शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

सत्य

काय म्हणतोस?
सत्य हवंय !
नको रे
असा हट्ट करुस
सोडून दे सत्याचा ध्यास...
नाहीच ऐकणार तू
नक्की हवंय सत्य
पक्का विचार कर...
ठीक आहे तर,
सत्य हवंय ना तुला
मग जा
आणि जळून जा !!
कारण सत्य म्हणजे जळणे
अखंड, संपूर्ण, नि:शेष जळणे;
सत्य नाही बासरी रिझवणारी
सत्य नाही खाऊ भूल पाडणारा
सत्य नाही शय्या मृदू पुष्पांची;
सत्य म्हणजे निखारे
सत्य म्हणजे ज्वाळा
सत्य म्हणजे होळी
सत्य म्हणजे जाळ...
जा, जळून जा
अन नको विचार करुस
तुला सत्य गवसलं की नाही
हे मला कसे कळेल याचा,
मला काहीच कळणार नाही
अन मला समजून जाईल
जळून गेलायस तू पूर्ण
झालीय तुझी राख
गवसलंय तुला सत्य...
जा-
सत्य तुझी वाट पाहतंय !!

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ९ ऑगस्ट २०१९

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१९

शोधयात्रा

शून्याची
शाश्वतता
शकुनवेड्या
शृंगारात
शोभिवंत,
शुष्क
शब्दांच्या
शृंखला
शक्यतांच्या
शोधात,
शुद्ध
शास्त्रांचा
शालीन
शिणवटा
शिवार्पण,
शहिदांची
शस्त्रे
शवाजवळ
शीतल
शरणागत,
शिशिराची
शोधयात्रा
शाल्मल
श्यामल
शांतीची...

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २ ऑगस्ट २०१९

बुधवार, ३१ जुलै, २०१९

क्रिकेटच्या मैदानावर

क्रिकेटच्या मैदानावर
उतरतात दोन संघ माणसांचे
खेळतात
लढतात, स्पर्धा करतात
एकमेकांशी
जिंकतात, हरतात
भोगतात सुद्धा
जय किंवा पराजय
ठेवतात मनात जपून
आणि परततात...
क्रिकेटच्या मैदानावर
उतरतात दोन पक्षी
खेळतात, बागडतात
लढत वा स्पर्धा करत नाहीत
एकमेकांशी
जिंकत नाहीत, हरत नाहीत
भोगतात आनंद, जीवन
मनात जपत नाहीत
आणि परततात...

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ३१ जुलै २०१९

मंगळवार, ३० जुलै, २०१९

बाभळीची रानगाथा

चंदनासी काय ठावी
बाभळीची रानगाथा
काटे लेऊनिया अंगी
हसण्याची गूढ कथा...

माळरानी दुर्लक्षित
कसे असते जगणे?
सुरक्षेत वाढणाऱ्या
चंदनासी कसे कळे?...
नाही आकर्षण तरी
लोक येतात धावून
का ते? सांग बा चंदना
गंध बाजूला ठेवून...
माझ्या नशिबी जळणे
त्याचसाठी येती जन
दोन कुऱ्हाडीचे घाव
आणि मिळते जळण...
तूही जळतो प्रसंगी
पण तुझा भाव मोठा
जळतानाही लाभतो
समाधानी गारवठा...
तुझे झिजणे महान
माझे झुरणे लहान
मला काटे, तुला गंध
सांग कोणते कारण?...
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ३० जुलै २०१९

बुधवार, २४ जुलै, २०१९

चांदणवेळा !!

ती चांदणवेळा माझी
माझ्यात जागते तेव्हा
तुडुंब होऊन जाते
माझ्यात युगांची तृष्णा

ती अपूर्ववेळा जेव्हा
मांडते पसारा सारा
अंधार सांडूनी जाती
अंतरीच्या संध्याछाया
ती उत्कटवेळा येते
करात घेऊन काही
चराचरातील श्वास
त्यावेळी थांबून जाती
ती अद्भुतवेळा देते
तिच्या करातील सारे
घेताना गोठत जाती
कंठीचे प्राणपिसारे
ती वेळा भिनते ऐसी
मी होतो नभ तात्काळ
अणूरेणूतून माझ्या
घुमतो प्रणवाकार
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २४ जुलै २०१९

शनिवार, ६ जुलै, २०१९

मी कवी आहे !

नाही, घाई करू नका
नका काढू निष्कर्ष
मी दुखावतोय तुम्हाला
किंवा
मी करतोय अपमान तुमचा असा
मी फक्त सत्य बोलतो, सांगतो
एवढेच
किंवा असेही म्हणता येईल की,
मी नाही बोलत, सांगत
समाधानासाठी
तुमच्या किंवा माझ्या;
मी बोलतो किंवा सांगतो
माझ्या अथवा तुमच्या
अधिक पूर्णतेसाठी
माझ्या मतीप्रमाणे
एवढंच;
काय म्हणता?
प्रमाण हवंय
माझ्या प्रमाणिकतेचं?
एक सांगू?
मी कधी म्हटलंय
माझ्यावर विश्वास ठेवा
मी म्हणतो म्हणून?
की थांबवलंय प्रतिसाद देणं
तुमची साद दुर्लक्षित करून?
टाळलंय का कधी तुम्हाला?
की फिरवलंय तोंड
तुम्हाला पाहून?
कधी चुकवलीय नजर तुमची?
लक्षात ठेवा-
प्रामाणिकता नजर लपवत नाही...
पुन्हा सांगतो
मी अपमान करत नाही
मी दुखवत नाही
सांगतो, बोलतो सत्य फक्त
कारण मी
सूर्यगोत्री आहे,
सत्यव्रती आहे,
मी कवी आहे !
मी कवी आहे !!

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ६ जुलै २०१९

सोमवार, १ जुलै, २०१९

मृगजळ

मृगजळ खरंच असतं
मृगजळ म्हणून
मृगजळ असेस्तोवर,
घोस्ट इमेज खरीच असते
घोस्ट इमेज म्हणून
घोस्ट इमेज असेस्तोवर...

ओंजळ !!

ओंजळ असेल
तेवढंच घेता येतं
देणाऱ्याने कितीही दिलं तरी !
ओंजळ असेल
तेवढंच देता येतं
देण्याला कितीही असलं तरी !
ओंजळ भरली असेल तर
काही घेताही येत नाही
काही देताही येत नाही !
ओंजळ करावी लागते रिकामी
देण्यासाठीही
घेण्यासाठीही !
ओंजळीचा आकार
नाही करता येत कमी
नाही करता येत मोठा !
ओंजळ रीती करताना
असावा लागतो
ओंजळ स्वीकारणारा !
ओंजळ भरताना
असावा लागतो
ओंजळ भरणारा !
ओंजळ फक्त आपली
आकार; भरणे, रिक्त होणे
सगळं दुसऱ्या कुणाचं तरी !
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १९ जून २०१९

आता माझा मीच

फकिरीची माझ्या
असो मज आण
जगतीची जाण
काय करू?

उल्हास सुखाचा
दु:खाची वेदना
तुमची तुम्हाला
लखलाभ
देणार ते काय
काय घेऊ शके
जग हे तुमचे
मज सांगा
मनाचाच गुंता
मनाचे स्वातंत्र्य
सारेच निरर्थ
जाणतो मी
नको मज मृत्यू
नको ते जीवन
दोन्हीही एकच
आहे ठावे
स्वार्थाचाच खेळ
परमार्थी भूल
खोटी असे झूल
पाठीवर
अंधार, प्रकाश
सारेच तोकडे
पाय ते उघडे
चादरीत
शब्दांची कुसर
शब्दांचे मखर
शब्दांची पाखर
जावो लया
आता माझा मीच
हिरावेल कोण
जगतीची काय
बिशाद ती !
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २१ जून २०१९

फुलती लिली !!

कालपर्यंत कळीही नव्हती
अन सकाळी सकाळी जादू झाली
लिलीच्या हिरव्यागार पानातून
काही गुलाबी कळ्या
मान उंचावून पाहत होत्या
टूकुटूकु उत्सुकतेने
वर्षाराणी हसत होती
गालातल्या गालात
माळी उभा होता
बाजूला शांतपणे
लिलीच्या कळ्या
फुलण्याच्या तयारीत होत्या
पण चेहरा मात्र उतरलेला...
त्यांना आठवत होता संवाद
चार महिन्यांपूर्वी
वर्षाराणीशी झालेला...
लिली म्हणाली होती वर्षाराणीला-
'नको करुस तोरा,
मी ठेवते जपून स्वतःला
त्या ग्रीष्माच्या उन्हातही
धरून ठेवते माझी मूळं
माझे कष्ट, माझी सहनशीलता
फुलून येते मृगाच्या सरींनी;
फुलण्याचं स्वप्न माझं
जपते मी असोशीने
अन लावते जीवाची बाजीसुद्धा
म्हणून येते अंगांगी फुलून;
तू नको सांगूस तुझा तोरा'
वर्षा राणी फक्त हसली होती तेव्हा...
यावेळी उशीर केला तिने येण्यासाठी
सगळेच तळमळत होते
अन लिलीही !
अखेर ती आली
थबकली फुललेल्या लिलीजवळ
अन म्हणाली हळूच तिच्या कानात -
'मी आल्याशिवाय नाहीच फुलू शकत तू
कितीही धरून ठेव मुळांना
कितीही धरून ठेव फुलेच्छा
कितीही उपस कष्ट
कितीही कर सहन
कितीही कर प्रयत्न
मी साद घातल्याशिवाय
नाही येत तुला फुलता...
अन ही तुझी मुळं आहेत ना
तीही राहतात जिवंत
या माळ्यामुळे
याने भर ग्रीष्मात
स्वतः घामाघूम होऊन
न चुकता घातलेल्या पाण्यामुळे...
रागावू नकोस
माझ्याही मनात नाही राग
पण एकच सांगते बाय माझे
फुलण्याचं कौतुक होतं
म्हणून माजू नकोस...
कोणतंच फुलणं
आपलं आपलं नसतं,
कोणतंच फुलणं
स्वतः स्वतःचं नसतं,
कधीच!!'
फुलती लिली ऐकत होती
खाली मान घालून...

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २३ जून २०१९

खोटी कविता खरी होताना...

हे जग खूप सुंदर आहे,
हे जग खूप कुरूप आहे;
हे जग खूप चांगलं आहे,
हे जग खूप वाईट आहे;
हे जग म्हणजे स्वर्ग जणू,
हे जग म्हणजे निव्वळ नरक;
सगळी माणसं चांगलीच असतात,
माणूस चांगला असणं शक्यच नाही;
प्रयत्नाला काहीही असाध्य नाही,
प्रयत्नाने काहीच साध्य होत नाही;
जीवनात चढउतार येतच असतात,
जीवनात काहीही घडत नसतं;
प्रकाश हेच जीवनाचं वास्तव,
अंधार हेच वास्तविक जीवन;
षड्रिपु सुटता सुटत नाहीत,
ठरवलं की क्षणात षड्रिपु सुटतात;
जीवन म्हणजे मौजमजा करणे,
जीवन ही गांभीर्याने घेण्याची बाब;
जीवन म्हणजे निरर्थकता,
अर्थपूर्णता म्हणजेच जीवन;
काय खरं, काय खोटं?
चक्रव्यूह प्रश्नांचा...
***************
'तुझी कविता छान आहे
पण खोटी आहे...'
ज्येष्ठ कवीने सांगितले
नवोदित पुरस्कारप्राप्त कवीला...
'खरी करायला काय करू?'
नवोदिताने विचारले...
प्रत्येक ओळीच्या शेवटी
'कोणाकोणासाठी, कधीकधी'
एवढं फक्त जोड !!

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २४ जून २०१९

रविवार, ५ मे, २०१९

तुफान

तुफान आते है
ढिले पडते है
चले भी जाते है...
तुफान आने पर
कोई चले जाते है
कोई रह जाते है...
अकसर लोग डरते है
तुफानो से, और कुछ
डरते भी नहीं है...
कुछ ना डरनेवालो को जाना पडता है
कुछ डरनेवालो को रहना पडता है;
तुफान नहीं पुछता
आप क्या सोचते है?
ऐसा भी हो सकता है
वैसा भी हो सकता है,
ये भी होता है
वो भी होता है,
सुनकर ये बाते सभी
पुछ उठे कविराय
आखीर होता क्या है?
और दिये जाते है उत्तर भी-
वही होता है
जो मंजूर ए खुदा होता है !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ४ मे २०१९

एखादं झाड

एखादं झाड
आनंदमय सौख्याचं,
एखादं झाड
दु:खमयी प्रेमाचं;
एखादं झाड
काटेरी सुगंधाचं,
एखादं झाड
कोमल दुर्गंधाचं;
एखादं झाड
छाया न देणारं विशाल,
एखादं झाड
सावली देणारं पण लहान;
एखादं झाड
पर्णाविना फुलणारं,
एखादं झाड
सुमनरहित पानांचं;
एखादं झाड
उन्हातान्हात बहरणारं,
एखादं झाड
श्रावणातही खुरटलेलं...
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ४ मे २०१९

गंगामैय्या !!

गंगामैय्या मला ठाऊक आहे
आज तुझ्यातून वाहिलेलं पाणी
केवळ पाणी नव्हतं,
खरं तर ते केवळ पाणी
नसतंच कधी
ते तीर्थ असतं नेहमीच,
पण आज ते तीर्थही नव्हतं,
आज तो प्रवाह होता अश्रूंचा...
कितीतरी काळ दाबून धरलेल्या
अंतरीच्या असंख्य संमिश्र भावना
उमाळ्याने बाहेर पडल्या आज...
आनंद, दु:ख, अवहेलना
दुर्लक्ष, समाधान, आशा
या साऱ्यांचेच गोड, खारट
आंबट, तुरट, उष्ण अश्रू...
त्या अश्रूंचाच तो प्रवाह
कलकल करत वाहत होता
संध्यामग्न अदृष्टाला
मनीचा आवेग सांगण्यासाठी...
किती दीर्घ काळानंतर आज
लाभला तुला सन्मान
डावलला गेलेला !!
तुझ्या लेकरांचा नेता,
ज्या भूमीसाठी
धावतेस तू युगेयुगे
त्या भूमीचा प्रतिनिधी
श्रद्धापूर्वक करत होता तुझी वंदना
जणू संपूर्ण भरतभूमीच
जमली होती तुझ्या स्तवाला
लाभले होते तुला
आज तुझे सम्राज्ञी पद !!
जगाने पाहिले, अनुभवले ते...
पण हे सर्वोच्च स्थान
म्हणजे केवळ गौरव नाही
तुझ्या कर्तृत्वाचा,
तो गौरव नाही
तुझ्या सोसण्याचा,
तो नाही गौरव
तुझ्या आणि या भूमीच्या
देवाणघेवाणीच्या
महा उद्यमाचा...
तो गौरव आहे
जड चेतनाला
कृतज्ञ वंदन करणाऱ्या भावनेचा,
तो गौरव आहे
य:कश्चित समजल्या जाणाऱ्या
धुलीकणांना, जलकणांना
ईश स्वरूपात पाहण्याचा,
तो गौरव आहे
माणसाच्या मनाला
अत्युच्च भावांनी आभाळमय करण्याच्या
हजारो वर्षांच्या अथक प्रयत्नांचा,
तो गौरव आहे
छोट्याशा माणसाला
अनंत करण्याच्या ध्यासाचा...
या भूमीला
या भूमी-मानसाला
तुच्छ लेखले जगाने
डावललेही
अन येथील भूमीपुत्रांनीही
मिळवला आपला आवाज
त्यांच्याच आवाजात,
अन याहीपेक्षा वेदना होती-
तुला, या भूमीला, तुझ्या पुत्रांना
कायमस्वरूपी
खुजे करण्याच्या प्रयत्नांची
त्यांचं भावविश्व खुरटं करण्याची
माणसाचं मोठं होणं नाकारण्याची...
आजचा क्षण सांगून गेला
'होय-
खुजेपणाचे दिवस भरले आहेत
या भूमीने जवळ केला आहे
पुन्हा एकदा
अनंताचा राजमार्ग'
तू दिलेल्या संस्काराचा हा विजय आहे...
गंगामय्या !!
आजचे तुझे पाणी
या साऱ्यांमुळेच
तुझ्या डोळ्यात तरळलेले
अश्रू आहेत
मला ठाऊक आहे...
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २५ एप्रिल २०१९

जीवन म्हणजे बुटाची लेस

जीवन म्हणजे बुटाची लेस
'मी' बांधून ठेवणारी,
अन माणसे म्हणजे
टोके या लेसची,
गाठी पडतात
जवळ येतात,
गाठ सुटली
दूर होतात,
गाठ राहते
वर्षानुवर्षे किंवा थोडाच वेळ
काळ गाठीचा असो कितीही
टोके मात्र वेगळीच,
गाठ म्हणजे भास... एकतेचा...
जीवनाच्या लेसने निर्माण केलेला
'मी'ने बांधून घेण्यासाठी
उत्पन्न केलेला

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २५ एप्रिल २०१९

माणूस

मला हवं तेव्हा
बोलायलाच हवं तू,
मला नको तेव्हा
मौनच राहायला हवं तू,
मी?
- माणूस...

मला हवं तेच
बोलायला हवं तू,
मला नको त्याचा
उच्चारही न करावास तू,
मी?
- माणूस...
मला हवं तेवढंच
बोलावंस तू,
उरलेलं सगळं
गिळून टाकावं तू,
मी?
- माणूस...

रंगचक्र


हे रंगबिरंगी जीवन
ही निळी तयातील माया
त्या शुभ्र पटावर त्याची
हे चित्र रेखते तुलिका

चित्रातून वाहत जाती
रंगांच्या अल्लड सरिता
जाऊन पुन्हा मिळती त्या
पुनवेच्या शुभ्र समुद्रा
पुनवेची ढळते काया
उगवते पुन्हा ती माया
कृष्णघनातून हसती
कविता लुकलुकणाऱ्या
हे चक्र निरंतर फिरते
रंगांनी न्हाते, विरते
होऊन बाजूला कोणी
हाताशी भगवे धरते
ते भगवे विश्व तयाचे
जाते लयास नंतर
तुलिकेच्या अग्रातून तो
गाठतो भवाचे अंतर
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २२ मार्च २०१९

मंगळवार, १६ एप्रिल, २०१९

का?

पोट भरल्यावर
सारतात ताट बाजूला
तशीच सारली जातात
माणसेही;
ताटे राहतात निर्विकार
माणसांना मात्र होतो त्रास
का असे?
निर्जीव, सजीवातील फरक?
असेलही...
पण मग-
वेदना होऊ नये म्हणून
माणसाने निर्जीव का असू नये?

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १५ एप्रिल २०१९

शुक्रवार, १२ एप्रिल, २०१९

युगजयी !!

तुला सांगू?
मलाही येत असे राग तुझा
असा कसा तू दुबळा?
असा कसा कोणाहीसमोर पडतं घेतोस?
कोणीही यावे अन टपली मारून जावे?
पण आता प्रकाश पडतोय थोडा थोडा
राग गेला का? नाही ठाऊक
पण शांत झालाय हे खरं...
नाही मागितली कधी सवलत
नाही म्हटलेस कधी-
`मी राजा आहे
मला हवेत विशेष अधिकार;
मला नाही विचारायचेत प्रश्न;
नाही घ्यायच्या शंका माझ्यावर;'
आज पाहतो चहूभोवताल
आंधळ्या विश्वासाची भिक मागणारे
त्यासाठी वेगवेगळी कुंपणे उभारणारे
या कुंपणांसाठी उपद्व्याप करणारे...
आणि तरीही
विश्वासासाठी पुढे केलेली ओंजळ
रीतीच राहणाऱ्या झुंडी
जेव्हा पाहतो;
न्यायासनांचे पोकळ निर्णय
किंवा जनमताचे कोट्यवधी रेटे सुद्धा
विश्वासाची ओंजळ नाही भरू शकत,
आतलं रीतेपण नाही भरू शकत,
सरणावरही वाहिली जातात
फुले अविश्वासाची, तेव्हा....
तेव्हा.... दिसतो प्रकाशाचा कवडसा तुझ्याजवळ...
तीव्रता मिटून जाते तुझ्यावरच्या रागाची....
राघवा....
तुला, फक्त तुलाच ठाऊक होते
मोल आणि मूल्य विश्वासाचे
तुलाच ठाऊक होती किंमत
त्यासाठी मोजावी लागणारी
तू चुकवलीस ती...
जानकीला करायला लावलीस अग्नीपरीक्षा
तेव्हा तुझ्या आत उफाळलेले अग्नीचे तांडव
शतकोटी ज्वालामुखींचे उद्रेक
सहस्रकोटी वणव्यांचे लोळ
या साऱ्याचा दाह
कोणाला ठाऊक असणार तुझ्याशिवाय?
हां... एक जानकी सोडून...
जानकीहृदय राघव
राघवहृदय जानकी
दिला प्रतिसाद एकमेकांना
सोसले सारे काही
ठरवले किंमत मोजायची
जी पडेल ती
पण विश्वास पदरी पाडून घ्यायचाच
अन तसेच झाले...
ना मागितली दाद अन्यायाची
ना उभे केले जनसमर्थन
केवळ चुकवली अपार मौन किंमत
आणि भरून गेली तुमची ओंजळ
युगेयुगे वाहणाऱ्या नि:शंक विश्वासाने !!
काळालाही शक्य नाही
हा विश्वास हिरावून घेणे !!
हे खरंय की
तू दूषणेही सोसलीस
ही किंमत चुकवण्यासाठी,
पण दूषणे देणारेही
धक्का नाही लावू शकले
तू कमावलेल्या विश्वासाला...
रघुनंदना-
विश्वासाची भीक मागणारे तांडे पाहतो
तेव्हा तू कळतोस पुन्हा नव्याने
अन वाटून जाते
महाभारते होत राहतील
विश्वास अविश्वासाच्या नौका
येत राहतील, जात राहतील
पण काळसरितेवर
उठलेला रामायणाचा तरंग
पुन्हा उठणार नाही
जानकी राघवाची जोडी
पुन्हा होणार नाही
युगजयी नि:शंकता कधी विरणार नाही
तू दिलेली किंमत कधी सरणार नाही !!

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १२ एप्रिल २०१९

मंगळवार, ९ एप्रिल, २०१९

दोन रोपे

छान फुललं आहे हे रोप
गेल्या पावसाळ्यातच लावलं होतं
अन या उन्हाळ्यात
कसं बहरून आलं आहे
माती, पाणी, उन, हवा
आजूबाजूची झाडं, वातावरण
किडे, पक्षी
सगळ्यांनीच स्वीकारलं त्याला
पोषण दिलं, वाढवलं
दिलं बळ, फुलवलं....
हे पण आणलं होतं सोबतच
सोबतच, शेजारीच लावलं होतं
दोघांची मिळून
भरपूर फुलं निघतील म्हणून
पण हे नाही लागलं
मान टाकली याने
माती, पाणी, उन, हवा
आजूबाजूची झाडं, वातावरण
किडे, पक्षी
कोणीच नाही स्वीकारलं त्याला
कोमेजलं, सुकलं, संपलं....

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ९ एप्रिल २०१०

गुरुवार, २८ मार्च, २०१९

आत्मवेडा

मोगरा वेडा आहे
ठार वेडा...
त्याला कळतच नाही
अन सांगून समजतही नाही
की-
त्याचं फुलणं पाहायला
त्याच्या फुलांचं कौतुक करायला
त्याच्या बहराचा सुवास
श्वासात भरून घ्यायला
कोणीही नाही,
तो आपला बहरत राहतो
गळत राहतो
कोणी सापडलाच तावडीत
तर वाटतो त्याला
आपले सुवासिक गूज
मुक्त हस्ताने
कोणी ते स्वीकारतो की झिडकारतो
याकडे लक्षही न देता...
मोगरा वेडा आहे
ठार वेडा...
त्याला नाही समजत
मान अपमान,
त्याला नाही समजत
उपयोगीतेचे तत्त्व,
त्याला नाही समजत
लाभ हानी,
त्याला नाही समजत
ढवळून टाकणारी उदासी,
त्याला नाही समजत
किंमत त्याच्या सुवासाची,
त्याला नाही समजत
महत्व त्याच्या ग्रीष्मसोशीचं,
त्याला खरं तर
काहीच समजत नाही
त्याच्या भोवतीच्या जगातलं,
मोगरा वेडा आहे
ठार वेडा...
आत्ममग्न बहराचे
आत्मस्थ अनुसंधान
आत्मीयतेने भोगणारा
आत्मग्लानी ठाऊक नसलेला...
मोगरा-
आत्मवेडा आहे... आत्मवेडा !!

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २८ मार्च २०१९

मंगळवार, १९ मार्च, २०१९

त्याचा रंग

`काय रे,
हा कुठला रंग आणलास?
रंगांच्या सणाला हा काळा कशाला?'
विचारणाऱ्याच्या डोळ्यात बघत
त्याने विचारले-
`का? हा रंग नाही?
अन त्यानेच केलाय ना तयार
ज्याने हे सप्तरंग तयार केलेत?'
प्रश्नकर्ता गडबडला...
तो पुढे म्हणाला-
`त्यानेच दिलाय मला
हा काळा रंग
मी खेळतोय मनसोक्त तो...
तू खेळ तुझे रंग
त्याने तुला दिलेले...
हां, माझा रंग नाही टाकणार तुझ्यावर
हे रंग देणाऱ्यानेच घातलेय बंधन तसे,
तू मात्र टाकू शकतोस
तुझे रंग माझ्यावर
पाहा काही बसलेत तर...'
प्रश्नकर्त्याने केला खूप प्रयत्न
त्याच्या काळ्या रंगावर
आपले रंग टाकण्याचा
पण व्यर्थ
एकाही रंगाचा टिपूसही नाही टिकला
निराश होऊन जाऊ लागला प्रश्नकर्ता...
तेव्हा तो म्हणाला-
`हा त्याचाच रंग आहे
ज्याने केलेत हे रंग तयार
मला त्याचा रंग मिळालाय...'

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १९ मार्च २०१९

शुक्रवार, १५ मार्च, २०१९

देव करो...

अरे, हे पहा
किती छान केलीय सजावट
ही रंगसंगती, ही चित्रे
स्वच्छता, टापटीप...
खिडकीतून पहा
बगीचा किती हिरवागार नं!
दारातून प्रवेश करतानाच
किती छान मंदिर आहे बाप्पाचं
कुठे गोंधळ नाही
गडबड नाही
सगळे लोक अदबीने
प्रेमाने, आस्थेने बोलतात
वागतात...
पहा, पहा हे सगळे
अन विसरून जा
दुखणे, व्याधी, त्रास वगैरे !!
माणसे माणसांना
असाच सल्ला देतात बहुधा...
त्याच्या कानी पडतो
असा सल्ला
त्याला वा आणखीन कोणाला दिलेला
तेव्हा तो एवढेच म्हणतो मनाशी-
देव करो,
तुला कधी
रोग, दु:ख, व्याधी न होवो;
पण जर झालीच
तर तेव्हा कळेल तुला
इस्पितळाची सुंदरता
त्याचं वातावरण
वेदना दूर करू शकत नाही ते...
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १३ मार्च २०१९

तो

तो होता माझ्याआधी
तो राहील माझ्यानंतर,
तो श्वासांच्या आधी होता
तो राहील श्वासांनंतर,
काळाने नेत्र उघडले
त्याही आधी तो होता,
काळाचे नेत्र मिटतील
त्यानंतरही तो राहील,
कर्माच्या इच्छेआधी होता तो
कर्माच्या इच्छेनंतरही राहील तो,
उजेड पडण्याआधी तो होता
तो राहील उजेडानंतर,
सुखाच्या आधी तो होता
सुखाच्या नंतरही तो राहील,
तो असतो आधी, नंतर
मधले अंतरही तो असतो,
काही असण्याआधी असतो तो
तो असेल काही नसल्यानंतर,
अधेमधेही असतो असतो
तोच असतो काही असणे
तोच काही नसणे असतो !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १४ मार्च २०१९

जमलेच तर !!

जहाज बांधणीचा उद्योग असतो
तसाच असतो उद्योग
जहाज तोडणीचा,
वस्तूंच्या उत्पादनाचा उद्योग असतो
तसाच असतो उद्योग भंगाराचा,
सुतीकागृहे असतात
तसेच असतात स्मशान घाटही,
फुलदाणी असते
अन असते कचराकुंडीही,
असंच आणखी बरंच काही
माणसांनी माणसांसाठी निर्माण केलेलं
माणसांच्या जगातलं...
अन तसंच सगळं
हे जग
जन्माला घालणाऱ्याच्या जगातलंही...
म्हणूनच दिसतात माणसे
अधूनमधून
युगायुगांपासून
भंगार, स्मशान वा
कचराकुंडीसारखी जगणारी
सारी मानवता
सारी मंगलता
सारा आशावाद
यांना वाकुल्या दाखवत...
माणसाची गरज असूनही
नसते माणसाला प्रेम
भंगार, कचराकुंडी
आणि स्मशानाबद्दल,
जगाच्या निर्मात्यालाही नसते प्रेम
त्यानेच त्याच्या व्यवहारासाठी
जन्माला घातलेल्या अशा लोकांबद्दल
पण ती असतात त्याचीच निर्मिती;
जमलंच तर त्यांना हसू नये
ठेवू नयेत त्यांना नावे
अन सगळ्यात महत्त्वाचे
त्यांना शिकवू नये फार शहाणपण
त्या विश्व निर्मात्याने
तुमच्या आमच्यासाठीच घातलेले असते
त्यांना तसे जन्माला;
आपल्या पुरुषार्थाच्या
आपल्या सुखाच्या उद्यमाची
देठे, साली, खरकटे;
नको असलेले
वा खराब झालेले सारे
जमा करण्यासाठी
अन विल्हेवाट लावण्यासाठी;
भान असू द्यावे
आपली सुखशांति
अवलंबून असते यांच्यावरच
- जमलेच तर !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १४ मार्च २०१९

सोमवार, ११ मार्च, २०१९

तू डुचमळ होऊन ये ना

या कातर संध्याकाळी
तू सुगंध होऊन ये ना
या अबोल तिन्ही सांजेला
तू श्वास पेरूनी दे ना
त्या आर्त नदीतून थोडी
तू भिजव पाऊले किंचित
त्या ओलपावलांनी तू
केशर लावून जा ना
ही विस्कटलेली सांज
तू घे ना पदराखाली
दे उधळून त्याच्यावरती
तुझ्या पावलांची माती
मी कण कण होतो आहे
तू स्पर्श साजीरा दे ना
होऊन युगांची तृष्णा
तू कवेत मजला घे ना
मी बसतो झाडाखाली
संध्येला हात हलवतो
तू उगवून त्याच क्षणाला
तो हात चुंबुनी घे ना
भवताली अंधुक सारे
क्षितिजी शांति पसरे
यमनात गोठल्या हृदयी
तू डुचमळ होऊन ये ना

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ३ मार्च २०१९

ओल

ही ओल अशी प्राणात
जाळता जळतही नाही
मरणाच्या कातर भाळी
ती कुंकूम रेखून जाई
ही ओल सारखी गळते
जीवाला बिलगून छळते
कमळाची देठे नाजूक
दारात ठेवूनि वळते
ही ओल कशी जिद्दीची
सूर्याला पुरुनी उरते
तमसांद्र घनाच्या हाती
चंद्राची कोर प्रसवते
ही ओल कोठूनी येते
काहीच कसे उमजेना
वेलीवर शुभ्र फुलांची
आरास कधीच खळेना

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १० मार्च २०१९

कविता नसते गणित

कविता नसते गणित
पायऱ्या आणि पद्धत समजून घेण्याचे
उत्तरही नसते तिचे ठरलेले
दोन अधिक दोन म्हणजे चार असे
किंवा नसते तिचे मोजमाप
भूमितीच्या कंपासनुसार
नसतात भौतिक वा रासायनिक गुणधर्म...
कविता नसते तत्वज्ञान
तर्क आणि निरीक्षणाचे
खंडन किंवा मंडनाचे
कोणता तरी सिद्धांत सांगणारे
तिला नसतेच करायचे सिद्ध काहीही...
ती असते फक्त उत्तर
न सुटलेल्या गणिताचे
ती स्वतःच असते सिद्धांत
स्वयंसिद्ध तत्वज्ञानाचे...
कधी हवेसे, कधी नकोसे
कधी रुचकर, कधी पथ्यकर
कधी मोरपीस हळुवार
कधी करवत अनिवार,
कधी उधळण रंगांची
कधी विस्कट बेरंगी,
कधी अस्मानाचा तोल
कधी चाहूल अनमोल,
कविता फक्त असते
अवर्णनीय बहुमोल...

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ११ मार्च २०१९

गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

चला झुंड झुंड खेळू

चला झुंड झुंड खेळू या...
एक झुंड आमची
एक झुंड तुमची
एक झुंड यांची
एक झुंड त्यांची...
झुंडीचा वेश
झुंडीची भाषा
झुंडीचा त्वेष
झुंडीची नशा...
झुंडीचे जिंकणे
झुंडीचे हरणे
झुंडीच्या झुंजीत
झुंडीचे मरणे...
झुंड काळ्याची
झुंड पांढऱ्याची
झुंड निळ्याची
झुंड हिरव्याची
झुंड लाल
झुंड भगवी
झुंड पिवळी
झुंड ढवळी...
दानवतेची झुंड
मानवतेची झुंड,
देशद्रोहाची झुंड
देशभक्तीची झुंड,
चांगल्याची झुंड
वाईटाची झुंड,
कळकळीची झुंड
मळमळीची झुंड,
भोगाची झुंड
त्यागाची झुंड,
शस्त्रांची झुंड
शास्त्रांची झुंड,
दुर्जनांची झुंड
सज्जनांची झुंड,
भेकडांची झुंड
शूरांची झुंड....
कोण तुम्ही?
काय नाव तुमच्या झुंडीचे?
काय म्हणता- झुंड नाही
सांगताना हे तोंड उघडून
लाज कशी वाटत नाही?
झुंडीशिवाय ओळख नाही
ओळखीशिवाय किंमत नाही
किमतीशिवाय जीवन नाही...
आधी झुंड जॉईन करा
झुंडीला मान्यता द्या
झुंड करणे शिकून घ्या
झुंडीची मान्यता मिळवा
तेव्हाच आपल्याला जगता येईल
सगळ्याच झुंडी
जगणे आपले मान्य करतील...
तू असण्याला अर्थ नाही
तू जगण्याला अर्थ नाही
तू मरण्याला अर्थ नाही...
अर्थ आहे मान्यतेला
अर्थ आहे झुंडीला
मान्यता वाढली पाहिजे
झुंड वाढली पाहिजे
झुंडी वाढल्या पाहिजेत...
झुंड मला मान्य नाही...
- मर मग,
झुंडीत मी येणार नाही...
- टळ मग,
मान्यता नकोय मला...
- तो अधिकार नाही तुला,
झुंडीत ये, येऊ नको
घेणेदेणे नाही झुंडीन्ना
मान्यता मात्र देणारच
किंवा काढून घेणारच....
झुंडी झुंडी झुंडी झुंडी....
चला झुंड झुंड खेळू...
निरर्थक विश्वाचे
निरर्थक पांग फेडू...

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १ मार्च २०१९

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

तरंगांचा खेळ

तरंग उठणे
तरंग विरणे
तरंगांचा खेळ
अविरत
विश्वाच्या सागरी
लाटा क्षणोक्षणी
उठती नाशती
वेळोवेळी
खेळाचा प्रारंभ
ठाऊक कोणासी?
लाटाच मोजती
पदोपदी
सागर अवघा
सारेच जाणती
तरंगाचे मूळ
नाही ठावे
शांत समुद्रात
तरंग उठवी
वारा ऐसा कोठे
जो तो शोधे
वाऱ्याचे अप्रूप
साऱ्यांनाच वाटे
त्यालाच शोधाया
खटपट
खटपट होतो
तरंग नव्याने
लाट उसळते
पुन्हा पुन्हा
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २५ जानेवारी २०१९

पूजा उत्सव

हाकारले सगळ्यांना एकदा
म्हटले -
चला पूजा बांधू या
उत्सव करू या
धडाक्याने, जोरदार
'मी'चा !
सगळे उत्साहाने तयार झाले
मखर सजले
माळा लागल्या
तोरणे, रांगोळ्या, मंडप
फुले, सजावट, सनई
झकपक पोशाखात
सगळे हजर...
स्थापना झाली
प्राणप्रतिष्ठा झाली
आरत्या, स्तोत्रे
पूजा, अभिषेक
नैवेद्य, प्रसाद
सगळे पार पडले
यथासांग...
सकाळ, संध्याकाळ
आरत्या, भजने, स्तोत्रे
'मी'च्या महानतेची
प्रवचने, व्याख्याने, कीर्तने
'मी'च्या पोथीची पारायणे
सगळी रेलचेल...
नाटके, नृत्य
फेर फुगड्या
खेळ, स्पर्धा
खाणेपिणे
थाटच थाट...
प्रतिपदा ते अमावास्या
सगळ्या तिथीचा जागर झाला
हळूच म्हटले साऱ्यांना -
आता करू या विसर्जन
देऊ या निरोप
'मी'ला...
हो म्हणत सटकले काही
काहींनी घेतला काढता पाय
करू या म्हणत
काही गेले
काहीच न बोलता
गर्दीत तोंड लपवत...
मांडवात शिल्लक एक
विसर्जन व्हायचंय 'मी'चं !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २६ जानेवारी २०१९

युगपुरुष

माणूस चालतो चंद्रावर
गुरुत्वाकर्षणाशिवाय
तरंगत तरंगत
न बांधलेल्या पायांनी
बिना ओढीने
चंद्राशी संबंध न ठेवता…
तशीच जगतात
माणसे काही
या पृथ्वीवर
गुरुत्वाकर्षणाशिवाय
तरंगणाऱ्या मनांनी
कशाशीही न बांधलेली
बिना ओढीने
संबंधशून्य...
कोणत्याही चुंबकाशिवाय
जगणारी ही माणसे
होतात विघटित
अन पसरते त्यांची धूळ
हवेवर, वातावरणात...
मात्र,
काहींची होते पृथ्वी
जडशीळ
जिच्या पोटात जन्म घेतात
असंख्य ज्वालामुखी
अनेक सागर
अपार खनिजे अन वनस्पती
अन गुरुत्वाकर्षण सुद्धा
हे गुरुत्वाकर्षण
आकर्षून घेते साऱ्यांना...
गुरुत्वाकर्षण गमावलेल्या मनात
गुरुत्वाकर्षण जन्म घेते
तेव्हा
जन्माला येतो युगपुरुष !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २९ जानेवारी २०१९

झाडे म्हणजे प्रार्थना

झाडे म्हणजे प्रार्थना
ज्यांना नसतात शब्द
जी असते ओतप्रोत
जीवनजाणिवांनी
तुडुंब भरलेली...
रोज पहाटे
सृजनाचा आनंद सोहळा,
रोज सांजेला
विसर्जनाची शोकसभा
निर्लिप्तपणे पार पाडणारी
संवेदनपूर्ण शून्याकार झालेली
तदाकार प्रार्थना...
जी विचारीत नाही प्रश्न
उन्हा पावसात भिजणाऱ्या
प्राक्तनाला,
आपल्याच फळांचा
तुकडाही न चाखू शकणाऱ्या
ललाटरेषेला
रसमय तरीही शून्याकार झालेली
निर्लेप नि:शेष प्रार्थना...
झाडे असतात
अस्तित्व नसलेली
पण अस्तित्वाहून सत्य असलेली
एकाग्र प्रार्थना...
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २९ जानेवारी २०१९

घाबरट

घाबरट असतो मी
अतिशय घाबरट असतो मी,
उजेडाला नाही अस्तित्व
अंधाराशिवाय
तरीही नको असते मला
चर्चा अंधाराची
गोंजारेल माझं भय अशीच
प्रकाशाची चर्चा हवी,
कारण मी घाबरट असतो...
पदोपदी आढळतात
दुर्दैवाचे दशावतार
पिचलेल्या निराशा
विस्कटणारी स्वप्ने,
शुभेच्छांना लावलेल्या
वाटाण्याच्या अक्षता,
धडाधड फुटणारी
आशावादाची जहाजे,
पण टाळतो मी
त्याकडे पाहण्याचेही
न जाणो माझ्या सुखाला
अपशकून होईल म्हणून
हो, मी घाबरट असतो...
बाजूला सारतो
'न'ने सुरू होणारं सारं काही,
नजर वळवून घेतो
साऱ्या अभावांकडून
मेंदूच्या, हृदयाच्या दारांवर
लावतो पाट्या 'प्रवेश बंद'च्या
मला नकोशा सगळ्या गोष्टींसाठी,
पाहतो स्वप्ने
अंधारशून्य उजेडाची
वेदनाशून्य सौख्याची
अशुभशून्य शुभंकराची
मृत्यूशून्य जीवनाची
अभावशून्य संपन्नतेची
विषशून्य अमृताची
खरेच मी घाबरट असतो...
मी नाहीच पचवू शकत वास्तव
समुद्रमंथनातून
नाही हाती येत केवळ अमृत,
विषाचा कुंभही असतोच
अपरिहार्यपणे...
पण मी मनातही येऊ देत नाही
हे सारे
कारण...
मी नसतो विष पचवणारा नीलकंठ
मी फक्त घाबरट असतो...
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १ फेब्रुवारी २०१९

वाळवंट


होऊ दे वाळवंट मनाचं...
दिवसा तापणारं
रात्री थंड होणारं,
दिवसा पावलं पोळली
तरी रात्री दाह निवंवणारं,
कधीही चिखल न होणारं
कसलाही डाग न लावणारं,
कधीही कोणतीही
पाऊलखुण मागे न ठेवणारं,
वादळानंतरही
पूर्वीसारखं राहणारं,
सुकणं हीच नियती असलेली
शापित फुलझाडं न फुलवणारं,
पाणीही न मागणाऱ्या
काटेरी झाडांना माया लावणारं,
कशातही न गुंतणारं
कशालाही न गुंतवणारं,
होऊ दे वाळवंट मनाचं...
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ४ फेब्रुवारी २०१९

अंधाराची मिठी


अंधाराची मिठी
आहे भलीमोठी
आयुष्याच्या गाठी
सुटलेल्या,
अंधारच सखा
नाही दुरावत
रोज उरभेटी
ठरलेल्या,
तारकांची दिठी
ज्याची असो त्यास
अंधार मिठीत
सुखावणे,
अंधाराची मिठी
आहे मोठी गोड
जगती या तोड
नाही त्यास,
अंधाराची मिठी
आहे खूप घट्ट
सोडविता यत्ने
सुटेची ना,
अंधाराची मिठी
आवळीते ज्यास
पाडते विसर
जगतीचा,
जगाचा धपाप
संपूनच जातो
ज्याला कवटाळे
अंधार हा,
जीवाचे धावणे
शांतवून जाये
एकदा का भेटे
अंधारासी,
मागणे काहीही
नाही त्याचे कधी
अंधाराची मिठी
निरपेक्ष,
सामावून घेई
विश्वची अवघे
अंधार अंधार
जीवलग
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १२ फेब्रुवारी २०१९