रविवार, ८ डिसेंबर, २०१३

पत्ता

समोर बस आली
अन् चढलो त्या बसमध्ये;
कुठे जात होती बस?
कुणास ठाऊक...
कंडक्टर आला
म्हणाला- तिकीट?
म्हणालो- एक द्या...
अहो पण कुठले?
कंडक्टरचा प्रश्न...
कुठले तिकीट मागावे?
कुठे जायचे आहे आपल्याला?
संभ्रमित माझ्यापुढे
चिमटा वाजवला कंडक्टरने,
सावरून घेत म्हणालो,
द्या शेवटल्या स्टॉपचे...
तिकीट खिशात ठेवले
अन् पाहत बसलो खिडकीबाहेर
बराच वेळ फिरली बस
किती वेळ कुणास माहीत...
कंडक्टर सांगत होता-
उतरा आता,
आला शेवटला स्टॉप...
मी बसलेलाच, म्हणालो-
आता कुठे जाणार बस?
जाईल पुन्हा
तुम्ही जिथून बसला तिथेच...
मग द्या पुन्हा तिथलेच तिकीट...
तिकीट देताना म्हणत होती
कंडक्टरची नजर -
`किती वेडपट आहेस तू?'
जिथून चढलो होतो तो स्टॉप आला
मी बसलेलाच,
कंडक्टर स्वत:च म्हणाला,
काय? जायचे पुन्हा
शेवटल्या स्टॉपला?
मी फक्त, हो म्हणालो
त्याने तिकीट दिले
प्रवास सुरू झाला,
झाल्या दोन तीन फेर्या अशाच
अखेर तो बापडा म्हणाला-
आता बस डेपोत जाणार
आता उतरावेच लागेल
उतरलो चुपचाप खाली
थोड्याशा सहानुभूतीने
जवळ आला कंडक्टर
म्हणाला- काही प्रॉब्लम आहे का?
कुठे जायचे आहे?
म्हटले, तेच तर ठाऊक नाही
पत्ताच हरवलाय
बरेच दिवस झाले
शोधतो आहे,
उद्या दुसरी बस पकडणार
आणि पुन्हा शोध...
कंडक्टरने पाय काढता घेतला
वेड्याच्या नादी लागणे
बरे नव्हे म्हणून...

- श्रीपाद
मंगळवार, २८ फेब्रुवारी २०१२

क्षणभंगुर

तो उभा
आभाळावर नजर रोखून
डबडबल्या डोळ्यांनी
अनंत आकाश तोलून धरत,
त्याच्या इवल्याशा थेंबात
सामावलं आकाश आणि
गुडूप झालं त्याहूनही विस्तीर्ण मनात...
तोच थेंब ओघळला
अन् घरंगळला जमिनीवर
मातीवर सुकून गेला,
जाताजाता आपल्यातली
न विझणारी ठिणगीही
देऊन गेला...
त्या ठिणगीने उसळला
आगडोम्ब पृथ्वीच्या पोटात
अन् उसळल्या असंख्य ठिणग्या,
धरतीने फिरवला हात त्यांवर
अन् त्यातून फुले उमलून आली
पण संध्याकाळी कोमेजली...
अगदी त्याच्यासारखीच...

- श्रीपाद
शुक्रवार, १० फेब्रुवारी २०१२

तुला नाही ठाऊक

तुला नाही ठाऊक
तू माझ्यासाठी काय आहे?

तू माझ्यासाठी
हसण्याचं कारण आहे
रडण्याचं निमित्त आहे
उदासीचा बहाणा आहे...

तू आहे माझ्यासाठी
रुसण्याचं स्थान
बेहोशीचं गान
जगण्याचं भान...

तुला नाही ठाऊक
तू माझ्यासाठी काय आहे?

तू आहे
झाडांची हिरवाई
फुलांची नवलाई
रंगांची उधळण,
पक्ष्यांचा चिवचिवाट
नदीचं वाहणं
वार्याचं भुरभुरणं

तू आकाशीची कोर आहे
नाचणारा मोर आहे
पहाटेचं दवं आहे
रात्रीचं हिव आहे,
पावसाची धार आहे
थंडीची बहार आहे

तुला नाही ठाऊक
तू माझ्यासाठी काय आहे?

तू
मनातला पिंगा आहे
ह्रुदयातली हुरहुर आहे
नयनातली आस आहे
पावलातली ओढ आहे

माझं असणं आहे तू
माझं नसणं आहे तू
ओंजळीतल्या नाजूक
भावना म्हणजे तू

तुला नाही ठाऊक
तू माझ्यासाठी काय आहे?

तुला नाही ठाऊक,
जाग येते कधीतरी
रात्री वेळी अवेळी
खिडकीतल्या किरणांवर होतो स्वार
पोहोचतो आकाशी
अन् आकाशगंगेच्या सोबतीने
पोहोचतो तुझ्याजवळ

डोकावतो हळूच
तुझ्या स्वप्नमयी डोळ्यातून,
वेढून घेतो तुला अल्लद
रोखून धरतो माझ्या श्वासांनीही
तुझी झोप चाळवू नये म्हणून
आणि परततो आल्या पावली
पाऊलही न वाजवता
माझ्याच अस्तित्वाचं प्रयोजन घेउन
सतत साद घालणार्या
धूसर भास आभासांच्या पल्याड

तुला नाही ठाऊक
तू माझ्यासाठी काय आहे?

- श्रीपाद

कट्टी

अमनस्क फिरत होतो उद्यानात
एका झाडाखाली थांबलो, चाफ्याच्या
अगदी सहजच
हळूच आलं एक फूलपाखरू
आणि बसलं चक्क हातावर
थोड्या उड्याही मारल्या
त्यानं तिथल्या तिथे,
थोडी पटली असावी ओळख
म्हणून बसलं होतं निवांत
ठिपक्या ठिपक्यांचे पंख हलवत
थोडीशी हालचाल केली
तरीही नाही उडालं,
कधी डोळे मिचकावले
त्याच्याकडे पाहून,
कधी घातली फुंकर,
तेही डोलत होतं आनंदात,
आणि पाहतो पाहतो
तोवर गेलं उडून
अरे अरे म्हणत मारलेल्या
हाकाही न ऐकता...
असा कसा रे दुष्ट तू?
मला खूप राग आलाय तुझा
तुझं मन भरलं असेल खेळून
पण माझं खेळणं तर राहीलंच ना अर्धवट,
खेळतच होतो आपण दोघं
आनंदातही होतो
त्रास नव्हतो देत एकमेकांना
तरीही गेला, मन भरलं म्हणून
माझं मन भरण्याची वाट न पाहताच
आता कधीही नाही बोलणार तुझ्याशी
कट्टी कट्टी कट्टी...

- श्रीपाद

ज्वाला

कोरड्या ठणठणीत
आणि रिकाम्या मनात
काय चाललंय आज हे...
का भरल्या जातंय
आज हे पुन्हा?
खरवडून खरवडून
रिकामं केलं होतं हे मडकं
आणि आज अचानक, नकळत...
कोणाचा हा उपदव्याप? कशासाठी?
संताप संताप होतो आहे
आता आग पेटून उठावी
जळून जावं सारं काही
उडून जावी राख वार्यावर
पुन्हा एकदा मोकळ व्हावं
अन् लाभावं ते सुखद रितेपण
पण नाही,
आग नाही पेटत अजून
धूर धूर झालाय सगळा
चुलीत, ओली लाकड
टाकल्यावर होतो तसा
कोंडून गेलं आहे सगळ
कासाविस अस्वस्थता
असा धूर चांगला नाही
मला ज्वाला हवी आहे,
ज्वाला...

- श्रीपाद कोठे

प्रवाह

एक होती राधा
एक होता कृष्ण

एकत्र यायचे होते दोघांनाही
एकरूप व्हायचे होते दोघांनाही

तसे काही घडले नाही
ओढ मात्र संपली नाही

युगेयुगे तीच ओढ़
तशीच अजून वाहते आहे
कोटी कोटी मनांमध्ये
अजूनही तेवते आहे

राधा गेली कृष्ण गेला
तरी वाहणे सुरूच आहे
त्यालाच आज जगामध्ये
राधा-कृष्ण नाव आहे...

- श्रीपाद

`झाड कटवाना है क्या झाड?'

ओलिचिम्ब पहाट कानातून मनात उतरली
अन् डोळे उघडायला भागच पडले,
ऐकू येणार्या पाउसधारा दिसू लागल्या,
त्यांच्याशी गुजगोष्टी करत
तसाच लोळत राहिलो काही वेळ,
त्यांच्या आमंत्रणाला नकार देणे
शक्यच नव्हते, दार उघडलं
हिरवा आनंद
सगळीकडे भरून राहिला होता,
अनामिक धुंदीतच दिवस सुरू झाला
चहा झाला आणि
हाती पेपर घेउन दारातच बसलो,
खरं तर पेपर नावालाच होता हातात
अवतीभवती आणि मनातही होता फक्त
ताजा चैतन्यमयी हिरवा फुलार
झाडे नटली होती हिरवाईने
चैतन्याची, सृजनाची गाज देत
मरगळल्या मनाला साद देत,
सांदीकोपर्यातही उगवून आले होते
काही ना काही...
अन् अचानक कानी हाक आली,
`साब झाड कटवाना है क्या झाड??'

- श्रीपाद

रानबावरी...!!!

कधी गर्द झाडीतून
कधी विरळ झाडाझुडुपातून
नागमोडी पायवाट तुडवत जाते- ती!
कधी अल्लड अवखळ
कधी पोक्त गंभीर,
नाचत बागडत
हरिणांच्या साथीनं,
ठुमकत डौलदार
मोराच्या सोबतीनं,
कधी सुहास्यवदना
कधी गंभीर चेहरा करून,
पशुपक्ष्यांशी बोलत बोलत
गायीगुरांशी खेळत खेळत
नदीच्या प्रवाहासारखीच
नदीच्या काठाने,
कधी थबकलेली
कधी वाहती,
वेळी अवेळी
एकटीच भटकते
निर्व्याज निर्भयपणे,
कधी चंद्रकिरणे लेवून
कधी अवसेचे चांदणे पांघरून,
येताजाताना
कटाक्ष टाकते कधी एखादा,
कुठून येते?
कुठे जाते?
कोणालाच नाही ठाऊक
लोक म्हणतात-
दूर दूर, खूप दूर
जंगलाच्या टोकाला गुहा आहे,
तिथूनच येते ती
आणि तिथेच जाते परत,
बस्स... फक्त एवढेच,
तिचं नाव...
.........???
.........???
रानबावरी...!!!

- श्रीपाद

अलीकडे

होत नाही
तुझे येणे
अलीकडे
वारंवार

मानसीच्या
अशांतीला
आता नाही
पारावर

तुझा फोटो
घेतो करी
करावया
गोष्टी चार

आहेस तू
असा भास
नाही जरी
आसपास

कसे सांगू
आता तुला
मनातले
गुज खास

साधे पान
गळताही
घेतो तुझा
अदमास

नको आता
जीवघेणा
अंत माझा
पाहू प्रिये

तुझ्याविना
कसा राहू
उरात हा
श्वास अडे

- श्रीपाद

तुझे जाणे

तुझे जाणे
माझ्यासाठी
वेदनांचे
उमलणे

तुझे जाणे
अंगणीची
पाने-फुले
कोमेजणे

तुझे जाणे
आंब्यावरी
कोकीळेचे
मौन होणे

तुझे जाणे
पडवित
झोपाळ्याचे
खंतावणे

तुझे जाणे
मोगर्याने
सुवासाला
पारखणे

तुझे जाणे
माझे पुन्हा
आठवात
हरवणे

- श्रीपाद

चोकलेट

माझ्या दिशेने येणार्या प्रकाशाकडे
उत्सुकतेने पाहत होतो
तोच त्याच्या पाठी लपलेल्या अंधाराने
हळूच खुणावले,
मंद स्मित करीत म्हणाला तो-
ये इकडे,
न बोलता खुणेनेच सारं काही

मी नाही गेलो
तेव्हा त्याने चोकलेट काढले
त्याच्या जवळचे
आणि म्हणाला, हे घेणार?

चोकलेट पाहून जवळ गेलो
खूप गोड हसत होता तो
चोकलेट सारखाच,
हळूच हात पुढे केला
आणि चोकलेट घेतलं त्याने दिलेलं
त्याने हळूच पापाही घेतला माझा
छान वाटलं मला

मला चोकलेट का दिलं?
मी विचारलं...
तू जवळ आला ना माझ्या म्हणून!!
जो येतो माझ्याजवळ
त्या सगळ्यांना देतो मी
खूप चोकलेट आहेत माझ्याकडे
सगळ्यांसाठी
पण येत नाहीत
फारसे कोणी माझ्याजवळ

तू लपून का बसतो प्रकाशामागे?
म्हणून येत नाहीत कोणी
मला घाबरवायला नाही आवडत कोणाला
तो उत्तरला,
आणि हा प्रकाश ना
घाबरतो खूप मला
माझाच भाऊ असून
म्हणून बसतो लपून
पण जे येतात ना
त्या सगळ्यांना देतो
मी चोकलेट
भेदभाव न करता

सुंदर-कुरूप
चांगले-वाईट
स्त्री-पुरुष
श्रीमंत-गरीब
ज्ञानी-मूर्ख
सगळ्यांना

येत जा आठवण आली की...

- श्रीपाद

मन माझे

मन माझे
वेडेपिसे
देखोनीया
चिंब झाडे

झाडे वेडी
डोलतात
वार्यासंगे
बोलतात

बोलतात
शब्द असा
अंतरी जो
बिलगतो

बिलगणे
असे त्याचे
सुगंधात
जीव न्हातो

जीव मग
तरंगतो
आभाळाला
खेव देतो

खेव घाली
आभाळही
अज्ञाताचा
स्पर्श होतो

स्पर्श होता
गात्रोगात्री
जलधारा
झरतात

झरताना
पुन्हा पुन्हा
मने चिंब
करतात

- श्रीपाद

मालकंस

अशी भेट
धुंद धुंद
मीठी झाली
मुक्तछंद

मोगर्याचा
मंद गंध
श्वासलय
अनिर्बंध

विरले ते
जडबंध
हळू टिपे
मकरंद

गात्रान्नाही
चढे जोर
आता नको
लाज-बुज

कण कण
तुझा माझा
गाऊ लागे
मालकंस

- श्रीपाद

माझे मन

माझे मन
तुझे झाले
भेटीलागी
आसुसले

भेट घडे
तुझी माझी
माझे मन
नादावले

नाद असा
वेडापिसा
माझे मन
खुळावले

वेडा नाद
रुंजी घाले
माझे मन
उधाणले

कसे कथू
वेडे गुज
माझे मन
खंतावले

भेट पुन्हा
होण्यासाठी
माझे मन
वाट पाहे

- श्रीपाद

अंतरंग

काका मला तो पिवळा
मला हिरवा द्या काका
मला लाल
मला निळा

हे तुझे पैसे बेटा
तुझा झाला एक रूपया
तुला गं काय हवं

शाळेजवळच्या फुगेवाले काकांच्या
दुकानावर रोजचेच संवाद पार पडले
रोजच्या सारखेच

अन्,
अन् वेगळेच काहीतरी घडले आज
रोजच्यापेक्षा
रोज न येणारी ती मुलगी
हळूच जवळ गेली त्यांच्या
अन् म्हणाली-
`अहो फुगेवाले काका'
`काय गं बेटा'
काका, तो काळा फुगाही
उडतो का हो
हवेत उंच??
हो गं बेटा
तोही उडतो असाच
इतर फुग्यांसारखाच
हवा तुला?
आणि काकांनी फुगा दिला
त्या मुलीच्या हाती
आणि म्हणाले-
`घे तुला ही भेट
माझ्याकडून'
तीही निघून गेली आनंदाने
फुगा उडवत

आणि कुबड्या घेउन जाणार्या
त्या काळ्या मुलीकडे पाहात
काका स्वत:शीच पुटपुटले-
`फुगा रंगाने वर नाही जात बेटा
त्याच्या आतील हवेने जातो...'

- श्रीपाद

अदृश्य

हवेची झुळूक
खूप मोलाची आहे,
माझ्यासाठी....

तसाच देवही
खूप मोलाचा आहे,
माझ्यासाठी....

माझं मनही
खूप मोलाचं आहे,
माझ्यासाठी....

मोगर्याचा सुगंधही
खूप मोलाचा आहे,
माझ्यासाठी....

पण हे कधीच
भेटलेले नाहीत, दिसलेले नाहीत
मला प्रत्यक्ष...

जशी तूही
भेटलेली नाहीस, दिसलेली नाहीस
प्रत्यक्ष कधीही...

- श्रीपाद

विस्कटलेली लय

काय नातं आहे
माझं नी त्याचं,
निरंतर ओढीने
मन झेपावतं
आस लागून राहते- भेटीची,

काम तर काहीच नाही
बोलायला काही संदर्भही नाहीतच
तरीही ओढ, अनिवार

दुरून होणारं दर्शन केवळ
त्याला एकटक
निरखून पाहण्याचा
चाळा फक्त,

दोन्ही हात उंच उभारून
झेप घेतली मनाने- उत्तुंग
मिटून घेतले डोळे
आणि अचानक ते पुढ्यात
मंद स्मित करीत,

प्रदीर्घ प्रतीक्षा फळाला आली
आणि अवसान गळून पडलं
सारी शक्तीच संपून गेली
शब्दही फुटेना तोंडून,

तेही निघून गेलं
आसुसलेल्या समजूतदारीनं,

तेव्हापासून आभाळ मारवा गातय
नियमितपणे, रोज संध्याकाळी,
आणि मी प्रयत्न करतो
तो नि:शब्द मारवा ऐकण्याचा
विस्कटलेली लय शोधण्याचा
निसटलेले स्वर मुठीत धरण्याचा

- श्रीपाद

अनामिकेची अंगभूल

अदृश्य पाशांनी
आवळलेला
अस्तित्वभार वाहून नेताना
अस्पष्ट जाणवते
अनामिकेची अंगभूल...
आधीच बावरलेल्या मनाला
अकारणच उसवून जाते...
अल्लद छेडून जाते
अनोळखी वीणा...
अधिकार गाजवते
आपल्याच तोर्यात...
आत्मा पडून राहतो
अडगळीच्या कोपर्यात
आक्रोशणारे निश्वास मोजत
अतृप्तीची समजूत घालत
आणि तरीही सुटत नाही
अनिवार ओढ
अनामिकेची...

- श्रीपाद

अबोलणारी झांज

दाटून येते कधी अवेळीच, उदासवाणी सांज
देऊन जाते माझ्या हाती, अबोलणारी झांज

असाच होता एक दिवस तो, उधळीत होतो रंग
लाल गुलाबी हिरवा पिवळा, होते अवघे दंग

खेळ मजेचा चालू असता, आला कठीण प्रसंग
डोळ्यादेखत कोसळला तो, विटून गेले रंग

नूर बदलला; झाली पळापळ, कुणी घेतली धाव
गाडी काढली कुणी आणखी, कुणी लाविले फोनं

रुग्णवाहिका आली धावत, घेउन गेली त्यास
उपचारांची शर्थ जाहली, शून्य असे प्रतिसाद

वरचढ ठरला काळ त्या क्षणी, घेउन गेला त्यास
तेव्हापासून रंग फिकुटले, उदास झाली सांज

- श्रीपाद

किंकाळी

काळोखाला चिरून गेली
दर्दभरी किंकाळी
क्षणात झाली चैतन्याची
पाहा राखरांगोळी

गडद्द काळोखातून उठल्या
लवलवत्या ज्वाळा
घेऊन गेल्या आठ जीवांना
सोबत निजधामा

जुनेच होते वैर म्हणोनी
दिली लावूनी आग
चिल्लीपिल्ली होती झोपली
आली त्यांना जाग

काय करावे काही सुचेना
आगडोंब उसळला
चहू दिशांनी ज्वाळा ज्वाळा
दाखविती जिभल्या

तोंडून साधा शब्द फुटेना
देईल कैसी हाक
वाळून गेले अश्रू नयनी
दैवाचा हा खेळ

मायलेकरे बिलगून बसली
आला शेवटचा क्षण
काय बोलले असतील तेव्हा
कोण करी सांत्वन

उरली केवळ राख त्या स्थळी
जिथे होती झोपडी
आणि पलिकडे क्रौर्य गोठुनी
मान खाली घालुनी

अरे माणसा कैसी करणी
पशुपरी ही तुझी
यातून सुटका होईल का रे
देवा अमुची कधी?

- श्रीपाद
(सोलापूर जिल्ह्यात माढा येथे १५ फेब्रुवारी २०१० रोजी पारधी जमातीच्या २ स्त्रिया व ६ बालकांना त्यांच्याच जमातीच्या काही लोकांनी पूर्ववैमनस्यातून जाळून टाकले. त्या घटनेनंतर मनात उमटलेल्या भावना.)

येती भरून डोळे

येती भरून डोळे
पण थेंब ओघळेना
कंठात दाटलेला
तो हुंदका फुटेना...

आभाळ दाटलेले
बरसात मात्र नाही
कोंदाटल्या दिशांना
रस्ताही आकळेना...

तो पूर आठवांचा
येतो मनात दाटून
अस्वस्थ भावनांना
परी शब्द सापडेना...

- श्रीपाद

तुटता तारा

निराधार आभाळाखाली
आधारहीन पावले
निरंकुश, झपूर्झा स्थितीत
कीर्र झाडी
असून नसल्यासारखी
आकाशीची चंद्रकोर
असून नसल्यासारखी
रातराणीचा सुगंध
असून नसल्यासारखा
वाटेवरील पदरव
असून नसल्यासारखा
मनाचा वेगही
असून नसल्यासारखा,
दृष्टी मात्र निश्चल
करुण-कोमल, आर्त
एकटक आभाळाकडे
आभाळातल्या बापाला
मायमाऊलीला
साकडे घालत,
अधीर
रोखून ठेवलेली नजर
रोखून ठेवलेला श्वास,
क्षणार्धात
मोकळा झाला
तळमळणारा आत्मा,
आभाळातल्या मायबापांनी
साकड ऐकलं, अन्....
तुटत्या तार्याला नमन करीत
सारं अस्तित्व आक्रोशलं
`असेल तिथे सुखी ठेव'
*** *** *** *** ***
कोणाच्या तरी सुखासाठी
तार्याला तुटावेच लागते ना
आकाशी...
...वा धरतीवर सुद्धा...

- श्रीपाद

पुंजका

अबोध मनाच्या तळाशी
काही धूसर आकृती
पुंजके पुंजके
हळूहळू त्यांचेच आकार होतात
न कळण्यासारखे, चित्रविचित्र
मग होतात गडद
रेषा, रंग, सौष्ठव
धूसरता कमी कमी होत जाते
ठळकपणा येऊ लागतो
हळूच त्या आकृती
हाती धरु जातो
तोच
निसटतात त्या हातातून
आणि फेर धरत
विरून जातात
पुन्हा एकदा
पुंजके पुंजके होउन
अस्तित्वाचा एक पुंजका
मागे ठेवून

- श्रीपाद

त्यांनी कदाचित समुद्र पाहिला नसावा

एके दिवशी
सायंकाळच्या गप्पाष्टकात
खूप वाकून पाहिले त्यांनी
माझ्या मनात;
दिसले त्यांना
खूप काही
सांडलेले, विखुरलेले
इकडे तिकडे
आश्चर्य वाटले त्यांना
आणि निराशाही;
त्यांनी कदाचित
समुद्र पाहिला नसावा

एके दिवशी पाहिले त्यांनी
माझे आकांडतांडव
माझा आक्रोश, आवेश
माझे गरजणे, बरसणे
आवेगाने फुटून जाणे
वारंवार उसळणे
अन् पुन्हा कोसळणे
त्यांना भीती वाटली
अन् चिंताही;
त्यांनी कदाचित
समुद्र पाहिला नसावा

- श्रीपाद

तसेही

आता निवांतपण
उद्या सकाळपर्यंत
कोणीही येणार नाही
जाणार नाही
उगीच एखादं कुत्र येतं
कधी कधी चुकारपणे
पण बहुधा नाहीच... ...
गात गात पहाटे येईल
झाडाखालचा चहावाला
आणि सुरू होईल वर्दळ
रात्रीपर्यंत येत राहतील लोक
आपापले हसू-आसू घेउन
घेउन जातील सोबत
आपापले असे काहीतरी
किंवा जातील सोडुनही
हाती घेतलेले हात
दबलेले निश्वास
किंवा बिस्कीटान्च्या
पुड्याचा कागद सुद्धा... ...
हसतील, बोलतील, चालतील
वाद घालतील, भांडतीलही
करतील काळजी आणि विचारपुसही
मिठीतही घेतील क्वचित
आणि निघून जातील
हात हलवत, उड्या मारत
नाही तर डोळे टिपतही... ...
सारं माझ्याच साक्षीनं;
येत राहतील गाड्याही
आणि जातील निघूनही
नाही थांबणार कुणीही
फक्त माझ्याशिवाय,
आणि पुढे केलेले हात
गुंफून घेईन पुन्हा छातीवर
रात्र झाली की;
उसासा दाबून टाकण्यासाठी
किंवा पुन्हा
दणकटपणे उभे राहण्यासाठी
... ... ... ... ...
तसेही फलाटाला
उभे राहावेच लागते ना !!!

- श्रीपाद

भोवरा

शांतपणे वाहते रेवा
परवीनच्या `रजनी कल्याण'सारखी
एक मडके,
त्या प्रवाहाला सोबत करीत
अस्थिकलश... कुणा एकाचा
कधीतरी नाव, रूप लाभलेला
कधीतरी नाव, रूप हरवलेला
नक्षत्रवेडा की मित्र काट्याकुटयांचा
येताना ओठभर हसू आणलेच असेल
किमान एखादीच्या चेहर्यावर
जाताना डोळाभर रडले असेल कुणी?
असेलही...
दोन-चार हाडे कुठेतरी
मिसळून जातील मातीत
अन् संपेल सारे
एका चक्राची पूर्ति ! समाप्ती !! की प्रारंभ?
झगडा, `मी' चा...
कधीपासून, कशासाठी?
कोणाच्या इच्छेने?
प्रश्नांचे भोवरे
रेवेच्या पात्रात
अतृप्त, अस्वस्थ
भोवर्यान्ना जन्म देत

- श्रीपाद

राघववेळ

शरयूच्या तीरावर
अमनस्क, अपलक उर्मिला
सरत्या दिनकराकडे पाहत
राघववेळेच्या प्रतिक्षेत
लक्ष्मणाच्या शब्दांची शाल पांघरून... ... ...
अखेर फळास आली
१४ वर्षांची प्रतिक्षा
आणि शरयूचा संग सुटला... ... ...
युगे लोटलीत
तीरावर विसावणार्या प्रत्येकाला
शरयू उर्मिलेची कहाणी सांगते,
पण आज
मौन झाली शरयू
काय सांगू या पांथस्थाला
कशी उमेद बांधू याची
कोणत्या शब्दांनी?
कोणत्या कहाणीने?
कसा शांत करू याचा जीव?
ठाऊकच होते उर्मिलेला
अन् लक्ष्मणालाही,
प्रतिक्षा आहे, फक्त १४ वर्षांची
पण...
याची प्रतिक्षा?
किती काळ?
कोणत्या उर्मिलेसाठी?
याची राघववेळा कोणाला ठाऊक असेल?
मौनपणे शरयू वाहतेच आहे... ... ...

- श्रीपाद

धावत धावत ये

ये ना गं लवकर
नको अंत पाहूस,
कालपासून अंथरलेल्या
माझ्या नयनांच्या पायघड्या
सुकून जातील बघ,
रात्रंदिवस रोखून ठेवलेले श्वास
निसटून जातील कुठेतरी... ...
ये, लवकर ये
धावत धावत ये... ...
तुझी चाहूल घेउनच तर येते
माझी प्रिया
अन् तू निरोप घेताच
निघूनही जाते,
काही घटकांची भेट
तुझी नि माझी
तिची नि माझी...
तेवढीच तर वेळ असते
माझ्या जगण्याची
कान्ह्याची बासरी ऐकण्याची
हंबरणार्या कपिलेला गोंजारण्याची,
तेवढीच वेळ असते
झुळझुळणार्या झर्याची
चिवचिवणार्या पक्ष्यांची
खळाळणार्या हास्याची,
तेवढीच वेळ असते
कुजबुजणार्या शपथांची
टपटपणार्या फुलांची
मुसमुसणार्या हुंदक्यांची
ऊसासणार्या विरहाची... ...
म्हणून ये,
धावत धावत ये

- श्रीपाद

मुक्काम

नेहमीसारखाच
आजही जाऊन आलो
त्या आंब्याखाली
संध्याकाळची वेळ साधून,
पारावर बसलो
उगाच थोडा वेळ,
थोडा हिंडलो
इकडे तिकडे,
अमनस्क रेघोट्या
उमटल्या धुळीत आपोआपच
उलट तपासणीही घेतली स्वत:चीच
थोडी पानेही चुरगाळून टाकली

असेच करतो मी
कधी कधी
स्वत:ला भेटावेसे वाटले की,
जाऊन येतो आंब्याखाली

माझा मुक्काम तिथेच आहे
तू निघून गेल्यापासून

- श्रीपाद

रांगोळी

`आई गं...!!!'
बोलता बोलता चुकून
अंगणातल्या रांगोळीवर
पाय पडला अन्
ती विस्कटली...

सकाळची रया
संध्याकाळी
पार लोपली...

`सॉरी हं',
अभावितपणे
स्वगत बाहेर पडलं...

जाऊ दे,
नको वाईट वाटून घेउस
माझं प्राक्तनंच आहे
विस्कटण;
कोणाच्या तरी पायाने
वा झाडूने,
मला नाही होत दु:ख वगैरे...

तुझं पाऊल तेवढ
नीट धुवून घे
विस्कटता विस्कटता
तुझ्या पावलाला
माझा रंग
चिकटून गेलाय बघ...

- श्रीपाद

थट्टा

दिवस सरला
संध्याकाळ झाली
आकाशरंग तसेच
नीळे, लाल, गुलाबी, भगवे
मधे मधे पांढरे पुंजके
पहाटे होते तसेच... ... ...
तूही तसाच
पहाटेसारखाच
ओरडतोही तसाच आहे
तुझी काव काव ऐकूनच तर
झोपेतून जाग आली
तू दिलेली ती सादच
दिवसभर रुंजी घालत होती मनात
त्यामुळेच दिवसही गेला उत्साहात
आशादायी पहाटेनंतर
उत्साहपूर्ण दिवस... ... ...
पण सकाळचे उत्साही रंग
आता मलूल झालेत
उदास झालेत
चित्तहारी माणूस येणार येणार
म्हणत दिवस गेला
पण काहीच खबरबात नाही त्याची,
तुला नाही कळणार ही उदासी
पण एक ऐकशील
पुन्हा नको असा ओरडूस
पहाटे पहाटे,
अशी थट्टा करू नये रे कुणाची...

- श्रीपाद

शत शत वंदन

सप्तसुरांचे एकत्रित दर्शन,
सर्व मनोभावांचे एकत्रित वर्णन,
आबालवृद्धांचे सामूहिक गुंजन,
वनी मोराचे सुंदर नर्तन,
प्रेमी जीवांचे मधुर कुजन,
देशभक्तीचे उत्कट पूजन,
मातृत्वाचे मंगल गायन,
पितृत्वाला सुरेल वंदन,
या सार्याचं वर्णन
करणारा एकच शब्द-
लता मंगेशकर,
दीदी तुम्हाला
शत शत वंदन
शत शत वंदन

- श्रीपाद

क्षणभंगुर

किती वाट पहायला लावतेस?
दिवस रात्रीला म्हणाला...
माझी अवस्था वेगळी असते का?
रात्रीने दिवसाला प्रतिप्रश्न केला...

काय गं हे नशीब आपलं?
अखंडपणे चालण, बास्...
दोघांच्याही दिशा विरोधी
तूही चालत असतेस
अन् मीही चालत असतो,
अखेरीस तो क्षण येतो
चिरप्रतिक्षित
ओढाळ, हवाहवासा
पण शापित,
त्या मधु मिलनाला
तू आपले रंगरूप सोडून देतेस
आणि मीही त्याग करतो
माझ्या रंगरुपाचा
तू रात्र नसतेस
आणि मी नसतो दिवस
अन् काही कळण्याच्या आतच
पुन्हा एकदा तू असतेस तू
अन् मी असतो मी
दोघांनाही नको असते हे `मी'पण
तरीही, स्वीकारावे लागतेच...

मिलन आणि विरह
एकाकार झालेल्या,
त्या क्षणभंगुर क्षणांची
एकमेव साक्षीदार असलेली
संध्याकाळ मात्र
खदखदत निघून जाते

- श्रीपाद

अनभिज्ञ

सकाळी उमललेली टवटवीत फुले
कोमेजून गेलीत संध्याकाळी
पाकळ्या मलूल झाल्या,
त्यांच्या शेजारीच
डुलत होत्या नवीन कळ्या

काय संबंध
मलूल फुलांचा
आणि नवीन कळ्यांचा?
परस्परांशी, झाडाशी?
एकाने मान टाकली
आणि दूसरी मान डोलावतेय

मी हात पुढे केला
मलूल फुले खुडण्यासाठी
तू म्हणालीस,
`थांब...
झाडांना हात नसतो लावायचा
सूर्यास्तानंतर
थकून भागून झोपतात ती'

त्याच वेळी मधुमालती फुलत होती
तिची फुले तोडताही येत नाहीत
आणि तोडून उपयोगही नाही
ती केवळ सुगंध पसरतात दशदिशांना
भरून टाकतात आसमंत
मधुमालतीच्या मांडवाखालून
आपण पुढे गेलो

सकाळी पाहिलं
सडा पडला होता
काल मलूल झालेल्या फुलांचा,
सुगंध पसरणार्या मधुमालतीच्या फुलांचा,
एका खराट्याची वाट पाहत
आणि डुलणार्या कळ्या
मुक्तपणे फुलल्या होत्या
संध्याकाळी मलूल होण्यासाठी,
अनभिज्ञपणे

- श्रीपाद

वाटा

याच वळणावरून
निघून गेलीस दूर
या सळसळत्या आंब्याची
सोबत मागे ठेउन
तेव्हा संध्याकाळच होती

काही शब्द उमटलेत तेव्हा
पण तेही,
मौनालाही मौन पडावे असेच

काही हुंदके दाटून आलेत
पण तेही,
काळेकुट्ट मेघ विखरुन जावेत तसे

हातांनी स्पर्श केला हातांना
पण तोही,
तार न छेडणारा- झंकारशून्य

डोळ्यात अश्रु दाटले
पण तेही,
वैषाखपात्रात चुकार ओहोळ राहून जावा तसे

असेच काहीसे
आणि काहीबाही
आंब्याच्या तळाशी

आणि मग
या आंब्यापासून दूर दूर
कोसो दूर
केवळ- संध्याकाळी दाटून येणार्या
त्या एकाकी वाटा

- श्रीपाद

अंधारवाटा

संध्येचा पदरव आला
की; दिवे साद घालतात,
पहिला दिवा लागतो आणि
म्हातारीचे हात जोडले जातात
सहज, आपोआप, अभावितपणे

हळूहळू नदीचा काठ फुलतो
चुडे किणकिणु लागतात
डोईवरचे पदर संभाळत
अन् पदराआड दिवे जपत
सुवासिनी घाटावर उतरू लागतात

किनार्यावरील मंदिरात
शंख घंटा वाजू लागतात
नदीच्या प्रवाहावर अद्भुत रांगोळी
उमटू लागते

`दूरवर जाणार्या या अंधारवाटा
उजळून टाका रे बाबांनो'
कुणी एक कोमल मनाचा
जाणता रसिक
त्या दिव्यांना सांगतो

आणि घाटावर दूर कोपर्यातल्या
वडाखाली बसलेल्या
एका जटाधारीला
अज्ञातातून एक स्वर ऐकू येतो,

`त्यागाचीही अखेर
काळोखातच होत असते
या दिव्यांसारखीच...'

- श्रीपाद

सांजभूल

पक्षी एकाच दिशेने, एकत्रितपणे
आकाशातून उडतात
कुठेही न थांबता
तेव्हा संध्याकाळ झालेली असते
तेजोभास्करही थकलेला असतो
त्याच्या तेजाचे बोचके
अज्ञातात विरून जाते...
ही निरोपाची वेळ असते
बाहेरचा निरोप घेण्याची
सावलीचाही निरोप घेण्याची,
यानंतरची सोबत फक्त
आपली आपल्यालाच...
पशु-पक्षी, झाडे-वेली,
नद्या-नाले, आकाश-पृथ्वी,
माणसेही
सार्यांच्याच निरोपाची लगबग...
व्यवहार शांत होतात
अन् निरोपाच्या या घडीला
हात देण्यासाठी
ऊगवते एक चांदणी
मनाच्या अंतर्मनात
आकाशीच्या सरोवरात पडते
तिचे प्रतिबिंब
अन् पसरत जाते सांजभूल
अवघ्या चराचरावर

- श्रीपाद

मौन राग

रोज संध्याकाळी
पक्षी जमतात झाडावर
थव्याथव्याने
अन् फांद्यांवर उड्या मारत मारत बोलतात
कधी हळूवार, कधी कर्कश्श
तो तिच्याशी, ती त्याच्याशी
ते त्यांच्याशी
कोणी; ... नाही बोलत काहीच
आणि शेवटी
सारेच मिळून म्हणतात
वेदनेची दु:खगर्भ प्रार्थना
मौन रागात ... ... ... ...

- श्रीपाद

कुट ठेऊ रे राजा...!!!

टिंग्या चित्रपटात टिंग्याची भूमिका करणार्या शरद गोयेकर याच्या आईची ही मनोवस्था. `टिंग्या'ला नुकताच चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यातील टिंग्या हा जुन्नर तालुक्यातील राजुरी या गावी पालावर राहतो. त्यांचा व्यवसाय मेंढपाळ. त्याच्या घरी पत्रकारांनी भेट दिली तेव्हा त्याच्या आईने `हा पुरस्कार कुठे ठेऊ' असा एक हळवा प्रश्न विचारला. त्याच भावना व्यक्त करण्याचा हा प्रयत्न. त्या बाजूची ग्रामीण भाषा मला माहीत नाही. पण थोडासा विदर्भातील ग्रामीण भाषेचा आधार घेतला आहे.

कुट ठेऊ रे राजा...!!!

कायची ही गडबड?
अरे, मंडळी तं आली बी
आमच्याचकडे,
औं!! काय आहे बाप्पा?
का म्हणता?
माही मुलाखत
मी टिव्हिवर दिसनार,
पेपरात छापून येनार माहा फोटो...
केवढा रे लेकरा तुहा पराक्रम!!
या बापू या
पानी घ्या,
दमून आलासा
वईच च्या टाकतो...
हे आमचं खोपट,
फोटो काडता?
काडा न बाप्पा...
हा आमचा टिंग्या,
बोल न रे बापू कई,
आज काऊन चुप झाला?
केवडा मोठा झाला रे लेकरा!!
पन, आमी तं लहानच हाओ ना!!
अरे हे तुहे एवढे पुरस्कार गिरस्कार
कुट ठेऊ रे राजा...!!!

-श्रीपाद

असाच जातो दूर कुठे तरी

असाच जातो दूर कुठे तरी
पाठीस घेउन वारा,
उनाड भटकत स्वैर उधळीतो
रक्तामधला पारा,
दिशादिशांना कवळून घेती
अल्लड पाउसधारा,
मज स्वप्नांचे दान मागती
फुलवुनी मोरपिसारा,
पिसाटलेल्या वाटा पुसती
आहे कोण बिचारा,
कडेकडेची झाडे म्हणती
नाही त्यास निवारा,
वार्यासंगे गुणगुणताना
जिवास नाही थारा,
मधे अचानक हळू खुणवितो
लुकलुकणारा तारा,
बंध तोडुनी धुंद नाचतो
आनंद असा हा न्यारा,
नकोच गुंते नको पसारा
खेळ असा मज प्यारा

- श्रीपाद 

उदास मारवा

अंधुक ओल्या अंधारातून,
आले कोण?
उत्कट गहिर्या अंतरातुनी,
उगवे कोण?
सांज कोवळी आठवणीन्ची,
सांगू कुणा?
गंधबावरी बकुळ नाजुक,
दावू कुणा?
अशाच वेळी तुझे बरसणे,
ठरलेले...
चुकचुकणारे भास दिवाणे,
विरलेले...
अशा क्षणान्ची ओंजळ घेउन,
मी उरतो...
दूर वेशीवर उदास मारवा,
तो झुरतो...

- श्रीपाद

कालजयी काळोख

कालजयी काळोखात
मार्ग शोधणारी
अस्तित्वाची घोरपड,
जीवाच्या आकांतानं
हातातली दिवटी
संभाळण्याची धडपड,
सोसाट्याचे वारे अन्
वादळाचे थैमान
उजळलेली प्रत्येक काडी
विझवून टाकणारे,
अधांतरी आशेचा दीप
पेटता ठेवण्याची ही परीक्षा
अनिच्छेनं लादलेली
क्रूर, करुणाहीन परीक्षकानं,
अन् प्रत्येक पावलावर
निखार्यान्चाच पाउस पाडणारे
त्याचेच निर्लज्ज भालदार- चोपदार,
फक्त....
फक्त काही क्षण हवी
भूमिका परीक्षकाची
अन् काकणभर अधिक शक्ती,
हा खेळच बंद होईल मग
नेहमीसाठी,
आणि सारं शांत शांत शांत
अथांग काळोखात विरून गेलेलं...

- श्रीपाद

कृष्ण

कृष्ण- अस्तित्व वर्णन
कृष्ण- विचार दर्शन
भावना नर्तन, कृष्णनाम

कृष्ण- द्रौपदी रुदन
कृष्ण- कर्णाचे(कंसाचे?) क्रंदन
कालिया मर्दन, कृष्णनाम

कृष्ण- गोपाल रंजन
कृष्ण- गोपींचे कूजन
राधेचा रमण, कृष्णनाम

कृष्ण- यशोदा नंदन
कृष्ण- योग्यांचे चिंतन
सुदामा बंधन, कृष्णनाम

कृष्ण- बासरी वादन
कृष्ण- सृष्टीचे सृजन
मनीचे स्पंदन, कृष्णनाम

- श्रीपाद

वाट कुसुंबी चालत होतो

पाऊस ओल्या संध्याकाळी
वाट कुसुंबी चालत होतो

मिटल्या ओठी , शांत लोचनी
मुके तराणे गातच होतो

आले कोणी, गेले कोणी
नोंदही नव्हती, भानही नव्हते

दिल्या घेतल्या श्वासानाही
मुके तराणे सजवित होते

चंदन वारा , सांयतारा
गोड बासुरी, मोरपिसारा

हळु पसरली तुझी ओढणी
मला मिळाला खरा निवारा
- श्रीपाद

सखे,

सखे,
काय वाटतं तुला?
फक्त सखीच
हळवी असू शकते.. असते?
कधीतरी
वेलीवरील मोगर्याला विचार,
कधीतरी
दवबिन्दुंचे हुंदके ऐक,
कधीतरी
तिन्हीसांजेला मारवा ऐक,
कधीतरी
व्याकुळलेली कविता वाच,
कधीतरी
वादळाचं पिसाटपण समजून घे,
कधीतरी
अमावास्येला चांदण्या मोजुन पाहा,
कधीतरी
कमळात लपलेल्या भुन्ग्याशी गुज कर,
कधीतरी
पावसात एकटीच फिरून पाहा,
कधीतरी
आषाढाच्या पहिल्या मेघाला विचारून पाहा,
सारेच एका सुरात सांगतील
सख्याचं कातर हळवेपण...

-श्रीपाद

सखे,

सखे,
तू तर चंदना
होय, चंदनाच...
तू म्हणजे नुसता सुगंध
दाही दिशा व्यापित
दूर दूर पसरणारा
कितीही थांबवतो म्हटले
तरीही न थांबणारा
स्पर्शाच्या शपथांची कोडी घालणारा
अंगभर लपेटून, तरीही अस्पर्शित
तनमन भरून टाकतानाच
ओंजळ रिक्त ठेवणारा
प्रेमळ लळा लावून
क्रूरपणे निघून जाणारा
फक्त एक परिमळ, मृदगंधासारखा
फक्त एक दरवळ, चंदनासारखा

- श्रीपाद

सखे,

सखे,
काय लिहू...
काय काय लिहू...
कसं लिहू...
खरं तर,
माझी सखी
हा लिहायचा विषयच नाही...
ती तर केवळ एक अनुभूति...
पण लिहू नये असंही नाही...
तुझा विषय निघाला की राहवतही नाही...
एकदा असाच अडखळलो होतो
चालता चालता
पायात काटा बोचला होता
खूप दुखत होतं, खुपत होतं
चालूच नव्हतो शकत
कसा तरी उभा राहिलो
कसला तरी आधार घेउन
बरीच मंडळी होती आजुबाजूला
सारेच सांगत होते
अगदी प्रेमाने, आपुलकीने
`अरे काटा काढून टाक'
आणि तेवढयात तू आलीस
विजेच्या वेगाने
सार्यांना दूर करीत
माझा पाय घेतलास मांडीवर
आणि अगदी हळूच
काढून टाकला तो काटा
एका टोकदार सुईने
माझ्याकडे पाहून छानसं हसलीस
मी म्हणालो, `थांक्यू'
तू प्रश्नार्थक पाहिलंस...
मी म्हणालो,
`सारे सांगत होते काटा काढायला
तू तो काढलास
त्यासाठी धन्यवाद'
माझ्या केसातून हात फिरवलास
आणि म्हणालीस,
`तुझ्यावर प्रेम करते ना म्हणुन'
आठवतं तुला???
कसं आठवणार???
कारण मला लख्ख आठवतय
हा प्रसंग घडला
अन् मी डोळे उघडले तर...
मी बिछान्यावर होतो
आणि तू प्रसन्नपणे
पहाटेच्या दवात पसरून राहिली होतीस...

-श्रीपाद

`आयला'

मान्सून अगदी छान येणार यावर्षी
वेळेच्या आधीही
कमी दाबाचा पट्टा
छान तयार झाला आहे
वारे वगैरेही अगदी
हवे तसे वाहत आहेत
गरमीचा ताप अगदी
संपून जाणार लवकर
पिकपाणी छान येणार
सगळीकडे
हिरवाई अन् आनंद...
पण, अरे...
हे काय झाले
`आयला' वादळ आले
त्या बंगालच्या उपसागरात,
त्याने सगळ्या दिशाच बदलून टाकल्या
हवेच्या, वार्याच्या
मान्सून गेला पलुन
आता पाहायची वाट पुन्हा...
म्हणजे,
माझ्या आयुष्यासारखंच की,
नेहमीचच,
आनंदाचा मान्सून येणार येणार म्हणताच
कुठले तरी `आयला' येणार
आणि त्या सुखमय जलदांना
पळवुन लावणार...
बस, एवढच आणि असंच घडलंय...

-श्रीपाद