुसणार्या हुंदक्यांची
ऊसासणार्या विरहाची... ...
म्हणून ये,
धावत धावत ये

- श्रीपाद

मुक्काम

नेहमीसारखाच
आजही जाऊन आलो
त्या आंब्याखाली
संध्याकाळची वेळ साधून,
पारावर बसलो
उगाच थोडा वेळ,
थोडा हिंडलो
इकडे तिकडे,
अमनस्क रेघोट्या
उमटल्या धुळीत आपोआपच
उलट तपासणीही घेतली स्वत:चीच
थोडी पानेही चुरगाळून टाकली

असेच करतो मी
कधी कधी
स्वत:ला भेटावेसे वाटले की,
जाऊन येतो आंब्याखाली

माझा मुक्काम तिथेच आहे
तू निघून गेल्यापासून

- श्रीपाद

रांगोळी

`आई गं...!!!'
बोलता बोलता चुकून
अंगणातल्या रांगोळीवर
पाय पडला अन्
ती विस्कटली...

सकाळची रया
संध्याकाळी
पार लोपली...

`सॉरी हं',
अभावितपणे
स्वगत बाहेर पडलं...

जाऊ दे,
नको वाईट वाटून घेउस
माझं प्राक्तनंच आहे
विस्कटण;
कोणाच्या तरी पायाने
वा झाडूने,
मला नाही होत दु:ख वगैरे...

तुझं पाऊल तेवढ
नीट धुवून घे
विस्कटता विस्कटता
तुझ्या पावलाला
माझा रंग
चिकटून गेलाय बघ...

- श्रीपाद

थट्टा

दिवस सरला
संध्याकाळ झाली
आकाशरंग तसेच
नीळे, लाल, गुलाबी, भगवे
मधे मधे पांढरे पुंजके
पहाटे होते तसेच... ... ...
तूही तसाच
पहाटेसारखाच
ओरडतोही तसाच आहे
तुझी काव काव ऐकूनच तर
झोपेतून जाग आली
तू दिलेली ती सादच
दिवसभर रुंजी घालत होती मनात
त्यामुळेच दिवसही गेला उत्साहात
आशादायी पहाटेनंतर
उत्साहपूर्ण दिवस... ... ...
पण सकाळचे उत्साही रंग
आता मलूल झालेत
उदास झालेत
चित्तहारी माणूस येणार येणार
म्हणत दिवस गेला
पण काहीच खबरबात नाही त्याची,
तुला नाही कळणार ही उदासी
पण एक ऐकशील
पुन्हा नको असा ओरडूस
पहाटे पहाटे,
अशी थट्टा करू नये रे कुणाची...

- श्रीपाद

शत शत वंदन

सप्तसुरांचे एकत्रित दर्शन,
सर्व मनोभावांचे एकत्रित वर्णन,
आबालवृद्धांचे सामूहिक गुंजन,
वनी मोराचे सुंदर नर्तन,
प्रेमी जीवांचे मधुर कुजन,
देशभक्तीचे उत्कट पूजन,
मातृत्वाचे मंगल गायन,
पितृत्वाला सुरेल वंदन,
या सार्याचं वर्णन
करणारा एकच शब्द-
लता मंगेशकर,
दीदी तुम्हाला
शत शत वंदन
शत शत वंदन

- श्रीपाद

क्षणभंगुर

किती वाट पहायला लावतेस?
दिवस रात्रीला म्हणाला...
माझी अवस्था वेगळी असते का?
रात्रीने दिवसाला प्रतिप्रश्न केला...

काय गं हे नशीब आपलं?
अखंडपणे चालण, बास्...
दोघांच्याही दिशा विरोधी
तूही चालत असतेस
अन् मीही चालत असतो,
अखेरीस तो क्षण येतो
चिरप्रतिक्षित
ओढाळ, हवाहवासा
पण शापित,
त्या मधु मिलनाला
तू आपले रंगरूप सोडून देतेस
आणि मीही त्याग करतो
माझ्या रंगरुपाचा
तू रात्र नसतेस
आणि मी नसतो दिवस
अन् काही कळण्याच्या आतच
पुन्हा एकदा तू असतेस तू
अन् मी असतो मी
दोघांनाही नको असते हे `मी'पण
तरीही, स्वीकारावे लागतेच...

मिलन आणि विरह
एकाकार झालेल्या,
त्या क्षणभंगुर क्षणांची
एकमेव साक्षीदार असलेली
संध्याकाळ मात्र
खदखदत निघून जाते

- श्रीपाद

अनभिज्ञ

सकाळी उमललेली टवटवीत फुले
कोमेजून गेलीत संध्याकाळी
पाकळ्या मलूल झाल्या,
त्यांच्या शेजारीच
डुलत होत्या नवीन कळ्या

काय संबंध
मलूल फुलांचा
आणि नवीन कळ्यांचा?
परस्परांशी, झाडाशी?
एकाने मान टाकली
आणि दूसरी मान डोलावतेय

मी हात पुढे केला
मलूल फुले खुडण्यासाठी
तू म्हणालीस,
`थांब...
झाडांना हात नसतो लावायचा
सूर्यास्तानंतर
थकून भागून झोपतात ती'

त्याच वेळी मधुमालती फुलत होती
तिची फुले तोडताही येत नाहीत
आणि तोडून उपयोगही नाही
ती केवळ सुगंध पसरतात दशदिशांना
भरून टाकतात आसमंत
मधुमालतीच्या मांडवाखालून
आपण पुढे गेलो

सकाळी पाहिलं
सडा पडला होता
काल मलूल झालेल्या फुलांचा,
सुगंध पसरणार्या मधुमालतीच्या फुलांचा,
एका खराट्याची वाट पाहत
आणि डुलणार्या कळ्या
मुक्तपणे फुलल्या होत्या
संध्याकाळी मलूल होण्यासाठी,
अनभिज्ञपणे

- श्रीपाद

वाटा

याच वळणावरून
निघून गेलीस दूर
या सळसळत्या आंब्याची
सोबत मागे ठेउन
तेव्हा संध्याकाळच होती

काही शब्द उमटलेत तेव्हा
पण तेही,
मौनालाही मौन पडावे असेच

काही हुंदके दाटून आलेत
पण तेही,
काळेकुट्ट मेघ विखरुन जावेत तसे

हातांनी स्पर्श केला हातांना
पण तोही,
तार न छेडणारा- झंकारशून्य

डोळ्यात अश्रु दाटले
पण तेही,
वैषाखपात्रात चुकार ओहोळ राहून जावा तसे

असेच काहीसे
आणि काहीबाही
आंब्याच्या तळाशी

आणि मग
या आंब्यापासून दूर दूर
कोसो दूर
केवळ- संध्याकाळी दाटून येणार्या
त्या एकाकी वाटा

- श्रीपाद

अंधारवाटा

संध्येचा पदरव आला
की; दिवे साद घालतात,
पहिला दिवा लागतो आणि
म्हातारीचे हात जोडले जातात
सहज, आपोआप, अभावितपणे

हळूहळू नदीचा काठ फुलतो
चुडे किणकिणु लागतात
डोईवरचे पदर संभाळत
अन् पदराआड दिवे जपत
सुवासिनी घाटावर उतरू लागतात

किनार्यावरील मंदिरात
शंख घंटा वाजू लागतात
नदीच्या प्रवाहावर अद्भुत रांगोळी
उमटू लागते

`दूरवर जाणार्या या अंधारवाटा
उजळून टाका रे बाबांनो'
कुणी एक कोमल मनाचा
जाणता रसिक
त्या दिव्यांना सांगतो

आणि घाटावर दूर कोपर्यातल्या
वडाखाली बसलेल्या
एका जटाधारीला
अज्ञातातून एक स्वर ऐकू येतो,

`त्यागाचीही अखेर
काळोखातच होत असते
या दिव्यांसारखीच...'

- श्रीपाद

सांजभूल

पक्षी एकाच दिशेने, एकत्रितपणे
आकाशातून उडतात
कुठेही न थांबता
तेव्हा संध्याकाळ झालेली असते
तेजोभास्करही थकलेला असतो
त्याच्या तेजाचे बोचके
अज्ञातात विरून जाते...
ही निरोपाची वेळ असते
बाहेरचा निरोप घेण्याची
सावलीचाही निरोप घेण्याची,
यानंतरची सोबत फक्त
आपली आपल्यालाच...
पशु-पक्षी, झाडे-वेली,
नद्या-नाले, आकाश-पृथ्वी,
माणसेही
सार्यांच्याच निरोपाची लगबग...
व्यवहार शांत होतात
अन् निरोपाच्या या घडीला
हात देण्यासाठी
ऊगवते एक चांदणी
मनाच्या अंतर्मनात
आकाशीच्या सरोवरात पडते
तिचे प्रतिबिंब
अन् पसरत जाते सांजभूल
अवघ्या चराचरावर

- श्रीपाद

मौन राग

रोज संध्याकाळी
पक्षी जमतात झाडावर
थव्याथव्याने
अन् फांद्यांवर उड्या मारत मारत बोलतात
कधी हळूवार, कधी कर्कश्श
तो तिच्याशी, ती त्याच्याशी
ते त्यांच्याशी
कोणी; ... नाही बोलत काहीच
आणि शेवटी
सारेच मिळून म्हणतात
वेदनेची दु:खगर्भ प्रार्थना
मौन रागात ... ... ... ...

- श्रीपाद

कुट ठेऊ रे राजा...!!!

टिंग्या चित्रपटात टिंग्याची भूमिका करणार्या शरद गोयेकर याच्या आईची ही मनोवस्था. `टिंग्या'ला नुकताच चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यातील टिंग्या हा जुन्नर तालुक्यातील राजुरी या गावी पालावर राहतो. त्यांचा व्यवसाय मेंढपाळ. त्याच्या घरी पत्रकारांनी भेट दिली तेव्हा त्याच्या आईने `हा पुरस्कार कुठे ठेऊ' असा एक हळवा प्रश्न विचारला. त्याच भावना व्यक्त करण्याचा हा प्रयत्न. त्या बाजूची ग्रामीण भाषा मला माहीत नाही. पण थोडासा विदर्भातील ग्रामीण भाषेचा आधार घेतला आहे.

कुट ठेऊ रे राजा...!!!

कायची ही गडबड?
अरे, मंडळी तं आली बी
आमच्याचकडे,
औं!! काय आहे बाप्पा?
का म्हणता?
माही मुलाखत
मी टिव्हिवर दिसनार,
पेपरात छापून येनार माहा फोटो...
केवढा रे लेकरा तुहा पराक्रम!!
या बापू या
पानी घ्या,
दमून आलासा
वईच च्या टाकतो...
हे आमचं खोपट,
फोटो काडता?
काडा न बाप्पा...
हा आमचा टिंग्या,
बोल न रे बापू कई,
आज काऊन चुप झाला?
केवडा मोठा झाला रे लेकरा!!
पन, आमी तं लहानच हाओ ना!!
अरे हे तुहे एवढे पुरस्कार गिरस्कार
कुट ठेऊ रे राजा...!!!

-श्रीपाद

असाच जातो दूर कुठे तरी

असाच जातो दूर कुठे तरी
पाठीस घेउन वारा,
उनाड भटकत स्वैर उधळीतो
रक्तामधला पारा,
दिशादिशांना कवळून घेती
अल्लड पाउसधारा,
मज स्वप्नांचे दान मागती
फुलवुनी मोरपिसारा,
पिसाटलेल्या वाटा पुसती
आहे कोण बिचारा,
कडेकडेची झाडे म्हणती
नाही त्यास निवारा,
वार्यासंगे गुणगुणताना
जिवास नाही थारा,
मधे अचानक हळू खुणवितो
लुकलुकणारा तारा,
बंध तोडुनी धुंद नाचतो
आनंद असा हा न्यारा,
नकोच गुंते नको पसारा
खेळ असा मज प्यारा

- श्रीपाद 

उदास मारवा

अंधुक ओल्या अंधारातून,
आले कोण?
उत्कट गहिर्या अंतरातुनी,
उगवे कोण?
सांज कोवळी आठवणीन्ची,
सांगू कुणा?
गंधबावरी बकुळ नाजुक,
दावू कुणा?
अशाच वेळी तुझे बरसणे,
ठरलेले...
चुकचुकणारे भास दिवाणे,
विरलेले...
अशा क्षणान्ची ओंजळ घेउन,
मी उरतो...
दूर वेशीवर उदास मारवा,
तो झुरतो...

- श्रीपाद

कालजयी काळोख

कालजयी काळोखात
मार्ग शोधणारी
अस्तित्वाची घोरपड,
जीवाच्या आकांतानं
हातातली दिवटी
संभाळण्याची धडपड,
सोसाट्याचे वारे अन्
वादळाचे थैमान
उजळलेली प्रत्येक काडी
विझवून टाकणारे,
अधांतरी आशेचा दीप
पेटता ठेवण्याची ही परीक्षा
अनिच्छेनं लादलेली
क्रूर, करुणाहीन परीक्षकानं,
अन् प्रत्येक पावलावर
निखार्यान्चाच पाउस पाडणारे
त्याचेच निर्लज्ज भालदार- चोपदार,
फक्त....
फक्त काही क्षण हवी
भूमिका परीक्षकाची
अन् काकणभर अधिक शक्ती,
हा खेळच बंद होईल मग
नेहमीसाठी,
आणि सारं शांत शांत शांत
अथांग काळोखात विरून गेलेलं...

- श्रीपाद

कृष्ण

कृष्ण- अस्तित्व वर्णन
कृष्ण- विचार दर्शन
भावना नर्तन, कृष्णनाम

कृष्ण- द्रौपदी रुदन
कृष्ण- कर्णाचे(कंसाचे?) क्रंदन
कालिया मर्दन, कृष्णनाम

कृष्ण- गोपाल रंजन
कृष्ण- गोपींचे कूजन
राधेचा रमण, कृष्णनाम

कृष्ण- यशोदा नंदन
कृष्ण- योग्यांचे चिंतन
सुदामा बंधन, कृष्णनाम

कृष्ण- बासरी वादन
कृष्ण- सृष्टीचे सृजन
मनीचे स्पंदन, कृष्णनाम

- श्रीपाद

वाट कुसुंबी चालत होतो

पाऊस ओल्या संध्याकाळी
वाट कुसुंबी चालत होतो

मिटल्या ओठी , शांत लोचनी
मुके तराणे गातच होतो

आले कोणी, गेले कोणी
नोंदही नव्हती, भानही नव्हते

दिल्या घेतल्या श्वासानाही
मुके तराणे सजवित होते

चंदन वारा , सांयतारा
गोड बासुरी, मोरपिसारा

हळु पसरली तुझी ओढणी
मला मिळाला खरा निवारा
- श्रीपाद

सखे,

सखे,
काय वाटतं तुला?
फक्त सखीच
हळवी असू शकते.. असते?
कधीतरी
वेलीवरील मोगर्याला विचार,
कधीतरी
दवबिन्दुंचे हुंदके ऐक,
कधीतरी
तिन्हीसांजेला मारवा ऐक,
कधीतरी
व्याकुळलेली कविता वाच,
कधीतरी
वादळाचं पिसाटपण समजून घे,
कधीतरी
अमावास्येला चांदण्या मोजुन पाहा,
कधीतरी
कमळात लपलेल्या भुन्ग्याशी गुज कर,
कधीतरी
पावसात एकटीच फिरून पाहा,
कधीतरी
आषाढाच्या पहिल्या मेघाला विचारून पाहा,
सारेच एका सुरात सांगतील
सख्याचं कातर हळवेपण...

-श्रीपाद

सखे,

सखे,
तू तर चंदना
होय, चंदनाच...
तू म्हणजे नुसता सुगंध
दाही दिशा व्यापित
दूर दूर पसरणारा
कितीही थांबवतो म्हटले
तरीही न थांबणारा
स्पर्शाच्या शपथांची कोडी घालणारा
अंगभर लपेटून, तरीही अस्पर्शित
तनमन भरून टाकतानाच
ओंजळ रिक्त ठेवणारा
प्रेमळ लळा लावून
क्रूरपणे निघून जाणारा
फक्त एक परिमळ, मृदगंधासारखा
फक्त एक दरवळ, चंदनासारखा

- श्रीपाद

सखे,

सखे,
काय लिहू...
काय काय लिहू...
कसं लिहू...
खरं तर,
माझी सखी
हा लिहायचा विषयच नाही...
ती तर केवळ एक अनुभूति...
पण लिहू नये असंही नाही...
तुझा विषय निघाला की राहवतही नाही...
एकदा असाच अडखळलो होतो
चालता चालता
पायात काटा बोचला होता
खूप दुखत होतं, खुपत होतं
चालूच नव्हतो शकत
कसा तरी उभा राहिलो
कसला तरी आधार घेउन
बरीच मंडळी होती आजुबाजूला
सारेच सांगत होते
अगदी प्रेमाने, आपुलकीने
`अरे काटा काढून टाक'
आणि तेवढयात तू आलीस
विजेच्या वेगाने
सार्यांना दूर करीत
माझा पाय घेतलास मांडीवर
आणि अगदी हळूच
काढून टाकला तो काटा
एका टोकदार सुईने
माझ्याकडे पाहून छानसं हसलीस
मी म्हणालो, `थांक्यू'
तू प्रश्नार्थक पाहिलंस...
मी म्हणालो,
`सारे सांगत होते काटा काढायला
तू तो काढलास
त्यासाठी धन्यवाद'
माझ्या केसातून हात फिरवलास
आणि म्हणालीस,
`तुझ्यावर प्रेम करते ना म्हणुन'
आठवतं तुला???
कसं आठवणार???
कारण मला लख्ख आठवतय
हा प्रसंग घडला
अन् मी डोळे उघडले तर...
मी बिछान्यावर होतो
आणि तू प्रसन्नपणे
पहाटेच्या दवात पसरून राहिली होतीस...

-श्रीपाद

`आयला'

मान्सून अगदी छान येणार यावर्षी
वेळेच्या आधीही
कमी दाबाचा पट्टा
छान तयार झाला आहे
वारे वगैरेही अगदी
हवे तसे वाहत आहेत
गरमीचा ताप अगदी
संपून जाणार लवकर
पिकपाणी छान येणार
सगळीकडे
हिरवाई अन् आनंद...
पण, अरे...
हे काय झाले
`आयला' वादळ आले
त्या बंगालच्या उपसागरात,
त्याने सगळ्या दिशाच बदलून टाकल्या
हवेच्या, वार्याच्या
मान्सून गेला पलुन
आता पाहायची वाट पुन्हा...
म्हणजे,
माझ्या आयुष्यासारखंच की,
नेहमीचच,
आनंदाचा मान्सून येणार येणार म्हणताच
कुठले तरी `आयला' येणार
आणि त्या सुखमय जलदांना
पळवुन लावणार...
बस, एवढच आणि असंच घडलंय...

-श्रीपाद

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१३

अजन्मा



अस्वस्थ वाटांचा
अज्ञात प्रवास
अज्ञाताकडेच

अविकारी मनाने
आसमंत निरखीत
अमर्याद

अस्फुट किंकाळी
आदिभयाची
अजन्मा

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १९ नोव्हेंबर २०१३

सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

ऋतुवेगळे प्रहर

ऋतुचक्र
फिरतेच आहे,
ऋतुरंग
पालटतच आहेत,
ऋतुगंध
दरवळतोच आहे,
ऋतुलीला
बहरतेच आहे,
ऋतुगाणे
फुलतेच आहे,
ऋतुविभ्रम
नाचतच आहेत,
पण
सारे काही
भिंतीवरल्या चित्रासारखे...
जगण्याचे
ऋतुवेगळे प्रहर होऊन

- श्रीपाद कोठे
नागपूर

अंत्ययात्रा... स्वप्नांची...

मी पाहिले स्वप्नांना
तडफडताना
मन विदीर्ण करणारी
त्यांची घालमेल
चिरंजीव व्रण उठवणारी
त्यांची असहाय्य धडपड
अपघाती मृत्युनंतरचे
त्यांचे तुकडे गोळा करून
अंत्ययात्राही काढली
तुकड्यांच्या त्या गाठोडयाची
पण,
ते गाठोडे सरणावर ठेवले
अन् क्षणार्धात
चुड लावण्यापूर्वीच
जाउन बसले ते
उडी मारून
शेजारच्या चिंचेवर...
विषण्णपणे परतलो
अन् स्वप्नांच्या कलेवराचे
ते गाठोडे
पुन्हा हातात तयार...
वारंवार प्रयत्न केला
आयुष्यभर, रोज
प्रत्येक क्षणी
पण, प्रत्येक वेळी
सारे काही तेच आणि तसेच
सरणावर ठेवताच
उडून चिंचेच्या झाडावर
आणि परत येताच
पुन्हा हातात तयार...
काळाच्या दयेने
माझीही अंत्ययात्रा निघाली
अंत्यसंस्कार झाले
थडगेही बांधले गेले
आणि त्या चिंचेच्या झाडावरील
स्वप्नांच्या कलेवराचे गाठोडे
शेजारी येउन बसले
मलूलपणे, निमूटपणे...

- श्रीपाद कोठे
नागपूर

ग्रेसला

कवीवर्य ग्रेस यांचा आज (१० में) वाढदिवस. आज (१० में २००९ रोजी) ते ६८ वर्षांचे झाले. त्यानिमित्त-


तू गाणी गातोस संध्याकाळची
रंगबिरंगी उदासीची
क्षितिजे भेदून जाणार्या नजरेनी
न्याहाळतोस तलम पापुद्रे
माणसांचे, विचारांचे, भावनांचे
या समग्र अस्तित्वाच्या कोलाहलाचे
भयकंपित मनाने खोदतोस
विराट लेणी शब्दांची
अन् मुक्काम ठोकतोस
निबिड अरण्यातल्या
अलक्षित अंधारगुहेत
... ... ... ... आणि
विदीर्ण झालेले आम्हीही
घेतो, तुझ्या पदचिन्हांचा मागोवा
अनाम ओढीने,
अनसूय अजाण भाबडेपणाने
अंधाराच्या, अज्ञाताच्या
अनावर आसक्तीने
... ... ... ... म्हणूनच
थांबू नकोस
चालत राहा
जड झालेल्या अधीर पावलांनी,
आमच्या शापित अस्तित्वाला
करुणेचे दयार्द्र चंदनलेपन करण्यासाठी...

- श्रीपाद कोठे
नागपूर

नवलकथा

नवलकथा ऐकवतोय
एका झाडाची
या झाडाने म्हणे,
एका पांथस्थाला
एक निवाराच मागितला
सावली हवी म्हणून...
एकाला तर चक्क
म्हणाले हे झाड़
की बाबा,
मला फिरायलाच घेउन चल
खूप कंटाळून गेलो आहे
एकाच जागी...
आणखीन एकाच्या तर
इतकं मागे लागलं
काय तर म्हणे,
माझ्याशी बोलतंच जा
माझ्याशी कोणी बोलत नाही...
त्या झाडाच्या
अशा विचित्र मागण्या ऐकून
त्याखाली विसावणारे सगळे
आता त्याला सोडून
गेले म्हणतात दुसरीकडे,
आणि बरं तर बरं
त्यांनी एकमताने
एक ठरावही केला की,
या झाडाला वेड लागलंय,
त्याला कुठे अधिकार असतो का?
असं काही मागायचा,
त्याने फक्त देतच राहायचं असतं,
वगैरे वगैरे...

- श्रीपाद कोठे
नागपूर

अंगणातलं स्वप्न..!??

अंगणातलं स्वप्न..!??
अं हं... छे छे...
स्वप्नच, पण डोळ्यातलं
ज्याला अंगण नाही असं
क्षितिजापार पोचणारं
आभाळालाही कवेत घेणारं
दुर्दम्य सागरलाटांचं
झुळझुळ वाहणार्या सरितेचं
विराट सिंहगर्जनेचं
आणि कोकीळ कूजनाचं
एकांतातील कोलाहलाचं
आणि कोलाहलातील एकांताचं
आत आत बुडी मारत
उसलळून एव्हरेस्ट गाठणारं
उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहणारं
आणि स्वप्नातून खाडकन जागं करणारं
तुझं स्वप्न-
कुंपण न ओलांडताही
विश्वप्रदक्षिणा घालणारं...

- श्रीपाद कोठे
नागपूर

निरोप

वातावरण कसं प्रफुल्लित झालंय आज
वसतिगृहाची झाडझुड, स्वच्छता
कालपासूनच सुरू झालीय
आज मोठे पाहुणे येणार आहेत ना !!
मागच्या, पुढच्या, बाजूच्या आंगणात
छान पाणी शिंपडलंय
मघाशी त्या वडाखाली काय छान वाटत होतं...
सनई लागली आहे,
खूप सारी फुलं लावली आहेत
गुच्छ ठेवले आहेत
त्यांचा सुवास किती गोड वाटतोय
सगळी मुलं, मुली तयारी करताहेत
गणवेषाची इस्त्री, बुट-मोजे, वेणीफणी
सगळी लगबग चाललीय
खूप आनंदात आहेत सगळे
अन् छोटसं दु:खही
आनंद आणि दु:ख एकत्रच
कारणही एकच दोन्हीसाठी
आज आमचा कान्हा चाललाय
आमच्यापासून दूर, आम्हाला सोडून...
वेळ काय घालवतोय मी
तयार व्हायचय लवकर
आज मंचावर जायचंय मला...
आले, आले, पाहुणे आले
टाळ्यांचा कडकडाट झाला
स्वागतगीत छान म्हटलं या मुलींनी
बाईंनी परिचय करून दिला पाहुण्यांचा
स्वागतही झालं
सरांनीही सांगितलं आजच्या कार्यक्रमाबद्दल
आता माझी पाळी
बाईंनी माझं नाव पुकारलं
मी मंचावर चढलो
गुलाबांचा पुष्पगुच्छ
आणि शर्ट-प्यान्टचा डब्बा
कान्ह्याला दिला,
म्हटलं- हे तुझ्यासाठी
आम्हा सगळ्यांकडून,
मिठीच मारली त्याने मला,
मला पाठीवर उष्ण ओलावा जाणवला
मी बाजूला झालो हळूच...
कान्हा उभा राहिला
मनोगत व्यक्त करायला
आणि बोलू लागला-
`मित्रांनो,
कितीतरी वर्षं झालीत
मी तुमच्याबरोबर राहत होतो
आता नसेन तुमच्याबरोबर
मला सगळं आठवतंय
फिरायला जाणं, दंगामस्ती, मारामारी
खाणंपिणं, गाणी म्हणणं,
चोरून आंबे खाणं,
आजारी पडणं,
आपल्या बाई, आपले सर
आणि तुम्ही सगळे...
पण आज एक नवीन रस्ता
आलाय माझ्यासमोर
आता तोच माझा रस्ता
म्हणून साथ सुटणार तुमची
पण, त्याच रस्त्यावरून
मी परत येत जाईन
दर आठवडयाला, तुम्हाला भेटायला
आणि तुम्हाला सांगेनही
खूप काही,
आपल्या या होस्टेलबद्दल
तुम्ही दिलेल्या या फुलांबद्दल
आणि
मला दृष्टी देऊन सृष्टिची कवाड उघडणार्या
त्या डॉक्टरांच्या, त्या देवदूताच्या हातांबद्दल
मला दृष्टी देणारा तो दाता तर
ही सृष्टी सोडून केव्हाच निघून गेलाय
आपण सारे त्याच्यासाठी
टाळ्यांचा कडकडाट करू या...!!'

- श्रीपाद कोठे
नागपूर

उदास उजेड


संध्याकाळ झाली की,
उदास उजेड
चालून येतो माझ्यावर
आणि नि:शस्त्र, असहाय्य सैनिकाला
पराभूत केल्याच्या थाटात
निघून जातो पुढे
पुन्हा परतून येण्यासाठी...
त्याचे एकेक अस्त्रही जहाल असते
ब्रम्हास्त्रासारखे,
कधी असतो
शेतातून परतलेला बैल
गोठ्यात बांधलेला, एकटा
धपापणारा, तोंडातून फेस गाळणारा...
कधी असतो एक मुलगा
१०-१२ वर्षांचा
ज्याच्या डोळ्यात असतो संगम
अस्ताचलावरील सूर्याचा आणि
जन्मदात्या मातेच्या चितेचा...
कधी असतो थवा पक्ष्यांचा
आंब्याच्या, कडुलिंबाच्या, शेवग्याच्या
वा कुठल्याही झाडावरचा
ज्यांच्या कंठातून
कलकलाटाच्या रुपाने निघत असते
कालवाकालव अंतरातली...
किंवा कधी कधी
रेल्वेच्या प्रवासात
खिडकीतून पाहिलेली
बाया- माणसे- मुले
आपापल्या झोपडीच्या
दारात, अंगणात बसून
निरोपाचे हात हलवणारी
प्रवाशांकडे पाहून...
... तू देखील
अशाच संध्याकाळी
निघून गेली होतीस नं
मला,
उदास उजेडासोबत सोडून...

- श्रीपाद कोठे
नागपूर

नचिकेता

प्रश्न पडू द्या प्रश्न
मला, तुम्हाला, यांना, त्यांना
सगळ्यांना पडू द्या प्रश्न
लाखो, करोडो प्रश्न
अभेद्य खडक फोडणारे,
मनोसागराचा तळ गाठणारे...
डोंगरमाथ्यावर भटकणारे
मनाच्या गुहेत लपणारे...
रानावनात बागडणारे
मनाच्या बागेत विहरणारे...
रंगीबेरंगी फूलपाखरांसारखे
आणि काळेकभिन्न रानटी...
बासरीसारखे मधुर
तसेच रणवाद्यांचा कल्लोळ उठवणारे...
खडीसाखरेच्या मधुरतेबरोबरच
मिरचीच्या झणझणित ठेच्यासारखे...
उत्तरांचे साचे फेकून देऊन सत्याचा शोध घेणारे
नचिकेत्याच्या आत्मशोधासारखे...

- श्रीपाद कोठे
नागपूर

मृगजळ

वाट फुटेल तसा
चालत होतो,
दिशाहीन पावलांना
मातीत रुतवत
भटकत होतो
नि:संग, अमनस्क !!
अचानक कुठुनशी साद आली
अनाम, अनोळखी...
मान वळवली तर तू
दूर उभी राहून खुणावत होतीस
म्हणालीस-
ये असाच सरळ रेषेत
पोहोचशील माझ्यापर्यंत !!
माझ्या मनात मात्र संभ्रम...
हळूहळू तू आलीस
माझ्याजवळ
हळूच आपला हात लांबवून
स्पर्श केलास आणि
परतून चालू लागलीस...
पुन्हा जाऊन उभी राहिलीस
जुन्याच जागेवर अन्
घातलीस साद
मी पाऊल टाकलं
तुझ्या वाटेवर
एक, दोन, तीन आणि असंख्य...
दिशाहीन पावलांना
गवसली दिशा
मनाला संग लाभला तुझा...
पण काय?
ओळखीच्या स्थानी पोहोचतो तर
तू गायब
मधेच दिसतेस, खुणावतेस
मी पुढे येतो
तू गायब...
हा कसला खेळ
जीवघेणा
मृगजळाचा...!!!

- श्रीपाद कोठे
नागपूर

ज्वालामुखी

वर्षं झालं
अजूनही आईच्या डोळ्यातलं
पाणी सरलं नाही
बाबांची शून्य नजर स्थिरावली नाही
येणारे जाणारे सुरूच आहेत
त्यात- भाऊ बहिणी आहेत,
नात्यागोत्याचे आहेत,
मित्र मैत्रिणी आहेत
आणि पोलिस अधिकारीही
पण सारेच चेहरे भकास...
पण आज असह्य झालं
आई आली चहाचा कप घेउन
आणि फेकून दिला मी
तिच्या हातातला कप
थरथरत उभी राहिली
कितीतरी दिवसांनी आज पहिल्यांदाच,
लाखो ज्वालामुखी डोळ्यातून सांडत होते
अन् जिभेचा पट्टा सुरू झाला
- दांडपट्ट्यासारखा,
... नको मला काही
नको तुमचं खाणंपिणं
काळज्या करणं
तुमचे मायेचे हात
आणि तुमचा अश्रुपात,
निघून जा
आणि कृपा करून बंद करा
ते संतत्वाचे षंढबोल...
माझ्यासाठी दु:ख करताहेत म्हणे !!
अरे एकही माईचा लाल नाही तुमच्यात
माझ्या पाठीवर मायेचा
हात फिरवतात म्हणे...
थू:,
एखाद्या हाताने सुरी फिरवली असती ना
त्या नराधमाच्या गळ्यावर
तर न फिरवताही
मायेचे शतसहस्र हात
फिरले असते पाठीवरून...
माझ्या हृदयातल्या लाखो ज्वालामुखींपैकी
एखादी ठिणगी तरी तुमच्या डोळ्यात
दिसली असती तर
दाह किंचित कमी झाला असता, कदाचित...
अरे बलात्कार कोणावर झालाय,
माझ्यावर की तुमच्यावर??
माझ्यावर आपबिती ओढवली
तेव्हाही मी प्रतिकार केला रे,
ओरबाडलं नखांनी
दातांनी चावे घेतले
जे शक्य झालं
ते सारं केलं प्रतिकारासाठी,
माझी शक्ती कमी पडली...
पण तुम्ही??
तुम्ही तर काही न होताच
लुळेपांगळे झालात...
छि:,
लाज वाटते मला तुमची,
आता मलाच निघायला हवं
नराधमाच्या नरडीचा घोट घ्यायला
आणि तुमच्या षंढत्वाची चिता रचायला...

- श्रीपाद कोठे
नागपूर

अभिनय

आभासी जगण्यात
अर्थरंग भरण्याचा
अभिनय...

अशांत मनाची
अवस्था लपवण्याचा
आटापीटा...

अद्भुताच्या दिशेला
आशाळभूत नजर
अनावर...

अंतरीचे भकासपण
अखंड जाळणारे
अनिर्बंध...

असहाय्य तडफड
अस्तित्वासाठी
अकारण...

आयुष्यरेषेला शाप
अनादि उदासीचे
अबोलपणे...

असण्याचे सोहळे
अचेतनाचे
अर्धवट...

अ आ इ ई उ ऊ
असेच काहीतरी
अकल्पित...

- श्रीपाद कोठे
नागपूर

माझ्या मनात मनात

माझ्या मनात मनात
शिळ कवितेची घुमे
तिच्या ओळीओळीतून
तुझे पाऊल वाजते....!

तिच्या ओळीओळीतून
चंद्र चांदणे सांडते
माझ्या मनी अलगद
तुझे पाऊल वाजते....!

माझ्या मनी अलगद
आली कशी तू भरून
कुंदकळ्या वेचताना
तुझे पाऊल वाजते....!

कुंदकळ्या वेचताना
तुझी मूर्त ती बावरी
अलवार स्वप्नामधी
तुझे पाऊल वाजते....!

अलवार स्वप्नामधी
नको शपथ तू घालू
जन्मभर डोळ्यामध्ये
तुझे पाऊल नाचते....!

- श्रीपाद कोठे
नागपूर

सूर्यमार्गाचा प्रवास

ठाऊक आहे मला
खडतर आहे हा रस्ता
खडतर रस्ता कसला,
समरांगणच ते
सतत जळायचं एवढच
अग्निमय अस्तित्वाचंच हे चालणं
वार्याची झुळूक, तरूंची छाया
या मार्गावर नसणारच
जलदांचीही वाफ करून टाकणाराच हा रस्ता
कोणी धन्यवादासाठी
हात हाती घेतो म्हटले तरी अशक्य
तमभरला गारठा दूर सारून
जीवनाची ऊब तयार करणं
हेच माझं नियत कर्म
आणि त्यासाठी जळत राहणं हेच प्राक्तन
पर्याय तरी कुठे आहे माझ्याकडे अन्य
हा मृत्युंजयाचा आत्मयज्ञ
हा सूर्यमार्गाचा प्रवास
स्वत: स्वीकारलेला, की लादलेला?
समाधानाचा की जुलुमाचा??
हा त्याग की आहुती???
चला, चला...
विचार कसला करतोय,
मला थांबता नाही येत...!!!

- श्रीपाद कोठे
नागपूर

पावा

कुणी तरी हाती ठेवला
आयुष्याचा पोकळ पावा
आणि म्हणाले-
घे, हे तुझ्यासाठी...
हरखून गेलो
ते नळकांड हाती पडताच,
आणि ओठी लावून
मोठ्याने फूंक घातली
आवाज आला भसाडासा
मौज वाटली
पुन्हा घातली फूंक
पुन्हा भसाडा आवाज
खूप टाळ्या पिटल्या...
आणि मग छंदच लागला-
फूंक घालण्याचा,
कधी हलकेच, कधी जीव तोडून
जशी फूंक तसा आवाज
हेही उमगू लागले,
छिद्रांवर बोटे फिरली
स्थिरावली
फुंकरीनेही आधार शोधले
त्या पोकळीत
चाचपडत चाचपडत
आधार घेत घेत
उभी राहिली सरगम,
मग त्या स्वरांचे खेळ
कधी हा पुढे कधी तो पुढे
कधी एक खाली कधी दुसरा वर
हे गाणे असते याचीही उमज पडू लागली
कान आणि मन सुखावू लागले
आणि अकस्मात्
पोकळी भेदून काही तरी आत शिरले
तडा गेला पोकळीला
मग सारेच काही निराधार झाले
... ... ... ... ...
आताही फुंकर घालतो
स्वर चिरके उमटतात
पावसाळी रातकीडयान्ची
कर्कश्श किरकिर जणू
फुंकरीमागची ताकद वाढली की
कर्कश्शपणाही वाढतो
आता टाळ्या नाही पिटत
आता फक्त समजावतो- स्वत:ला,
पोकळीलाही तडा जातो,
पोकळीलाही तडा जातो बरं...

- श्रीपाद कोठे
नागपूर

तो,

तो,
फक्त कापुराचा भास
सुमनांचा सुवास
मायेचा ध्यास
आणि तुझा श्वास...

तो,
फक्त असण्याचे नाव
नसण्याचे भाव
जीवनाचा डाव
आणि तुझा पडाव...

तो,
फक्त अभावांची साद
अव्यक्ताची याद
अतृप्तीची ब्याद
आणि तहान अमर्याद...

तो,
फक्त नसण्याची कला
रिकामा झुला
ओसाड मळा
आणि अंतरीचा लळा...

- श्रीपाद कोठे
नागपूर

आताशा,

आडोसा दूर नको करू
अंधार पळून जाईल ना
आताशा, उजेड नाही दुडदुडत येथे...

आवाज नको देऊ
आभास विरून जातील ना
आताशा, पावा नाही गुणगुणत येथे...

आठवण नको काढू
अजाणता उचकी लागते ना
आताशा, प्राजक्त नाही बहरत येथे...

ओळख नको दाखवू
ओठी सरगम येईल ना
आताशा कोकिळ नाही गात येथे...

अलगद स्वप्नी नको येऊ
अंतरी डोह डहुळतात ना
आताशा, किनार्यांचा भरवसा नाही येथे...

ओंजळ नको भरू पूर्ण
ओसंडून वाहील ना
आताशा, नेत्रांना पूर नाही येत येथे...

आसमंती नको विहरुस
आसमानी रंग खुलतील ना
आताशा, इंद्रधनू नाही फाकत येथे...

अत्तर नको लावू
अलवार गंध पसरतील ना
आताशा, चंदनही शांतवत नाही येथे...

- श्रीपाद कोठे
नागपूर

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा सावरतोय
स्वत:ची लक्तरे,
नवा तडाखा बसलाय ना,
कोणीतरी बसतो मानगुटीवर
म्हणतो- जीव दे
कधी असतो कसाब
कधी रामलिंग राजू
देऊन टाकतो मी- जीव,
कारण मी?
मी तुझाच अंश ना?
निर्गुण, निराकार
दु:ख नाही, वेदना नाही
शांति शांति शांति...
जातात जीव, जाऊ दे
लुटतात तिजोर्या, लुटू दे
चौकशा करू
निवाडा करू
अपराध्यांना शिक्षा करू
सच्चिदानंदी शांतपणाने...
शेवटी पापाचा घडा भरायला हवा ना
शंभर पापे झाल्यावरच होईल ना
शिरच्छेद शिशुपालाचा...
वा रे सौदागर
एका डोक्यासाठी
शंभर डोकी हवीत तुला,
पहिल्याच पापाला का रे
घालत नाहीस घाव?
न पेक्षा
एकदा मोठ्या मनाने
देऊन टाक ना
स्वत:च्या षंढत्वाचा कबुलीजबाब...

- श्रीपाद कोठे
नागपूर

अवसेचे चांदणे

अवसेचे चांदणे
अंगभर लपेटून घेतले
अशांत जाणिवा उफाळून आल्या
अतीताचे बोट धरून

आभाळभर पसरलेली
अनादि अस्तित्वाची लुकलुक
अमर्याद सौंदर्याची उधळण करीत
ओठंगून उभी होती

अढळ ध्रुवतार्याचा ताठा
अजिंक्य योद्ध्यासारखा
अभ्राच्छादित मनाला
आव्हान देत होता

आठवांचा महापूर आला
ओठांवर लकेर घुमली
आयुष्याची वळणे आठवून
आसवांनी दाटी केली

अंधारावर रेखलेली
अनमोल नक्षी
अभयदान देत होती
अस्वस्थ हुंकारांना

अविनाशी चेतना
ओरडून ओरडून सांगत होती
अवसेला टाळू नको
अंधाराला भिऊ नको

- श्रीपाद कोठे
नागपूर

अद्वैत साधायचंय मला

अद्वैत साधायचंय मला
आपलंच आपल्याशी

अस्तित्वाच्या गाभार्यात
अरुपाचं रुपाशी

आनंदाचा मुखवटा घालणार्याचं
आसवांची सोबत करणार्याशी

अंधारगुहेत हरवलेल्याचं
आकाशझेप घेणार्याशी

अनवट वाटा चालणार्याचं
आर्त टाहो फोडणार्याशी

असाध्य स्वप्ने पाहणार्याचं
अचानक कोसळून पडणार्याशी

अपूर्व मानसचित्रांचं
अनाकलनीय वास्तवाशी

अमानुष मानसक्रीडेचं
अजोड रसिकतेशी

अहंकारी पौरुषाचं
अलिप्त मार्दवाशी

अडखळणार्या शब्दांचं
अल्लड भावनांशी

अंगाईच्या स्वरांचं
आभामयी बंदीशींशी

आभासी जगण्याचं
आशयघन जीवनाशी

अद्वैत साधायचंय मला
आपलंच आपल्याशी

- श्रीपाद कोठे
नागपूर

अबोल पाखरे

अंतहीन वेदनेचा
अमूर्त क्रूस खांद्यावर ठेवून
आल्या पावली परतलीस...

आभाळचांदणे गात्री पेरून
आषाढफुलांची परडी हाती ठेऊन
अवघड वाटेवर आणून सोडलंस...

अतर्क्य भूतकाळाचं बोट धरून
अनंत भविष्यकाळ पसरलाय
अजस्र वाळवंटासारखा...

आठवांची माळ गुंफून
आगमनाची वाट पाहतो
आसवांच्या सोबतीने...

अग्निफुलांची वर्षा झेलत
अभावांची गीते गात
आळवणीची सतार छेडतो...

आकाशगामी आयुष्यरथ
अष्टदिशांनी चौखूर उधळलाय
अभावितपणे...

ओढाळ मनाची
आवर्तनावर आवर्तनं
अनाहूतपणे चालणारी...

अंधारकोठडीच्या बंद दारावर
अविराम धडकणारी
अबोल पाखरे जणू...!!!

- श्रीपाद कोठे
नागपूर

अस्तराची मोजडी

अचानकपणे तुझं येणं
आयुष्यभर पसरून राहणं
अनवाणी पावलांना जणू
अस्तराची मोजडी घालणं,
अकाली पावसासारखं गाठलंस
आनंदाचं झाड रुजवलंस
ओंजळीत दव साठवून
अलगदपणे फुलवलंस,
आली आली म्हणत होतो
आत आत गात होतो
आता पुन्हा कधी येईल
असाच ध्यास घेत होतो,
आरपार घुसलीस एकदम
अभावितपणे मुरलीस चटकन
अळतारेखल्या पावलांनी
आरस्पानी हसलीस खुदकन,
ओठ दुमडून म्हणलीस एकदा
असेल काय ऋणानुबंध
आपण दोघे कोण कुठले
असाच राहो भावबंध,
अशीच एकदा हळूच आलीस
अलवारपणे डोळे झाकलेस
अंगणी चंदनसडा शिंपलास
आसमंती प्राजक्त उधळलास...!!!

- श्रीपाद कोठे
नागपूर

अंतरातला काहुरजाळ

अंतरातला काहुरजाळ
अनावर उफाळला
अंधारभरल्या विश्वाच्या
आदिभयासह नृत्य करीत,
अक्राळविक्राळ थैमान घालीत
अचकट विचकट हास्य करीत
असभ्यतेचा हात धरून
असह्य वणवा पसरित,
अबोध सहनशीलता
अन्यायाच्या टाचेखाली चिरडली
अस्तित्वाचा पोरखेळ झाला
अन् मर्यादा अमर्याद झाली,
अग्निज्वाला धडाडल्या
अणुस्फोटांनी चिंधड्या उडवल्या
अगणित ज्वालामुखी जागे झाले
असाधारण समूर्त होऊ लागले,
अनिलाची झुळझुळ मालवली
आल्हादस्वर दुभंगले
अंशुमानाची तेजस्वी किरणे धुरकटली
आदिनाथाचे तांडवही उणावले,
अनिकेत
अनिर्बंध
असहाय्यतेने
अविनाशही हादरला...

- श्रीपाद कोठे
नागपूर

असंभवाचा गर्भसंभव

अज्ञाताच्या महाद्वारातून बाहेर पडलो
असीम ऊर्जेसह,
अनादि जिगिषेने
अथांग सागरात झोकून दिले,
अनाम बंधने स्वीकारून
अकारणच पोहत राहिलो,
अजेयाचा छंद घेउन
अनामिक संघर्ष केले,
अनिर्बंध क्रौर्याला
असाध्य प्रेमाने मात दिली,
अगोचर कोमलतेची
असफल आहुति दिली,
अनिमिष निमिषांचा
अगाध ध्यास घेतला,
अतृप्तीची शाल पांघरून
अखंडाची चैतन्यशलाका उजळली,
अव्यक्ताची खिल्ली उडवित
अज्ञानाची मशाल पाजळली,
अर्ध्यावरून नजर वळवली
अनंत योजने दूर होतो
आरंभाच्या क्षणापासून,
आता फक्त प्रतीक्षा
असंभवाच्या गर्भसंभवाची
अश्रापसी...!!

-श्रीपाद कोठे
नागपूर

नका नका रे दु:खांनो

नका नका रे दु:खांनो
नका सोडुनिया जाऊ
तुमचाच साथ मला
नका एकला ठेऊ...

आजवरी संभाळले
धीर दिला दोन्ही हाते
सोबतीला येउनिया
वाट दावी सवे सवे...

कधी केला ना कंटाळा
थकव्याचा ना देखावा
आज का रे आठवला
सवंगड्यांचा मेळावा...

तुम्हीच रे माझ्यासाठी
ठाव्या नाही दूजा गाठी
अर्ध्यावर कुणा पुसू
येता का रे माझ्या पाठी...

थांबा ना रे दु:खांनो
तुमचीच याद येते
सुखाच्या रे सोबतीने
क्षणभरी न गमते...

तुम्हाही का झाले आता
माझे असणे नकोसे
आण परी तुम्हा माझी
सवे माझ्या येण्यासाठी...

- श्रीपाद कोठे
नागपूर

वेडे कुठले...

खूप दिवसांपासून
आसवे मागे लागली होती,
आज तर हट्टच धरून बसलीत-
`आम्हाला बाहेर यायचंय,
वहायचंय'
खूप झटापट झाली,
मग म्हणालो,
`बरं या !'
खूप आनंद झाला त्यांना
उड्याच मारल्या बेट्यांनी
मग म्हणाली,
`अरे पण खांदा कुठे
आम्हाला वाहायला?'
क्षणभर विचार केला,
मान झुकवली आपल्याच खांद्यावर
आणि म्हटलं- `वाहा'
मनसोक्त वाहिलेत बेटे...
वेडे कुठले...

-श्रीपाद कोठे
नागपूर

मनामनातील स्वरयोग्याला...

पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. जीवनातील अभिजाततेवर प्रेम करणार्या सार्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. एखाद्या गोष्टीसाठी आयुष्य वाहून घेणे ही सामान्य बाब नाही. अशी माणसं दुरापास्त असतात.


हा सत्कार आहे
स्वरांच्या सरितेचा
सुरांच्या सागराचा
संगीताच्या कैलासलेण्याचा...
हा सत्कार आहे
प्रदीर्घ तपश्चर्येचा
अखंड साधनेचा
महान ध्यासाचा...
हा सत्कार आहे
देहुच्या तुक्या वाण्याची
अभंग वाणी
आपल्यापर्यंत पोहोचवणार्या आवाजाचा...
हा सत्कार आहे
तुम्हाला मला
नादब्रम्हाचे वेड लावणार्या
स्वरभास्कराचा...
हा सत्कार आहे
सच्च्या सुरांचा
अभिजात कलेचा
अरूप सौंदर्याचा...
हा सत्कार आहे
दमदार माणसाचा
अतुल्य सामर्थ्याचा
भीमसेनाचा...
हा सत्कार आहे
गायकाचा
वैष्णवाचा
माणसाचा...
हा सत्कार आहे
मिले सुर मेरा तुम्हारा सांगत
करोडो मनांची तार छेडणार्या
मनामनातील स्वरयोग्याचा...
अभिवादन... अभिवादन... अभिवादन...

- श्रीपाद कोठे
नागपूर

मुखाग्नि मागतेस?

मुखाग्नि मागतेस?
देईन, ..... देईनही...
पण, त्यावेळी मी चितेत उभा असेन
हे लक्षात असू दे
जीवाचं पाणी पाणी झालं असेल
डोळ्यातून गंगा, यमुना, सरस्वती वाहत असतील
तरीही विझणार नाही माझी चिता !
एकच करशील?
मृगाची एक धार होऊन येशील?
शेजारच्या नदीतून वाहशील?
माझी रक्षा त्यात विसर्जित होईल
आणि मी तुझा हात धरून निवांत होईन
अनंताच्या प्रवासासाठी, निर्धास्तपणे...

- श्रीपाद कोठे
नागपूर

स्वयंभू

फटाक्यांचे आवाज थांबलेत आता,
पूर्णपणे...
कचरा पडलाय सर्वत्र
बारूदही निर्जीव, निकामी...
फुलांच्या माळाही सुकल्या
उद्या वाळतील
परवा निर्माल्य कचरापेटीत...
रांगोळीचे रंग सुस्तावलेत
माणसांच्या, बायांच्या वावराने विस्कटलीही
उद्या झाडूचा एक फटकारा, बस...
शुभेच्छांचे आवाजही विरलेत
विस्मृतीतही जातील लगेच
उद्या पहाटे अस्तित्वहीन...
अंगणातल्या उदास पणत्या
भरलेलं तेल संपलय
ज्योती विझून गेल्या...
सर्वत्र निस्तब्धता
मनातल्या अनाम अनादी
स्वयंभू अंधारासारखी...

- श्रीपाद कोठे
नागपूर

तोडीच्या प्राजक्तस्वरांचा

तोडीच्या प्राजक्तस्वरांचा सडा शिंपित
भूपाळीची प्रसन्न रांगोळी रेखित
भटियारचे मंगल तोरण बांधित
दिवाळी दारोदारी येवो...
आसावरीशी फुगडी खेळत
सारंगाचा पाहुणचार घेत
दिवाळी घरोघरी बागडो...
यमनाची पूजा करीत
केदाराचा शंखनाद घुमवित
पुरियाचा घमघमाट पसरित
दिवाळी घरोघरी नांदो...
मारव्याची हुरहुर लावून
मालकंसाची धुंदी चढवून
हंसध्वनिचे रेशीम चांदणे पसरून
दिवाळी निरोप घेवो...

- श्रीपाद कोठे
नागपूर

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१३

हे जिवंत वारे न्यारे

हे जिवंत वारे न्यारे
या जिवंत पाऊसधारा
मनात अलगद शिरला
मृदगंधी विंधणवारा...

हे जिवंत हिरवे रान
या जिवंत बावर्या हरिणी
मनी सहजी उगवून आली
आरसपानी सजणी...

हा कोसळ चैतन्याचा
हा परिमळ पार्थिवतेचा
दोहोंच्या अपार आवेगाला
सृजनाचा मार्दव झेला....

- श्रीपाद कोठे
नागपूर

कशी होतीस गं आई तू ?

सांजवेळी तुळशीजवळ
दिवा लावताना,
दुडू दुडू धावणार्या पिल्लामागे
घास हाती घेउन पळताना,
दारात लेकरांची
वाट पाहत उभी असताना,
देवघरातल्या समईच्या प्रकाशात
मंद हसताना,
स्वयंपाकासाठी भाजी चिरताना,
बक्षीस मिलालेल्या पाडसाला
मिठीत घेउन गालगुच्चा घेताना,
... असं खूपदा पाहिलंय तुला
कथांमध्ये,
कादंबरीत,
कवितेत,
चित्रपटात,
आणि आजूबाजूलाही...
पण खरंच
कशी होतीस गं आई तू ?

- श्रीपाद कोठे
नागपूर

मामा! रे मामा...

इस्रोने चांद्रयान पाठवले होते. विज्ञान, तंत्रज्ञान, कर्तृत्व हे सगळे विषय तर आहेतच. सगळ्यांची मान ताठ व्हावी असाच हा पराक्रम होता. पण चंद्राशी आपणा भारतीयांचे त्याहूनही अधिक घट्ट नाते आहे. तो आपला चंदामामा आहे. चांद्रयानाच्या निमित्ताने या मामाला भेटण्यासाठी आपला भाऊच जातो आहे जणू. थोडंसं तसंच काही.

मामा! रे मामा...

मामा! रे मामा
आमचा एक भाऊ येतोय
तुला भेटायला
आमची सगळ्यांचीही
खूप इच्छा आहे रे
तुला भेटण्याची
पण तू कुठला भेटायला?
तुला दुरूनच पाहतो
तूही पाहतोस
हळूच हसतोस
हात हलवतोस
डोळे मिचकावतोस
कधी लपून बसतोस
कधी हरवून जातोस,
आपण भेटलेलो मात्र नाही !
आईला विचारलं तर म्हणायची,
अरे, तो मामा आहे ना तुमचा
तुमची काळजी घेतो तो
तुमच्यासाठीच सतत काम करतो
फिरत राहतो
तुम्हाला सोबत करतो !
आणि खरेच रे
तुझा खूप आधार वाटतो
तुला पाहिलं ना की,
भीती नाही वाटत अंधाराची
जंगलातल्या अन् मनातल्याही !
तू हरवलास की मात्र
घालमेल होते
पण आता आलाय योग
भेट तू आमच्या भावाला
तुलाही खूप आनंद होईल
अन् अभिमानही वाटेल
आपल्या कर्तृत्ववान भाच्यांचा !
खूप बोल, गप्पा मार
तुझं सुख-दु:ख, आसू-हसू
गुपितं, सारं सारं सांग
एकटाच असतो ना तू?
खूप बोलायचं असेल
सारं सारं बोल
आम्हालाही ऐकायचं तुझ्याबद्दल
अन् हो आमच्या दादाबरोबर
खाऊही पाठव, न विसरता
सौंदर्याचा खाऊ
शितलतेचा खाऊ
प्रसन्नतेचा खाऊ
शांततेचा खाऊ...
पाठवशील ना?
वाट पाहतोय आम्ही...

- श्रीपाद कोठे
नागपूर

मला माफ करायचंय तुला पण... ... ??? !!!

नको होतं मला काहीही,
फक्त द्यायचं होतं तुला
असेल नसेल ते
उधळून टाकायचं होतं तुझ्यावर,
मी ओंजळही ऊचलली
तुझ्यावर फुले उधळण्यासाठी
अन् त्याच क्षणी
तू छाटून टाकले माझे दोन्ही हात
......... निर्दयपणे...

नको होतं मला काहीही
गायची होती
केवळ तुझीच गाणी
मी तान घेतलीही
अन् त्याच क्षणी
तू हासडून टाकली माझी जीभ
......... क्रूरपणे...

नको होतं मला काहीही
फक्त तुलाच पाहात राहायचं होतं
जन्मभर
मी नेत्रही वळवले तुझ्याकडे
अन् त्याच क्षणी
तू फोडून टाकले माझे नयन
......... निर्ममपणे...

नको होतं मला काहीही
फक्त साठवून ठेवायचं होतं
तुला आयुष्यभर,
मनाची कवाडे उघडलीही
मी सताड
अन् त्याच क्षणी
चोळामोळा करून फेकून दिलंस
तू माझं मन उकीरड्यावर
......... थंडपणे...

अजूनही... अजूनही...
मला माफ करायचंय तुला
पण... ... ??? !!!

- श्रीपाद कोठे
नागपूर

पण काय करू?

हो,
प्रत्येकवेळी असंच होतं खरं......
पण काय करू?
नजर वळते तुझ्याकडे
कानात प्राण आणून लक्ष देतो
तुझ्या मौनातून स्रवणाऱ्या कहाण्यांकडे
अन् क्षणार्धात पाठ फिरवतो
मन कातर होतं, विचारतं-
मावेल तुझ्या ओंजळीत,
तिचं नादावणं?
येईल तुझ्या कवेत,
तिचं खुळावणं?
पेलेल तुझ्या मुठभर हृदयात,
तिचं आभाळदु:ख?
प्रत्येकवेळी असंच होतं खरं......
पण काय करू?

- श्रीपाद कोठे
नागपूर

वाघाचं माकड

कुणी कधी असं झाल्याचं,
ऐकलं आहे काय?
वाघाची शेपुट बंदराने ओढल्याचं
पाहिलं आहे काय?

कुणी कधी असं झाल्याचं,
ऐकलं आहे काय?
वाघाच्या पाठीवर बंदर बसल्याचं
पाहिलं आहे काय?

कुणी कधी असं झाल्याचं,
ऐकलं आहे काय?
वाघाला चापट मारून बंदर
पळालं आहे काय?

कुणी कधी असं झाल्याचं,
ऐकलं आहे काय?
वाघाचे कान धरून बंदर
लपलं आहे काय?

कुणी कधी असं झाल्याचं,
ऐकलं आहे काय?
बंदराच्या त्रासाने वाघ पळाला
दिसलं आहे काय?

कुणी कधी असं झाल्याचं,
ऐकलं आहे काय?
बंदरचेष्टांनी वाघाचं माकड
झालं आहे काय?

- श्रीपाद कोठे
नागपूर

अरे, ती आली...

अरे, ती आली...
ती दुरून दिसली आणि
खसखस पिकली
कोणी शेरेबाजी केली
कोणी खुसुखुसू केले
कोणी गालातच हसले
कोणी बोटे मोडली
कोणी नजर फिरवली
कोणी तान गिरवली
कोणी पाठ फिरवली
कोणी वाट निरखली....
तिच्या घरी दोघेच
ती आणि तिचा लहान मुलगा....
आज संध्याकाळी
मी तिला पाहिलं
तुळशीजवळ दिवा लावून
नमस्कार करताना
आणि नंतर
मुलाला घास भरवताना...
तिला असं कुणीच पाहिलं नव्हतं
मी आज पाहिलं
त्याच क्षणी तिनेही पाहिलं
मला नजर झुकवताना...

- श्रीपाद कोठे
नागपूर

मखर

किती सुंदर दिसतंय मखर
तीन दिवस मेहनत केलीय
रात्री जागवल्या
झुंबंरं, तोरण, पताका
नक्षीदार महिरप
दिव्यांच्या माळा
रंगीबेरंगी फूले
कित्ती छान वाटतं !
पण बाप्पा गेलेत आणि
सुनं वाटू लागलं मखर
उदास, निस्तेज, रिक्त सांगाडा
... ... जणू काही
तू निघून गेल्यानंतर उरलेलं
माझं मनंच !!

- श्रीपाद कोठे
नागपूर

छकुली

हळुहळु अंधार पडला
किनार्यावर गच्च अंधारात
मी एकटाच
नकळत कसलासा भास झाला
हळूच पाहिलं वळून
छोटीशी पणती खुणावत होती
तिच्या जवळ गेलो
म्हणाली-
`सांगावा धाडलाय सूर्यानं,
उद्या सकाळी येणारच आहे
तोवर माझी ही छकुली
तुझी साथ करेल...'

- श्रीपाद कोठे
नागपूर

झाडे

झाडे... कशीही वाढतात
उभी, सरळ, आडवी-तिडवी,
वाकलेली, झुकलेली
गोल, डेरेदार, ओबडधोबड,
वळसेदार, नागमोडी...

झाडे... कुठेही वाढतात
गावात-रानात, मैदानात- पहाडावर
पाण्यात अन् बाहेरही
खडकावर- रेतीत, कुंडीत- घरात
दगडाच्या आडोशालाही...

झाडे... कधी वाढतात स्वतंत्र
कधी वाढतात सगळ्यांसह
कधी झाडे फुलतात
कधी फुलत नाहीत
कधी झाडे फळतात
कधी फळत नाहीत...
सावली देण्याचा गुण मात्र
झाडे...
कधीच, कुठेच सोडत नाहीत...

- श्रीपाद कोठे
नागपूर

मुकी सतार

तो एक चांगला कारागीर होता
देश-विदेशात ख्याती होती त्याची
तो संगीताची वाद्य बनवायचा
देश विदेशातील लोक ती घेउन जात
मलाही त्यानंच घडवलं
अतिशय छान, आकर्षक
माझ्यावरील कलाकुसर
दुकानात येणार्यांना
खिळवून ठेवत असे...
कुणीही मागणी नोंदवली नसतानाच
त्यानं मला घडवलं
अगदी स्वत:ची हौस म्हणून...
लोक येत, सगळ्यात पहिले
माझ्याकडेच वळत, माझी स्तुती करीत
एक तरफ घेउन माझ्या तारा छेडत
आणि लगेच दूर होत
माझ्या गळ्यातून
स्वरांची कंपनंच निघत नसंत...
कुणी मला स्वर देईल का?
कुणी स्वरदा येईल का?
मी-
एक स्वरहीन, मुकी सतार

- श्रीपाद कोठे
नागपूर

फुंकर

पोकळ फुंकर येऊ दे तळातून
विराट अनादी अस्तित्वाचा
अलगद हात धरून
आणि भरून जाईल
पाव्याची अनंत पोकळी
झरू लागेल गीत
स्वरांच्या चांदण्या लेऊन
अन् विराट पोकळी
शहारून जाईल
त्यांच्या चंदन चैतन्याने...

- श्रीपाद कोठे
नागपूर

मैत्रीचा वाढदिवस

आज आपल्या मैत्रीचा
पहिला वाढदिवस!
केवढीशी होती?
आणि, आता चांगलं
बाळसं धरलंय...
उभी राहते
स्वत:च्या दोन पायांवर
गुडगुडी न घेता...
आता पावलं टाकेल
धावेल दुडूदुडू
मग पडेल बुदुक बुदुक
पायांना खरचटेल
लागेल, रडेल...
त्याला देवाजवळच्या दिव्यातलं
मुर्दाड तेल लावून
फू-फू करून
फुंकर घालू आपण
आणि
जमिनीवर पाय आपटून
हा~~त्ते पण करू...
मग आपली मैत्री
खुदकन हसेल अन्
बागडू लागेल पुन्हा...
हळूहळू मोठी होईल ती
खूप मोठी...
हट्ट करत करत
लाडावून घेत घेत
लळा लावत लावत...
आभाळाला हात पुरवेल
आणि?
भुर्रकन उडून जाईल का?
नाही, नाही
ती खूप समजूतदारही होईल...
आपण तिला खूप जपायला हवं...
आपण जपू तिला...
तुझ्या डोळ्यातलं
थोडंसं काजळ काढून
तीट लाव नं तिला...
कुणाची दृष्ट लागू नये म्हणून...
लावशील नं तीट?

- श्रीपाद कोठे
नागपूर

एक दिवस टपोरा गुलाब

एक दिवस टपोरा गुलाब
माझ्याकडे आला, म्हणाला-
मला काही तरी हवंय, देणार?
मी माझा गंध देतो
हवं तर
सगळ्या फुलांचा गंध देतो!
अरे पण काय हवे तुला?
तुझ्या प्रियेच्या तळव्यावरील
मेंदीचा गंध
मी नाही म्हणालो...

अशीच एकदा नदी आली
म्हणाली,
मी तुला माझं प्रवाहिपण देते,
मला एक गोष्ट देतोस?
मी विचारलं काय?
तुझ्या प्रियेचा अल्लडपणा!
मी नाही म्हणालो...

एकदा आकाशीचं इंद्रधनुष्य
समोर उभं ठाकलं
त्याने त्याचे रंग देऊ केलेत
अन् म्हणालं-
तुझ्या प्रियेचं लोभसपण
मला दे ना!
मी नाही म्हणालो...

एकदा मधमाशी
कानी गुणगुणली,
तुला सगळा मध देते,
मला एक देतोस?
मी विचारलं काय?
ती म्हणाली-
तुझ्या प्रियेच्या अधरांचा
थोडासा मकरंद!
मी नाही म्हणालो...

एकदा तर प्रत्यक्ष
कुबेर अवतरला
म्हणाला-
माझा सारा खजिना देतो!
मी विचारलं कशासाठी?
कुबेर म्हणाला,
तुझ्या प्रियेच्या
काही स्मृति दे ना!
मी नाही म्हणालो...

आणि
एकदा तूच आलीस
म्हणालीस- एक हवंय, देशील?
मी विचारलं, काय?
`मला मीच परत हवीय'
काहीही नं बोलता
मी ओंजळीत ह्रदय काढलं
अन्, डोळे मिटून घेऊन
माझी ओंजळ रीती केली
तुझ्या ओंजळीत ...

- श्रीपाद कोठे
नागपूर

अनाहत


मी अफाट? मी विशाल?
असेनही... नसेनही... कदाचित
पण मी अपूर्ण? ...नक्कीच
सतत प्रश्नांच्या भोवर्यात...
मी पूर्ण असेन तर
ही ओढ कशाची?
कोण खेचतंय मला
अनाहूतपणे?
तुझी निळी हाक कानी पडते
आणि क्षणात असोशी थांबते
झंकारू लागतो अनाहत नाद
`हीच माझी पूर्णता'
`हीच माझी पूर्णता'

- श्रीपाद कोठे
नागपूर

निळी साद

तुझी निळी आर्त साद ऐकतो
आणि दुभंगतो,
ढवळून निघतो अंतरात
निघतो एका आवेगात
धावतो अफाट वेगात
तुझ्या दिशेने,
कधी उषासूक्ते गात
कधी निशासुक्ते आळवित
अन् किनारे उभे ठाकतात
अचानक
मग आदळतो त्यांच्यावर
फुटतो, तुटतो, विदीर्ण होतो
आणि विखरुन टाकतो
अंतरी साठवलेली
तुझ्या शुभ्रतेची
फेनफुले...

- श्रीपाद कोठे
नागपूर

आभाळीच्या सरी

आभाळीच्या सरी
कोसळती दारी
तुझ्या गाली थेंब
थांबेचीना...
शहारतो देह
झंकारती गात्र
तुझ्या ओठी दाह
मावेचीना...
कशी टाळू आता
नजर प्राणांची
तुझ्या नेत्री मद
साकळेना...
नको छळू मज
होई अनिवार
उराउरी भेट
आवरेना...
काय सांगू तुज
अंतरीचे गुज
माझ्या हृदयात
सावरेना...

- श्रीपाद कोठे
नागपूर

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

माय आन बापू

माय आन बापू
आले नाही अजून
पाउस त सुधरु देत नाई
बत्ती त नसंनच
गुरं येउन तं लई येळ झाला
माय बापू कुटं गेली असंन?
बरं जालं,
म्हाद्या अब्यास घिउन बसला
भूक तं त्यालेबी लागली आसंन
चुलीखाली लाकुड लावावं
माय बापू येतीनच तवंर
* * * * * * * * * *
आता कोन आलं?
कवाड कोन वाजवते?
थांबा आलो, थांबा आलो
अरे, हा तं बजरंग काका
`का झालं काका? ओला हुत आला?'
आन ह्ये मानसं काउन आले?
काय आनलं त्यायनं?
चादरीत गुंडायलेलं हे का व्हय?
गडबड ऐकून म्ह्याद्या बी पडवित आला
गुंडायलेल्या चादरी पडवित ठिउन
समदे बसले
धोंडी काकानं पुसलं,
`काय जालं रे बजरंगा?'
बजरंगा काका बोल्ला,
`का सांगू आता?
आभायंच फाटलं
गुरं पाठवले घराकड
आन दोगं निगाले बिगी बिगी
पाउस लय जोरात आला
म्हून थांबले चिंचेखाली
माह्याच वावराच्या बांध्यावर
आवाज बी देल्ला मले
मी म्हनलं, मी बी येतो
जोडे घालतंच व्हतो
आन तेवढ्यात
विज बोंबलली जोरानं
येउन पयली चिंचेवर
चिंच जयली उभ्यानंच
आन बुढा बुढी पन...
तसाच आलो गावात
लोकायले घेतलं आन घिउन आलो'
बजरंग काका थांबला
आन चंदानं म्हाद्याला जवय घेतलं
तिला गावलं, चादरीत गुंडाळून
माय बापुच घरला आले हायेत...

- श्रीपाद कोठे
नागपूर

जगावेगळी वाटं !

कुणा विचारू जाते कुठवर
उंचसखल ही वाटं
कुणा विचारू कैसी वळणे
नागमोडी ही वाटं...

कुणास सांगू या वाटेवर
रंग फाकती दाटं
कुणास सांगू या वाटेचा
गंध असे घनदाटं...

काटे आणिक फुलेही येथे
प्रकाश अन् अंधार
सोबत नाही अन्य कुणाची
एकलेपणा फार...

तरीही वाटे अपार प्रिती
मनास शांती अपार
अपुले आपण असता संगे
मिळे छान आधार...

काय सांगू हो या वाटेच्या
सम्राटाचा थाटं
नाही मळली आजवरी ही
जगावेगळी वाटं....

- श्रीपाद कोठे
नागपूर

अकस्मात अन् विज बोलली

आला आला पाउस आला
चिंब भिजवुनी गेला
मनात माझ्या गोड प्रियेची
याद जागवून गेला...

कशी असावी, कुठे असावी
छळतो मम हृदयाला
अकस्मात अन् विज बोलली
तिही स्मरते तुजला...

- श्रीपाद कोठे
नागपूर

मनस्विनी

रुक्मीणीला ओढ माझी
मी राजपदी आहे म्हणून...
सत्यभामेला ओढ माझी
स्वर्गीचा प्राजक्त आणला म्हणून...
द्रौपदीला ओढ माझी
प्रत्येक संकटात धावून गेलो म्हणून...
वृंदेला ओढ माझी
घरोघरी मानाचं स्थान दिलं म्हणून...
कुंतीला ओढ माझी
तिच्या मुलांना वाचवलं म्हणून...
अन् मला ओढ?
राधेची, फक्त राधेची
तिला फक्त मी हवा होतो म्हणून...
तिचं प्रेम माझ्या अमुक तमुक गोष्टीवर नाही,
फक्त माझ्यावर होतं म्हणून...
मला ओढ राधेची, फक्त राधेची...
माझ्यावर प्रेम करण्याची
तिला लाज वाटली नाही म्हणून...
माझ्यावर प्रेम करताना
तिला भीती वाटली नाही म्हणून...
आपल्या सावळ्याकडे धाव घेताना
तिने सारे अडसर झुगारले म्हणून...
माझ्यावर माया करताना
तिला परतफेड नको होती म्हणून...
मला ओढ राधेची, फक्त राधेची
ती मनस्विनी होती म्हणून...

- श्रीपाद कोठे
नागपूर

पाउस कधीचा पडतो

पाउस कधीचा पडतो
रानात काजवे भिजले
दाराच्या आडोशाला
स्मरणाचे गुच्छही थिजले...

वार्याने डुलती धारा
आकाशी चमके पारा
रणवाद्यांच्या कल्लोळाने
हृदयाला नाही थारा...

ओलेत्या झाडासंगे
घरटेही झाले ओले
ओलेत्या पंखांखाली
गाणेही झाले ओले...

थिजलेल्या अंधारातून
उडी मारते कोणी
मनडोह ढवळुनी आले
सखयेच्या डोळ्यातील पाणी...

- श्रीपाद कोठे
नागपूर

आत्ममग्न तान्हुल्या

आपल्याला शहरात काजवे पाहायला मिळत नाहीत. पण जंगलातला अनुभव शब्दातीत असतो. काजव्यांचे थवेच्या थवे असतात. असाच एक अनुभव शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न.

आत्ममग्न तान्हुल्या

रात्रीच्या अंधारी
ज्योति लक्ष उजळल्या
नभामधुनी तारका
धरेवरी उतरल्या...

क्षणात पंख पसरिती
क्षणी प्रकाश फाकती
क्षणात पंख मिटवुनी
क्षणी उदास भासती...

आत्ममग्न तान्हुल्या
कधी इथे, कधी तिथे
वार्यावर लहर लहर
रानवाट पेटतसे...

- श्रीपाद कोठे
नागपूर

नानीबाई

नानीबाई गेली
वय- अंदाजे ७८ वर्षे !!!
गावात आली लग्न होउन
७ व्या, ८ व्या वर्षी
७० वर्षे गावातच
माहेरपणालाही गेली, न गेली
तिलाही आठवत नव्हतं
कधीतरी नवरा गेला
मूलबाळ नाही...
४०० उम्बर्यांचा गाव
१०-२० आत्मीय
बसण्या, उठण्याची घरं
गावाशेजारची नदी
ओढयासारखी
आजूबाजूची शेतं
शंकराचं मंदिर
एसटीचा थांबा
एवढंच नानीचं जग...
७० वर्षांचं आयुष्य...
आधाराला
७० पेक्षाही कमी गोष्टी
या जगात आली... गेली...
पेपरमध्ये बातमीही नाही...
गावात गेलो की
जठराग्नी शांत व्हायचा
तृप्त व्हायचा
नानीच्या हातच्या
गरम गरम भाकरी खाउन
चार शब्दांची देवाण घेवाण
`काय नानीबाई?'
पीठभरल्या हातांनीच उत्तर यायचं
`ठीक आहे मालक'
७० वर्षात तृप्त झालेले
शेकडो मालक
नानीच्या अंत्यसंस्काराला मात्र
२०-२५ डोकी,.... आणि
नानीची आठवण काढणारी
एक मातीची चूल!!!

- श्रीपाद कोठे
नागपूर

पतंग

आयुष्याचा कटलेला पतंग
विहरत होता आकाशात
मुक्तपणे, वार्यांच्या लाटांवर
स्वैर, स्वच्छंदी
दिशा नाही, उद्देश नाही
पण आनंदी...
संथ संथ गिरक्या घेताना
नजरेस पडलं एक पाचूचं बेट
हिर्वकंच, गारेगार
डोळे निवलेत
चार घटका आधारासाठी
पतंग उतरला
त्या आल्हादक बेटावर
आणि हळूहळू रुतु लागले
काटे आणि फांद्या
लक्तंरं निघाली
कपडे फाटले
रक्तबंबाळ झालं अवघं शरीर
आता तर
नकोशी वाटते
वार्याची एखादी गार झुळुकही
कारण
प्रत्येक झुळुक आणखी रक्तबंबाळ
करुन जाते
अवघं अस्तित्व...

- श्रीपाद कोठे
नागपूर

कविचा स्वर

स्मशानवासी देवदेवता
तिथले भूत-प्रेत-पिशाच्च
हाडे, कवट्या,
कोल्हे, कुत्रे, गिधाडे
धडाडत्या चिता
डोंब आणि चिंचेची झाडे
सारे कविभोवती
फेर धरून नाचत होते
कर्णकर्कश्श गीतांसह
वाद्यांच्या भयकारी गोंधळासह...
थोड्या थोड्या वेळानी
प्रत्येक जण
कविला प्रश्न करीत होता
विकट हास्यासह
`अरे कवडया,
तू कविता करतोस?
कुठे आहे तुझी कविता?'
प्रत्येकाचे विचारुन झाले
तरीही कवी शांत...
श्रांत झालेला तो समूह
क्षणभर थांबला
आणि संधी साधून
उच्च स्वरात कवी म्हणाला,
`ते पाहा...'
सारेच
त्याच्या बोटाच्या रोखाने
पाहू लागले
सळसळणार्या पिंपळाच्या फांद्यांमधून,
आणि कवी म्हणाला
`होय, मी कविता करतो
आणि करणारही
कारण
रात्रंदिवस धगधगणार्या
चितांच्या सान्नीध्यात राहूनही
स्मशानाच्या वर असणार्या
आभाळातही
पौर्णिमेचा चंद्र उगवतो
अन्
टिपुर चांदण्यांची शेती फुलते'
त्यानंतर फक्त
कविचा स्वर घुमत राहिला
बाकी सारे
शांत... शांत... शांत...

- श्रीपाद कोठे
नागपूर

एक दिवस लपाछपी

एक दिवस लपाछपी खेळलो आपण
कुठे लपली होती कुणास ठाउक?
सापडलीच नाहीस लवकर
आणि मग भो केलंस एकदम...
मी रागावलो खूप,
हे काय खेळणं म्हणून...
तू म्हणालीस-
एवढा काय चिडतोस,
मी काय हरवले होते?
मग झाला समझोता
आणि खूप गप्पा मारल्या...
हरवण्याच्या अन् सापडण्याच्या...
रंगांच्या कांडया हरवल्या
तेव्हा तू कशी भांडलीस बहिणीशी,
आणि तुझी बाहुली हरवली
तेव्हा किती रडलीस...
माझी ब्याट हरवली
तेव्हा मी घर कसं डोक्यावर घेतलं
आणि सरांनी भेट दिलेलं पेन हरवलं
तेव्हा मी एका मुलाला कसं बुकलून काढलं
या सगळ्याची उजळणी झाली...
त्यावर तू म्हणालीस,
लहानपण कसं छान असतं
पण आता आपण मोठे झालोत
आता कळतं आपल्याला
अमुक काही हरवलं
त्यासाठी त्रागा नसतो करायचा,
नसतं वैतागायचं,
सोडून द्यायचं,
दुसरी वस्तू आणायची...
मीही शहाण्यासारखं हो म्हणालो,
अन् एक दिवस अचानक
तूच हरवून गेलीस
आणि क्षणार्धात मला कळलं
मी मुळीच मोठा झालेलो नाही...

- श्रीपाद कोठे
नागपूर

मंगेश पाडगावकर यांना...

तुमचं अभिनंदन करायला
तुमचेच शब्द
उसने घ्यावे लागतात,
कोणती ओळ निवडावी
काहीच सुचत नाही,
आनंदयात्री असतानाही
आभाळदु:ख मांडलंय तुम्ही
सारेच रंग, सारेच भाव
उत्कटतेने वाचले आम्ही
कशाचीही उपेक्षा
कधीच आढ़ळली नाही,
चराचराला कवेत घेणार्या तुमची
पूजा कशी बांधणार?
गंगेचं पाणी ओंजळीत घेउन
गंगेलाच अर्पण करणार,
गंगेलाच अर्पण करणार...
शत अभिनंदन
शत शत अभिनंदन!!!

- श्रीपाद कोठे
नागपूर