फिरतात काटे
शोधण्या आरंभ
आणिक शेवट
घड्याळीचा...
किती काळ झाला
गोल गोल गोल
अखंड फिरणे
संपेची ना...
कुठे गेले टोक
जेथून प्रारंभ
कसे शोधायचे
कळेची ना...
नाही सुरुवात
कोठला शेवट
शोध शोध शोध
थांबेची ना...
तीन, सहा, नऊ
नंतर ते बारा
पुन्हा पुन्हा पुन्हा
तेच तेच...
काळाचे घड्याळ
काटे अगणित
नावे त्यांची खूप
ठेवतात...
सुख सुख सुख
विज्ञान विज्ञान
कोणी तत्वज्ञान
म्हणतात...
नातीगोती ज्ञाती
भावना, सोबती
चऱ्हाट दळती
काटे सारे...
नाही सापडत
शेवट कशाचा
सुरुवात तीही
अज्ञातच...
थकतात काटे
कधी चिडतात
थकुनिया कधी
थांबतात...
पाही धडपड
दुरून तो काळ
काट्यांना हसतो
मनामध्ये...
- श्रीपाद कोठे
सोमवार, २८ डिसेंबर २०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा