शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

एखादा कण वगैरे

मला पडतात प्रश्न्नबिश्न
इकडचे तिकडचे
जगाच्या आदि-अंताचे
आत्म्या परमात्म्याचे
या जगातील असम्बद्धतेचे
अस्तित्वाचे, अगतिकतेचे;
कधी उत्तरांचे रतीब घालत
तर कधी उत्तरांची याचना करत
फिरत राहतो वणवण
अस्वस्थ होत
आणि अस्वस्थ करत
माझ्या `मी'ला फटकारत
वा गोंजारत;
पण...
पण नाही पडत मला प्रश्न
`मी' तुडवून टाकणार्यांचे

माझ्या सारखेच हातपाय असणारे
बाबा आमटे
हातपाय झडलेल्यांसाठी
संपवतात `मी'ला
पण मला नाही खुणावत ते;

लाखो संसारांसाठी
स्वत:ची चूल बोळकी फोडणार्या
सावरकरांची प्रेरणा कशी असेल?
नाही पडत मला हा प्रश्न;

या राष्ट्राला जागं करण्यासाठी
`मी'चा होम करणारे हेडगेवार,
अर्धा पंचा नेसून
जगज्जेत्यांना ललकारणारा गांधी,
जगाला स्तिमित करणारा
निष्कांचन, एकाकी विवेकानंद
यांच्या अस्तित्वाचा शोध
घ्यावासा नाही वाटत मला

झालंच तर
जगाच्या करुणेपोटी
राजगृह ठोकरणारा सिद्धार्थ,
स्वत:च्या मारेकर्यांनाही
अभयदान देणारा
स्वत:चा क्रूस
स्वत:च वाहणारा येशू,
स्वत: सावध होऊन
जगाला सावध करीत
हिंडणारा समर्थ
मला नाही खुणावत

अब्राहम लिंकन,
मार्टिन ल्युथर किंग,
जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर,
आयडा स्कडर,
जोन ऑफ आर्क,
डॉ. कोटणीस,
लुईस ब्रेल,
फ्लोरेंस नायतींगेल
यांनी कुठे पुरले होते
स्वत:च्या अस्तित्वाचे पाश?
काय होती
त्यांच्या रक्तथेंबांची जातकुळी?
नाही वाटत मला जाणून घ्यावेसे

कारण `मी' असतो
कोणीतरी शहाणा
तत्वज्ञ, कवी, लेखक
नाटककार, कलाकार
जगाच्या नाडीचं निदान करणारा वैद्य,
माझा `मी' हरवून तर जाणार नाही
अशी भीती सतत बाळगणारा भित्रा,
आयुष्याला भिडण्यापेक्षा
आयुष्याच्या कलेवराला कवटाळणारा
कोणीतरी...
या विश्वातला एखादा कण वगैरे

- श्रीपाद कोठे, नागपूर
रविवार, २२ एप्रिल, २०१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा