शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

पंचम

सकाळची प्रसन्न वेळ
आंब्यावर उंच बसून
कोकिळ गात होता
निसर्गदत्त मधुर पंचम,
खाली खेळणारी मुलेही
त्याला देऊ लागली
प्रतिसाद, कुहू कुहू करून;
मुले काढू लागली
मोठा आवाज,
करू लागली
त्याची गम्मत,
कोकिळही वाढवू लागला
आपला आवाज
मुलांच्या बरोबरीने,
हळू हळू त्याचा
निसर्गदत्त मधुर पंचम
कर्कश्श होऊ लागला
त्यात डोकावू लागला क्रोध...
काय झाले असेल बरे?
मला प्रश्न पडला...
का रागावला कोकिळ?
सुरेल गाण्यात
व्यत्यय आणला म्हणून?
आपल्या सुराची
बेसुर नक्कल केली म्हणून?
की पंचमातील
करुण आर्त विषादाची
निर्लज्ज थट्टा केली म्हणून?
कधी तरी
विचारावे लागेल कोकिळाला...

-श्रीपाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा