शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०

कविता

कविता

अस्तित्वाच्या
अंधाराची
आवर्तने -
आक्रोशतात
अनावरपणे,
आळसावतात
अपार,
आवळतात
आत्म्याला
अनिर्बंध,
अव्हेरतात
अष्टौप्रहर,
आठवतात
अविच्छिन्नपणे,
आढळतात
अखंडपणे,
आदळतात
अस्तित्वगाभ्यावर,
अन
होतात कविता !!

- श्रीपाद कोठे
रविवार, १३ डिसेंबर २०२०

#कविताश्रीपादच्या

संध्याकाळ

संध्याकाळ

तो उठतो तेव्हा
संध्याकाळ असते,
तो कामे करतो तेव्हाही
संध्याकाळ असते,
तो जेवतो, फिरतो
वगैरे वगैरे तेव्हाही
संध्याकाळ असते,
तो झोपतो तेव्हा
संध्याकाळ असते,
झोपेत त्याला जाग येते तेव्हा
संध्याकाळ असते,
तो असल्याचं
त्याला आठवतं तेव्हापासून
संध्याकाळ आहे...
जीवनोदयाची उषा
जीवनास्ताची निशा
त्याने फक्त वाचलंय
तेही संध्याकाळी,
स्वच्छ दर्शन आणि अंधत्व
हेही ऐकलंय त्याने, तेही
झावर झावर संध्याकाळी,
हिवाळ्यात उशिरा उगवतो सूर्य
उन्हाळ्यात लवकर उगवतो सूर्य
पावसाळ्यात झाकलेला असतो सूर्य
हेही पडलंय कानावर त्याच्या
सूर्य चंद्र नसलेल्या संध्याकाळी,
त्याला फक्त ठाऊक आहे
संध्याकाळ...
अश्वत्थाम्याच्या
निरर्थक चिरंजीवीत्वासारखी...

- श्रीपाद कोठे
रविवार, १३ डिसेंबर २०२०

#कविताश्रीपादच्या

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

उसासे
उदास
उगाच...
उंच
उभारी
उद्ध्वस्त...
उमेद
उद्यासाठी
उभीच...
उमाळे,
उ:शाप
उसवलेले...

शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२०

भवाच्या
भयाला
भावाने
भागावे...
भयाच्या
भुताला
भक्तीने
भुलवावे...
भक्तीच्या
भुलाईने
भावासी
भजावे...
भवाच्या
भ्रांतीसी
भेदून
जावे...

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १२ ऑगस्ट २०१९

'मला त्रास होतो तुमचा'

'मला त्रास होतो तुमचा'
तो म्हणाला,
'आपण वाईट आहोत'
तुम्ही समजला,
तो फक्त
एवढेच म्हणत होता-
'आपण वेगळे आहोत'...
तुम्ही समजलात
तोही अर्थ होऊच शकतो
या जगरहाटीत,
पण तो गेलाय
या जगरहाटीच्या पल्याड
हे तरी
कुठे ठाऊक आहे
तुम्हास?

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १८ सप्टेंबर २०१९

नदीला थांबवू नये !!


नदीला थांबवू नये
उगमाशी,
ती नदी होत नाही;
नदीला थांबवू नये
अधेमधे,
ती नदी राहत नाही;
नदीला थांबवू नये
सागराशी,
नदी वाहती राहत नाही;
नदी -
पाण्याची...
काळाची...
जीवनाची...
विचारांची...
भावनांची...

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २० सप्टेंबर २०१९

उद्धरेत आत्मनात्मानं...


जखमी झालेला तो
निजला होता बिछान्यावर
तळमळत होता
वेदना आणि दु:खाने
कधी कण्हत, कधी ओरडत
आजूबाजूला असणाऱ्या कोणालाही
नव्हतं दुखत काहीही
नव्हत्या वेदना अजिबात;
त्यांनी केला मग एक ठराव
'आमच्यापैकी कोणालाही
दुखत नाहीय कुठेच
काहीच वेदनाही नाही,
आम्ही संख्येनेही आहोत अधिक
तू एकटा आहेस
अत्यल्प मतात आहेस
त्यामुळे तुला
दु:ख असूच शकत नाही
आम्ही फेटाळून लावतो आहोत
तुझा दु:खाचा प्रस्ताव
बहुमताने
अस्तित्वच नाही
तुझ्या दु:खाला
म्हणूनच गरज नाही
त्याकडे लक्ष देण्याची'
प्रस्ताव एकमताने पारित होऊन
ठराव झाला
सुरू झाली तयारी पांगण्याची
तेवढ्यात
कुणास ठाऊक कसे
पण एक जण बोलला -
'अरे विव्हळतोय तो
थोडे पाणी तरी देऊ या'
त्याला अर्ध्यात थांबवून
उत्तर मिळाले कडकडीत -
'काही गरज नाही
ज्याचं त्याचं सुखदु:ख
ज्याच्या त्याच्या जवळ,
प्रत्येक जण जबाबदार असतो
आपापल्या भोगासाठी,
त्याला दुखण्याचं स्वातंत्र्य
हवं असेल तर
आम्हाला नको का
त्याकडे दुर्लक्ष करण्याचं स्वातंत्र्य,
कण्हणं हा दुबळेपणा आहे,
दुखण्याचं प्रदर्शन अशोभनीय असतं,
सहअनुभूती वगैरे थोतांड आहे,
कोणी काही करण्याची गरज नाही,
उद्धरेत आत्मनात्मानं...
इत्यादी इत्यादी इत्यादी'
पाणी पाजण्याचा विचार करणारा
केविलवाणा होऊन गेला;
व्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाही
थुईथुई नाचत बाहेर पडल्या

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २६ सप्टेंबर २०१९

हे महामानव !


हे महामानव,
तुला वंदन...
तुझे स्मरण कृतज्ञतेने...
प्रार्थनाही
तुझ्या लोकोत्तर गुणांच्या प्राप्तीसाठी...
तुझ्या जयंतीदिनी !
हेही खरंय की,
विसर पडतो तुझा
पुष्कळदा, पुष्कळांना;
काही तर विसरतात तुला
जाणूनबुजून;
खूप मोठा काळ
झालाय प्रयत्न
तुला विसरवण्याचा सुद्धा;
म्हणून द्यावी लागते आठवण
द्यावीही, देतोही...
आणखीन एका महात्म्याचाही
असतो जन्मदिन आजच
योगायोगच म्हणायचा
साम्यही खूप सारं
तुम्हा दोघात...
तो महात्मा
मोठा होता वयाने तुझ्यापेक्षा
तू स्वतः
मानायचास त्याला प्रेरणा,
चालायचास त्याच्या मार्गावर...
नियतीचीच खेळी म्हणा
तो महात्मा झाला
अन जगानेही मान्य केलं
त्याचं महानपण...
पण त्यामुळे तू मागे पडलास
तुला मिळायला हवा
तेवढा सन्मान नाही मिळाला
तो मिळायला हवा
म्हणूनच करून द्यावी लागते आठवण,
पण नको येऊ देऊ तुलना मनात,
नको येऊ देऊ मनात
त्या महात्म्याविषयीची अढी,
नको होऊ देऊ अपमान
त्या महात्म्याचा,
नको वाटू देऊ की-
द्यावा अधिक जोर
तुझ्या नावावर
त्याच्या सोबतीने उभे करण्यासाठी;
तसे झाले तर
ते करेल मला लहान
अन महत्त्वाचे त्याहून
ते नाही आवडणार तुलाही;
असतील चुका झाल्या
केले असतील गुन्हेही कोणी
होत राहील चर्चा त्याचीही;
पण नको येऊ देऊस
कोणाला लहान करण्याचा विचार
माझ्या मनात
तुझी महानता सिद्ध करण्यासाठी;
हे महामानव
शत शत वंदन !
शत शत वंदन !!

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २ ऑक्टोबर २०१९
(स्व. लालबहादूर शास्त्री यांना)

सीमोल्लंघन


सीमोल्लंघन तर झालेय
कधीचेच-
क्षितिजांचे मृगजळही
झालेत स्पर्शून-
आभाळतृष्णा
झालीय पृथ्वीगर्भा,
दिशा विझल्यायत
अन निजलाय काळ,
शिलंगणाला
उरलेच नाही काही
आणि सरलेय
परतण्याचे घरटेही;
नि:संग पाऊले मात्र
तुडवतायत वाट
कुठूनही न येणारी
कुठेही न जाणारी...

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ८ ऑक्टोबर २०१९

शब्दातला अर्थपारा


शब्द वाचता वाचता
घ्यावा समजून थोडा
अर्थ पाझरता मनी
जसा पारिजात सडा...

शब्द नाहीत अक्षरे
किंवा मुंगळ्यांची रांग
नेत्रदारी रेखलेली
नाही मुळी ती आरास...
शब्द वाहणारा झरा
त्याने भागते तहान
मनातल्या ओंजळीने
त्याचे करावे प्राशन...
शब्द दिसतो तेवढा
पूर्ण कधी म्हणू नये
त्याच्या पाठी पोटी काय
पाहण्याला चुकू नये...
शब्द पारखून घ्यावा
शब्दे विश्वास धरावा
शब्दाशब्दात दाटला
पारा गोठवून घ्यावा...
शब्दातला अर्थपारा
जाऊ नये निसटून
त्याला घालून ठेवावे
भाव-बुद्धीचे कोंदण...
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ९ ऑक्टोबर २०१९

अपरिहार्य...


अमावास्येला सांगू नये
पौर्णिमेची गाणी गायला,
सांगू नये तिला
पौर्णिमा व्हायलाही;
तसे होत नसते कधीच;
दोन्हीही अपरिहार्य
दोन्हीही अपरिवर्तनीय;
खरी असते पौर्णिमेची उत्फुल्लता
अन असतेच खरी
अमावास्येची वेदनाही
उत्फुल्लते सोबतच वेदना जाणवायला
आकाश व्हावे लागते
पौर्णिमा अन अमावास्येला
एकत्र पोटी बाळगणारे
***********
वाळवंटात गाऊ नये
वर्षा, वसंताची गीते;
वाळवंटाला सांगूही नये
वसंत फुलवण्याला;
तसे होत नसते कधीच;
दोन्हीही अपरिहार्य
दोन्हीही अपरिवर्तनीय;
खरे असते वर्षेचे थुईथुईणे
खरे असते वसंताचे फुलून येणे
अन असतेच खरे
वाळवंटाचे रखरखीतपणही;
थुईथुईणे, फुलणे, रखरखणे
सगळंच जाणून घ्यायला
व्हावे लागते पृथ्वी
अनादि सहनशीलता पोटी असणारी
***********
नियतीच्या नावडत्या बाळांना
सांगू नयेत आवडत्या बाळांची गीते
त्यांना सांगूही नये
आवडती बाळे होण्यास;
तसे होत नसते कधीच;
दोन्हीही अपरिहार्य
दोन्हीही अपरिवर्तनीय;
नियतीचे दान खरेच असते
अन खरेच असतात
नियतीचे क्रूर नकारही;
नियतीचे दान
आणि नियतीचे नकार
दोन्ही समजण्यासाठी
व्हावे लागते आई
भाग्यवान आणि अभागी बाळांना
एकाच पोटात वाढवणारी
***********
व्हावे आकाश
व्हावे पृथ्वी
व्हावे आई
तरच उमगू शकते
या अस्तित्वाचे आदिदु:ख...
नपेक्षा मान्य करावे आपले
मर्यादित, भयग्रस्त एकांगीपण
सत्याच्या विश्वदर्शनाने हादरलेले

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १० ऑक्टोबर २०१९

असे लाभावे काळीज


असे लाभावे काळीज
ज्यात सामावेल जग
मिळालेल्या फुलासंगे
मनी जपावे दगड...

घ्यावे ठेवून कौतुक
उपेक्षेच्या आडोशाने
प्रेमबोलांच्या संगती
द्वेषाचेही घोट घ्यावे...
गोड घास भरवावे
लाडावल्या जीवनाला
कडू जहरही प्यावे
भाळी आठी न घालता...
जरी लाभले ना सौख्य
चक्र नियमानुसार
तरी पडू नये पीळ
गांजलेल्या अंतरात...
निखाऱ्यांची व्हावी फुले
प्रहारांचे गेंद व्हावे
मनातल्या कोपऱ्यात
नकोशांना स्थान द्यावे...
अंतरात ज्वालामुखी
जळतो तो जळू द्यावा
दूर ढकलता कोणी
वाणीतून देव गावा...
अंतरातल्या जळवा
अंतरात सुखे नांदो
रक्त प्राशता तयांनी
चंदनाचा गंध दाटो...
सारे सारे निरर्थक
सारे सारे छळणारे
अंगांगाचा दाह जरी
तुळशीचे भाग्य लाभो...
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १७ ऑक्टोबर २०१९

मारवा


पंचमाचे दान मागत
हिंडणारा मारवा
येतो पुढ्यात वारंवार
कधी दारी
कधी बाजारी
हात पसरतो
पाहतो दिनवाण्या मुद्रेने
नाही वापरावे लागत
आता त्याला शब्द
त्याचं मागणं
उमटतं त्याच्या आर्त नजरेतून;
माझ्याही नजरेतून कळतो त्याला
माझा अगतिक नकार
ईश्वराच्या दुर्बोध मौनाप्रमाणे;
निघून जातो मारवा
निराधार अपूर्णतेच्या
न संपणाऱ्या मार्गाने
पृथ्वी आणि माझ्यासारखाच
पुन्हा कधीतरी
समोरासमोर येण्यासाठी
ग्रहणाच्या सूर्य चंद्रासारखा;
पुन्हा मागेल पंचमाचे ग्रहणदान
जो पंचम नाहीच माझ्याकडे त्याचे
पुन्हा जाईल निघून
झोळीत नकार घेऊन
अन फिरत राहील अविरत
आशेची अपरिहार्यता सांगत
विश्वाचे आर्त सावडत

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २१ ऑक्टोबर २०१९

कालातीत !!


मी होतो काळाआधी
मी राहीन काळानंतर
काळाच्या नदीतीरावर
माझे वास्तव्य निरंतर...

माझ्यातून उगवे पृथ्वी
उगवती ग्रह तारेही
आकाशी भरुनी आहे
माझीच सावळी नक्षी...
काळाच्या उदरी जे जे
ते माझ्यातून आले आहे
काळाला सोडून जाते
तेही माझ्यात मिसळते...
काळाच्या भवतालीही
आहे मीच भरोनी
काळाच्या कंठातूनही
माझीच प्रसवते वाणी...
काळाचा महिमा थोर
गातात संत, साव, चोर
त्याचाही अवघा भार
आहे माझ्या खांद्यावर...
मजला नावही नाही
नाहीच मोजमापही
पल्याड गुणरुपांच्या
मी कालातीत विदेही...
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २७ ऑक्टोबर २०१९

झाड नाही सोडत


आपली जागा,
नदी नाही थांबत
एके जागी,
सूर्य उगवतो आणि मावळतो
रोज सारखाच,
चंद्र उगवतो रोज पण
कमीजास्त तेजाने,
पृथ्वी फिरते सतत
तरीही भासते स्थिर,
वारा कधी वाहतो
कधी थांबतो...
सगळेच वागतात
त्यांच्या त्यांच्या पद्धतीने,
नाही करत नक्कल एकमेकांची
नाही करत स्पर्धा वा ईर्षा
नाही ठेवत नावे एकमेकांना
करत राहतात निसर्गाने सोपवलेली कामे
त्यांच्या त्यांच्या पद्धतीने;
अन तरीही सावरून धरतात सृष्टी...
माणूस यांच्याकडून काही शिकला तर?

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०१९

फक्त हसते !


दीपकळी रोज ऐकवते
नवीन प्रकाशाचे गाणे,
पणती फक्त हसते !
फांदीची कळी रोज सांगते
ताजे जीवनाचे गाणे,
झाड फक्त हसते !
येणारा श्वास गातो
आशेचे गाणे प्रतिक्षणी
जीवन फक्त हसते !
कॅलेंडरची पाने दाखवतात
भविष्याचं चित्र रोज
वेळ फक्त हसते !
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १ नोव्हेंबर २०१९

विश्वास !!


ठाऊक आहे तुला?
माझ्याजवळ काय आहे?
माझ्याजवळ आहेत
अणुबॉम्ब हजारोंच्या संख्येत;
माझ्याजवळ आहेत
शस्त्र अस्त्र... सहस्र;
माझ्याजवळ आहेत
पैसे... जग विकत घेण्यासाठी;
माझ्याकडे आहे
तंत्र, मंत्र, विज्ञान, बुद्धी;
माझ्याजवळ आहे
माणसांचे थवे असंख्य;
माझ्याजवळ आहेत
संस्था, रचना, व्यवस्था;
काय आहे तुझ्याजवळ???
विश्वास !!!
तुझं हे सारं सामर्थ्य
तुझं हे सारं कौशल्य
तुझं सारं सारं
मला संपवू शकत नाहीत
कधीच...
बस,
माझ्याकडे एवढा विश्वास आहे !!

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ३ नोव्हेंबर २०१९

देवाजीचे पाय


उपटोनी आलो
सुटुनिया गेली
गाठ सारी...
पूजाअर्चा सारी
जळी शिरवली
नागवाच केला
भाव मग...
काढून टाकले
टिळे आणि माळा
उपाधींची ब्याद
दूर केली...
भजन, कीर्तन
संपले अवघे
दाटून राहिला
मौनगंध...
अंतरात खूण
सापडली तेव्हा
आत्मरंगी मन
रंगविले...
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ८ नोव्हेंबर २०१९

ब्रेक


कोणालाही
लावावा लागू नये ब्रेक
माझ्यासाठी
माझ्यामुळे...
रस्त्यावर,
जीवनात,
अन-
जीवनाचा
निरोप घेतानाही !

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २२ नोव्हेंबर २०१९

नाही वाईट वाटत


होण्या पालखीचे भोई
परी असावी तयात
ज्ञानेशाची एक ओवी...
नाही खंतावत मन
उभा शेवटी म्हणून
पण ओंजळीत यावे
प्रसादाचे चार कण...
नाही दुखावत आता
मनमानी तुझी मोठी
पण नेहमी असावे
माझे नाव तुझ्या ओठी...
नाही उरली तक्रार
तुझ्या-माझ्या दुराव्याची
पण अंतरात जप
जोजवल्या स्नेहगाठी...
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २४ नोव्हेंबर २०१९

फुले


सकाळी सकाळी
पहावीत फुले
न्याहाळावे रंग त्यांचे
जमलेच तर करावा स्पर्श
ते देतात आनंद भरभरून
अन देतात आधारही,
सांगतात ती आपल्याला -
बस, काहीच तासांचा आहे
हा रंगसोहळा, हा स्पर्शसोहळा
हा सोहोळा दर्शनाचा,
दुपारी येशील तेव्हा
दिसू मलूल झालेले
अन येशील सांजच्याला
तेव्हा गेलो असू गळून,
रंग जातील उडून
गंध जाईल निघून
टवटवी जाईल संपून...
आणखीही बोलतात फुले
बरंच काही-
म्हणतात -
तोडेल आता कुणीतरी
वाहील देवांवर
पूजा असेल घरची तर
होऊ निर्माल्य उद्या,
पूजा मंदिरात असेल तर
होऊ निर्माल्य थोड्याच वेळात;
किंवा नेतील कुणी
कुणाला तरी द्यायला
कधी स्वागताला
कधी प्रेम म्हणून
अन बसू कुठल्या कोपऱ्यात
निरर्थ होऊन;
किंवा नेतील कुणी
एखाद्या
निर्माल्य झालेल्या जीवावर
वाहायला, उधळायला
अन होऊन जाऊ
तत्क्षणी गतार्थ
फिरेल एखादा खराटा
अन जातील सारे
रंग, स्पर्श, गंध लयाला
लोपेल सारी टवटवी;
अन सांगतात मग फुले
कानात हळूच -
हेच जीवन !
देतात साहस
देतात धाडस
देतात आधार
मलूल होण्यासाठी
निर्माल्य होण्यासाठी;
रोज सकाळी
भरून घ्यावा
आनंद आणि आधार;
रोज सकाळी
फुले पाहत जावीत...

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २६ नोव्हेंबर २०१९

अर्थहीन !!


एक संदेश द्यायचा होता त्याला
म्हणून खेळला एक मोठ्ठा खेळ
घडवले महाभारत
सांगितली भगवद्गीता
अन दिला संदेश -
'उद्धरेत आत्मनात्मानं'
करायचा असतो उद्धार
स्वतःचा स्वतःला
आपणच असतो
आपले शत्रू
आपले मित्र
नसतो अवलंबून
आणि नसावंही;
पाहू नये तोंडाकडे कोणाच्या
शोधू नये आधार कुठे;
व्हावे स्वतःचे तारणहार...
आम्ही डोलावल्या माना
अन पाहू लागलो पुन्हा
याच्या त्याच्या तोंडाकडे;
त्याने केलेला प्रयोग
गिरवू लागलो आम्ही,
त्याने वापरलेली साधने
वापरू लागलो आम्ही,
त्याने दिलेले तर्क
देऊ लागलो आम्ही,
त्याने दिलेला संदेश मात्र
ठेवला गुंडाळून बासनात...
प्रत्येकाने व्हावे तारणहार
समस्त विश्वाचे
आपल्यासारखे
होते त्याचे स्वप्न;
त्यासाठीच होता संदेश त्याचा
आम्ही आपलेही तारणहार नाही होऊ शकलो...
पाहतोच आहोत अजून
याच्या त्याच्या तोंडाकडे
आशाळलेल्या नजरेने
अन ओरडतो आहोत
रस्त्यावर भटकणाऱ्या
दत्तात्रेयांच्या निष्ठावंतांच्या झुंडीसारखे...
अर्थहीन !!

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २७ नोव्हेंबर २०१९

डेड एन्ड...

चालणं भाग असतं,
चालावंच लागतं,
चालण्याला पर्याय नसतो,
चालणं आवश्यक असतंच,
चालणं योग्य असतं,
- फक्त
चालताना
असावं एक अवधान
रस्त्याला
dead end असूच शकतो !!

- श्रीपाद कोठे
नागपूर
१ डिसेंबर २०१९

प्रयत्नांचे दीप

प्रयत्नांचे दीप
उजळले किती
अनंत अंधार
उरलेला...
उजेडाचे तळे
हाच एक भ्रम
पुसून टाकला
उरातील...
मृगजळ खोटे
कळो आले तेव्हा
फिरवली पाठ
उजेडासी...
उरफोड सारी
वाहूनिया जाते
काळप्रवाहाच्या
उदकात...
आपुला आपण
करावा संवाद
जळो जगतीचे
उणेदुणे...
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २ डिसेंबर २०१९

पाऊस आणि दुष्काळ

खूप खूप पाऊस पडतो
अन येतो ओला दुष्काळ
नाही लागत हाती पीकपाणी
होते पडझड सगळी
घरांची, वास्तूंची
सामानाची, मनांची
माणसांची, पशूंची;
असलेलंही जातं भिजून
असलेलंही जातं किडून,
रोगराई, संसर्गाला
सुमार नसतो काही,
चोऱ्याचपाट्या वाढतात;
होत्याचं नव्हतं होतं झटपट,
नाही म्हणायला मिळते पाणी
होते सोय तेवढीच...
********************
कधी कधी नाहीच पडत पाऊस
मग येतो दुष्काळ कोरडा
किडुक मिडुक संपून जातं
दशा होते अन्नान्न,
डीहायड्रेशनने दगावतात माणसे
दगावतात पशू पक्षी
लागतात गावे देशोधडीला,
नाही म्हणायला
घरे राहतात जशीच्या तशी
कुलूपबंद
माणसे परतण्याची आशा धरून;
हळूहळू विरत जातं सारं...
********************
भावनांचाही
पाऊस असतो म्हणतात -

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ७ डिसेंबर २०१९

अदलाबदल

एकदा बदलली नावे फुलांची
मोगऱ्याला आवाज दिला - 'ए कुंदा'
कुंदाला आवाज दिला - 'ए मोगऱ्या'
काहीच बदल झाला नाही,
टपोरेपण अन सुवास
मोगऱ्याला सोडून गेले नाहीत;
टवटवीत शुभ्रता
कुंदाला सोडून गेली नाही;
खजील झालो
खट्टू झालो
पुन्हा केला प्रयत्न;
दोघांनाही आता
बेशरमची फुलं म्हटलं,
तरीही ती जशीच्या तशीच;
मग वळवला मोर्चा
बेशरमाकडे
त्याला म्हणत राहिलो -
गुलाब, मोगरा, चमेली
चंदन, वड, पिंपळ
आंबा, फणस, पेरू
- असं काही काही;
पण नाही पडला
फरक त्यालाही काहीच;
झाडांना, फुलांना, फळांना
नाही पडत फरक
या नावाने वा त्या नावाने;
मलाही मिळतात बरीच नावे,
पण...

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १५ डिसेंबर २०१९

किनारे दूर जाताना

किनारे दूर जाताना
दृष्टी आकाशी असावी
पार्थिवाची राख थोडी
मूक भाळी टेकवावी...

मृण्मयाचा गंध घ्यावा
दो करांनी सावरोनी
आणि अर्पावी धरेला
सागराची मौन वाणी...
पावलांचे गान भोळे
पायरीला दान द्यावे,
आठवांचे शुभ्र झेले
आसमंता पांघरावे...
होऊनि नि:संग प्यावे
अमृताचे लाख प्याले
भावकंठाने म्हणावे
चिन्मयाचे शुद्ध गाणे...
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १९ डिसेंबर २०१९

अंदाज

समुद्राच्या काठी
असतो कचरा, असते घाण
पण त्यावरून करू नये
त्याच्या पोटातील रत्नांचा अंदाज;
समुद्राच्या काठी
असते वाळू
पण त्यावरून करू नये
त्याच्या गर्भातील माशांचा अंदाज;
समुद्राच्या काठावर
दिसते त्याची खळबळ
पण त्यावरून करू नये
त्याच्या गांभीर्याचा अंदाज;
समुद्राच्या काठावर असते
पाणी पाऊलभर
पण त्यावरून करू नये
समुद्राच्या खोलीचा अंदाज;
माणसांचाही
अंदाज करू नये असाच
त्याच्या काठावर दिसणाऱ्या
काहीबाही गोष्टींवरून !!

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ३० डिसेंबर २०१९

मीच माझा हुंकारतो

तुझ्या सोबतीची शाल
अंगावर पांघरतो,
तुझ्या अदृश्य हातांची
ऊब मनी जोजवतो...

तुझी अमूर्त आकृती
माझ्या बाजूने चालते,
माझ्या पावलांच्या संगे
तुझे पाऊल पडते...
माझ्या संगे वेचतात
आजूबाजूचा आनंद
तुझ्या अबोल डोळ्यांना
कसा लागला हा छंद...
माझ्या कंठातले गाणे
तुझ्या स्वरातून येते
तुझ्या शब्दांची पालखी
दारी ठेऊनिया जाते...
माझा जीव तुझी छाया
माझा भाव तुझी माया
परसात बागडतो
तुझा चंदनाचा पावा...
उभा चंपक शेजारी
घाली अंगणात सडा
तुझ्या पाऊली दाटतो
वनी फुलला केवडा...
भोवतीचे सारे सारे
तुझ्या रंगात नाहते
आत खोलवर सारे
तुझे अरुप पाहते...
आहे तरी कसे म्हणू
कसे म्हणू नाहीस तू,
तुला हाकारतो आणि
मीच माझा हुंकारतो...
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ३१ डिसेंबर २०१९

तो ... ...

त्यांना ... ...
तो दु:ख सांगतो
त्यांना दुस्वास वाटतो,
तो त्रास सांगतो
त्यांना तक्रार वाटते,
तो आपबिती सांगतो
त्यांना आरोप वाटतो,
तो संवेदना बोलतो
त्यांना स्वाभिमानाला धक्का वाटतो,
तो आर्जव करतो
त्यांना आदेश वाटतो,
तो विश्लेषण करतो
त्यांना विरोध वाटतो,
तो मत मांडतो
त्यांना मागणं वाटतं,
तो विनोद करतो
त्यांना विकृती वाटते,
तो संवाद करतो
त्यांना संघर्ष वाटतो,
तो ... ...
त्यांना ... ...

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ५ जानेवारी २०२०

मृगजळ !!

मृगजळ कधीच फसवत नाही
अगदी कधीच...
फसतो आपण
अन म्हणतो
फसवलं मृगजळाने...
मृगजळ कधी बोलावतं का?
आपणच जातो त्याच्याजवळ
तहानलेले होऊन
अन ते अदृश्य होतं
जवळ गेल्याबरोबर
जे मुळात नसतंच कधीच कुठे;
सावलीत, थंडीत चालताना
नाही भेटत कधीच मृगजळ,
ते भेटतं
फक्त रखरखत्या उन्हात
असह्य ताप सहन करत चालताना
घशाला कोरड पडते तेव्हा
जीव तळमळतो तेव्हा;
उगवतं अचानक
बोलावत नाही
पण खेचून घेतं,
उरफोड करत धावतो त्यामागे
अन जवळ पोहोचतो तर
काहीच नाही...
नसतं खरं तर काहीच
तरीही वाटतं आहे
तेच मृगजळ !!
खरी फक्त तहान असते,
खरा फक्त शोष असतो,
खरं फक्त तापणं असतं,
खरा फक्त भ्रम असतो,
खरा फक्त भ्रमनिरास असतो...
मृगजळ सुद्धा खोटं नसतं
खरंच, खोटं नसतं मृगजळ
कारण, खोटं असायला
ते मुळात असावं लागतं !!
मृगजळ तर नसतंच...
कोण जन्माला घालतं
नसलेल्या मृगजळाला,
कोण अदृश्य करतं
नसलेल्या मृगजळाला,
कोण भोगायला लावतं
मृगजळाला अकारण
- तहानलेल्याची नाराजी,
तोच खरा दोषी
तोच खरा गुन्हेगार
तोच खरा पापी;
सांभाळून ठेवा आपल्या शुभेच्छा,
सांभाळून ठेवा आपल्या सदिच्छा,
त्या
दोषी, गुन्हेगार अन पाप्यासाठी
जेव्हा मिळेल त्याच्या कर्माची सजा
तेव्हा त्याला गरज पडेल म्हणून...

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १३ जानेवारी २०२०

तुका डोंगरी बैसतो

तुका डोंगरी बैसतो
ध्यान विठ्ठलाचे ध्यातो
हात सत्याचा धरून
शब्द शहाणा लिहितो...

नको गलबला त्यास
ज्यात लोपतसे सत्व
तुका अवकाशी लावी
त्याचे निर्मळ ते चित्त...
त्याचा शब्द शक्तिमान
त्यात साठवतो तेज
कधी आर्जवांचा भाव
कधी ओढतो आसूड...
होते डोंगरवाऱ्याने
सारे हिणकस दूर
तुका वेचून काढतो
धुळीतले सोनकण...
नाही सोसत तयाला
बाहेरील झंझावात
अंतरीची वादळे तो
घेतो तोलून झोकात...
शब्द, रूपाचे लावण्य
सरणार कधीतरी
घेतो बांधून मनाशी
खूणगाठ केव्हा तरी...
त्याला ध्यास अक्षराचा
त्याचा भाव अनंताचा
त्याचे शब्द वाहतात
अर्थ फक्त शाश्वताचा...
डोंगराच्या माथ्यावर
त्याचा एकांत राजस
चिरंतनातून होते
चिरंजीव बरसात...
तीच बरसात मग
येते डोंगर तळाशी
अन फुलवीत जाते
सार्थतेच्या महाराशी...
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १६ जानेवारी २०२०

यमनाच्या संध्याकाळी

यमनाच्या संध्याकाळी
मौनास बांधल्या गाठी
स्वरकल्लोळाच्या पोटी
क्षणिकांची दाटीवाटी...

यमनाच्या संध्याकाळी
येतात वादळे आणि
अंधुक आठवांचीही
सरिता नाचत जाई...
यमनाच्या संध्याकाळी
आम्रतरुला धरुनी
अल्लड वारा अजुनी
झोपाळा झुलवीत राही...
यमनाच्या संध्याकाळी
विस्मृतीच्या पारावरती
नेत्रांच्या थिजल्या वाती
पुन्हा उजळूनी येती...
यमनाच्या संध्याकाळी
उत्फुल्ल निशेच्या भाळी
शेंदूरटिळा रेखाया
किरणांची होते दाटी...
यमनाच्या संध्याकाळी
गातात पाऊले वेडी
काळाच्या पाऊलवाटी
सरलेल्या गाठीभेटी...
यमनाच्या संध्याकाळी
लाटातून लाटा उठती
बुडलेले सारे काही
घेऊन किनारी येती...
यमनाच्या संध्याकाळी
वेणूचा नाद सभोती
धरणीला देऊन जाती
स्वर्गीचे चांदणमोती...
यमनाच्या संध्याकाळी
खेळ असा हा खुलतो
हसता हसता थोडा
पापणीत साकळतो...
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १८ जानेवारी २०२०

समजून घेताना...

मी समजून घेतो तुला
माझ्या बाजूने,
कधी कधी तुझ्या बाजूने;
असंच समजून घेतो
आपल्यात जे काही
असेल नसेल ते,
या किंवा त्या बाजूने;
ना माझी बाजू असते पूर्ण
ना तुझी बाजू असते पूर्ण;
मला व्हावे लागेल
माझ्यापासून दूर,
मला व्हावे लागेल
तुझ्यापासून दूर;
अन उभे राहावे लागेल
त्या बिंदूवर
जिथून दिसतील मला
मी, तू, अन
दोघातील असले नसलेले
सारे काही पूर्ण रुपात;
त्या बिंदूलाच असते नाव -
सत्य, ईश्वर, धर्म, न्याय
किंवा मानवता
किंवा प्रेम !!
माझ्याकडे आहे यातील काही?
तुझ्याकडे आहे यातील काही?

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २० जानेवारी २०२०

जिव्हाळ्याचा रंग

किती आवडतो तुला
लपाछपीचा हा खेळ
मला छळण्यात तुझा
जातो आनंदात वेळ...

कसा नियम अजब
तुझ्या खेळातील आहे
लपणार तूच आणि
शोधायचे मला आहे...
कधीतरी वाटते की
थोडे आपण लपू या
गाल फुगतात तुझे
आणि खेळ मोडलेला...
लपण्याच्या जागा सुद्धा
किती सापडती तुला
शोधशोधून थकतो
जीव कातावतो असा...
परी तुला काय त्याचे
वरी हसण्याचा छंद
मेटाकुटीस आणतो
तुझा खेळण्याचा ढंग...
पण सोडवत नाही
तुला शोधण्याचा खेळ
कसा जिव्हाळ्याचा रंग
मनी वाजतो मृदंग...
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २७ जानेवारी २०२०

तो अंतरी जपावा...

तो अंतरी जपावा...
अळवापरीस आहे
आयुष्य, मानवा रे !
गमजा कशास त्याच्या
जे, गळणार खास आहे...

मोत्यांस लाजविती
पर्णावरील थेंब
मातीत ओघळोनी
होतात शून्य तत्व...
लावण्य सानुल्यांचे
क्षणकाल मोहविते
थोडी झुळूक सारे
अस्तित्व मालविते...
क्षण एक तेवढा तो
सौंदर्यसाज घेतो
आनंद मुक्त हस्ते
जगतास देत जातो...
तो तेवढाच घ्यावा
मनशिंपल्यात ध्यावा
होईल मोती ज्याचा
तो अंतरी जपावा...
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, ३० जानेवारी २०२०

मी हिंदू आहे !!

मी हिंदू आहे !!
हो,
मी हिंदू आहे
कट्टर हिंदू
अगदी कट्टर कट्टर हिंदू !!
म्हणूनच -
मला नाही होत संकोच
रमझानच्या वा नाताळच्या
शुभेच्छा देताना,
मला नाही वाटत की -
मेरीपुढे किंवा रिक्त भिंतीपुढे
उभे राहिल्यावर
कोणाला
आधार, आनंद वा शांति नाही मिळणार;
नाही येत माझ्या मनात
हा देव श्रेष्ठ की तो देव श्रेष्ठ;
मी आहे कट्टर हिंदू
त्यामुळेच आहे माझा विश्वास
येशू अन अल्ला अन गणेश
विष्णू अन दुर्गा अन शिव
किंवा हा, तो, तो, ते, ते
किंवा ही, ती, ती, त्या, त्या
किंवा माता किंवा पिता किंवा मालक
यात भेद नाहीच काही,
या विश्वाच्या नित्यनूतन निर्मितीत
मानवाच्या मनात उठलेले
ते आहे सुंदर काही तरी,
ते आहे शिव काही तरी
ते आहे सत्य काही तरी;
मी हिंदू आहे
अगदी कट्टर...
म्हणूनच -
मला नाही वाटत भय
तुम्ही एवढे उदार आहात का?
हा प्रश्न विचारताना -
एखाद्या ख्रिश्चनाला
एखाद्या मुस्लिमाला
एखाद्या यहुद्याला
एखाद्या हिंदूला
एखाद्या नास्तिकालाही;
अन मला नाही वाटत भय
शुभचिंतन करताना
एखाद्या ख्रिश्चनासाठी
एखाद्या मुस्लिमासाठी
एखाद्या पारशासाठी
एखाद्या हिंदूसाठी
एखाद्या नास्तिकासाठी;
मी हिंदू आहे म्हणूनच
हेही सांगू शकतो सगळ्यांना-
आपली ओळख
आपल्या फुलण्यासाठी असते,
नसते वर्चस्वासाठी
नसते सत्ता गाजवण्यासाठी,
आपली ओळख नसते
संघर्षाच्या चुलीचे सरपण,
आपली ओळख नसते
घोळके वाढवून दमदाटी करण्याचे शस्त्र,
आपली ओळख नसते
आर्थिक, राजकीय, प्रादेशिक
साठमारीचे हत्यार;
मी हिंदू आहे कट्टर
म्हणूनच म्हणू शकतो
नि:शंकपणे -
धर्मांतराची गरजच नाही
अन त्यासाठी होणारे प्रयत्न
मानवतेचा अपराध आहेत;
मी हेही म्हणू शकतो
की, हे प्रयत्न थांबवा
तरच येईल शांतता जगण्यात;
मला संकोच होत नाही सांगताना
की, सगळ्याच सणांमध्ये
घुसले आहे व्यापारी
गल्ला भरून घ्यायला सज्ज;
मी हिंदू असल्यानेच म्हणतो
मानवी श्रद्धेचा
राजकीय वापर
आर्थिक वापर
सामाजिक वापर
गैर आहे;
मला नाही वाटत
हिंदूंची अवैज्ञानिकता
मुस्लिम, ख्रिश्चन वा अन्य
यांच्यापेक्षा वेगळी आहे,
मला नाही वाटत
हिंदूंचे परंपरा प्रेम
मुस्लिम, ख्रिश्चन वा अन्य
यांच्यापेक्षा वेगळे आहे;
त्याच वेळी मी हेही म्हणतो -
अवैज्ञानिकता, परंपराप्रेम
यात अडकू नये कोणीच
अगदी हिंदूंनीही;
मी हिंदू आहे
कट्टर कट्टर हिंदू आहे...
सत्यमार्गाचा प्रवासी आहे !
पूर्णतेचा प्रवासी आहे !!
शिवत्वाचा प्रवासी आहे !!!
म्हणूनच -
निर्भीडपणे बोलतो, सांगतो
त्या मार्गीचे अडथळे
त्या मार्गीच्या अडचणी
त्या मार्गीचे काटे
त्या मार्गीचे खड्डे
त्या मार्गीचे थांबे
त्या मार्गीच्या खुणा...
मला चुकीला चूक म्हणता येते
स्वतःच्या चुकीलाही;
मला कळते की
धरायचा असतो हात आततायीचा,
मी तेही करतो;
अन चालत राहतो पुढे पुढे
माझ्या शुचिर्भूत मनासह
त्यावर कसलाही डाग
पडू नये, याची काळजी घेत...
मी हिंदू आहे
कट्टर कट्टर हिंदू आहे !!!
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २५ डिसेंबर २०१९