शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

फकिरी

काय हवंय तुला?
घेऊन जा
जे जे हवे ते...
असलेला नसलेला
पैसाअडका
जमीनजुमला,
असलेले नसलेले
आप्तस्वकीय
शत्रू-मित्र,
असलेले नसलेले
गुण अवगुण
कर्तृत्व दातृत्व,
असलेला नसलेला
मानमरातब
नावलौकिक,
असलेले नसलेले
ज्ञान अज्ञान
जगण्याचे भान,
घेऊन जा सारे काही
प्रेमाने वा लुटून
हक्काने वा चोरीने...
जे जे माझे तेही घेऊन जा
जे माझे नाही तेही घेऊन जा
नेण्यासारखेही घेऊन जा
न नेण्यासारखेही घेऊन जा
हवे असलेले घेऊन जा
नको असलेलेही घेऊन जा;
फक्त...
फक्त, एकच विनंती
जाताना तेवढी
फकिरी मात्र ठेवून जा,
माझी माझ्यासाठी... ...

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २० जानेवारी २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा