शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

मी हिंदू आहे !!

मी हिंदू आहे !!
हो,
मी हिंदू आहे
कट्टर हिंदू
अगदी कट्टर कट्टर हिंदू !!
म्हणूनच -
मला नाही होत संकोच
रमझानच्या वा नाताळच्या
शुभेच्छा देताना,
मला नाही वाटत की -
मेरीपुढे किंवा रिक्त भिंतीपुढे
उभे राहिल्यावर
कोणाला
आधार, आनंद वा शांति नाही मिळणार;
नाही येत माझ्या मनात
हा देव श्रेष्ठ की तो देव श्रेष्ठ;
मी आहे कट्टर हिंदू
त्यामुळेच आहे माझा विश्वास
येशू अन अल्ला अन गणेश
विष्णू अन दुर्गा अन शिव
किंवा हा, तो, तो, ते, ते
किंवा ही, ती, ती, त्या, त्या
किंवा माता किंवा पिता किंवा मालक
यात भेद नाहीच काही,
या विश्वाच्या नित्यनूतन निर्मितीत
मानवाच्या मनात उठलेले
ते आहे सुंदर काही तरी,
ते आहे शिव काही तरी
ते आहे सत्य काही तरी;
मी हिंदू आहे
अगदी कट्टर...
म्हणूनच -
मला नाही वाटत भय
तुम्ही एवढे उदार आहात का?
हा प्रश्न विचारताना -
एखाद्या ख्रिश्चनाला
एखाद्या मुस्लिमाला
एखाद्या यहुद्याला
एखाद्या हिंदूला
एखाद्या नास्तिकालाही;
अन मला नाही वाटत भय
शुभचिंतन करताना
एखाद्या ख्रिश्चनासाठी
एखाद्या मुस्लिमासाठी
एखाद्या पारशासाठी
एखाद्या हिंदूसाठी
एखाद्या नास्तिकासाठी;
मी हिंदू आहे म्हणूनच
हेही सांगू शकतो सगळ्यांना-
आपली ओळख
आपल्या फुलण्यासाठी असते,
नसते वर्चस्वासाठी
नसते सत्ता गाजवण्यासाठी,
आपली ओळख नसते
संघर्षाच्या चुलीचे सरपण,
आपली ओळख नसते
घोळके वाढवून दमदाटी करण्याचे शस्त्र,
आपली ओळख नसते
आर्थिक, राजकीय, प्रादेशिक
साठमारीचे हत्यार;
मी हिंदू आहे कट्टर
म्हणूनच म्हणू शकतो
नि:शंकपणे -
धर्मांतराची गरजच नाही
अन त्यासाठी होणारे प्रयत्न
मानवतेचा अपराध आहेत;
मी हेही म्हणू शकतो
की, हे प्रयत्न थांबवा
तरच येईल शांतता जगण्यात;
मला संकोच होत नाही सांगताना
की, सगळ्याच सणांमध्ये
घुसले आहे व्यापारी
गल्ला भरून घ्यायला सज्ज;
मी हिंदू असल्यानेच म्हणतो
मानवी श्रद्धेचा
राजकीय वापर
आर्थिक वापर
सामाजिक वापर
गैर आहे;
मला नाही वाटत
हिंदूंची अवैज्ञानिकता
मुस्लिम, ख्रिश्चन वा अन्य
यांच्यापेक्षा वेगळी आहे,
मला नाही वाटत
हिंदूंचे परंपरा प्रेम
मुस्लिम, ख्रिश्चन वा अन्य
यांच्यापेक्षा वेगळे आहे;
त्याच वेळी मी हेही म्हणतो -
अवैज्ञानिकता, परंपराप्रेम
यात अडकू नये कोणीच
अगदी हिंदूंनीही;
मी हिंदू आहे
कट्टर कट्टर हिंदू आहे...
सत्यमार्गाचा प्रवासी आहे !
पूर्णतेचा प्रवासी आहे !!
शिवत्वाचा प्रवासी आहे !!!
म्हणूनच -
निर्भीडपणे बोलतो, सांगतो
त्या मार्गीचे अडथळे
त्या मार्गीच्या अडचणी
त्या मार्गीचे काटे
त्या मार्गीचे खड्डे
त्या मार्गीचे थांबे
त्या मार्गीच्या खुणा...
मला चुकीला चूक म्हणता येते
स्वतःच्या चुकीलाही;
मला कळते की
धरायचा असतो हात आततायीचा,
मी तेही करतो;
अन चालत राहतो पुढे पुढे
माझ्या शुचिर्भूत मनासह
त्यावर कसलाही डाग
पडू नये, याची काळजी घेत...
मी हिंदू आहे
कट्टर कट्टर हिंदू आहे !!!
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २५ डिसेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा