शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

गोंदवण

सांजधुळीतील तुझी आठवण
अजून जागी आहे
त्या प्रहरातील तुझी गोंदवण
अजून ताजी आहे

त्या भेटीतील छुनछुन पैंजण
अजून वाजत आहे
त्या समयीचा पवन सुगंधी
अजून वाहत आहे

त्या सहवासातील स्मितहास्याचा
अजून परिमळ वाहे
तव नयनातील हळव्या शपथा
अजून ओल्या आहे

सांजनभाचे ते अवखळणे
अजून मानसी राहे
तव बोलांचे ते अडखळणे
अजून कानी आहे

त्या घटीकेचे रंग बावरे
अजून लोचनी आहे
तव गालांचा लाल रक्तीमा
अजून गहिरा आहे

त्या सांजेला किती आठवू
अजून हवीशी वाटे
तव प्रीतीला किती साठवू
अजून अधूरी भासे

-श्रीपाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा