सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

घाबरट

घाबरट असतो मी
अतिशय घाबरट असतो मी,
उजेडाला नाही अस्तित्व
अंधाराशिवाय
तरीही नको असते मला
चर्चा अंधाराची
गोंजारेल माझं भय अशीच
प्रकाशाची चर्चा हवी,
कारण मी घाबरट असतो...
पदोपदी आढळतात
दुर्दैवाचे दशावतार
पिचलेल्या निराशा
विस्कटणारी स्वप्ने,
शुभेच्छांना लावलेल्या
वाटाण्याच्या अक्षता,
धडाधड फुटणारी
आशावादाची जहाजे,
पण टाळतो मी
त्याकडे पाहण्याचेही
न जाणो माझ्या सुखाला
अपशकून होईल म्हणून
हो, मी घाबरट असतो...
बाजूला सारतो
'न'ने सुरू होणारं सारं काही,
नजर वळवून घेतो
साऱ्या अभावांकडून
मेंदूच्या, हृदयाच्या दारांवर
लावतो पाट्या 'प्रवेश बंद'च्या
मला नकोशा सगळ्या गोष्टींसाठी,
पाहतो स्वप्ने
अंधारशून्य उजेडाची
वेदनाशून्य सौख्याची
अशुभशून्य शुभंकराची
मृत्यूशून्य जीवनाची
अभावशून्य संपन्नतेची
विषशून्य अमृताची
खरेच मी घाबरट असतो...
मी नाहीच पचवू शकत वास्तव
समुद्रमंथनातून
नाही हाती येत केवळ अमृत,
विषाचा कुंभही असतोच
अपरिहार्यपणे...
पण मी मनातही येऊ देत नाही
हे सारे
कारण...
मी नसतो विष पचवणारा नीलकंठ
मी फक्त घाबरट असतो...
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १ फेब्रुवारी २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा