रविवार, २७ डिसेंबर, २०१५

तो


तो फुलेबिले तोडतो,
पाणी घालतो झाडांना,
काढतो पिवळी पाने वगैरे,
थोडी साफसफाई करतो,
तेव्हा चिकटतात
काही पाने, फुले, काड्या
कधी थोडी जळमटेही,
त्याच्या हातापायांना, केसांना
कपड्यांना, चपलांना,
अन मागे लागतात त्याच्या
आम्हालाही यायचंय म्हणून,
तोही फिरतो त्यांना बरोबर घेऊन;
अन लोक त्याला सांगतात-
तुला हे चिकटलंय,
तुला ते चिकटलंय,
... त्यांना कोण सांगणार
तो त्या पानाफुलांच्या,
काड्यांच्या
अन जळमटांच्या सोबत
फिरायला निघालाय ते...


- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २७ डिसेंबर २०१५

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०१५

निराकाश

उजेडाचा हात हाती घेऊन
पुळणीतून चालताना
थबकलो अवचित
गुणगुणू लागलो
अविनाशी यक्षगाणी
उदासीन आनंदाची,
तिथेच बसलो वाळूत
मागून घेतले उजेडाला
थोडेसे आदिताल
अभयांकित आकाशासाठी,
आदिताल हाती देऊन
ज्योती विलीन झाल्या
अंधारात अंधारासाठी,
अंधाराच्या शिडीवरून मीही चढलो
आकाशाला खेव देण्यासाठी
आदितालाची आवर्तने करीत करीत
भेटलो आकाशाला
नाचलो, बागडलो
अन आदिताल आकाशाला सोपवून
मी निराकाश झालो
माझ्यातून माझ्यासाठी...

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ११ नोव्हेंबर २०१५

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०१५

`अकाल'

अमृताचा वसा घेऊन
अखंड चालतोय
अनादि काळापासून
आपल्यालाच विसरून,
अदमास घेतोय
आसुसल्या श्रुतींनी
अधीरल्या नेत्रांनी
आवेगल्या पावलांनी,
आत उसळणाऱ्या लाटांना
ओंजळीत कोंबू पाहतो
अजाणपणाने,
अवस असो वा पुनव
आपल्याच नादात हरवून
`अकाल' होऊ पाहतो

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ६ ऑक्टोबर २०१५

शुक्रवार, २६ जून, २०१५

सखे,

सखे,
--- --- --- --- ---
--- --- --- --- ---
--- --- --- --- ---
--- --- --- --- ---
--- --- --- --- ---
--- --- --- --- ---
--- --- --- --- ---
सखे गं !!
--- --- --- --- ---


- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २६ जून २०१५

मंगळवार, २६ मे, २०१५

सखे...

सखे,
दु:ख गोड असतं?
दु:ख सुंदर असतं?
दु:ख हवंसं असतं?
तुला काय वाटतं?
मला वाटतं, हो-
दु:ख- गोड, सुंदर, हवंसं असतं...
गडद संध्याकाळी
मारवा ऐकतो ना आपण
तेव्हा कळतं हे...
हरवलेल्या पंचमाला शोधत
सगळे स्वर फिरत असतात
जीवाच्या आकांताने
आणि पंचम मात्र नाहीच सापडत
जणू तंबूचा मधला खांब
असल्यासारखा पंचम
नसतो हाताशी, अन
तरीही साधायचा असतो तोल
उतरायचं असतं समेवर
...
...
...
जसा दर संध्याकाळी
मी उतरतो ज्ञात अज्ञाताच्या धरेवर
तोल सांभाळत, तुझ्याशिवाय...
...
...
...
प्रत्येकाचा एकेक पंचम असतोच ना,
कुणाला पिळवटून टाकणारा
मारवा गात
शोधावा लागतो आपला पंचम;
पण तेव्हाच कळतं
दु:खही- गोड, सुंदर, हवंसं असतं...

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २६ मे २०१५

मंगळवार, १९ मे, २०१५

बा लेकरा...

छे, काय उन आहे की काय?
कुठे दुकानही दिसत नाही
अन पाणपोईही
दोन घोट पाणी कोणाला मागावं
तर, सारी दारेखिडक्याही बंद
ठीकच आहे म्हणा
आपल्याला उन आहे
तसे लोकांनाही आहेच ना !!
बरं झालं पण,
हे वडाचं झाड तरी सापडलं रस्त्यात
थोडी सावली तरी सापडली
श्वास घ्यायला
दोन क्षणांची उसंत मिळाली...
@@@@@@@@@@@@
बा वडा...
तुला नाही का रे उन लागत?
अरे लेकरा काय सांगू?
मी ना ए.सी., कुलरमध्ये राहू शकत
तुमच्यासारखा,
ना छत्री धरू शकत, ना रुमाल बांधू शकत
मी तसं केलं तर
तुमच्यासारख्यांना कोण रे सावली देईल?
पण का तापतोस असा आमच्यासाठी?
अरे तेच काम दिलंय मला...
कोणी?
ज्याने जन्माला घातलंय तुला मला...
त्याला जाब का नाही विचारत पण
का असं तापत उभं केलंय म्हणून?
राग नाही येत तुला त्याचा...
कसं आहे लेकरा,
म्हटलं तर राग,
म्हटलं तर तृप्ती-
त्याचा थोडासा भार
घ्यायला मिळाला याची...
थोड्याच दिवसांनी तुला मला
हव्याहव्याशा जलधारा बरसवण्यासाठी
तो कुठे कसा किती
तापत असेल कोणाला ठाऊक?
आपणंच बसवलेलं नाटक आहे ना हे?
विसरलास?
तू, मी, तो...
फक्त भूमिका सतत बदलणाऱ्या,
कधी तू माझ्या जागी,
कधी मी तुझ्या जागी,
कधी तो आपल्या जागी,
कधी आपण त्याच्या जागी,
बस, असंच आणि एवढंच !!!

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १९ मे २०१५

रविवार, १७ मे, २०१५

सखे,

सखे,
बोगनवेल पाहिलीय ना तू?
मला आवडते खूप...
वेलीसारखी नसून आणि
झुडुपासारखी असूनही
बोगनवेल का?
हा प्रश्न मात्र मला सुटलेला नाही...
लाल, पिवळी, केशरी, पांढरी
गुलाबी, जांभळी... तिची फुलं,
दाट, भरगच्च, सुंदर, गुच्छेदार;
पाहिल्याबरोबर प्रसन्न वाटतं,
बोगनवेल फक्त आल्हादच वाटते...
तिची ही सुंदर फुलं मात्र
कोणी केसात माळीत नाही,
कोणी देवाला वाहत नाही,
कोणी शवावरही वाहत नाही,
की फुलदाणीत ठेवत नाहीत,
ना हारात वापरतात, ना रांगोळीत
कोटालाही लावत नाहीत,
तिची अन तिच्या फुलांची जागा
कुंपण किंवा फारच झाल्यास घराची भिंत,
तरीही फुलत राहते ती असोशीने...
का? ठाऊक नाही...
कधी कधी मी बाजूने जात असलो की,
सांगते ती कानात हळूच-
नको विचारत जाऊस प्रश्न,
कशाचं स्पष्टीकरण देऊ नकोस,
कशाचं स्पष्टीकरण घेऊ नकोस,
कशाचं स्पष्टीकरण मागू नकोस,
कशालाही काही कारण नसतंच मुळी
ना फुलण्याला, ना कोमेजण्याला
कशाचंही काही प्रयोजन नसतंच मुळी
ना फुलण्याचं, ना कोमेजण्याचं
फुलणं किंवा कोमेजणं - फक्त असतं,
फक्त असतं...

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १८ मे २०१५

शुक्रवार, १५ मे, २०१५

मौनात सोहोळे, लावण्याचे...

पावसाच्या सरी
आल्या माझ्या दारी
उन्हाचे घरटे
ठेवू कुठे...

सुखाची टोपली
अंगणी सांडली
लगबग झाली
वेचण्याची...

अंधारून आले
दिवसा उजेडी
परी मनामध्ये
उजाडले...

आभाळाचे पाणी
डोळ्यातून सांडे
मौनात सोहोळे
लावण्याचे...

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १५ मे २०१५

बुधवार, ६ मे, २०१५

हो, मला अपमान करायचा आहे...

अपमान करणं चांगलं नाही
हे मलाही मान्य आहे
आणि तरीही
मला अपमान करायचा आहे,
तो मी करतो आहे...
पैसा, नाव आणि प्रसिद्धीच्या
माजाचा अपमान,
दुसऱ्याला तुच्छ लेखण्याचा अपमान,
संवेदनहीनतेचा अपमान,
सगळ्या गोष्टींकडे पाहून
न पाहिल्यासारखं करणाऱ्या
वृत्तीचा अपमान,
`चलता है' म्हणणाऱ्यांचा अपमान,
विष्ठा वाट्याला आली तरीही
शांतपणे खावी असे सुचवणाऱ्या
शांतीदूतांचा अपमान,
संतत्वाच्या नावाखाली
षंढत्व खपवणाऱ्यांचा अपमान,
चीड अथवा राग येण्यासाठी
नातं विचारणाऱ्या मुर्दाडांचा अपमान,
जगातील सगळ्या गोष्टी
आपण दात काढावे यासाठीच असल्याचा
समज असणाऱ्यांचा अपमान,
या जगात अपयश आणि दुबळेपणाही असतो
आणि त्यासाठी केवळ संबंधित व्यक्तीच
जबाबदार नसते, हे मान्य करण्यास
नकार देणाऱ्या उथळपणाचा अपमान,
जीला खरे तर
लक्षावधी डोळे असायला हवेत
तरीही स्वत:च्या अंधत्वाचा
अपार गर्व बाळगते त्या
न्यायव्यवस्थेचा अपमान,
मान अपमान यातच धन्यता मानणाऱ्या
मानसिकतेचा अपमान,
न्याय अन्याय आणि माणुसकी
यापेक्षा कोट्यवधी रुपयांचे व्यवहार
आणि डोळ्यातील अश्रू
यांनाच महत्व देणाऱ्या विचारांचा अपमान,
`आपले' म्हणून
कशाच्याही पाठीशी उभे राहणाऱ्या
उद्धटपणाचा अपमान,
समाजसेवेच्या नावाखाली
स्वत:च्या पापाचा व्यापार करणाऱ्या
हलकटांचा अपमान,
ज्यांना खरे तर मानच देऊ नये
अशा सगळ्या गोष्टींचा अपमान...

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, ७ मे २०१५

(एकीकडे नि:शुल्क पाणपोई उभारून दुसरीकडे धान्यात खडे मिसळणारा व्यापारी आणि समाजसेवेचा बुरखा घेणारा सलमान यात काडीचाही फरक नाही.)
(आजकाल सोशल मिडियावरील लिखाणाचीही कधीकधी दखल घेतली जाते आणि कारवाई केली जाते. माझ्या या लिखाणाची दखल घेतल्या गेली आणि त्यासाठी मला सजा वगैरे मिळाली तरीही हरकत नाही; मात्र मी माझ्या भावना व विचार यांच्यावर ठाम आहे.)

सोमवार, २७ एप्रिल, २०१५

???


तो म्हणाला-
जा, मोकळं केलं तुला,
तू कुठेही जाऊ शकतोस आता...
वारा खदखदा हसला,
जाताना म्हणाला-
तू मला धरू तरी शकतोस का?

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २७ एप्रिल २०१५

शुक्रवार, १७ एप्रिल, २०१५

उतार चढाव

हा म्हणाला-
एवढा चढाव चढायचा आहे,
तो म्हणाला-
एवढा उतार उतरायचा आहे,
कुणीतरी म्हणालं-
इथे ना चढाव आहे, ना उतार आहे,
इथे फक्त रस्ता आहे,
हा बोलला-
रस्त्याच्या पायथ्याजवळून,
तो बोलला-
रस्त्याच्या वरच्या टोकावरून,
कुणीतरी बोललं-
रस्त्याच्या कडेने...
******************************
अस्तित्वात फक्त रस्ता आहे
चढाव आणि उतार
वेगवेगळ्या ठिकाणी
वेगवेगळ्या मनात आहे...
********************************
हा वर गेला की,
चढावाचा उतार होणार आहे,
तो खाली आला की,
उताराचा चढाव होणार आहे

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १८ एप्रिल, २०१५

अव्यक्ताचा डंख

मी मुक्यामुक्याने जेव्हा
आकाशी फिरण्या गेलो
जळात लपला पक्षी
हळूच पाहून आलो

मला पाहुनी हसला
ये ये म्हणुनी वदला
परंतु जाता जवळी
डोळे मिटुनी बसला

मी दिले सोडूनी मौन
पुसिले त्यासी कुशल
तो फक्त हालला आणि
झटकले थोडे पंख

मी शांत पुन्हा मौनात
बसला तोही निवांत
सांगत होतो तरीही
युगायुगातील गुज

निघण्यासाठी वळलो
तसे पसरले पंख
अज्ञातातून आलेला
जैसा अव्यक्ताचा डंख

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १७ एप्रिल २०१५

गुरुवार, १६ एप्रिल, २०१५

वेडी लिली

लिली वेडी आहे...
चार दिवस
पाऊस काय पडला
फुलून आली लगेच,
तिला नाही माहीत
हा पावसाळा नाही हे-
मीही नाही सांगणार
पण कळेल तिला
तेव्हा वाईट वाटेल,
निसर्गाने,
असे असायला नको ना !!

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १७ एप्रिल २०१५

मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०१५

करुणेचा डोंगर

अंधाराच्या सावल्यातून हिंडताना
सुगंधी वारा स्पर्श करून गेला
अन, जाता जाता
कानात सांगून गेला-
माझ्या मागोमाग ये,
आज्ञाच जणू,
चालू लागलो
एखाद्या गुलामासारखा
निमूटपणे,
दिवस, महिने, वर्ष...
अन अचानक चढ लागला;
डोळ्यांचे कार्य
बंद झाले असले तरीही
पावलांच्या वेदना
अन संवेदना शाबूत होत्या तर,
वाऱ्याला पुसले- कसला चढ?
तो कुजबुजला- शांत राहा,
निमूटपणे चढत राहिलो,
कधीतरी पुन्हा वारा कुजबुजला-
थांब आणि बस या बाजूला,
तोही टेकला शेजारी,
काळ कधीचाच पडला होता मागे,
दीर्घ निवांतानंतर
पडू लागले काही आवाज कानी
छिन्नी हातोड्यासारखे
कधी वेगात, कधी संथ
कधी जोरात, कधी मंद
पुन्हा पसरली शांतता
अन वारा कुजबुजला-
आपण करुणेच्या डोंगरावर आहोत,
आता गंमत दिसेल;
अधीर डोळे
पाहणं विसरलेले,
पाहू लागले भिरभिर...
सावकाश शब्दानेही लाजावे
एवढ्या हळूहळू
प्रकाशाने स्पर्श केला डोळ्यांना
अन विस्फारितपणे पाहू लागले ते
युगांच्या अंधाराला चिरून टाकीत,
डोंगरात कोरलेली अद्भुत शिल्पाकृती
कधीही न पाहिलेली, न देखलेली...
मी वाऱ्याकडे पाहिले
त्याला कळले माझे भाव
तो एकच शब्द बोलला-
`ईश्वर'... ... ... ...
आवंढा गिळून मी विचारले-
खोदणारे शिल्पकार कुठे गेलेत?
कानात गुणगुणत गुणगुणत
न बोलता वारा निघून गेला... ...

- श्रीपाद कोठे
नागपूर,
मंगळवार, ३ फेब्रुवारी २०१५

बुधवार, ७ जानेवारी, २०१५

सखे,

कधी कुठे पडतो
कानी सूर, एखादा;
कधी पडते दृष्टीस
रंगरेषांची संगती;
कधी एखादा शब्द
घुसतो मनात;
कधी एखादा स्पर्श
न स्पर्शल्यासारखा;
कधी दाटतो गंध
अज्ञातातून आलेला;
कधी नसते
बाहेरचे काहीही
उत्तेजित करणारे;
तरीही मी होतो कापूर
न दिसता, विरळ होत जाणारा...
जसे आपले डोळे
तुझे नि माझे डोळे
गमावतात अस्तित्व स्वत:चे
आंब्याच्या तळाशी
तलावाच्या काठाशी
नदीच्या तीरावर
समुद्राच्या पुळणीत,
माझे डोळे वितळतात
तुझ्या डोळ्यात
तुझे डोळे वितळतात
माझ्या डोळ्यात...
ना मी, ना तू- अशी
मी-तू पणाची बोळवण,
या महान मानवाने
अजूनही नाही शोधलेला शब्द
या मी-तू पणाच्या बोळवणीला;
अशीच होते अवस्था
कधी अकारण
कधी सकारण
मी होऊ लागतो कापूर
अन,
कधी पापण्या ओलावतात
कधी वाहू लागतात डोळे
अखंड, अहर्निश...
हा मर्यादा मागे टाकल्याचा शोकावेग
की, अमर्याद झाल्याचा आनंदातिरेक
काही कळत नाही,
कुणाला सांगू हे तुझ्याशिवाय?

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ७ जानेवारी २०१४