शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

मौनाची भाषांतरे

काय असेल त्या गर्भार मौनात?
लपलेल्या फुलाचे लपलेले मन;
लपलेल्या मनातील लपलेले व्रण;
काय असतील, काय असतील?

सोबत्यांचे निघून जाणे,
एकाकी चालण्याचा शिण,
नशिबी आलेले दुर्लक्ष,
की आणिक काही?

आयुष्याची निरर्थकता,
वेगळेपणाचे दडपण,
सुखाचे नकार,
की आणिक काही?

प्रश्नांची भिरभिर,
नशिबाची वंचना,
अपूर्णतेची बोच,
की आणिक काही?

मनाची बधिरता,
भावनांची शून्यता,
प्रयत्नांची हतबलता,
की आणिक काही?

सुडाची आग,
प्रार्थनेची जाग,
सुनी सुनी बाग,
की आणिक काही?

हसण्याचे संकल्प,
रडण्याचे विकल्प,
की आणिक काही?

मौनाची भाषांतरे तरी,
किती करावीत?

-श्रीपाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा