असेच माझे असणे नसणे
किंचित फुलणे, मिटून जाणे
धुळीत उठत्या पायखुणांची
सुंदर नक्षी मिटवीत जाणे
असेच माझे असणे नसणे
शब्द सुरातून वाहत जाणे
सुखदु:खाच्या उठता लहरी
वार्यावरती विरून जाणे
असेच माझे असणे नसणे
जीव जडविणे, मुक्त विहरणे
ओंजळ ही कधी भरून घेणे
कधी हातीचे ओतून देणे
असेच माझे असणे नसणे
अर्थ मिरविणे, निरर्थ होणे
घेऊन हाती छोटी दिवली
मीच मलाही, शोधीत जाणे
-श्रीपाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा