वाळूच्या शांत समुद्री
मौनाला बिलगून गेली
मौनाची नाजुक गाणी
अवकाश मोकळे झाले
अंतरात गुदमरलेले
दु:खाच्या पाऊलखुणांनी
गालावर ओघळलेले
नभी चंद्र जरासा तुटका
वार्याने हालत नाही
शपथांच्या स्मरणधुळीने
आभाळ कोंदुनी जाई
हे असेच काहीबाही
फुलणार्या झाडाजैसे
गळणार्या पानांनाही
का टोचत असतील काटे?
गाण्याचे दु:ख सुकोमल
दु:खाचे गाणे भोळे
दूरस्थ चांदणीचेही
का भरून येती डोळे?
मातीचा स्पर्शच हळवा
वाळूत कसा गवसावा
भाळावर गोंदवलेला
आलेख कसा मिटवावा?
- श्रीपाद कोठे
रविवार, २५ डिसेंबर २०११
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा