कधी झालो एक भाग
या अजस्र प्रवाहाचा
नाही आठवत आता,
आठवतं तेव्हापासून
वाहतोच आहे
या रोंरावणार्या धारेसोबत,
असाच वाहताना कधीतरी
आठवले होते शब्द
एका महात्म्याचे-
`जगण्याला काही तरी
ध्येय हवं'
अन् वाहता वाहता
एक ओंडका दिसला होता,
तो पकडणं हेच ध्येय झालं
बुडण्याचीही भीती नव्हती
ओंडका हाती लागता तर,
मग मारले हात-पाय
जीवाच्या आकांताने
गाठला ओंडका
बसलो थाटात त्यावर
विजयी मुद्रेने
ध्येय गाठलं
जन्माचंही सार्थक झालं,
अन् एक दिवस
तोच जीवनदायी ओंडका
आदळला कशावर तरी
ठिकर्या ठिकर्या झाल्या
फेकला गेलो दूर, कुठेतरी
एखाद्या चेंडूसारखा
आणि वाहतो आहे
धारेसोबत
ठेचकाळत, अडखळत
तर कधी शांतपणे,
आताही दिसतात ओंडके
अधून मधून
खुणावतात ही
पण नाही जाववत त्यांच्याकडे,
हेच बरं धारेसोबत वाहणं
पुन्हा चेंडू होण्यापेक्षा...
-श्रीपाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा