मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

धावत धावत ये ना


मी आर्त मनाने जेव्हा
साद घालतो तुजला
शब्दांच्या गाठी सोडून
तू शब्द होऊनी ये ना


मी गोंजारून शब्दांना
पोशाख घालूनी देतो
पाऊल गोंदूनी तूही
पैंजण होऊनी ये ना

पैंजणमुग्ध मनाने
जेव्हा मी चित्र रेखितो
अग्रातून तुलिकेच्या
तू रंग होऊनी ये ना

मी रंगबावरा वेडा
श्वासांनी विणतो धागे
तू महावस्त्र सृष्टीचे
सुगंध होऊनी ये ना

मी सुगंधी भिजलेला
आतूर पाहतो वाट
लपलेल्या हे कविते
धावत धावत ये ना

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २४ डिसेंबर २०१७

शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

काजळशाई


काळीज कुस्करून काढलेली
काजळशाई
कवितेच्या हाती देताच
कवितेने
कुंचला शाईत बुडवला
कागदावर फिरवला,
कोऱ्या कागदाने
काळोखाच्या शपथा
कोरून घेतल्या,
कागद काळा झाला
कालकूट प्राशन करून


- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २५ नोव्हेंबर

ओंडका


वसा ओंडक्याचा
कसा दूर सारू
ललाटी असे जे
त्या, कैसे अव्हेरू?

कुठे जावयाचे?
कुठे जात आहे?
प्रवाहास ठावे,
मला काय त्याचे?
कुणी सोबतीला
येऊन मिळती
अकस्मात आणि
कुठे दूर जाती
क्षणांचीच नाती
क्षणांचा पसारा
प्रवाहास नाही
कुठेही किनारा
असा ओंडक्याचा
वसा लाभलेला
हवासा असो वा,
नकोसा जरी हा

- श्रीपाद कोठे
नागपूर
३ डिसेंबर २०१७

कविते,


कविते,
तुझी कर्तव्ये दोनच...
तुला ठाऊक नसतील
म्हणून सांगतो-
वाचणाऱ्याला
आनंद अन समाधान देणे;
घडवणाऱ्याला
त्रास अन दु:ख देणे


- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १० डिसेंबर २०१७

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

मेंदू आईनस्टाईनचा

मेंदू आईनस्टाईनचा

कधीतरी
आईनस्टाईन म्हणाला होता
पाण्यात पोहणाऱ्या माशाची तुलना
आभाळी उडणाऱ्या पाखरांशी नका करू
आणि तो हेही म्हणाला होता,
आजची शिक्षण पद्धती तेच करतेय
याने मासा राहणार नाही मासा
पक्षी राहणार नाही पक्षी-
दिला होता इशारा त्यानेच;
आम्ही अभ्यासक्रमात
समाविष्ट केला
त्याचाच एक पाठ
आणि शिकवू लागलो
आपल्या मेंदूपेक्षा
कसा वेगळा होता
मेंदू आईनस्टाईनचा
सगळ्या माशांना आणि पक्ष्यांना...

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १४ नोव्हेंबर २०१७

मंगळवार, ३१ ऑक्टोबर, २०१७

अज्ञात झऱ्यावर


अज्ञात झऱ्यावर
अबोल पक्षी येतो
अंधार दाटताना
आभाळ होत जातो

अश्रूत गोठलेल्या
आलाप, सूर, ताना
अक्षय्य आर्ततेने
अंजुलीत धरतो
आता तरी सरू दे
अंधारयुग माझे
आवाज देत ऐसा
ओढ्यास सोपवितो
आवेग दाटुनिया
ओढा उचंबळे तो
आसावल्या दिठीने
अश्रूत साठवितो
अश्रूस आवरेना
आकाश त्या पुरेना
अवकाश पाखराचा
आता कुठे उरे ना
अद्भुत त्याचवेळी
आली उरात हाक
आकाश शब्द बोले
आलो पाहा मी खास
आवाज ऐकता हा
आल्हाद त्यास झाला
अद्वैत विठ्ठलाचा
अलवार भास झाला
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ३१ ऑक्टोबर २०१७

शुक्रवार, २७ ऑक्टोबर, २०१७

चांदणभूल


मी मागून घेतो थोडे
अवसेला ओले गाणे
शून्यात ठेवूनी देतो
रातकिड्यांचे रडणे

डोळ्यांना दिसते काही
दाराशी भिजते जाई
आकाशी चांदणवेळा
पाण्यावर आल्या गायी
अतृप्त तृप्तीचा देठ
काळजा घालीतो वेढे
रस्त्याने धावत जाती
रातीला कुठले वेडे
साठवतो कानी तेव्हा
अज्ञात मुके ते सूर
पावलात नक्षत्रांच्या
अडके चांदणभूल
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २६ ऑक्टोबर २०१७

वेदनेस...


मावळतीचा गंध नसे ज्या
अशा वेदने ये ये ये
अनाम अद्भुत अंतरंगीच्या
अतुल वेदने ये ये ये

क्षणैक तळपुनी अस्ता जाई
अशा जगातुनी ने ने ने
नित्य साथीला सवे घेऊनी
दु:ख अनावर दे दे दे
अंधाराची तुला न भीती
कृपाळूपणे ये ये ये
तेजाचीही तुला न क्षीती
अमर वेदने ये ये ये
अचल चंद्रिके अढळ देवते
वेढून मजला घे घे घे
दांभिक जगती सत्यवतीचा
वसा अंतरी दे दे दे
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २३ ऑक्टोबर २०१७

शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

पायरी

कधीतरी शिकलेला सिद्धांत
दुसऱ्या पायरीवर जायला
सोडावी लागते
पहिली पायरी;
घोकून ठेवलाय
अन जगतोही त्याप्रमाणेच,
फक्त एक प्रश्न
पडू लागलाय आताशा
ज्या दुसऱ्या पायरीवर जातो
ती खाली नेते की वर??

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १४ ऑक्टोबर २०१७

तो

तो फिरतो अजूनही
दिसतो कधीमधी
रस्त्याने जातायेताना,
किती वर्षं झालीत
माझ्या लहानपणापासून पाहतोय
म्हातारा झाला आता,
त्यावेळी असायची मुलं
त्याच्या मागेपुढे
त्यांच्या गोंधळावरूनच
कळायचं, तो आलाय
आता नाही कळत तसं...
एकटाच फिरत असतो
कोणी नाही ओढत
त्याचा शर्ट
कोणी नाही मारत
त्याला हाका
वेगवेगळ्या नावांनी...
तोही नाही देत उत्तर-
आता कोणालाच
किंवा
खाली वाकून
नाही उचलत एखादा दगड
मुलांवर भिरकवायला;
त्याचं वेडंही
अनाथ झालंय आता... !!!

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १४ ऑक्टोबर २०१७

बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

हो, तो राम होता


हो, तो राम होता
त्याने वध केले
आवश्यक होते म्हणून
पण,
ज्याचा वध केला त्याच्याबद्दल
मनात किल्मिष नव्हते त्याच्या
अन डोळाही नव्हता
ज्याचा वध केला त्याच्या
सत्तेवर, संपत्तीवर, स्त्रीवर
आणि
वध केल्यानंतर दिला निरोप
सन्मानानेच,
तो दुर्भावरहित होता
हो, तो राम होता...

सोडले त्याने पत्नीला वनात
तेही गर्भवती असताना
पण सोबत धाडला बहिश्चर प्राण
नीट व्यवस्था लावायला
टाकून नाही दिले तिला
बेजबाबदारपणे
अन नाचून पार्टीही नाही केली
सुटलो बुवा एकदाचा म्हणून
किंवा
एखादी इच्छा पूर्ण केली नाही
चहात साखर कमी झाली
यासारख्या कारणांनी नाही सोडले तिला
किंवा
दुसऱ्या परीवर जीव आला म्हणून
कंटाळा आला म्हणून
अगदी- व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून सुद्धा
नाही सोडले त्याने पत्नीला...
कोणताही आदर्श जगणं
किती कठीण असतं
मनावर कसा दगड ठेवावा लागतो
हे युगायुगांना शिकवण्यासाठी
त्याने केला त्याग, गर्भवती पत्नीचा
तेही डोळ्यात पाणी आणून
आपलेच हृदय कापून काढावे
अशा वेदना साहून
तो उत्तुंग होता
हो, तो राम होता
राजा असूनही त्याने प्रेम केले नावाड्यावर
१४ वर्षे वनवास सोसूनही
अन शक्य असूनही
त्याने शिक्षा केली नाही
कैकयीला वा मंथरेला,
तुझ्या आईमुळेच मी दु:ख भोगतोय
असे म्हटले नाही भरताला,
अन
कर्तव्य पाळताना दुर्लक्ष केले
पित्याच्याही अश्रूंना
तो तत्वांसाठी व्यक्तिवादी
करुणेसाठी विश्वव्यापी होता
तो तत्वमय होता
हो, तो राम होता
तो जगला नाही `रामा'साठी
म्हणून तो राम होता
शत्रूला वा विरोधकांनाच नव्हे
भक्तांना वा आप्तांनाही
समजायला, पेलायला अन जगायला
जड होता
तो नीलाकाश होता
हो, तो राम होता
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २८ सप्टेंबर २०१७

शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

उंबरे


अधीर लोचनात
मूक वाटा साठवून घेताना
काळाचे अनादी मूळ
उगवून येते
अन पसरू लागतात डहाळ्या
सांडू पाहणाऱ्या डोहात,
शिगोशिग भरलेल्या
प्राचीन जलाशयातून दिसणाऱ्या
अस्पष्ट धुरकट पायवाटा
देतात निमंत्रण
न थांबणाऱ्या प्रवासाचे,
पायातले उंबरे
स्वीकारू देत नाहीत निमंत्रण
अंतरातले उंबरे
सांडू देत नाहीत डोह,
आत मुळ्या पसरणारा कालवृक्ष
जखडून ठेवतो पावलांना
अन पायवाटांची निमंत्रणे
वादळ होऊन येतात
कालवृक्षाला उखडून टाकण्यासाठी,
उंबरे फक्त झिजत राहतात

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ८ डिसेंबर २०१५

सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

पळा पळा पळा

पळा पळा पळा
कोण पुढे पळे तो?
ही शर्यत सुमारपणाची,
ही शर्यत नावे ठेवण्याची,
ही शर्यत त्रास देण्याची,
ही शर्यत सूड घेण्याची;
ती तिकडे पाहिलीत-
ती आहे ढोंगीपणाची,
ती आहे खोटे बोलण्याची,
ती आहे बनवाबनवीची,
ती आहे `मी' गोंजारण्याची,
पळा पळा पळा
कोण पुढे पळे तो?
आणि ती पलीकडची ना-
ती फायदे लाटण्यासाठी,
ती कुटील कृत्यांसाठी,
ती कुत्सित हसण्यासाठी,
ती अद्दल घडवण्यासाठी,
आणि त्या बाजूची ती-
कोणाला तरी पाडण्यासाठी,
कोणाला कमी दाखवण्यासाठी,
कोणाला संपवून टाकण्यासाठी,
कोणाला गृहित धरण्यासाठी,
पळा पळा पळा
कोण पुढे पळे तो?
पळा पळा,
लवकर लवकर पळा
घाईघाईने पळा
शर्यत जिंकायचीच तुम्हाला
पहिले यायचे आहे ना?
बक्षीस पटकवायचे ना?
कौतुक हवे आहे ना?
पाठीवर थाप हवीय ना?
कोणी नाही दिली तर-
आपली आपण द्याल ना?
पळा पळा पळा
कोण पुढे पळे तो?
वेळ निघून जातेय
बाकीचे पुढे चाललेत
तुम्ही मागे पडताय
थकायचं नाही, भागायचं नाही
शर्यतीतून मागे हटायचं नाही
शर्यत आहे मोठी
होऊ नये खोटी
पळणे परिपाठी
म्हणून म्हणतो-
पळा पळा पळा
कोण पुढे पळे तो?


- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ४ सप्टेंबर २०१७

मंगळवार, ४ जुलै, २०१७

राहिली ना आता


राहिली ना आता
ओढ पावसाची
वाळवंटी मन
रमूनी जाई

पावसाच्या धारा
छळती अपार
परी तप्त वाळू
निववी जीवा
हिरव्याची जादू
कोणा मातब्बरी?
भुलवी जयासी
रखरखाट
मनाच्या भिंतीला
जेथे ओल येते
साचते शेवाळ
फसफसुनी
तयापरी बरे
कोरडे पाषाण
भ्रम नाही तेथ
उरला कैसा
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, 30 जून 2017

श्वास

श्वास
अंतरी बाहेरी
येतो जातो अखंडित
यासी जीवन हे नाव
श्वास
तुझा माझा
झाला एक जेव्हा
राहिलो ना मीच माझा
श्वास
अडला अडला
तुझ्या आठवांची माया
गळा दाटून हा आला
श्वास
आभाळ आभाळ
जसा चंदनाचा परिमळ
गाभाऱ्यात विठू सावळा सजला
श्वास
आभास आभास
वर्ख रूपे सोनियाचा
चैतन्याचा भाव झाकीला झाकीला
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २६ जून २०१७

सोमवार, ५ जून, २०१७

विनोदी मालिका

नित्याप्रमाणे मेसेज येऊ लागले
मोबाईलची घंटी किणकिणाट करून
सूचना देऊ लागली
एका महाराजांच्या
एका भक्ताचा संदेश आला-
तणाव टाळण्यासाठी
हसत खेळत देवाचे नाव घ्या...
मानसशास्त्राच्या हवाल्याने
एकाने पाठवले-
आरोग्यासाठी सतत हसत राहा...
मित्रत्वाच्या पांघरुणातून
सांगितले एकाने-
सदा हसणाराच हवाहवासा वाटतो...
थोड्या वेळाने
एक आगावू सल्ला आला-
तणावमुक्तीसाठी
विनोदी मालिका, चित्रपट पाहा...
सगळ्यांचा आशय एकच
जवळपास...
कोणती विनोदी मालिका
किंवा विनोदी चित्रपट पाहावा?
विचार करता करता
मला आठवण झाली
माझ्याच जीवनाची...

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ५ जून २०१७

शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

विलाप...


पक्षी उठतात पहाटेच
अन गातात सुस्वर
ते फुलांच्या जन्माचे
आनंदगाणे असते,
पक्षी खेळतात दिवसभर
त्या फुलांच्या संगतीने
बागडतात त्यांच्यावर
मधही पितात त्यातला,
संध्याकाळी पुन्हा
गाऊ लागतात पक्षी
पण ते सुस्वर नसते
ते फुलांना वाहिलेल्या
श्रद्धांजलीचे गाणे असते,
सकाळी जन्मलेली फुले
संध्याकाळी माना टाकतात
संध्याकाळ फुलांच्या
अंत्यसंस्काराची वेळ असते
संध्याकाळ कासाविशीची
वेळ असते
संध्याकाळ पक्ष्यांच्या
विलापाची वेळ असते...

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १३ एप्रिल २०१७

निष्कंप आठवांची


निष्कंप आठवांची
दारात भेट झाली
वाऱ्यात पश्चिमेच्या
चाहूल मंद झाली,
थोडी निशा उशाला
घेऊन सोबतीला
कोंदाटल्या मनाने
जळचंद्र निजला,
पाऱ्यात साठलेले
एकांत शांत झाले
वाटेत सावल्यांचे
डोळे भरून आले,
काळ्या छटा अनोख्या
शिल्पात स्वस्थतेने
गुंता तिच्या मनाचा
रेखून आज गेल्या,
आक्रोश पाखरांचे
नेत्रातूनी उडाले
रंगात गंधलेले
चैतन्य स्तब्ध झाले

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १४ एप्रिल २०१७

बुधवार, १२ एप्रिल, २०१७

कशाला सावरू?

मुक्या पावलांना
कशी आस लावू?
मुक्या आसवांना
कुठे वाट दाऊ?
मुक्या भासणाऱ्या
भेगाळ जखमा
सुक्या पर्णभारे
कशा आज झाकू?

मुक्या जाहलेल्या
शब्दार्त कविता
मुक्यानेच कैसा
कुणासी निवेदू?
मुक्या या जगाच्या
मुक्या जाणीवांना
सुक्या ओंजळीने
कुठे आज अर्पू?

मुक्या गोंधळाचा
कल्लोळ अवघा
मुक्या सागराला
कसा पोहोचवू?
मुक्या गोठलेल्या
अविराम लाटा
सुक्या साहिलांनी
कशाला सावरू?

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १२ एप्रिल २०१७

सोमवार, १० एप्रिल, २०१७

तो


एकदा तो
उभा राहिला आरशापुढे
त्याला दिसले
चिखलाने भरलेले कपडे
चिखलाने रांगोळी काढलेला चेहरा
असे काहीबाही...
त्याने आरसाच फोडून टाकला;
पुन्हा एकदा तो
राहिला उभा आरशापुढे
त्याला दिसले
वाहते नाक, चिपडलेले डोळे
अस्ताव्यस्त केस
इत्यादी इत्यादी...
त्याने पुन्हा आरसाच फोडून टाकला;
आता तो
आरशालाच घाबरतो म्हणे...

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ८ एप्रिल २०१७

सोमवार, २० मार्च, २०१७

अबोलीची फुले


खूप जपून
तोडावी लागतात
अबोलीची फुले
खूप दाटीवाटीने
फुलतात ती
छोटी छोटी असतात
पाकळ्या मिसळून जातात
एकमेकीत
देठ लपून असतं
कळ्यांच्या गुच्छात
पडद्याआड लपलेल्या
लहानशा गोंडस मुलीसारखं
सारं काही तिच्या मनातल्या
भावनांच्या गुंत्यासारखं
कितीही काळजी घेतली
कितीही हळुवारपणे खुडलं
तरीही एखादी पाकळी तुटतेच
कधीतरी
अन मग भोगावे लागतात
नियतीच्या चुकांचे शाप
अबोली होऊन

- श्रीपाद कोठे
नागपूर

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

रियाझ

काय सांगता?
गाणी म्हणता तुम्ही?
वा वा, फारच छान
कुठली गाणी म्हणता?
मी म्हणतो गाणी-
मैत्रीची, प्रेमाची, मानवतेची
सत्याची, सेवेची, देवत्वाची
आभाळाची, वसुंधरेची, अज्ञाताची
शांतीची, प्रसन्नतेची, गुढतेची
एकत्वाची, अखंडतेची, अद्वैताची
आत्म्याच्या अंतरात्म्याची
अनंततेची अद्भूत गाणी...
अरे व्वा, छान, छान
बरं एक सांगाल?
हो हो, विचारा ना...
तुम्ही विकलंय कधी स्वत:ला?
कधी चिरून तुकडे तुकडे केलेत स्वत:चे?
अन टाकलेत ते
भुकेल्या लांडग्या, कोल्हया, गिधाडांपुढे?
कधी पाजलंय रक्त स्वत:च स्वत:चं काढून
कुत्र्यांना, मांजरांना?
कधी बोलावलंय वाघा सिंहांना जेवायला
अन स्वत:च स्वत:ला रांधून वाढलंय त्यांना?
कधी लाथाडून घेतलंय आपणच पाळलेल्या
गाढवांकडून, बैलांकडून, हत्तींकडून?
अहो, काय बोलताय तुम्ही हे?
काय म्हणता?
नाही केलं असं काही कधी?
म्हणजे तुम्ही रियाझ करीत नाही म्हणायचं...

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १८ फेब्रुवारी २०१७

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

माणसे अशीही असतात


अंत्यसंस्काराच्या सामानाच्या दुकानाला
लागूनच असलेल्या
फळांच्या दुकानातून
त्याने घेतली केळीबिळी,
तिथेच बाजूला बसून
खाल्लीत सुद्धा ती फळे,
तो भिकारी नव्हता
माणसांचे वर्ग करणाऱ्या डोळ्यांना
सर्वसामान्य वाटावा असाच होता
पैसे देऊन त्याने घेतली होती फळे
भुकेने कासावीस झाला होता?
की,
जीवन, मरण असा भेद हरवलेला
वेडा? की, फरिश्ता?
-
-
-
माणसे अशीही असतात... ... ...
अंत्यसंस्काराच्या सामानाच्या दुकानाला
खेटूनच फळांचे दुकान लावतात
अन
तेथून फळे घेऊन खातात सुद्धा...

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ५ फेब्रुवारी २०१७

मंगळवार, २४ जानेवारी, २०१७

प्रतिसाद

मी सांगितल्या त्याला
कथा, कहाण्या, गोष्टी
खूप... खूप...
शेकड्यांनी
कधी देवादिकांच्या,
कधी माणसांच्या,
कधी पुराणातल्या,
कधी कादंबरीतल्या,
कधी सिनेमातल्या,
अनंत रंगांच्या, ढंगांच्या
असंख्य आकारांच्या, प्रकारांच्या
`साद आणि प्रतिसाद'
हाच विषय असलेल्या...
एक दिवस तो
साद घालू लागला मला
अनावरपणे, अनिवारपणे
अलवारपणे;
मी कुठलाच प्रतिसाद दिला नाही
...... कदाचित मी सगळ्या कथाकहाण्या
विसरून गेलो असेन...

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २४ जानेवारी २०१७

बुधवार, ११ जानेवारी, २०१७

आजची कविता तुझ्यासाठी, फक्त...


आजची कविता तुझ्यासाठी
तुला thank you म्हणावंसं वाटलं म्हणून
अगदी मनापासून thank you
खरं तर आजवर जाणवलंच नाही तुझं महत्व
त्यासाठी sorry सुद्धा हं...
कुठेही जातोस, कुठेही राहतोस,
कसाही राहतोस
जसं ठेवलं तसं
कुठलीही कुरकुर नाही
घाण नाही, कचरा नाही
काटे नाही, गोटे नाही
जाळी नाही, जळमट नाही
मी म्हणेल तिथे, अन माझ्यासाठी
... पण, फक्त माझ्यासाठीच असंही नाही
जो जवळ करेल त्याच्यासाठीही
माझ्यासाठी करतोस, वागतोस, राहतोस तसंच
सगळं जग झाडू म्हणतं तुला
मीही म्हणतो, म्हणेन सुद्धा
पण आतापासून
एक कोपरा राहील मनात
`तो झाडू घे' म्हणतानाही;
वास्तविक तुझी अन माझी कहाणी
सारखीच आहे
पण आज मी तुलनाही नाही करणार
कारण मला ठाऊक आहे
तू काकणभर सरसच आहेस माझ्याहून
त्याच्याहून किंवा तिच्याहून
म्हणून आज फक्त thank you
अगदी निखळ, शुद्ध, सोलीव
thank you.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ११ जानेवारी २०१६

रविवार, १ जानेवारी, २०१७

आर्जव


आयुष्याच्या या वळणावर
आज पेटवू एक निरांजन
आल्यागेल्या पांथस्थाला
अंधारातील ते आश्वासन


अष्टदिशांनी येतील जेव्हा
अवसेचे कृष्णदूत धावूनी
आर्त मनांनी इथे म्हणावी
आत्मशक्तीची सुरेल गाणी

अवचित आल्या कृष्णनभाला
आतून द्यावी इथेच हाक
आषाढाने बरसून जावे
आणि फिटावी आदितहान

आसुसलेल्या पाखरनयनी
आशा यावी इथे फुलोनी
आडोशाला वितळून जावी
आजवरीची निराश वाणी

अद्भुत काही इथे नको रे
अजाणताही इथे संपू दे
आयुष्याच्या या वळणावर
आत्मतृप्तीची बाग फुलू दे

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १ जानेवारी २०१७
(नवीन वर्षानिमित्त)