शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

अपरिहार्य...


अमावास्येला सांगू नये
पौर्णिमेची गाणी गायला,
सांगू नये तिला
पौर्णिमा व्हायलाही;
तसे होत नसते कधीच;
दोन्हीही अपरिहार्य
दोन्हीही अपरिवर्तनीय;
खरी असते पौर्णिमेची उत्फुल्लता
अन असतेच खरी
अमावास्येची वेदनाही
उत्फुल्लते सोबतच वेदना जाणवायला
आकाश व्हावे लागते
पौर्णिमा अन अमावास्येला
एकत्र पोटी बाळगणारे
***********
वाळवंटात गाऊ नये
वर्षा, वसंताची गीते;
वाळवंटाला सांगूही नये
वसंत फुलवण्याला;
तसे होत नसते कधीच;
दोन्हीही अपरिहार्य
दोन्हीही अपरिवर्तनीय;
खरे असते वर्षेचे थुईथुईणे
खरे असते वसंताचे फुलून येणे
अन असतेच खरे
वाळवंटाचे रखरखीतपणही;
थुईथुईणे, फुलणे, रखरखणे
सगळंच जाणून घ्यायला
व्हावे लागते पृथ्वी
अनादि सहनशीलता पोटी असणारी
***********
नियतीच्या नावडत्या बाळांना
सांगू नयेत आवडत्या बाळांची गीते
त्यांना सांगूही नये
आवडती बाळे होण्यास;
तसे होत नसते कधीच;
दोन्हीही अपरिहार्य
दोन्हीही अपरिवर्तनीय;
नियतीचे दान खरेच असते
अन खरेच असतात
नियतीचे क्रूर नकारही;
नियतीचे दान
आणि नियतीचे नकार
दोन्ही समजण्यासाठी
व्हावे लागते आई
भाग्यवान आणि अभागी बाळांना
एकाच पोटात वाढवणारी
***********
व्हावे आकाश
व्हावे पृथ्वी
व्हावे आई
तरच उमगू शकते
या अस्तित्वाचे आदिदु:ख...
नपेक्षा मान्य करावे आपले
मर्यादित, भयग्रस्त एकांगीपण
सत्याच्या विश्वदर्शनाने हादरलेले

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १० ऑक्टोबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा