खूप सारी फुलझाडे
काही वेलीही
बाराही महिने फुलत असतात
कुठली ना कुठली फुले
रोज सकाळी फुले तोडायची, वेचायची
शेजारच्या काकांचा नियम,
मग ते पूजा करणार
देवांची आरास करणार,
त्या फुलांनी
काकूही देणार गजरे करून
आपल्या लेकी सुनांना,
घरातील खोल्यांची शोभाही वाढवणार
या फुलांचे गुच्छ
काही दिवसांपूर्वीही, एक दिवस
असेच झाले सारे काही
नजर सहज भिरभिरत होती
तेव्हा दिसले एक फूल
टपोरे, प्रसन्न, सुगंधित
लपून बसलेले
वेलीच्या पानाआड,
त्याच्यासह फुललेली फुले
गेली होती काकांसोबत,
कुणी ना कुणी
करतील त्यांना जवळ
करतील सार्थक
त्यांच्या जन्माला येण्याचं,
हे वेडं मात्र राहील तसंच
आणि जाईल कोमेजुन संध्याकाळी
त्याच्याशी बोललो थोडासा...
विचारलं त्याला,
त्याच्या मनात काय चाललंय ते
ते मात्र मौन बाळगून
बसून राहिलं चुपचाप...
मी चिडलो, रागावलो
स्वत:वरच...
खूप वर्ष झालीत याला
अलीकडे मला
समजू लागले आहेत
त्या फुलाच्या मौनाचे अर्थ
थोडेथोडे...
-श्रीपाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा