तो रोज येतो
आपण फाटकाजवळ गेलो की,
आम्ही त्याला खंडू म्हणतो
तो आला की,
घरात वर्दी फिरते खंडू आला
अन् पोळी घेऊन येतं कोणी तरी
तोही उभा राहतो तोवर
मग पोळी खातो मनसोक्त
कधी कधी हातून ओढूनही
एका उन्हाळी दिवसाची गोष्ट
खाऊन झाल्यावरही हलला नाही
डोळ्यात खोलवर तहान दिसली
पाणी ठेवले पुढे
गटागटा प्याला पोटभर,
उन्हाळाभर चालला हा क्रम
पाऊस पडला अन् पाणी बंद,
प्राणी गरजेपुरतीच अपेक्षा धरतात
मनाने कान धरला
काल शेजारी म्हणाला,
हा सार्याँच्याच घरापुढे उभा राहतो
त्यांचाच असल्यासारखा
दुसर्या दिवशी खंडू आला
पोळी खाणे झाले नेहमीसारखेच,
म्हणाला- काही बोलायचे आहे
माझा चेहरा प्रश्नार्थक
तसा बोलला,
कालचं बोलणं ऐकलं तुमचं
मी राहतो उभा सगळ्यांपुढे
त्यांचाच असल्यासारखा
दारं उघडली की,
पण...
सगळे उभे राहतात माझ्यापुढे
मी त्यांचा नसल्यासारखा...
नकळत मनात शब्द उमटले
... ... ... ... ... ... ... ...
`माझा खंडू'
-श्रीपाद कोठे, नागपूर
बुधवार, १९ ऑक्टोबर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा