शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

वेणूस...


कशी काढते भरून
तुझी तूच गं पोकळी
कशी आणते खेचून
शून्यातून स्वरावली...
कसे काढते शोधून
नसलेले सप्तसूर
कसे सजविते बाई
श्वास तुझे वेळूतून...
कसा करते साजीरा
सप्तकाचा तू शृंगार
कसा सांभाळते डौल
भरजरी पोषाखात...
काय पोटातून उले
कसे कळावे आम्हास
तुझी शब्दशून्य भाषा
आम्हा नाही आकळत...
बिना पावलांची चाल
तुझी नजाकत थोर
जन्मा घालण्याच्या आधी
नाही दिसत गर्भार...
तुझे अज्ञात खेळणे
तुझा अज्ञाताशी संग
ज्ञात विश्वात डोलतो
कस्तुरीचा रसरंग...
तुझा अभिसार असा
नाही रूप, नाही शब्द
तरी आकारास येते
शून्यातून नादविश्व...

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ७ जुलै २०१८

हे एकाक्षा


हे एकाक्षा...
कितीही दे शकुनाचे कौल,
कितीही पचवून टाक
शतपिंड शतवार
पूर्ण अपूर्ण इच्छांचे,
तुझ्या भावनांचे दिवे
पेटणार नाहीतच कुठे
वर्तुळ व्हावं लागतं पूर्ण
दिवा उजळायला,
जोडले जावे लागतात
धन आणि ऋण अक्ष
तेव्हा उजळतो दिवा
तुझा एक अक्ष तर
घेतलाय काढून त्याने
कसा पेटणार कुठेही
तुझ्या भावनांचा दिवा?
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ७ जुलै २०१८

त्याच्या कविता

त्याचे शंभर टक्के प्रयत्न
परीक्षकांच्या
३० टक्के अपेक्षाच
पूर्ण करू शकले
चूक कोणाची?
@@@@@@@
तो चढत होता
मोठ्ठा पहाड
घाटात वादळ आलं
त्याने धरला कठडा
आधाराला
वादळाने भिरकावला
कठडा खोल दरीत
सोबत तोही
चूक कोणाची
@@@@@@@
त्याने केली तक्रार
वादळाविरुद्ध
त्याला भिरकावले म्हणून
न्यायालयाने नाकारली
वादळावर सत्ता नाही म्हणून
चूक कोणाची?
@@@@@@@

सुखपात


नसतेच दिलेले गर्भाशय कुणाला
सुखाचा गर्भ धारण करणारे
किंवा असते दुबळे
जे नाही धरून ठेवू शकत
सुखाचा बाळजीव
अन वाहून जाते सुखाशा
वारंवार होणाऱ्या सुखपातांनी...
वांझपण काय फक्त,
जीव जन्माला घालण्यापुरते असते?
आणि अजूनही नाही आलेले तंत्र
परीक्षानळीत सुखगर्भ वाढवून
मनात रोपण करण्याचे,
तोवर तरी वाहावेच लागणार
याला, त्याला, त्याला
त्या दयाळू ईश्वराने
पदरी घातलेले
सुखाचे वांझपण...
हां,
सुखाचे कुटुंब नियोजन
किंवा
स्वैच्छीक सुखपात मात्र
अजून नाही आलेला पाहण्यात...
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ६ ऑगस्ट २०१८

काळोख


मुका काळोख
उभा ठाकतो पुढ्यात
शतजन्मांचे काजवे
ओंजळीत नाचवत,
निरुत्तर प्रश्नांची कोडी मांडून
करतो कोंडी,
क्षितिजकडांना भेदून
घेऊन येतो कसल्या कसल्या हाका
पुराणपुरुषाच्या कंठातल्या,
उशाशी ठेवतो पुरचुंडी
अस्तित्वसंचिताची
निश्चल काळाच्या धाग्याने बांधलेली
आणि पसरत जातो
शून्यातून शून्याकडे
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ३१ जुलै २०१८

खेळ


चल थोडं समजूत समजूत खेळू...
तू घाल माझी समजूत
मी घालेन तुझी समजूत,
सांग काही कारणे थोडी
तुझ्या वागण्याबोलण्याची
तुझ्या अबोल्याची, दुर्लक्षाची
दुखवल्याची, रागावण्याची
जुन्यापुराण्या साऱ्याची;
नाही बोलणार मी काही
सगळं सगळं करीन मान्य
खरं, खोटं
पटणारं, न पटणारं;
असंच सगळं मीही सांगेन
तूही नको बोलूस काही
मान्य कर माझं सगळं;
राग राग रागावून टाकू
दोष दोष देऊन टाकू
कारणे बिरणे देऊन टाकू
एकमेकांचं सारं काही
मान्य मान्य मान्य करू
सारं काही समजून घेऊ;
चल एकदा
समजूत समजूत खेळून घेऊ...
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ३१ ऑगस्ट २०१८

नीलकंठ


नकारघंटा किती वाजू दे
हाक मारणे सोडू नये
किती वर्षु दे बर्फ शिरावर
धग रक्ताची गोठू नये...
उधाण लाटा मत्त येऊ दे
नाव तीरावर लावू नये
कातळकाळ्या कालपटावर
स्वप्न गोंदणे सोडू नये...
कराल दाढा खूप वाजू दे
गुणगुण गाणे टाकू नये
निबीड जंगल आले तरीही
सतत चालणे थांबू नये...
मरून झाले अनेक वेळा
जगणे तरीही विसरू नये
जखमांचे व्रण अभिमानाने
जगी मिरविणे सांडू नये...
विष वाढले पानी तरीही
पंगत सोडून उठू नये
माधुर्याची भीक मागुनी
नीलकंठ व्रत खंडू नये...
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २६ जुलै २०१८

किनारा


कितीक लाटा आल्या गेल्या
कितीक पुसली गेली नावे
नाही विरला, नाही जिरला
एक किनारा तसाच आहे...
लाटा करिती दंगाधोपा
दंगाधोपा करिती माणसे
तरी स्तब्धसा आत्ममग्न तो
एक किनारा तसाच आहे...
महाल, किल्ले किती वाळूचे
उभे राहिले आणि विरले
पुन्हा एकदा त्या खेळास्तव
एक किनारा उभाच आहे...
पांथस्थांचा जमतो मेळा
जातो निघुनी वेळोवेळा
नव्या स्वागता नव्या उर्मिने
एक किनारा उभाच आहे...
कुठून आणतो अशी शांतता
येते कुठूनी ही अविचलता
प्रश्नांची ही रास ओतूनी
पुन्हा किनारा तसाच आहे...
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २० जुलै २०१८

लेखक


काय, करतो काय लेखक?
तो जोडतो माणसांना
- प्राण्यांशी
- पक्ष्यांशी
- नद्या, समुद्र, सरोवरांशी
- झाडांशी, पहाडांशी
लेखक जोडतो माणसांना
- प्रदेशांशी
- विदेशांशी
- विचारांशी
- भावनांशी
लेखक जोडतो माणसांना
- समाजाशी
- माणसांशी
- स्वतःशी
लेखक धरतो आरसा
दाखवतो प्रतिबिंब -
कधी आनंद देणारे
कधी चेहऱ्यावर लागलेले
काळे डाग पुसून टाकायला सांगणारे
कधी रंगरंगोटी करायला वाव देणारे;
त्याला समजू नका लहान
त्याची नका करू उपेक्षा
त्याच्याशी होऊ नका कृतघ्न;
तो नाही केवळ
शब्दांचा गारुडी...
तो आहे -
महादु:खाचा महाशब्द
महासौख्याचा महाहुंकार
महाअस्तित्वाचा महाप्राण...
लक्षात असू द्या
तोच आहे
माणसाच्या
अजाण जाणिवांचा अंत:स्वर !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १६ जुलै २०१८

ओंजळीतला ओंकार


किती युगांचा दुरावा
कसा सरता सरेना
काय विनवणी करू
काही काहीच कळेना
तुज नाही का आठव
नाही येत का भरते
काही हालचाल मग
कशी बरी न दिसते
किती शकुन काळ्याचे
किती घन साकळले
किती अधीर पाउले
सारे सारे व्यर्थ गेले
थोडी उचल नजर
जरा पाहा ना इकडे
काळजात लकाकू दे
काही स्मृतींचे काजवे
पुरे झाला आता खेळ
पुरे सारी धावपळ
आतबाहेर घुमू दे
ओंजळीतला ओंकार
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २३ जुलै २०१८

निरक्षर !!


किती बरं होतं ना
आम्ही राजकीय निरक्षर होतो !!
दूध रस्त्यावर फेकत नव्हतो;
कांदे, टमाटे खाण्यासाठीच वापरत होतो;
जाती माहिती होत्या तरी
कोणाच्याही काढत नव्हतो;
आमच्यासारख्या माणसांनाच
आमचे शत्रू समजत नव्हतो;
पाण्यासाठी, जमिनीसाठी
पदासाठी, खुर्चीसाठी
रोज रोज भांडत नव्हतो;
अपमानासाठी दबावासाठी
उखाळ्यापाखाळ्या करत नव्हतो;
शेजाऱ्याला शेजारी मानत होतो
माणसाला माणूस मानत होतो
उमदे मतभेद बाळगत होतो
पटणारे, न पटणारे
उघड, मोकळे बोलत होतो
असे सारे असूनही
आम्ही सारे एक होतो-
किती बरं होतं ना
आम्ही राजकीय निरक्षर होतो !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १६ जुलै २०१८

जेव्हा नकोसा उजेड


जेव्हा नकोसा उजेड
तेव्हा म्हणावीत गाणी
पंख छाटले जाताना
डोळा आणू नये पाणी
भेगाळल्या काळजाला
द्यावे दगडी अस्तर
तेव्हा कोमेजत नाही
प्राणफुलांचे मखर
बांधावीत घरटीही
पावसाळी आभाळात
घर वाहिले तरीही
जीवा लाभते ताकद
येता अंतरी भूकंप
बुडी घ्यावी पाताळात
सावडीत वर यावे
अंतरंगीचे निर्माण
सरणाच्या उरावर
मरणाचे गीत गावे
जीव जळताना थोडे
भावगीत आळवावे
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ६ जुलै २०१८

ओवी तुझी, शिवी तुझी


ओवी तुझी
शिवी तुझी
मज बोल
लाविशी का?
सुख तुझे
दु:ख तुझे
मज भोग
दाविशी का?
पुण्य तुझे
पाप तुझे
मज घोर
लावितो का?
दया तुझी
माया तुझी
मज वृथा
फिरवी का?
गोड तूच
कडू तूच
मज चव
कळवी का?
भोग तुझे
त्याग तुझे
मज त्यात
ओढतो का?
जग तुझे
कार्य तुझे
मज फुका
जुंपतो का?
भक्ती तुझी
मुक्ती तुझी
मज भाव
मागतो का?
तुझे नाम
तुझे गान
मज शब्द
याचतो का?
तुझा भक्त
तुझा आप्त
तुझा भाट
वाटलो का?
जड तूच
तत्व तूच
मज मायी
फसवी का?
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ८ जुलै २०१८

डाकू


ही जमीन कोणाची?
ही माती कोणाची?
कोणाची ही खनिजे?
कोणाचे हे पाणी, हवा?
झाडेझुडपे, पशुपक्षी
चंद्र, सूर्य, तारे सारे
आहे तरी कोणाचे?
कोणी दिला सातबारा?
घेतला कोणी सातबारा?
आपले यातले नाही काहीच
तरीही करतो दावे मालकीहक्काचे
लावतो किंमत या साऱ्याची
ती ठेवतो वाढवत नेहमी
करतो वसुली प्रत्येकजण...
आधीच्याने केले म्हणून
नंतरच्याला करणे भाग आहे,
वरच्याने केले म्हणून
खालच्याला करणे भाग आहे...
कोणाचीच नाही म्हणून
सगळ्यांची ही पृथ्वी
कोणाचाच नाही सातबारा
म्हणून सगळ्यांचाच आहे सातबारा
विसरून गेलो आहोत आम्ही
कदाचित माहितीच नव्हते
विसरून जाण्यासाठी,
पूर्वीपासून चालत आलेले
आताही चाललेच आहे,
आपल्या नसलेल्या पृथ्वीवर
मालकी सांगून
त्याची किंमत वसुलणारे
लुटारू अन डाकू आहोत आम्ही
माणूस नावाचे...
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ३० जून २०१८

स्वप्न


स्वप्न पाहिली त्याने खूप
त्याहून जास्त बाळगली इच्छा
इच्छेहून जास्त केले प्रयत्न;
फक्त,
त्याचं एकही स्वप्न
पहाटेचं नव्हतं...
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २ जुलै २०१८

सोबत


भिजलेलं पाखरू
वळचणीला आलं
आपलं घर नाही
म्हणून होतं बावरलं
सुरक्षित कोपऱ्यात
जाऊन बसलं
पंख फडकवून
कोरडं झालं
घशातल्या घशात
ओरडू लागलं
ओरडत ओरडत
बसून राहिलं...
रात्र झाली
घरचे दिवे मालवले
पाखरू ओरडतच होतं...
पाखरू जागं होतं
घर आणि सोबती
हरवले म्हणून,
तो समाधानाने झोपला
रात्रीला
सोबत मिळाली म्हणून
- श्रीपाद कोठे
नागपूर
४ जुलै २०१८

नाणेफेक


इकडे चित, इकडे पट
मध्ये काय?
माहीत नाही अन
सांगताही येत नाही
काहीतरी आहे हे मात्र नक्की...
उगाच का एकत्र राहतात
घट्ट चिकटून
अजिबात साथ न सोडता
अगदी
आपण अन आपला श्वास
यापेक्षाही घट्ट, एकजीव
कधीच विलग न होणारे...
वाट्याला मात्र एकच येणार
चित किंवा पट
नाणेफेक होणारच
अटळपणे
अन एकच स्वीकारावे लागणार
दोन्ही नाहीच मिळणार
एकजीव असूनही...
अशीच अनेक नाणी;
जय-पराजय
यश-अपयश
होकार-नकार
दिवस-रात्र
उजेड-अंधार...
यांचीही होतेच नाणेफेक
अन स्वीकारावे लागते
एकच काहीतरी
कधी चित, कधी पट...
किंवा कधीकधी
फक्त चित... चित... चित...
किंवा
फक्त पट... पट... पट...
त्या दोघांमध्ये असलेल्या
माहिती नसणाऱ्या
सांगता न येणाऱ्या
कशाच्या तरी
अथांग निरर्थक साक्षीने !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ३० जून २०१८

अनिवार काव्यधारा...


ये प्रेमले नभातून
लेऊन रंग न्यारे
आसावल्या दिठीला
सुख होऊ दे जरासे...
ये प्रेमिके फुलारून
लोभावल्या पदांनी
खंतावल्या उरात
दे छेडूनी सतार...
ये प्रेरणे उभारून
कर आपुले पिसांचे
घेउनी मज कवेत
गा गीत चांदण्यांचे...
ये प्रांजले सुगंधुन
गुंफून श्वास अवघे
या सावळ्या क्षणातून
तू माळ विश्व सारे...
ये प्रसन्नवदने ये
सारून दूर दुजता
दोघात टपटपू दे
नाजूक प्राजक्त अवघा...
ये प्रेमवेडे अशी ये
विसरून हा पसारा
होऊनी जा मनातील
अनिवार काव्यधारा...
ये प्राणदे तमातून
होऊन तू शलाका
काळ्या निजेस दे तू
कालिंदीचा सहारा...
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २४ जून २०१८

पैज


हरलास ना?
म्हटलं होतं-
नको लाऊस पैज, हरशील
पण तुला गर्व
खरं तर घमेंड
जगन्नियंता असल्याची...
केवढ्या ताठ्याने म्हणाला होता-
मला काहीही अशक्य नाही
मी काहीही करू शकतो
किती कोटी वर्षे झालीत
घालतोय जन्माला
प्रत्येक नवा क्षण वेगळा...
अन लागली पैज-
'अगदी पिळून टाकणारे स्वर
एकही थेंब उरणार नाही
असं गाणं ऐकवायचं
मी म्हणेन तेव्हा'
म्हणालास हो,
अन पूर्णही केलीस मागणी
काही दिवस !
आणि आता???
आता म्हणतोस- हरलो,
आता नाही शिल्लक
आतडी पिळणारा एकही स्वर
का? कुठे गेली तुझी
नवोन्मेषशालिनी प्रतिभा?
कुठे गेला तुझा ताठा
प्रत्येक क्षण
नव्याने जन्माला घालण्याची
फुशारकी मारणारा?
अजून तर केवढा उरलाय रस्ता
मला हवे आहेत स्वर
पेशी न पेशी पिळून काढणारे...
नपेक्षा
शरण ये
अन सोडून दे
पिळून घेण्यासाठी माझे मला...
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २९ जून २०१८

सारीपाट


सगळेच टाकतात फासे प्रयत्नांचे
जगण्याच्या अन जगाच्या सारीपाटावर
काहींना पडते लगेच सहाचे दान
काहींना खेळावे लागते वारंवार
म्हणूनच,
काहींचा खेळ सुरू होतो लवकर
काहींचा खेळ सुरू होतो उशिरा...
खेळातही पडतात दाने वेगळाली
कोणी रखडतो मागे, कोणी पळतो पुढे...
शेवटाचेही खरे नसतेच काही
जेवढे हवे दान तेवढे पडतेच असे नाही
कधी होते लवकर सुटका
कधी लांबण...
कधी खिजवणे, कधी हशा, कधी नुसता कंटाळा
कधी ईर्ष्या, कधी दुस्वास, कधी नाक उडवणे
कधी राग, कधी संताप, कधी फक्त हुंकार...
खेळ फक्त चौघांचाच
बाकी सारे बेकार
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २३ जून २०१८

सांजसावली


सांजसावली उरात घेऊन उतरतो मारवा
अज्ञात स्थानकावर
केशरनिळ्या पाखरांच्या पंखावरून,
स्तब्ध धुक्यातून
एकेक पाऊल टाकत
घेतो अदमास
जीव-अनोळखी स्थानकाच्या प्राचीनतेचा,
स्थानकाबाहेर पडताना
स्मित केलं न केलं
असे हलवतो ओठ
पडिक आडावर
पाणी शेंदणाऱ्या अल्लडेकडे पाहून...
सांजसावली विचारते-
मी कुणाची?
मारवा भिरभिर नजर फिरवतो
आपण शोधतो आहोत
असा भास निर्माण करीत,
उत्तर नसते त्याच्याकडे
हे ठावे त्यालाही
पण आश्वस्त समजूत घातलेली
तेव्हापासून सांजसावली चाललीय
मारव्याचे बोट धरून,
अंधार दाटला की
सावली सोडून जाते-
ऐकले होते आजवर,
आज मात्र सावलीच
भिरभिरतेय
दूर शेतात पेटलेल्या चुलीचं
अनाथपण पोटी घेऊन
शोधतेय तिचा नाथ वा तिची नाथ,
सांजसावली सनाथ होईपर्यंत
मारव्याची सुटका नाही,
गंमत म्हणजे,
सावलीला हे माहीत नाही-
मारव्याची सावली हरवली आहे,
सावली नसलेला मारवा
अन
अनाथ सांजसावली
फिरतायत
एका अज्ञात स्थानकावरून
दुसऱ्या अज्ञात स्थानकावर...
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २१ जून २०१८

आर्जवांचे आक्रोश


आर्जवांचे आक्रोश
अवकाशी हरवतात
अस्तित्वशून्य होत
अनिर्बंध तटस्थता
अडवून धरते
अदम्य जिवेच्छा
अपराजित मृत्यू
आक्रसू पाहतो
अनिर्वाच्य लसलस
अजाण जाणिवा
अथांग डोहात
ओघळतात कोमेजून
आयुष्य चालतं
अज्ञात रस्त्याने
आशा पांघरून
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १८ जून २०१८

लाटा


लाटा विरून जातात
जातातच-
सरोवराच्या
सरितेच्या
सागराच्या सुद्धा,
लहान, मोठ्या
अजस्र, महाकाय
अगदी सुनामीच्या देखील...
लाटा विरून जातात
जातातच-
अधेमधे
मधल्यामध्ये
किनाऱ्याला पोहोचण्याआधीच
बेदखल होऊन
कधी जन्मताच
कधी जन्मता जन्मताच...
लाटा विरून जातात
जातातच-
मनाच्या सरोवरात
मनाच्या सरितेत
मनाच्या सागरात सुद्धा...
निसर्गाप्रमाणेच !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ३ जून २०१८

अंत


'अंत असतोच प्रत्येक गोष्टीचा',
'मान्य, अगदी शंभर टक्के मान्य...
पण,
त्याच्या त्रासाचा
त्याच्या कष्टाचा
त्याच्या भोगण्याचा
त्याच्या सोसण्याचा
अंत कधी होणार?
त्या साऱ्याला
अंत आहे की नाही?'
'होणार, होणार
त्यांचाही अंत होणार'
'पण कधी?'
'त्याच्या अंतासोबत'
... ... ... ... ... ...
!!!!!
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २९ मे २०१८

कोरडे पाणी


कोसळती वर्षाधारा
अवनीला होते सुख
अंधाऱ्या, मागील दारी
साकळते वेडे दु:ख
संवाद चालतो तेथे
दोहोंच्या प्राणामधुनी
आडात कोंडूनी घेते
वर्षेचे कोमल पाणी
ओलेत्या अंबरधारा
ओलेच शुभ्र आकाश
कूस बदलती दारी
ओलेते नीलम भास
या ओलाव्याच्या संगे
दारात दाटती मेघ
कोसळत्या वर्षाधारा
होतात कोरडी रेघ
पाण्याचा खेळ जुना हा
पाव्यातून वाजे धानी
इकडे तिकडे फक्त
साचते कोरडे पाणी
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १० जून २०१८

धावचित


धावचित होणारा बाद होतो
कधी स्वतःच्या चुकीने
कधी दुसऱ्याच्या चुकीने
क्रिकेटच्या मैदानावर
अन जीवनाच्या धावपट्टीवरही,
फळ बाद होणाऱ्याच्याच पदरात
चूक कोणाचीही असली तरीही
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १८ मे २०१८

तमास...


ये दाटूनी असा तू
प्रेमे उचंबळोनी
घ्याया मला कवेत
रे सखया, तमा तू
ये धाऊनी गिळाया
मिळमिळीत दु:ख
ये धाऊनी कुटाया
विसविशीत सुख
ये शक्तीभारे अशा
होईल ज्यात नष्ट
कृत्रिम भावनांचे
व्यापार हे बलिष्ठ
घेवोनिया कुशीत
अंगाईगीत गा तू
तृप्तीत वेदनांच्या
या पापण्या मिटू दे
ये राजसा, दयाळा
दे भेट आवळोनी
जावो लयास अवघी
ही आर्तता, विराणी
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १६ मे २०१८

परग्रहवासी


तो दिसतोय तुम्हाला?
नाही, तो वेडा नाही
बावरला आहे
गोंधळला आहे
शोधतो आहे त्याचा रस्ता
जो हरवलाय कुठेतरी, कधीतरी...
विचारतोय याला त्याला
हिला, तिला, त्यांना
जो कोणी वाटतो
जवळचा किंवा ओळखीचा;
ते विचारतात खाणाखुणा
त्याला नाही सांगता येत;
मग सांगतात त्याला
हे, ते, ती, ही, त्या, ते -
शोध बाबा तुझा रस्ता तूच
मग गोंधळतो तो,
बावरतो,
पाहतो इकडे तिकडे
फिरत राहतो
मागे पुढे, डावी उजवीकडे
एखादा वा एखादी कुणी
करतात सोबत चार पावले
अन सांगतात -
मला जायला हवं
शोध तुझा हरवलेला रस्ता...
त्याला कोणीतरी सांगायला हवंय -
तुझा रस्ताच नव्हे
तुझा ग्रहच हरवला आहे,
पण सुटणार नाही
समस्या तेवढ्यानेच...
कसा पाठवणार त्याला
त्याच्या ग्रहावर परत?
नका हसू त्याला
नका करू त्याचा उपहास
नाही शोधता आला रस्ता
नका शोधू,
नाही देता आली साथ
नका देऊ,
पण...
नका ठरवू त्याला वेडा,
नका विसरू -
तो गोंधळला आहे
तो बावरला आहे
त्याने हरवला आहे
ग्रह स्वतःचा
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २४ मे २०१८

तो फकीर आहे


तो फकीर आहे
राहू द्या त्याला तसेच
दोन जग असतात त्याला,
एक तुमचं -
ज्यात तो चालतो, फिरतो
खातो, पितो, झोपतो, बोलतो...
अन एक दुसरं जग
ज्यात असतो तो
कायम, २४ तास;
अगदी
तुमच्या जगात असतानाही;
ते कळत नाही तुम्हाला एवढंच...
नसतोच तुम्हाला परिचय
त्याच्या त्या दुसऱ्या जगाचा
नसते ठाऊक तिथली भाषा
तिथले रीतीरिवाज
मग वाटतो तो विक्षिप्त, वेडगळ
नालायक सुद्धा
या तुमच्या जगाला;
त्याला मात्र असते माहिती
खडानखडा
तुमच्या जगाची;
अशी अनेक जगं
अंगाखांद्यावर घेऊनच
चालत असतो तो वाट
चालू द्या त्याला तसेच
नका लावून बघू फुटपट्ट्या तुमच्या
फसाल अकारण
तुमच्याच जाळ्यात...
त्याचा त्रास नाही होणार तुम्हाला
तुमचा त्याला होऊ देऊ नका
राहू द्या त्याला फकीर;
लक्षात असू द्या
तो तुमच्यात आहे
पण तुमचा नाही;
हक्क वगैरेच्या क्षुल्लक तराजूत
नका तोलू त्याचे फकिरपण
लक्षात असू द्या
त्याचे अवलियापणच
तुमच्या जगाचा आधार आहे;
फकिराला तोलू नका
फकिराला मोलू नका
फकिराला राहू द्या फकीर
त्याच्यासाठीच नव्हे
स्वतःसाठी सुद्धा !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, ३ मे २०१८

वर्तुळाचा शोध


'काय शोधतोय?
वर्तुळाचा प्रारंभ?
की वर्तुळाची समाप्ती?
वर्तुळाच्या
कोणत्या बिंदूतून
कोणता बिंदू निघालाय?
दोन बिंदूंमधील
कोणत्या मोकळ्या जागेने
घातलाय पहिला बिंदू जन्माला?
की आणिक काही?'
'हो -
असंच काहीतरी...
पण समजत नाहीय
सुरुवात कुठून करावी...'
चालू दे शोध
कारण-
शोध घेताच येत नाही वर्तुळाचा
हे कळत नाही
शोधाचे अपार कष्ट घेतल्याविना...
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, ३ मे २०१८

Winner !!


I lost this
I lost that
I lost him
I lost her
I lost them
I may have lost -
Opportunities,
Relations,
Finances,
Health,
Fame,
Worlds,
And what not?
I am ready
To loose it all
Again and again.
But...
Yes but,
I am not a loser
As
I haven't lost myself
And
I never will be.
I am a Winner
Everytime
And
Always !!
- shripad kothe
Nagpur
Sunday, 29 april 2018

कृष्णेकाठी


कृष्णेच्या काठावर
उमटलेली
कवितेची पावले
पुसली न जाणारी,
आकाशीचा चंदनगंध
उधळीत
नक्षत्र डहाळीवर
झुलणारी,
मृण्मयीला चिन्मयी करणारी
नितळ, प्रवाही, वाहती
घाटपायऱ्यांवर ओठांगून रेंगाळणारी
लाटांना अबोलतेने सांगावा देणारी
ओळखीच्या धूळखुणा जपणारी,
दूरच्या निबिड अंधारात
शून्याकाशी रोखलेल्या
थिजू पाहणाऱ्या नजरेला
काजळलोणी लावून
निवविणारी,
कृष्णमयी पावले
कृष्णाकिनाऱ्याची
कृष्णेच्या अंतरात रुतलेली
चिरंजीव
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, ३ मे २०१८

निश्चय !!


आज ठरवलंच
बस्स झालं आता,
नाही करायचा
तुझा पाठलाग,
नाही लागायचं
तुझ्या मागे,
काय संबंध आपला?
काय दिलंय तू?
कशासाठी जाळायचं
मी स्वतः ला?
आता नाही घेणार नावही...
तोडून टाकलं स्वतःला
तुझ्यापासून
अन पहुडलो निवांत...
अन येऊ लागलं कानी
हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून
तुझंच नाव !!
त्याला गरजच नव्हती
माझ्या उच्चारण्याची...
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २९ एप्रिल २०१८

पद्मरेखा


सतत चालतोय
पाचवीला पूजल्यासारखा
कधी प्राचीची दिशा धरून
कधी अस्ताचलाकडे,
कधी धावणाऱ्या
अन कधी गोठलेल्या वाटांनी,
उत्फुल्ल फुलांनी सजलेल्या
अन निराशा पांघरलेल्या रस्त्यांनी,
आपुलकीच्या मायेने जवळ करणाऱ्या
अन बेगुमान झिडकारणाऱ्या पायवाटांनी,
अंधार आणि उजेडाच्या
गुळगुळीत आणि खड्ड्यांच्या
कुसुमांच्या अन काट्यांच्या
पौर्णिमेच्या अन अमावास्येच्या;
एकच आधार
एकच सोबत
एकच साथ
अखंड...
तुझ्या पद्मरेखांची !!!
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २८ एप्रिल २०१८

कविता ग्रीष्माच्या

मोठं पटांगण
एका बाजूला प्रशस्त मंदिर
मध्यभागी जुन्या वटवृक्षाचा
विशाल पार
त्यावर विसावलेला मी
वडाच्या सावलीतही
भाजून काढणाऱ्या झळा
बचवासाठी कानाला रुमाल
पलीकडे पाण्याचा नळ
शेजारी भरलेला रांजण
गर्दी नसूनही
रांजणाजवळचा माणूस खंडत नाही;
मंदिराच्या सावलीत बसलेला तो
त्याने गाठोडी सोडली
त्यातून पेला काढला प्लॅस्टिकचा
दोनशे फूट चालत आला
रांजणापर्यंत, अनवाणीच
पेला भरून घेऊन गेला
न्याहारीसाठी;
त्याच्या भाळी सटवाईने
एकच ऋतू लिहिलाय - ग्रीष्म...
ग्रीष्माच्या झळा थोड्या शीतळ झाल्या असाव्या
पाच मिनिटांनी
रस्त्याला लागताना
कानाचा रुमाल
ग्रीष्माच्या झोळीत टाकून दिला
**************
ऐन जेवणवेळी
गोमाता हंबरते फाटकाजवळ
तिच्यापुढे पाण्याची बादली ठेवून
नजर जाते
रस्त्याच्या टोकाला असलेल्या
मंगल कार्यालयाकडे
जीवनाचे वसंत, ग्रीष्म
तरळून जातात नजरेपुढे
गोमातेपुढील बादली उचलताना
होतो साक्षात्कार
ग्रीष्माने ग्रीष्म झाल्याशिवाय
आषाढ, श्रावण बरसत नाहीत
**************
चला माझ्यासोबत
तुमची सुटका नाही
तुम्हाला पर्यायही नाही;
ग्रीष्माने बजावले
झाडावर उरलेल्या
काही चुकार पानांना
आणि आडोशाने बसलेल्या पाखरांनाही
ग्रीष्म ग्रीष्म आहे
**************
ग्रीष्म जळतो, जाळतो
भाजक्या ग्रीष्माच्या गंधाला
जग मोगरा म्हणतं...
*************
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २७ एप्रिल २०१८

कविते...


कविते,
साजरा केला आज जगाने
तुझा विशेष दिवस...
तुझा शृंगार
तुझं कौतुक
तुझं महत्व
तुझे भास, आभास
तुझा गहिवर
तुझा विलास
आणिक काय काय...
दिवस सरतोय
म्हणजे वेळ निरोपाची;
तुझाही निरोप ?? !!!
घेता येतो तुझा निरोप?
देता येतो तुला निरोप?
मीच माझा निरोप कसा घेऊ?
सांग ना...
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २१ मार्च २०१८

अज्ञाताच्या घरून येति

हरिप्रसादजींना अनेकदा ऐकलं आहे. प्रत्यक्ष सुद्धा पुष्कळ ऐकलं आहे. पण आज त्यांचा 'धानी' ऐकताना पहिल्यांदाच मनात काही आलं. तेच हे-

अज्ञाताच्या घरून येति

अज्ञाताच्या घरून येती सूर कसे देखणे
अनाकृतीला रूप लाभते तुझीया श्वासाने
लपलेला आनंद डोलतो कैसा शून्यातून
काय नाचते थुई थुई ते, पोकळ वेळूतून
अनोळखी ते गाव सुरांचे वसते कोठे रे?
कधी जाशी अन कैसा येशी, कानी सांग ना रे
नसते काही तेही असते, कुठे झाकलेले
कसे गावते कसे लाभते, काय तुझे नाते?
धन्यवाद हा शब्द तोकडा तुझ्या निर्मितीला
अखंड लाभो तुजला ऐसे आशीष देवाचे
तुझ्यातून जे वाहत येई दिव्य चेतनामय
प्रमुदित होवो त्याने अवनी, आणि आल्हादित

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ५ मार्च २०१८

वाट पाहतो...


वाट पाहतो तुझी प्रियतमा
धावत धावत ये ना
हे चिरसोबती, माझी प्रतीक्षा
लवकर संपव ना...
तुझे भेटणे ही तर नियती
ठाऊक तुजला ना
का रे करिसी विलंब मग तू
प्रेमळ होऊन ये ना...
अखंड सोबत तरीही नाही
भेट कधीही अपुली
नाही चाहूल आणि पदरव
मौन साधना कसली?...
उभा ठाकतो कधी अचानक
अनपेक्षित रे किती?
आवडते का लपाछपी तुज
जन्मभरीची असली...
सोडूनि जातो क्षणभरीही ना
ना रे भेटही क्षणाची
असली गंमत जन्मभरीची
त्रास किती तू देशी?...
नाही ठाऊक वेळ तरीही
येणे निश्चित असते
त्याचसाठी तर हाती सुमने
जन्मभरी वागविणे...
मैत्र आपुले स्मरून मानसी
विलंब नको रे करू
येण्याआधी कानी सांग तू, कैसे
मरणा तुजसी वरू?

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २६ फेब्रुवारी २०१८