छंद कसा लागला
कधी लागला
कळलेच नाही,
काढू लागलो चित्र
एकामागून एक
वेड्यासारखा
झपाटल्यासारखा,
काळवेळेचं बंधन नाही
प्रहरांची मर्यादा नाही,
वेगवेगळे आकार
गोल, चौकोनी, त्रिकोणी
रेषा- सरळ, उभ्या,
आडव्या, वळणदार
बिंदू, ठिपके
अधेमधे रिकाम्या जागाही,
एकामागून एक
उठावदार, सुंदर
साधी, सोपी, सरळ
अर्थपूर्ण, निरर्थक,
गुंफत गेलो
अन गुंतत गेलो
आणि;
आता आलाय कंटाळा
वाटतं नको आता
किती हा पसारा, गुंता
हरवूनच गेलो आपण
या जंजाळात
हाती तरी काय लागले?
खोडायचे आहे खूप काही
कदाचित सारेच काही,
पण खोडरबर कुठे आहे?
मनाच्या पेन्सिलीची चित्रे खोडणारा
खोडरबर शोधण्यात
वेळ जातोय सध्या
- श्रीपाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा