हे काळोखा,
कसे मानू तुझे आभार
कसा होऊ तुझा उतराई
तुझ्या कृपेची
दयाळूपणाची
कशी करू परतफेड?
तू नसतास तर-
कसे लाभले असते
चंद्रतारे,
कशी फुलली असती
मधुमालती,
कसा बहरला असता
मालकंस,
कोणी गायली असती
प्रीतीची गाणी
तू नसतास तर-
कोणी घेतले असते
अनंत निश्वास पोटात,
कोणी ऐकले असते
निराशेचे उसासे,
कुठे फुटले असते
अनावर हुंदके,
कशी लाभली असती
दमलेल्याला विश्रांती
अलवार आनंदाची बाग
अद्भुत सौंदर्याची खाण,
अस्फुट वेदनेचा आधार
अव्यक्त दु:खाचा महापार
जगातील महादु:खाचे
स्वप्न साकार
अशा- हे काळोखा,
खरंच सांग
कसे मानू तुझे आभार
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २० फेब्रुवारी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा