शुक्रवार, १ जानेवारी, २०२१
अनोळखी !
कविता
अस्तित्वाच्या
संध्याकाळ
बाऊल
फिरतात काटे
सहस्रकाच्या प्रारंभी
३१ डिसेंबर २००० - एका सहस्रकाचा अखेरचा दिवस. १ जानेवारी २००१ - एका सहस्रकाचा पहिला दिवस. हे दोन्ही दिवस कन्याकुमारीला घालवावेत म्हणून खूप पूर्वतयारी केली होती. ठरल्याप्रमाणे ३० डिसेंबर २००० ला कन्याकुमारीला पोहोचलो. परंतु मी पाठवलेला धनाकर्ष व पत्र व्यवस्थापकांना मिळालेच नव्हते. कालबंधनात अडकलेला, आपला कालसापेक्ष आनंद, त्या कालातीत श्रीचरणांशी बसून लुटता यावा; या आंतरिक इच्छेला व्यवहाराची अशी ठोकर बसली. पण कन्याकुमारी सोडताना एक जाणवलं की, जे झालं ते योग्यच झालं.
निवासाचं आरक्षण झालं नव्हतं. गर्दीही भरपूर होती. हो-ना करता करता व्यवस्थापकांनी तीन जण राहू शकतील अशा खोलीत माझी व्यवस्था केली. खोलीत तीन बिछाने व तीन कपाटे. प्रत्येकाची स्वतंत्र, वेगळी. खोलीत गेलो तर ती रिकामी होती. सायंकाळी समुद्रावर फिरायला गेलो. त्यावेळी `तो' कोणासोबत तरी फिरताना दिसला. त्याचं नावगाव ठाऊक नव्हतं, पण लक्ष वेधून घ्यावं असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. सहा फुटापेक्षा काकणभर अधिकच उंची. डोक्यावर विरळ तांबूस केस. विदेशी लालगोरा रंग. जीन्स व टी शर्ट घातलेला. आणि समोरून जाणाऱ्या येणाऱ्याकडे पाहून स्वागताचं स्मित करणारा !!! त्या सायंकाळची त्याची मूर्ती लक्षात राहिली.
भरपूर भटकून, जेवून वगैरे रात्री उशिराच खोलीवर गेलो. बाजूच्या दोन्ही बिछान्यांवर कोणीतरी ढाराढूर झोपी गेले होते. सकाळी उठलो तेव्हा दोन्ही बिछान्यांवर कोणीही नव्हते. लगबग करीत सूर्योदय पाहायला समुद्रावर गेलो. सूर्योदयाचा आनंद घेऊन परतू लागलो तेव्हा तो पुन्हा दिसला. तेच स्वागतशील हास्य ओठांवर खेळत होते. आज मात्र तो एकटाच होता. खोलीवर परतलो. आंघोळ वगैरे आटोपली आणि श्रीपादशिलेवर गेलो. दुपारी जगदंबा कन्याकुमारीचं दर्शन घेतलं. जेवलो, गावात भटकलो. संध्याकाळी खोलीवर परतलो तर धक्काच बसला. कालपासून दोनदा भेटलेला तो विदेशी पाहुणा माझ्याच खोलीत राहायला असल्याचे दिसले. तो थोडासा हसला व लगेच बाहेर पडला. त्याच्याशी ओळख करून घेण्याचे राहूनच गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र चांगला योग आला. कन्याकुमारीला विवेकानंद केंद्राच्या परिसरात सकाळी, आजूबाजूच्या गावातील बाया दही, दुध, ताक विकायला येतात. हा पाहुणा बाहेरच्या पडवीत एका दहीवालीशी बोलत होता. ग्रामीण तामिळ भाषेपलीकडे झेप नसलेली ती माउली व त्या भाषेचा गंधही नसलेला हा पाहुणा यांचा संवाद व व्यवहार पाहण्यासारखाच होता. त्याने दही घेतले होते. मीही त्याच्याजवळ गेलो. मी ताक घेतले. तो हसला. अन दही ताक प्राशनासोबतच आम्हा दोघातील संवादाची सुरुवात झाली. दीड दिवसापासून मनात रेंगाळणाऱ्या या पाहुण्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता मूर्त रूप घेऊ लागली. हा पाहुणा केवळ विदेशी आहे एवढेच त्याचे वेगळेपण नाही, हे एव्हाना लक्षात आले होतेच. तो इतर विदेशी पाहुण्यांसारखाही नव्हता. तो निवांत होता. इथल्या छोट्यामोठ्या गोष्टींशी समरस व्हायचा त्याचा प्रयत्न होता. त्याला सारं जाणून घ्यायचं होतं. oh, marvelous, wonderful अशा शेलक्या प्रतिक्रियांपुरता तो मर्यादित नव्हता. त्याला इथली माणसं, इथलं वातावरण, इथलं जीवन, तऱ्हा, रीती यांच्यातला अशरीरी आनंद त्याच पद्धतीने अनुभवायचा होता.
`तो' एक जर्मन नाट्य दिग्दर्शक होता. २-३ दिवसांपासून कन्याकुमारीत राहत होता. अन आणखीन २-३ दिवस राहणार होता. कन्याकुमारी पाहणं तर एका दिवसात होतं. त्याला ती अनुभवायची होती. आदल्या, म्हणजे ३१ डिसेंबरच्या रात्री, तेथे फिरायला आलेले पर्यटक गाणीबजावणी करीत होते तेव्हा, हा मात्र गाढ झोपला होता. त्याला त्याबद्दल छेडले तेव्हा मंदमंद हसत तो एवढंच म्हणाला- `मला हे आवडत नाही.' नंतरचे दोन दिवस आम्ही एकत्र खूप हिंडलो, गप्पा मारल्या. त्यातून एक वेगळा माणूस मला भेटला.
संध्याकाळी दोघेही फिरायला एकत्रच बाहेर पडलो. अचानक पावसाची एक सर आली. विवेकानंदपूरमच्या आवारात विवेकानंद केंद्राची माहिती देणारी एक प्रदर्शनी आहे. तेथे आडोशाला गेलो. मग दोघांनी मिळून ती प्रदर्शनी पाहिली. गप्पाही सुरूच होत्या. त्यातून कळलं की, त्याने वयाच्या १७ व्या- १८ व्या वर्षीच रामकृष्ण- विवेकानंद वाचले होते. त्याच्यावर खूप खोलवर परिणाम करून गेलेला श्रीरामकृष्णांच्या जीवनातील एक प्रसंग त्याने सांगितला. तो प्रसंग असा-
`श्रीरामकृष्णांना भेटायला, शंकासमाधान करून घ्यायला, त्यांचं मार्गदर्शन घ्यायला, त्यांच्याशी चर्चा करायला कोलकाता शहरातील खूप लोक रोज येत असत. एक दिवस एक प्राध्यापक महाशय आले आणि त्यांनी श्रीरामकृष्णांना खूप प्रश्न विचारले. परमेश्वर, त्याचं अस्तित्व वगैरेबद्दल ते प्रश्न होते. प्रश्न ऐकता ऐकताच श्रीरामकृष्णांची भावसमाधी लागली. ते आनंदाने नाचूगाऊ लागले. त्यातच त्यांचं बाह्य जगाचं ज्ञान नाहीसं झालं. त्यानंतर काही वेळाने ते हळूहळू पूर्ववत झाले. त्यावेळी प्राध्यापक महोदयांनी त्यांना पुन्हा विचारलं- माझ्या प्रश्नाचं उत्तर तर आपण दिलंच नाहीत. त्यावर श्रीरामकृष्ण म्हणाले- उत्तर तर मी दिलं. तुला ते समजलं नाही. प्राध्यापक आश्चर्यचकित झाले. त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. त्यावर श्रीरामकृष्ण म्हणाले- अरे, काय तुझी विलक्षण बुद्धिमत्ता? तुझी तर्कबुद्धी, तो बुद्धीचा विलास. ही सारी बुद्धी कुठून आली रे? श्रीरामकृष्णांचा अभिप्राय स्पष्ट होता. मानवी बुद्धीला अगम्य अशा ईश्वरी शक्तीचीच ती देणगी होती. प्राध्यापक मजकुरांचे समाधान झाले होते.
हा सारा प्रसंग सांगताना, तो जर्मन नाट्यदिग्दर्शक जणू काही तो प्रसंग प्रत्यक्ष अनुभवत होता. इतका तो त्या प्रसंगाशी, त्यातील पात्रांशी, त्यांच्या विचारांशी, भावांशी एकरूप झालेला होता. समरस होण्याचा त्याचा हा स्वभाव नंतरही अनुभवाला आला. कन्याकुमारीत चोल राजांनी बांधलेलं हजार-बाराशे वर्षांच पुरातन शिवमंदिर आहे. दुसऱ्या दिवशी तोच मला तिथे घेऊन गेला. अतिशय शांत, लोभसवाणा परिसर असलेलं, आध्यात्मिक आनंदाची अनुभूती देणारं ते मंदिर !! त्या मंदिरात दर सोमवारी दरिद्रीनारायणांसाठी भोजनाचं आयोजन असतं. हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने चक्क दरिद्रीनारायणांच्या पंगतीला बसून तिथे भोजन केलं होतं.
याच मंदिरात भगवे कपडे घातलेला, पण विदेशी गोऱ्या रंगाचा व चेहेरेपट्टीचा एक तरुण दिसला. एका मोठ्या पडवीत दूर कोपऱ्यात एक वळकटी. त्याच्या शेजारी बसून तो कुठलासा ग्रंथ वाचण्यात दंग होता. जर्मन मित्रानेच त्याची माहिती दिली. तो तरुण झेकोस्लोव्हाकियाचा. भारतात आला. हिमालयापासून भटकंती सुरु केली. आता कन्याकुमारीत आला होता आणि प्राचीन शिवमंदिरात राहत होता. काय करत असेल तो दिवसभर? विरंगुळा कोणता असेल त्याच्यासाठी? नेमका कशाचा शोध तो घेत होता? आपली माणसं, आपला देश; सारं सोडून तो असा भणंगासारखा का भटकत असेल? तो साधा पर्यटक तर नक्कीच नव्हता. त्याच्याशी संवाद झाला नाही. पण झेकोस्लोव्हाकियाचा तो तरुण मनावर मात्र कायमचा कोरला गेला.
जर्मन मित्राने मग मला कन्याकुमारीच्या भव्य चर्चमध्ये नेले. चर्चमध्ये जाण्याचा तो माझा पहिलाच प्रसंग होता. मंदिरात जातात त्याप्रमाणे पादत्राणे बाहेरच काढून ठेवून आम्ही चर्चमध्ये गेलो. नुकताच नाताळ आटोपला असल्याने येशूच्या जन्माचे अनेक देखावे तेथे होते. येशू व मेरीच्या प्रतिमांना मी चक्क हिंदू पद्धतीने हात जोडले. तो मनमोकळं हसला. समजूतदारपणे. त्यानंतर एका तामिळ कुटुंबातील तामिळ पद्धतीच्या घरगुती मंदिरालाही आम्ही भेट दिली.
दुसऱ्या दिवशी दिवसभर तो कुठे गायब होता कुणास ठाऊक? सायंकाळी मात्र आम्ही एकत्रच सूर्यास्त पाहिला व संध्याकाळ समुद्रावर घालवली. समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या उन्मत्त वाऱ्याच्या साथीने तो आपलं मनही मोकळं करीत होता. स्वत:बद्दल मात्र तो फार बोलला नाही. इथली माणसं, इथलं जीवन, इथले अनुभव याबद्दलच तो बोलत होता. तो म्हणाला- `लोक मला विचारतात, तुम्ही इथे काय करता? तेही एकट्यानेच. तुमचा वेळ कसा जातो? तुम्हाला कंटाळा नाही येत? मी त्यांना म्हणतो- इथे समुद्र आहे, एवढी झाडे आहेत, जाणारी येणारी माणसं आहेत. एखाद्या झाडाखाली बसून राहिलं तरीही दिवस निघून जातो, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकताना. आणखी काय हवं आनंदासाठी? वेळ घालवण्यासाठी?' त्याचं म्हणणं खरंही होतं अन कठीणही. कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नसलेला त्याचा हा आनंद हेवा करण्यासारखाच.
हा त्याचा स्वभाव होता, ही त्याची वृत्ती होती, हा त्याचा नेहमीचाच अनुभव होता किंवा कसे हे मला जाणून घ्यायचे होते. पण त्याने लगेच विषय बदलला. म्हणाला- उद्या सकाळी मी जातोय. `कुठे?' या माझ्या प्रश्नावर त्याचे उत्तर होते, `चेन्नईला.' त्या रात्री आम्ही पहिल्यांदाच एकत्र भोजन केले. रात्री गप्पा मारत मारतच आम्ही झोपी गेलो. तो पहाटेच जाणार होता. सकाळी उठण्यात मी पक्का. त्यामुळे त्याला म्हटलं- सकाळी जाण्यापूर्वी मला नक्की उठव. तो `हो' म्हणाला. सकाळी उठलो आणि पाहिलं तर त्याचा बिछाना मात्र रिकामा होता. त्याचे कपाटही उघडे. मला न सांगताच तो पहाटे निघून गेला होता.
अनेक गोष्टींसाठी माझ्या लेखी पहिला असलेला `तो' - व्यक्ती, घटना, पात्र, प्रसंग, विचार, भावना यांच्याशी समरस होण्याच्या आपल्या स्वभावाशी विपरीत अशा पद्धतीने, न सांगता निघून गेला होता. हा कोरडेपणा, तटस्थपणा, त्रयस्थपणा की आणखी काही? का गेला असेल तो असे न सांगता?
- श्रीपाद कोठे, गुरुवार, ३१ डिसेंबर २०१७
मायबाई
८४ वर्षांचं कृतार्थ आयुष्य संपवून तिने जगाचा निरोप घेतला. शांतपणे. नि:संगपणे. मला श्वास देणाऱ्या तिच्या अंतिम श्वासाच्या वेळी मात्र उपस्थित राहता आले नाही. ईश्वरेच्छा बलीयसी हेच खरं. सगळ्यांचेच हात बांधून टाकणाऱ्या या परिस्थितीत फार पर्यायही नव्हतेच. आयुष्यभर ही बोच मात्र राहील.
तळेगाव दशासर या आजही खेडेगाव असलेल्या वर्धा जिल्ह्यातील गावी तिचा जन्म. जवळच्या पुलगावला कापड गिरणी सुरू झाली. वडील नोकरीसाठी पुलगावला आले. वडील भावालाही पुलगावच्या दारुगोळा डेपोत नोकरी लागली. दरम्यान देश स्वतंत्र झाला. काहीच महिन्यात महात्मा गांधींची हत्या झाली. संघ स्वयंसेवक आणि ब्राम्हण यांना लक्ष्य करण्यात आले. स्वाभाविकच वडील आणि भाऊ दोघांच्याही नोकऱ्या गेल्या. भावाला कारावास भोगावा लागला. सुटून आल्यावर पुढे काय, या प्रश्नाने आंबुलकर कुटुंब नागपुरात आलं. महाल भागातल्या फाटे यांच्या वाड्यात नवीन आयुष्य सुरू झालं.
जामदार शाळा, कल्याणेश्वर मंदिर, अयाचित मंदिर, भोसला वेदशाळा या परिसरात जीवनाचे संस्कार झाले. याच काळात मनोहर कोठे जीवनात आले आणि कमल आंबुलकर ही मृणालिनी कोठे झाली. कमल या नावासारखीच साधी, सरळ, सोपी आणि सात्विक. स्वभाव आणि गुणांना काना, मात्रा, वेलांटी, वळणे काहीही नाहीत. कोणी काही म्हटलं, बोललं तर आपल्या अंगाला छिद्र पडतात का; असा प्रश्न करण्याएवढा शांतपणा. तिच्या सोशिकपणाचा आपल्याला त्रास व्हावा एवढा सोशिकपणा.
निस्पृहता स्वभावातच. एकदा गप्पा मारताना तिला विचारलं - तुझं लग्न कसं झालं सांग. तिनेही सहजपणे सांगितलं - 'दोन्ही घरी मान्य नव्हतं. पण लग्न करायचं हे ठरलं होतं. त्यानुसार वसंत पंचमीला संध्याकाळी लग्न झालं. वडिलांच्या घरी मान्य नसलं तरी, त्यांच्याच राहत्या घरात वरच्या मजल्यावर लग्न झालं. वडिलांची आजी, भटजी आणि एक दोन जवळचे मित्र मैत्रिणी यांच्या उपस्थितीत लग्न पार पडलं. वडिलांनी २५ रुपयांची साडी घेतली होती. सासू सासरे किंवा बाकी कोणी हजर नव्हते.' मी विचारले - जेवणखाण वगैरे. त्यावर तिचं उत्तर - 'त्याच दिवशी सगळ्यात लहान दिराची सकाळी मौंज होती. त्याचा स्वयंपाक होता. त्यातच जेवणे झाली.' हे सगळं सांगताना सुद्धा कोणताही तक्रारीचा वा नाराजीचा सूर नव्हता. एखादी दैनंदिन घटना सहज सांगावी तसे तिने लग्नाची गोष्ट सांगितली होती.
दोघांना एकमेकांची साथ आणि त्यांच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत गेली अन लग्नानंतर साधारण दहा-बारा वर्षांनी त्यांनी स्वतःचं घर बांधलं. शहराच्या बाहेर असल्याने सुरुवातीला वीज नव्हती, नळ नव्हते. विहिरीचे पाणी काढावे लागे. रस्ते नव्हते. पावसाळ्यात सायकल दूर कुठेतरी ठेवून वडिलांना घरी यावे लागे. पलिकडे जंगल होते. तिथले कोल्हे इत्यादी रात्री बेरात्री येत. पण कोणतीही तक्रार वा कुरकुर न करता तिने संसाराची गाडी चालवली.
आयुष्यात किती गोष्टी केल्या तिने. 'कितीतरी' हा एकच शब्द वापरावा लागेल. वाचन केलं, विणकाम केलं, भरतकाम केलं, शिवणकाम केलं, वाळवण केलं, स्वयंपाक केला, आजारपणं काढली, बाळंतपणे केली, शुश्रूषा केली, आई वडिलांची सेवा केली, देवांना फुलांचे लक्ष वाहिले, बागकाम केले, माणसे जोडली, अपार कष्ट केले, बाराक्षराची औषधे दिली, देशभर फिरून आली, अनेक गोष्टी अनेकांना शिकवल्या, समितीचं काम केलं, लाखोच्या संख्येत नामजप लिहिला, अतिथी सत्कार केला. अन हे सगळं कुरकुर न करता किंवा आपण काही करतो हे न सांगता, त्याची कोणाला जाणीवही होऊ न देता. रवींद्र भटांच्या बहुतेक चरित्र कादंबऱ्या तिने वाचल्या होत्या. सुधीर फडकेंचे आत्मचरित्र तिचे आवडीचे होते. त्याबद्दल पुष्कळदा बोलत असे. स्वयंपाक, स्वयंपाकघर, अतिथी सत्कार हे तर खास विषय. साक्षात अन्नपूर्णा होती. जेवणारी माणसे वाढली तरी स्वयंपाकाची नुपूर गेली नाही. मला आठवते, एकदा योगेंद्रजी घरी मुक्कामाला होते. ते संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री होते. माझ्याकडे तेव्हा विदर्भाची जबाबदारी होती. बैठक, भेटी, गप्पा आटोपून घरी यायला रात्रीचे अकरा वाजून गेले होते. पण तिने तेवढ्या रात्री गरम स्वयंपाक करून जेवू घातले. एवढा मोठा फकीर माणूस आपल्या घरी आला याचाच तिला आनंद. ती गेल्यानंतर जे जे फोन आले, त्यात बहुतेकांच्या बोलण्यात तिच्या खाऊपिऊ घालण्याचा उल्लेख होताच.
संपर्कात येणारा माणूस जोडून ठेवणे हा स्वभाव होता. दारावर उदबत्ती विकायला येणाऱ्यापासून तर छोट्या मोठ्या कामाच्या किंवा बिन कामाच्या अनेकांना तिने जोडून ठेवले होते. कळवळा हा तिच्या स्वभावाचा दुसरा गुण होता. काहीही पाश नसणाऱ्या एका कामवाल्या बाईला तर तिने काही वर्ष घरीच ठेवून घेतले होते. (या बाईंवर मागे मी स्वतंत्र लिहिलेही आहे.) भांडी घासायला येणाऱ्या आजीबाईंचीही अशीच काळजी. त्यांना भांडी ठेवताना स्वच्छ करून ठेवली पाहिजेत, चमचे- वाट्या- पेले- आपणच घासून घ्यावे; हा तिचा दंडक. का? कारण त्या नोकर नाहीत, मदतनीस आहेत. आहे कामाला म्हणून घ्या राबवून असा विचार नाही. वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत हाच दंडक होता. त्याआधी काही वर्षे तिला भांडी घासून घेण्याबद्दल छेडले तेव्हा तिने तिची भूमिका सांगितली होती. त्यानंतर मीही कधी तिला त्यापासून परावृत्त केले नाही. मदत करण्याचा प्रयत्न केला पण भांडी घासून घेण्याला विरोध केला नाही. एकदा पुण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेलो असतानाही असाच अनुभव. कुलीला सामान देताना एक दोन बॅग स्वतःच उचलल्या. 'का' विचारले तर, त्याला किती सामान द्यायचे? या बॅग हलक्याच आहेत. आपण घेऊ हे उत्तर. कोणाचे काम कमी करणे एवढंच या कळवळ्याचं रूप नव्हतं. तेव्हा जुने कपडे घेऊन त्यावर भांडी देणाऱ्या बायका दारावर येत असत. एक बाई ठरलेली होती. ती आली की, जुने कपडे देणे, घासाघीस करणे, भांडी घेणे साग्रसंगीत होत असे. ती बाई वस्तीत फिरत असे. शेवटी येऊन आपले कापडाचे भले मोठे गाठोडे अंगणात ठेवीत असे अन 'रिक्षा घेऊन येते. तोवर हे राहू द्या इथे' म्हणून रिक्षा आणायला जात असे. रिक्षा आणायला म्हणून गेलेली ती बाई कधी चार दिवसांनी, कधी पंधरा दिवसांनी सुद्धा येत असे. एकदा तर महिनाभर आली नव्हती. हिने तिचे गाठोडे मात्र जपून ठेवले होते. अन ती आल्यावर फक्त 'उशीर का झाला' एवढा साधा प्रश्न विचारला होता. पण नाराजी, पुन्हा असं चालणार नाही वगैरे वगैरे काही नाही.
समितीचं काम, शारदोत्सव, भजन मंडळ, भिसी, उन्हाळ्यातल्या शेवया- पापड- या सगळ्या सामूहिक उपक्रमात तिचा सहभाग हिरीरीने राहत असे. वस्तीत तिची पिढी म्हातारी झाली. सगळ्यांना सुना आल्या. त्या सुनांची भिसी सुरू झाली. सासवा बाजूला झाल्या पण ही मात्र अनेक वर्षे सुनांच्या भिसीत सहभागी होती. सुनांना ती मोठी वाटली नाही अन तिला सुना लहान वाटल्या नाहीत. अनेक वर्षे दिवाळीचा फराळ करून घेणे हा एक उत्सव होता. जुन्या महाल भागातील 'व्यंकटी' हा तेलंगी आचारी दिवाळीआधी घरी येत असे. काय काय पदार्थ बनवायचे, त्याला सामान किती लागेल; ही सगळी माहिती देऊन फराळ तयार करण्याचा दिवस ठरवून तो जात असे. तो येऊन गेला की वस्तीत निरोप द्यायचे. अन ठरलेल्या दिवशी ३०-४० घरचा दिवाळीचा फराळ तयार होत असे. त्यासाठीची लाकडे, भांडी, पाणी इत्यादी तयारी; आलेले सामान आणि ऑर्डर्स यानुसार माल तयार झाला की त्या त्या नावाने वेगळा काढून ठेवणे; हे सगळे काम भरपूर पुरत असे. पण हे सगळे करताना चेहऱ्यावर त्रासिकपणा राहत नसे अन आपण एवढं करतो यातून आपल्याला काय मिळतं, काय मिळणार; हा विचारही राहत नसे.
व्रतवैकल्येही तिने भरपूर केली. सोळा सोमवारपासून, आठवड्यातल्या चार वारांचे उपवास, चतुर्थी, एकादशी; असे सगळे. बाकी उपवास हळूहळू सोडले होते, पण एकादशी मात्र अखेरपर्यंत करीत होती. माझ्यासाठीही तिने व्रत केले होते. माझ्या पाठीवर शेरणी नावाचा एक प्रकार झाला होता. शेरणी म्हणजे पाठीवर छोटे छोटे पांढुरके डाग. त्यांचा त्रास काहीही नसतो. किंवा तो कोड वगैरे प्रकारही नसतो. किंवा चर्मरोग पण नाही. काहीतरी deficiency चा भाग असावा. पण असं म्हणतात की, आठवीची पूजा केली तर तो त्रास संपतो. मी तर करायला राहिलो. बरं ती पूजाही सगळ्यांकडे नसते. योगायोगाने आमच्या शेजारी राहणाऱ्या काळे यांच्याकडे आठवीची पूजा होती. ती तिथे जाऊन पूजा करून, दर्शन घेऊन येत असे. त्या दिवशी दिवसभर उपवासही. माझी शेरणीही हळूहळू संपली. Deficiency संपल्याने शेरणी संपली की तिच्या श्रद्धायुक्त व्रताने याची चिकित्सा मी केली नाही, करत नाही. मला करावीशीही वाटत नाही. मी फक्त त्या श्रद्धेसमोर मान झुकवतो.
संपन्नता आणि विपन्नता दोन्हीत मनाचा तोल ढळू न देणारा साधू असतो, असं एक संस्कृत वचन आहे. ती त्याच चालतं बोलतं उदाहरण होती. अर्धी उदबत्ती सकाळी अन अर्धी संध्याकाळी लावण्याचे दिवसही मी तिच्या सहवासात पाहिले आहेत अन विमान प्रवासाची नव्हाळी राहू नये असेही तिचे दिवस पाहिले आहेत. १९८० ची गोष्ट असावी. आणीबाणीनंतरची. वडिलांची punishment transfer झाली होती मुंबईला. संघवाले म्हणून. कमावते फक्त तेच. त्यांचा खर्च, आमचा परिवाराचा खर्च. शिक्षणे, आजारपणं; असं सगळंच. वडील काही चेक सह्या करून तिच्याजवळ ठेवत असत. लागतील तसे पैसे काढण्यासाठी. बँकेतून पैसे काढून आणण्याचे काम माझे असे. मला आठवते, त्या चेकने कधीकधी दहा रुपये काढून आणले होते. अर्थात दहा रुपयाला सुद्धा थोडीबहुत किंमत त्याकाळी होती. त्यानंतर आठेक वर्षांनी मी कमवू लागलो तेव्हा माझा पहिला पगार दोनशे रुपये होता. तरीही दहा रुपयांचा चेक हा थोडा थट्टेचा विषय असेच. बँकेतील काही लोक कुत्सित हसत देखील. पण एक काका होते रोखपाल. तेही ब्राम्हण आणि संघवाले. त्यांचा आधार होता. ते सांगत, 'दुर्लक्ष करायचं.' तिचाही तोच सल्ला. ही परिस्थिती काही फार टिकली नाही. पुन्हा चांगले दिवस आले. गाडी घोडे आले. पण दोन्ही परिस्थितीत मन, व्यवहार, वागणे, बोलणे; तेवढेच शांत.
अनेक थोरामोठ्यांशी संबंध आला होता. संघ मुख्यालयाजवळ राहणे आणि लहान भाऊ प्रचारक याही जमेच्या बाजू होत्याच. गोळवलकर गुरुजींना तिच्या हातची गुळाची पुरणपोळी आवडत असे. सरसंघचालकांची सावली असं ज्यांचं वर्णन करतात ते डॉ. आबाजी थत्ते हे तर तिचे भाऊच. वर्षभरातून दोनदा देशभर प्रवास करत असूनही; राखी पौर्णिमा, भाऊबीज कधी चुकले नाहीत. शिवाय नागपुरात असले की एखादी चक्कर ठरलेली. भारतीय मजदूर संघाचे कार्यालयच सुरुवातीला घरी असल्याने दत्तोपंत ठेंगडी अनेकदा पंक्तीला असत. शिवाय एकनाथजी रानडे, बाबासाहेब आपटे असे दिग्गजही येत जात असत. एकदा तर बाबासाहेब आपटे घरी आले, खाटेवर बसले आणि खाट कशी तुटली त्याचा किस्साही अनेकदा ऐकला आहे. सुमतीबाई सुकळीकर यांच्याशी तर 'काय गं कमल' असा संबंध. वंदनीय मावशी केळकर त्यांच्यापासून सगळ्या प्रमुख संचालिकांचा खूप स्नेह मिळालेला. पण हे सगळं कधी गप्पांच्या ओघात येईल तेवढंच. या फुशारकी मारण्याच्या गोष्टी नव्हत्याच. मनाला नियंत्रित वगैरे करून हे साध्य होत नाही. तो स्वभावच असावा लागतो. तिचा तो होता.
तिने कष्ट अपार केले पण कुरकुर केली नाही. सगळ्यांचं कौतुक केलं पण स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. तब्येत, दुखणी या जीवाला जखडलेल्याच गोष्टी पण त्यांचे issue केले नाहीत. फिरणं होत होतं तोवर फिरून आली. गंगासागर पाहून आली आणि साठीनंतर गिरनार पण चढून आली. सतत कशात तरी गुंतवून घेत राहिली. Brainvita, majic cube, carom, पत्ते हेही खेळली. कोणाकडे दुःखद घटना झाली की सांत्वनाला गेल्याशिवाय राहिली नाही. काठी टेकत दोन जिने चढावे लागले तरी. अनेक वर्ष रोज रात्री माझ्यासोबत तारक मेहता का उलटा चष्मा पण पाहिले. किती आणि काय काय आठवायचं, किती आणि काय काय सांगायचं? 'हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणांचे' अशी अवस्था आहे.
अन यापलीकडचंही नातं आहे. आम्हा आई मुलात जीवनविषयक चर्चाही होत. कधी त्या मृत्यूपर्यंतही पोहोचत. मी तिला म्हणत असे, माणसाने मृत्यूचाही विचार केला पाहिजे. जी एकमेव गोष्ट या जगात निश्चित आहे तिला का टाळायचं? तीही ऐकत असे, बोलत असे. भय, चिंता या गोष्टी तर मुळातच नव्हत्या. त्यामुळे मुक्तपणे बोलत असू या विषयावर. आठ महिन्यांपूर्वी वडिलांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर एक दिवस सहज बोलत बसलो होतो. तिच्या बोलण्यात थोडी निराशा, दु:ख असं होतं. तिला जवळ घेऊन समजावत मी म्हटलं - 'अगं हे तर जीवनाचं चक्र आहे. येतो त्याला जावं लागतंच. गुरुजी गेले, दत्तोपंत गेले, मावशी गेल्या, नानाजी मोठीआई गेले, बुद्ध गेले, शंकराचार्य गेले, श्री रामकृष्ण गेले, प्रभू राम गेले' अन मी थांबलो. अंदाज घेत. मी थांबलो तसं तीच पुढे म्हणाली - 'श्रीकृष्ण गेले.' दोघेही हसलो. शारीरिक आणि मानसिक दोन्हीची हिंमत तिच्याकडे भरपूर होती. पण थकत चालली होती. शरीर थकत होतं. व्याधी नव्हत्या पण झीज भरपूर झाली होती. गेल्या संक्रांतीनंतर तिला किंचित भास व्हायला लागले होते. भ्रम नव्हता. पण कधीकधी भास होत. एकदा फोनवर बोलताना म्हणाली - 'काय करू रे? मला कोणी कोणी दिसतात पण ते नसतातच. असं का होत असेल? काय करावं?' अर्थात वैद्यकीय उपचार सुरू झाले होतेच. मी तरी काय सांगणार? तिला म्हटलं - 'असं काही झालं की ओम नमः शिवाय म्हणत जा.' मात्र हळूहळू तिनी स्वतःला आवरणं सुरू केल्याचं जाणवत होतं. तिच्या जन्मगावी तिच्या वंशातील वामनाजी बुवा नावाच्या साधूंची जिवंत समाधी आहे. त्याची तिला खूप आठवण येत असे. त्यामुळे एक दिवस तिथे जाऊन आलो. व्हिडीओ कॉल करून तिला समाधीचं दर्शन करवलं. नंतर जाऊन पंधरा दिवस राहून आलो. त्याच मुक्कामात महाशिवरात्री या तिच्या जन्मदिवशी समिधाने केलेला तिला आवडणारा राजगिरा पिठाचा शिरा तिला खाऊ घातला. तेच आमच्यातलं शेवटचं communication.
म्हातारपणातील सोबतीची गरज लक्षात घेऊन चार वर्षांपूर्वीच दोघेही पुण्याला राहू लागले होते. लहान भाऊ, त्याची पत्नी, त्याचा मुलगा, बहिणी, त्यांची मुले सगळ्यांनीच दोघांचीही भरपूर आणि निरलस सेवा केली. मला ते भाग्य कमी वाट्याला आलं. शेवटले चार दिवस ती रुग्णालयात होती. तिथेच तिने अखेरचा श्वास घेतला. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीने तर सगळ्यांचेच हात बांधलेले. असंख्य माणसे जोडणाऱ्या तिचा अंत्यसंस्कार मोजून पाच जणांच्या उपस्थितीत झाला. घरावर प्रेम असूनही अंत्ययात्रा रुग्णालयातून परस्पर न्यावी लागली. शवाला स्नान, कपडे, हार असं काहीही नाही. कारण काही उपलब्धच नव्हतं. गोळवलकर गुरुजींनी अखेरची तीन पत्रे लिहिली होती. त्यातील एका पत्रात त्यांनी म्हटले होते - 'मृत्यू के पश्चात शव का शृंगार आदी बाते विचित्र लगती है.' त्याची आठवण झाली. नाही म्हणायला, मृत्यूची वार्ता कळल्यावर सहनिवासातल्या एका काकूंनी इमारतीतील चाफ्याची फुले आणली. त्याचा हार तिच्या गळ्यात पडला. शेजारच्या बंगाली कुटुंबाने दिलेले चंदन तिच्या भाळी रेखले. समरसून जीवन जगल्यावर जणू संपूर्ण नि:संग होऊन ती अंतिम प्रवासाला गेली. लौकिक जीवनातील सगळ्या गोष्टींचा; कर्मकांड, रीतिरिवाज, उपचार, वस्तू, शृंगार, नातीगोती, सुखदु:ख; सगळ्या गोष्टी कटाक्षाने दूर सारून; नि:संग होऊन गेली. तिच्या आवडत्या पदातील शब्दांचा आधार घ्यायचा तर - 'अम्ही सर्वही प्रवासी, जाणार दूरदेशी... तो मार्ग दाखवाया, अधिकारी रामराया...' या समर्पित भावासह गेली.
या जगातला मधुर रक्तसंबंध संपला. सहोदर असतातच. मला तर हेवा करावा असे सहोदर लाभले आहेत. नाही तर या भणंगाला कोण विचारतो. अन केवळ सहोदर नाहीत त्यांचे सहप्रवासी, सगेसोयरे सगळ्यांकडूनच आदर, प्रेम, सन्मान मिळतोच. तिने मिळवून ठेवलेले गणगोतही आहेत. म्हणून तर ती गेल्याचं कानी पडताच माझ्या जेवण्याखाण्याची सोय बघायला मंडळी धावून आली. आईचे दिवस होईपर्यंत स्वयंपाक करू नका, असे कोणी सांगायला ही पुण्यसंचय हवा. तो माझा नाही. तो तिचा आहे. इच्छांचे चिताभस्म तर कधीचेच फासले आहे पण असलीच तर एकच इच्छा आहे - जेव्हा कधी निरोप घ्यावा लागेल. तिच्याहून नि:संगपणे घेता यावा. तोवर आहेच - 'नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी... जिणे गंगौघाचे पाणी, जिणे गंगौघाचे पाणी...'
- श्रीपाद कोठे
रविवार, २६ एप्रिल २०२०
अक्षय्य तृतीया