बुधवार, ३१ जुलै, २०१९

क्रिकेटच्या मैदानावर

क्रिकेटच्या मैदानावर
उतरतात दोन संघ माणसांचे
खेळतात
लढतात, स्पर्धा करतात
एकमेकांशी
जिंकतात, हरतात
भोगतात सुद्धा
जय किंवा पराजय
ठेवतात मनात जपून
आणि परततात...
क्रिकेटच्या मैदानावर
उतरतात दोन पक्षी
खेळतात, बागडतात
लढत वा स्पर्धा करत नाहीत
एकमेकांशी
जिंकत नाहीत, हरत नाहीत
भोगतात आनंद, जीवन
मनात जपत नाहीत
आणि परततात...

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ३१ जुलै २०१९

मंगळवार, ३० जुलै, २०१९

बाभळीची रानगाथा

चंदनासी काय ठावी
बाभळीची रानगाथा
काटे लेऊनिया अंगी
हसण्याची गूढ कथा...

माळरानी दुर्लक्षित
कसे असते जगणे?
सुरक्षेत वाढणाऱ्या
चंदनासी कसे कळे?...
नाही आकर्षण तरी
लोक येतात धावून
का ते? सांग बा चंदना
गंध बाजूला ठेवून...
माझ्या नशिबी जळणे
त्याचसाठी येती जन
दोन कुऱ्हाडीचे घाव
आणि मिळते जळण...
तूही जळतो प्रसंगी
पण तुझा भाव मोठा
जळतानाही लाभतो
समाधानी गारवठा...
तुझे झिजणे महान
माझे झुरणे लहान
मला काटे, तुला गंध
सांग कोणते कारण?...
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ३० जुलै २०१९

बुधवार, २४ जुलै, २०१९

चांदणवेळा !!

ती चांदणवेळा माझी
माझ्यात जागते तेव्हा
तुडुंब होऊन जाते
माझ्यात युगांची तृष्णा

ती अपूर्ववेळा जेव्हा
मांडते पसारा सारा
अंधार सांडूनी जाती
अंतरीच्या संध्याछाया
ती उत्कटवेळा येते
करात घेऊन काही
चराचरातील श्वास
त्यावेळी थांबून जाती
ती अद्भुतवेळा देते
तिच्या करातील सारे
घेताना गोठत जाती
कंठीचे प्राणपिसारे
ती वेळा भिनते ऐसी
मी होतो नभ तात्काळ
अणूरेणूतून माझ्या
घुमतो प्रणवाकार
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २४ जुलै २०१९

शनिवार, ६ जुलै, २०१९

मी कवी आहे !

नाही, घाई करू नका
नका काढू निष्कर्ष
मी दुखावतोय तुम्हाला
किंवा
मी करतोय अपमान तुमचा असा
मी फक्त सत्य बोलतो, सांगतो
एवढेच
किंवा असेही म्हणता येईल की,
मी नाही बोलत, सांगत
समाधानासाठी
तुमच्या किंवा माझ्या;
मी बोलतो किंवा सांगतो
माझ्या अथवा तुमच्या
अधिक पूर्णतेसाठी
माझ्या मतीप्रमाणे
एवढंच;
काय म्हणता?
प्रमाण हवंय
माझ्या प्रमाणिकतेचं?
एक सांगू?
मी कधी म्हटलंय
माझ्यावर विश्वास ठेवा
मी म्हणतो म्हणून?
की थांबवलंय प्रतिसाद देणं
तुमची साद दुर्लक्षित करून?
टाळलंय का कधी तुम्हाला?
की फिरवलंय तोंड
तुम्हाला पाहून?
कधी चुकवलीय नजर तुमची?
लक्षात ठेवा-
प्रामाणिकता नजर लपवत नाही...
पुन्हा सांगतो
मी अपमान करत नाही
मी दुखवत नाही
सांगतो, बोलतो सत्य फक्त
कारण मी
सूर्यगोत्री आहे,
सत्यव्रती आहे,
मी कवी आहे !
मी कवी आहे !!

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ६ जुलै २०१९

सोमवार, १ जुलै, २०१९

मृगजळ

मृगजळ खरंच असतं
मृगजळ म्हणून
मृगजळ असेस्तोवर,
घोस्ट इमेज खरीच असते
घोस्ट इमेज म्हणून
घोस्ट इमेज असेस्तोवर...

ओंजळ !!

ओंजळ असेल
तेवढंच घेता येतं
देणाऱ्याने कितीही दिलं तरी !
ओंजळ असेल
तेवढंच देता येतं
देण्याला कितीही असलं तरी !
ओंजळ भरली असेल तर
काही घेताही येत नाही
काही देताही येत नाही !
ओंजळ करावी लागते रिकामी
देण्यासाठीही
घेण्यासाठीही !
ओंजळीचा आकार
नाही करता येत कमी
नाही करता येत मोठा !
ओंजळ रीती करताना
असावा लागतो
ओंजळ स्वीकारणारा !
ओंजळ भरताना
असावा लागतो
ओंजळ भरणारा !
ओंजळ फक्त आपली
आकार; भरणे, रिक्त होणे
सगळं दुसऱ्या कुणाचं तरी !
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १९ जून २०१९

आता माझा मीच

फकिरीची माझ्या
असो मज आण
जगतीची जाण
काय करू?

उल्हास सुखाचा
दु:खाची वेदना
तुमची तुम्हाला
लखलाभ
देणार ते काय
काय घेऊ शके
जग हे तुमचे
मज सांगा
मनाचाच गुंता
मनाचे स्वातंत्र्य
सारेच निरर्थ
जाणतो मी
नको मज मृत्यू
नको ते जीवन
दोन्हीही एकच
आहे ठावे
स्वार्थाचाच खेळ
परमार्थी भूल
खोटी असे झूल
पाठीवर
अंधार, प्रकाश
सारेच तोकडे
पाय ते उघडे
चादरीत
शब्दांची कुसर
शब्दांचे मखर
शब्दांची पाखर
जावो लया
आता माझा मीच
हिरावेल कोण
जगतीची काय
बिशाद ती !
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २१ जून २०१९

फुलती लिली !!

कालपर्यंत कळीही नव्हती
अन सकाळी सकाळी जादू झाली
लिलीच्या हिरव्यागार पानातून
काही गुलाबी कळ्या
मान उंचावून पाहत होत्या
टूकुटूकु उत्सुकतेने
वर्षाराणी हसत होती
गालातल्या गालात
माळी उभा होता
बाजूला शांतपणे
लिलीच्या कळ्या
फुलण्याच्या तयारीत होत्या
पण चेहरा मात्र उतरलेला...
त्यांना आठवत होता संवाद
चार महिन्यांपूर्वी
वर्षाराणीशी झालेला...
लिली म्हणाली होती वर्षाराणीला-
'नको करुस तोरा,
मी ठेवते जपून स्वतःला
त्या ग्रीष्माच्या उन्हातही
धरून ठेवते माझी मूळं
माझे कष्ट, माझी सहनशीलता
फुलून येते मृगाच्या सरींनी;
फुलण्याचं स्वप्न माझं
जपते मी असोशीने
अन लावते जीवाची बाजीसुद्धा
म्हणून येते अंगांगी फुलून;
तू नको सांगूस तुझा तोरा'
वर्षा राणी फक्त हसली होती तेव्हा...
यावेळी उशीर केला तिने येण्यासाठी
सगळेच तळमळत होते
अन लिलीही !
अखेर ती आली
थबकली फुललेल्या लिलीजवळ
अन म्हणाली हळूच तिच्या कानात -
'मी आल्याशिवाय नाहीच फुलू शकत तू
कितीही धरून ठेव मुळांना
कितीही धरून ठेव फुलेच्छा
कितीही उपस कष्ट
कितीही कर सहन
कितीही कर प्रयत्न
मी साद घातल्याशिवाय
नाही येत तुला फुलता...
अन ही तुझी मुळं आहेत ना
तीही राहतात जिवंत
या माळ्यामुळे
याने भर ग्रीष्मात
स्वतः घामाघूम होऊन
न चुकता घातलेल्या पाण्यामुळे...
रागावू नकोस
माझ्याही मनात नाही राग
पण एकच सांगते बाय माझे
फुलण्याचं कौतुक होतं
म्हणून माजू नकोस...
कोणतंच फुलणं
आपलं आपलं नसतं,
कोणतंच फुलणं
स्वतः स्वतःचं नसतं,
कधीच!!'
फुलती लिली ऐकत होती
खाली मान घालून...

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २३ जून २०१९

खोटी कविता खरी होताना...

हे जग खूप सुंदर आहे,
हे जग खूप कुरूप आहे;
हे जग खूप चांगलं आहे,
हे जग खूप वाईट आहे;
हे जग म्हणजे स्वर्ग जणू,
हे जग म्हणजे निव्वळ नरक;
सगळी माणसं चांगलीच असतात,
माणूस चांगला असणं शक्यच नाही;
प्रयत्नाला काहीही असाध्य नाही,
प्रयत्नाने काहीच साध्य होत नाही;
जीवनात चढउतार येतच असतात,
जीवनात काहीही घडत नसतं;
प्रकाश हेच जीवनाचं वास्तव,
अंधार हेच वास्तविक जीवन;
षड्रिपु सुटता सुटत नाहीत,
ठरवलं की क्षणात षड्रिपु सुटतात;
जीवन म्हणजे मौजमजा करणे,
जीवन ही गांभीर्याने घेण्याची बाब;
जीवन म्हणजे निरर्थकता,
अर्थपूर्णता म्हणजेच जीवन;
काय खरं, काय खोटं?
चक्रव्यूह प्रश्नांचा...
***************
'तुझी कविता छान आहे
पण खोटी आहे...'
ज्येष्ठ कवीने सांगितले
नवोदित पुरस्कारप्राप्त कवीला...
'खरी करायला काय करू?'
नवोदिताने विचारले...
प्रत्येक ओळीच्या शेवटी
'कोणाकोणासाठी, कधीकधी'
एवढं फक्त जोड !!

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २४ जून २०१९