रविवार, ८ डिसेंबर, २०१३

अंधारवाटा

संध्येचा पदरव आला
की; दिवे साद घालतात,
पहिला दिवा लागतो आणि
म्हातारीचे हात जोडले जातात
सहज, आपोआप, अभावितपणे

हळूहळू नदीचा काठ फुलतो
चुडे किणकिणु लागतात
डोईवरचे पदर संभाळत
अन् पदराआड दिवे जपत
सुवासिनी घाटावर उतरू लागतात

किनार्यावरील मंदिरात
शंख घंटा वाजू लागतात
नदीच्या प्रवाहावर अद्भुत रांगोळी
उमटू लागते

`दूरवर जाणार्या या अंधारवाटा
उजळून टाका रे बाबांनो'
कुणी एक कोमल मनाचा
जाणता रसिक
त्या दिव्यांना सांगतो

आणि घाटावर दूर कोपर्यातल्या
वडाखाली बसलेल्या
एका जटाधारीला
अज्ञातातून एक स्वर ऐकू येतो,

`त्यागाचीही अखेर
काळोखातच होत असते
या दिव्यांसारखीच...'

- श्रीपाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा