गुरुवार, २८ मार्च, २०१९

आत्मवेडा

मोगरा वेडा आहे
ठार वेडा...
त्याला कळतच नाही
अन सांगून समजतही नाही
की-
त्याचं फुलणं पाहायला
त्याच्या फुलांचं कौतुक करायला
त्याच्या बहराचा सुवास
श्वासात भरून घ्यायला
कोणीही नाही,
तो आपला बहरत राहतो
गळत राहतो
कोणी सापडलाच तावडीत
तर वाटतो त्याला
आपले सुवासिक गूज
मुक्त हस्ताने
कोणी ते स्वीकारतो की झिडकारतो
याकडे लक्षही न देता...
मोगरा वेडा आहे
ठार वेडा...
त्याला नाही समजत
मान अपमान,
त्याला नाही समजत
उपयोगीतेचे तत्त्व,
त्याला नाही समजत
लाभ हानी,
त्याला नाही समजत
ढवळून टाकणारी उदासी,
त्याला नाही समजत
किंमत त्याच्या सुवासाची,
त्याला नाही समजत
महत्व त्याच्या ग्रीष्मसोशीचं,
त्याला खरं तर
काहीच समजत नाही
त्याच्या भोवतीच्या जगातलं,
मोगरा वेडा आहे
ठार वेडा...
आत्ममग्न बहराचे
आत्मस्थ अनुसंधान
आत्मीयतेने भोगणारा
आत्मग्लानी ठाऊक नसलेला...
मोगरा-
आत्मवेडा आहे... आत्मवेडा !!

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २८ मार्च २०१९

मंगळवार, १९ मार्च, २०१९

त्याचा रंग

`काय रे,
हा कुठला रंग आणलास?
रंगांच्या सणाला हा काळा कशाला?'
विचारणाऱ्याच्या डोळ्यात बघत
त्याने विचारले-
`का? हा रंग नाही?
अन त्यानेच केलाय ना तयार
ज्याने हे सप्तरंग तयार केलेत?'
प्रश्नकर्ता गडबडला...
तो पुढे म्हणाला-
`त्यानेच दिलाय मला
हा काळा रंग
मी खेळतोय मनसोक्त तो...
तू खेळ तुझे रंग
त्याने तुला दिलेले...
हां, माझा रंग नाही टाकणार तुझ्यावर
हे रंग देणाऱ्यानेच घातलेय बंधन तसे,
तू मात्र टाकू शकतोस
तुझे रंग माझ्यावर
पाहा काही बसलेत तर...'
प्रश्नकर्त्याने केला खूप प्रयत्न
त्याच्या काळ्या रंगावर
आपले रंग टाकण्याचा
पण व्यर्थ
एकाही रंगाचा टिपूसही नाही टिकला
निराश होऊन जाऊ लागला प्रश्नकर्ता...
तेव्हा तो म्हणाला-
`हा त्याचाच रंग आहे
ज्याने केलेत हे रंग तयार
मला त्याचा रंग मिळालाय...'

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १९ मार्च २०१९

शुक्रवार, १५ मार्च, २०१९

देव करो...

अरे, हे पहा
किती छान केलीय सजावट
ही रंगसंगती, ही चित्रे
स्वच्छता, टापटीप...
खिडकीतून पहा
बगीचा किती हिरवागार नं!
दारातून प्रवेश करतानाच
किती छान मंदिर आहे बाप्पाचं
कुठे गोंधळ नाही
गडबड नाही
सगळे लोक अदबीने
प्रेमाने, आस्थेने बोलतात
वागतात...
पहा, पहा हे सगळे
अन विसरून जा
दुखणे, व्याधी, त्रास वगैरे !!
माणसे माणसांना
असाच सल्ला देतात बहुधा...
त्याच्या कानी पडतो
असा सल्ला
त्याला वा आणखीन कोणाला दिलेला
तेव्हा तो एवढेच म्हणतो मनाशी-
देव करो,
तुला कधी
रोग, दु:ख, व्याधी न होवो;
पण जर झालीच
तर तेव्हा कळेल तुला
इस्पितळाची सुंदरता
त्याचं वातावरण
वेदना दूर करू शकत नाही ते...
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १३ मार्च २०१९

तो

तो होता माझ्याआधी
तो राहील माझ्यानंतर,
तो श्वासांच्या आधी होता
तो राहील श्वासांनंतर,
काळाने नेत्र उघडले
त्याही आधी तो होता,
काळाचे नेत्र मिटतील
त्यानंतरही तो राहील,
कर्माच्या इच्छेआधी होता तो
कर्माच्या इच्छेनंतरही राहील तो,
उजेड पडण्याआधी तो होता
तो राहील उजेडानंतर,
सुखाच्या आधी तो होता
सुखाच्या नंतरही तो राहील,
तो असतो आधी, नंतर
मधले अंतरही तो असतो,
काही असण्याआधी असतो तो
तो असेल काही नसल्यानंतर,
अधेमधेही असतो असतो
तोच असतो काही असणे
तोच काही नसणे असतो !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १४ मार्च २०१९

जमलेच तर !!

जहाज बांधणीचा उद्योग असतो
तसाच असतो उद्योग
जहाज तोडणीचा,
वस्तूंच्या उत्पादनाचा उद्योग असतो
तसाच असतो उद्योग भंगाराचा,
सुतीकागृहे असतात
तसेच असतात स्मशान घाटही,
फुलदाणी असते
अन असते कचराकुंडीही,
असंच आणखी बरंच काही
माणसांनी माणसांसाठी निर्माण केलेलं
माणसांच्या जगातलं...
अन तसंच सगळं
हे जग
जन्माला घालणाऱ्याच्या जगातलंही...
म्हणूनच दिसतात माणसे
अधूनमधून
युगायुगांपासून
भंगार, स्मशान वा
कचराकुंडीसारखी जगणारी
सारी मानवता
सारी मंगलता
सारा आशावाद
यांना वाकुल्या दाखवत...
माणसाची गरज असूनही
नसते माणसाला प्रेम
भंगार, कचराकुंडी
आणि स्मशानाबद्दल,
जगाच्या निर्मात्यालाही नसते प्रेम
त्यानेच त्याच्या व्यवहारासाठी
जन्माला घातलेल्या अशा लोकांबद्दल
पण ती असतात त्याचीच निर्मिती;
जमलंच तर त्यांना हसू नये
ठेवू नयेत त्यांना नावे
अन सगळ्यात महत्त्वाचे
त्यांना शिकवू नये फार शहाणपण
त्या विश्व निर्मात्याने
तुमच्या आमच्यासाठीच घातलेले असते
त्यांना तसे जन्माला;
आपल्या पुरुषार्थाच्या
आपल्या सुखाच्या उद्यमाची
देठे, साली, खरकटे;
नको असलेले
वा खराब झालेले सारे
जमा करण्यासाठी
अन विल्हेवाट लावण्यासाठी;
भान असू द्यावे
आपली सुखशांति
अवलंबून असते यांच्यावरच
- जमलेच तर !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १४ मार्च २०१९

सोमवार, ११ मार्च, २०१९

तू डुचमळ होऊन ये ना

या कातर संध्याकाळी
तू सुगंध होऊन ये ना
या अबोल तिन्ही सांजेला
तू श्वास पेरूनी दे ना
त्या आर्त नदीतून थोडी
तू भिजव पाऊले किंचित
त्या ओलपावलांनी तू
केशर लावून जा ना
ही विस्कटलेली सांज
तू घे ना पदराखाली
दे उधळून त्याच्यावरती
तुझ्या पावलांची माती
मी कण कण होतो आहे
तू स्पर्श साजीरा दे ना
होऊन युगांची तृष्णा
तू कवेत मजला घे ना
मी बसतो झाडाखाली
संध्येला हात हलवतो
तू उगवून त्याच क्षणाला
तो हात चुंबुनी घे ना
भवताली अंधुक सारे
क्षितिजी शांति पसरे
यमनात गोठल्या हृदयी
तू डुचमळ होऊन ये ना

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ३ मार्च २०१९

ओल

ही ओल अशी प्राणात
जाळता जळतही नाही
मरणाच्या कातर भाळी
ती कुंकूम रेखून जाई
ही ओल सारखी गळते
जीवाला बिलगून छळते
कमळाची देठे नाजूक
दारात ठेवूनि वळते
ही ओल कशी जिद्दीची
सूर्याला पुरुनी उरते
तमसांद्र घनाच्या हाती
चंद्राची कोर प्रसवते
ही ओल कोठूनी येते
काहीच कसे उमजेना
वेलीवर शुभ्र फुलांची
आरास कधीच खळेना

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १० मार्च २०१९

कविता नसते गणित

कविता नसते गणित
पायऱ्या आणि पद्धत समजून घेण्याचे
उत्तरही नसते तिचे ठरलेले
दोन अधिक दोन म्हणजे चार असे
किंवा नसते तिचे मोजमाप
भूमितीच्या कंपासनुसार
नसतात भौतिक वा रासायनिक गुणधर्म...
कविता नसते तत्वज्ञान
तर्क आणि निरीक्षणाचे
खंडन किंवा मंडनाचे
कोणता तरी सिद्धांत सांगणारे
तिला नसतेच करायचे सिद्ध काहीही...
ती असते फक्त उत्तर
न सुटलेल्या गणिताचे
ती स्वतःच असते सिद्धांत
स्वयंसिद्ध तत्वज्ञानाचे...
कधी हवेसे, कधी नकोसे
कधी रुचकर, कधी पथ्यकर
कधी मोरपीस हळुवार
कधी करवत अनिवार,
कधी उधळण रंगांची
कधी विस्कट बेरंगी,
कधी अस्मानाचा तोल
कधी चाहूल अनमोल,
कविता फक्त असते
अवर्णनीय बहुमोल...

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ११ मार्च २०१९