गुरुवार, २८ मार्च, २०१९

आत्मवेडा

मोगरा वेडा आहे
ठार वेडा...
त्याला कळतच नाही
अन सांगून समजतही नाही
की-
त्याचं फुलणं पाहायला
त्याच्या फुलांचं कौतुक करायला
त्याच्या बहराचा सुवास
श्वासात भरून घ्यायला
कोणीही नाही,
तो आपला बहरत राहतो
गळत राहतो
कोणी सापडलाच तावडीत
तर वाटतो त्याला
आपले सुवासिक गूज
मुक्त हस्ताने
कोणी ते स्वीकारतो की झिडकारतो
याकडे लक्षही न देता...
मोगरा वेडा आहे
ठार वेडा...
त्याला नाही समजत
मान अपमान,
त्याला नाही समजत
उपयोगीतेचे तत्त्व,
त्याला नाही समजत
लाभ हानी,
त्याला नाही समजत
ढवळून टाकणारी उदासी,
त्याला नाही समजत
किंमत त्याच्या सुवासाची,
त्याला नाही समजत
महत्व त्याच्या ग्रीष्मसोशीचं,
त्याला खरं तर
काहीच समजत नाही
त्याच्या भोवतीच्या जगातलं,
मोगरा वेडा आहे
ठार वेडा...
आत्ममग्न बहराचे
आत्मस्थ अनुसंधान
आत्मीयतेने भोगणारा
आत्मग्लानी ठाऊक नसलेला...
मोगरा-
आत्मवेडा आहे... आत्मवेडा !!

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २८ मार्च २०१९

२ टिप्पण्या: