शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

दु:खांकुर

आकाशातल्या दोन ग्रहांना
बांधली एक दोरी
अन् वाळत घातली त्यावर
सारी दु:खबि:ख,
पण नंतर जाणवलं
ती फक्त फळं होती
वाळत घातलेली;
झाड़ तसंच होतं,
मग छाटून टाकलं झाड
अन् झालो निश्चिंत,
पण कुठलं नशीब आपलं?
लागली पुन्हा पालवी फुटायला
मग काढून टाकलं मुळापासूनच,
आता संपली ब्याद
म्हणून हुश्श केलं-
पण कसचं काय?
छोटी छोटी रोपं
लागली पुन्हा उगवायला,
मग केला निश्चय
उकरून काढली आजूबाजूची माती
सगळी मुळंबिळं जाळून टाकली,
आता नाही कसला धोका
असं बजावतोय स्वत:ला तोच-
लक्षात आलं की,
पुन्हा उगवू लागले आहेत
छोटेछोटे चिवट दु:खांकुर...
कुठे असतात याची चिरंजीव मुळं?

-श्रीपाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा