शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

अभोगीची धून

मी उदास होतो तेव्हा
फांदीवर झोके घेतो
झाडाचे दीर्घ उसासे
पाठीला बांधून घेतो

झाडाची सावली दाट
की मनातला काळोख
गळणाऱ्या पानांचाही
धरतीला होतो त्रास

माझ्या श्वासांची करुणा
पानांना साद घालते
वठलेल्या बुंध्यालाही
दु:खाची जाणीव होते

मी बोलत नाही काही
झाडाला सारे कळते
शब्दांचे मौन पिसारे
पंखात गोठूनी राहे

सुकलेल्या फांदीवर
हरवला पक्षी येतो
जाताना व्याकूळ काही
मातीला देऊन जातो

मी तसाच फांदीवर
भासांना हाती घेऊन
शब्दांची भावसमाधी
जैसी अभोगीची धून

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ६ फेब्रुवारी २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा