सोमवार, १ जुलै, २०१९

फुलती लिली !!

कालपर्यंत कळीही नव्हती
अन सकाळी सकाळी जादू झाली
लिलीच्या हिरव्यागार पानातून
काही गुलाबी कळ्या
मान उंचावून पाहत होत्या
टूकुटूकु उत्सुकतेने
वर्षाराणी हसत होती
गालातल्या गालात
माळी उभा होता
बाजूला शांतपणे
लिलीच्या कळ्या
फुलण्याच्या तयारीत होत्या
पण चेहरा मात्र उतरलेला...
त्यांना आठवत होता संवाद
चार महिन्यांपूर्वी
वर्षाराणीशी झालेला...
लिली म्हणाली होती वर्षाराणीला-
'नको करुस तोरा,
मी ठेवते जपून स्वतःला
त्या ग्रीष्माच्या उन्हातही
धरून ठेवते माझी मूळं
माझे कष्ट, माझी सहनशीलता
फुलून येते मृगाच्या सरींनी;
फुलण्याचं स्वप्न माझं
जपते मी असोशीने
अन लावते जीवाची बाजीसुद्धा
म्हणून येते अंगांगी फुलून;
तू नको सांगूस तुझा तोरा'
वर्षा राणी फक्त हसली होती तेव्हा...
यावेळी उशीर केला तिने येण्यासाठी
सगळेच तळमळत होते
अन लिलीही !
अखेर ती आली
थबकली फुललेल्या लिलीजवळ
अन म्हणाली हळूच तिच्या कानात -
'मी आल्याशिवाय नाहीच फुलू शकत तू
कितीही धरून ठेव मुळांना
कितीही धरून ठेव फुलेच्छा
कितीही उपस कष्ट
कितीही कर सहन
कितीही कर प्रयत्न
मी साद घातल्याशिवाय
नाही येत तुला फुलता...
अन ही तुझी मुळं आहेत ना
तीही राहतात जिवंत
या माळ्यामुळे
याने भर ग्रीष्मात
स्वतः घामाघूम होऊन
न चुकता घातलेल्या पाण्यामुळे...
रागावू नकोस
माझ्याही मनात नाही राग
पण एकच सांगते बाय माझे
फुलण्याचं कौतुक होतं
म्हणून माजू नकोस...
कोणतंच फुलणं
आपलं आपलं नसतं,
कोणतंच फुलणं
स्वतः स्वतःचं नसतं,
कधीच!!'
फुलती लिली ऐकत होती
खाली मान घालून...

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २३ जून २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा