शुक्रवार, १ जानेवारी, २०२१

बाऊल

तो क्षण...
अद्भुत?
मंतरलेला?
दैवी?
जो कुठला असेल
होता मात्र तेजाळ !
तू धरलेस छातीशी
अन मनाची संतूर
एकतारी होऊन गेली...
ती एकच तारदेखील
नाही आधीच्या संतूरची,
ती आहे
तुझ्या अमृत स्पर्शाने
उमलून आलेली तार,
बसवलीस ताणून माझ्या मनावर...
अन मी हिंडतोय-
रानावनातून
दगडधोंड्यातून
कडेकपारीतून
राजरस्त्यावरून
कधी महावस्त्र पांघरून
कधी चिंध्या गुंडाळून
त्या साऱ्यापासून अस्पर्शीत
बेदखल झालेला !
तुझ्या अनाम स्पर्शातून
हाती आलेली एकतारी घेऊन,
त्या तारेतून स्रवणाऱ्या
तुझ्या चाहुलीला पांघरून घेऊन
भास आभासांच्या
धुम्र वलयातून
तुझाच अनाम छंद आळवीत
तुझाच बाऊल होऊन...
अनाम
अनिकेत
अनिर्बंध
आनंदमय अस्तित्व होऊन
तुझ्या अनाम स्पर्शाच्या ओढीने
तुलाच आळवीत...

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २३ डिसेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा