गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

चला झुंड झुंड खेळू

चला झुंड झुंड खेळू या...
एक झुंड आमची
एक झुंड तुमची
एक झुंड यांची
एक झुंड त्यांची...
झुंडीचा वेश
झुंडीची भाषा
झुंडीचा त्वेष
झुंडीची नशा...
झुंडीचे जिंकणे
झुंडीचे हरणे
झुंडीच्या झुंजीत
झुंडीचे मरणे...
झुंड काळ्याची
झुंड पांढऱ्याची
झुंड निळ्याची
झुंड हिरव्याची
झुंड लाल
झुंड भगवी
झुंड पिवळी
झुंड ढवळी...
दानवतेची झुंड
मानवतेची झुंड,
देशद्रोहाची झुंड
देशभक्तीची झुंड,
चांगल्याची झुंड
वाईटाची झुंड,
कळकळीची झुंड
मळमळीची झुंड,
भोगाची झुंड
त्यागाची झुंड,
शस्त्रांची झुंड
शास्त्रांची झुंड,
दुर्जनांची झुंड
सज्जनांची झुंड,
भेकडांची झुंड
शूरांची झुंड....
कोण तुम्ही?
काय नाव तुमच्या झुंडीचे?
काय म्हणता- झुंड नाही
सांगताना हे तोंड उघडून
लाज कशी वाटत नाही?
झुंडीशिवाय ओळख नाही
ओळखीशिवाय किंमत नाही
किमतीशिवाय जीवन नाही...
आधी झुंड जॉईन करा
झुंडीला मान्यता द्या
झुंड करणे शिकून घ्या
झुंडीची मान्यता मिळवा
तेव्हाच आपल्याला जगता येईल
सगळ्याच झुंडी
जगणे आपले मान्य करतील...
तू असण्याला अर्थ नाही
तू जगण्याला अर्थ नाही
तू मरण्याला अर्थ नाही...
अर्थ आहे मान्यतेला
अर्थ आहे झुंडीला
मान्यता वाढली पाहिजे
झुंड वाढली पाहिजे
झुंडी वाढल्या पाहिजेत...
झुंड मला मान्य नाही...
- मर मग,
झुंडीत मी येणार नाही...
- टळ मग,
मान्यता नकोय मला...
- तो अधिकार नाही तुला,
झुंडीत ये, येऊ नको
घेणेदेणे नाही झुंडीन्ना
मान्यता मात्र देणारच
किंवा काढून घेणारच....
झुंडी झुंडी झुंडी झुंडी....
चला झुंड झुंड खेळू...
निरर्थक विश्वाचे
निरर्थक पांग फेडू...

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १ मार्च २०१९

सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१९

तरंगांचा खेळ

तरंग उठणे
तरंग विरणे
तरंगांचा खेळ
अविरत
विश्वाच्या सागरी
लाटा क्षणोक्षणी
उठती नाशती
वेळोवेळी
खेळाचा प्रारंभ
ठाऊक कोणासी?
लाटाच मोजती
पदोपदी
सागर अवघा
सारेच जाणती
तरंगाचे मूळ
नाही ठावे
शांत समुद्रात
तरंग उठवी
वारा ऐसा कोठे
जो तो शोधे
वाऱ्याचे अप्रूप
साऱ्यांनाच वाटे
त्यालाच शोधाया
खटपट
खटपट होतो
तरंग नव्याने
लाट उसळते
पुन्हा पुन्हा
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, २५ जानेवारी २०१९

पूजा उत्सव

हाकारले सगळ्यांना एकदा
म्हटले -
चला पूजा बांधू या
उत्सव करू या
धडाक्याने, जोरदार
'मी'चा !
सगळे उत्साहाने तयार झाले
मखर सजले
माळा लागल्या
तोरणे, रांगोळ्या, मंडप
फुले, सजावट, सनई
झकपक पोशाखात
सगळे हजर...
स्थापना झाली
प्राणप्रतिष्ठा झाली
आरत्या, स्तोत्रे
पूजा, अभिषेक
नैवेद्य, प्रसाद
सगळे पार पडले
यथासांग...
सकाळ, संध्याकाळ
आरत्या, भजने, स्तोत्रे
'मी'च्या महानतेची
प्रवचने, व्याख्याने, कीर्तने
'मी'च्या पोथीची पारायणे
सगळी रेलचेल...
नाटके, नृत्य
फेर फुगड्या
खेळ, स्पर्धा
खाणेपिणे
थाटच थाट...
प्रतिपदा ते अमावास्या
सगळ्या तिथीचा जागर झाला
हळूच म्हटले साऱ्यांना -
आता करू या विसर्जन
देऊ या निरोप
'मी'ला...
हो म्हणत सटकले काही
काहींनी घेतला काढता पाय
करू या म्हणत
काही गेले
काहीच न बोलता
गर्दीत तोंड लपवत...
मांडवात शिल्लक एक
विसर्जन व्हायचंय 'मी'चं !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २६ जानेवारी २०१९

युगपुरुष

माणूस चालतो चंद्रावर
गुरुत्वाकर्षणाशिवाय
तरंगत तरंगत
न बांधलेल्या पायांनी
बिना ओढीने
चंद्राशी संबंध न ठेवता…
तशीच जगतात
माणसे काही
या पृथ्वीवर
गुरुत्वाकर्षणाशिवाय
तरंगणाऱ्या मनांनी
कशाशीही न बांधलेली
बिना ओढीने
संबंधशून्य...
कोणत्याही चुंबकाशिवाय
जगणारी ही माणसे
होतात विघटित
अन पसरते त्यांची धूळ
हवेवर, वातावरणात...
मात्र,
काहींची होते पृथ्वी
जडशीळ
जिच्या पोटात जन्म घेतात
असंख्य ज्वालामुखी
अनेक सागर
अपार खनिजे अन वनस्पती
अन गुरुत्वाकर्षण सुद्धा
हे गुरुत्वाकर्षण
आकर्षून घेते साऱ्यांना...
गुरुत्वाकर्षण गमावलेल्या मनात
गुरुत्वाकर्षण जन्म घेते
तेव्हा
जन्माला येतो युगपुरुष !!
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २९ जानेवारी २०१९

झाडे म्हणजे प्रार्थना

झाडे म्हणजे प्रार्थना
ज्यांना नसतात शब्द
जी असते ओतप्रोत
जीवनजाणिवांनी
तुडुंब भरलेली...
रोज पहाटे
सृजनाचा आनंद सोहळा,
रोज सांजेला
विसर्जनाची शोकसभा
निर्लिप्तपणे पार पाडणारी
संवेदनपूर्ण शून्याकार झालेली
तदाकार प्रार्थना...
जी विचारीत नाही प्रश्न
उन्हा पावसात भिजणाऱ्या
प्राक्तनाला,
आपल्याच फळांचा
तुकडाही न चाखू शकणाऱ्या
ललाटरेषेला
रसमय तरीही शून्याकार झालेली
निर्लेप नि:शेष प्रार्थना...
झाडे असतात
अस्तित्व नसलेली
पण अस्तित्वाहून सत्य असलेली
एकाग्र प्रार्थना...
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २९ जानेवारी २०१९

घाबरट

घाबरट असतो मी
अतिशय घाबरट असतो मी,
उजेडाला नाही अस्तित्व
अंधाराशिवाय
तरीही नको असते मला
चर्चा अंधाराची
गोंजारेल माझं भय अशीच
प्रकाशाची चर्चा हवी,
कारण मी घाबरट असतो...
पदोपदी आढळतात
दुर्दैवाचे दशावतार
पिचलेल्या निराशा
विस्कटणारी स्वप्ने,
शुभेच्छांना लावलेल्या
वाटाण्याच्या अक्षता,
धडाधड फुटणारी
आशावादाची जहाजे,
पण टाळतो मी
त्याकडे पाहण्याचेही
न जाणो माझ्या सुखाला
अपशकून होईल म्हणून
हो, मी घाबरट असतो...
बाजूला सारतो
'न'ने सुरू होणारं सारं काही,
नजर वळवून घेतो
साऱ्या अभावांकडून
मेंदूच्या, हृदयाच्या दारांवर
लावतो पाट्या 'प्रवेश बंद'च्या
मला नकोशा सगळ्या गोष्टींसाठी,
पाहतो स्वप्ने
अंधारशून्य उजेडाची
वेदनाशून्य सौख्याची
अशुभशून्य शुभंकराची
मृत्यूशून्य जीवनाची
अभावशून्य संपन्नतेची
विषशून्य अमृताची
खरेच मी घाबरट असतो...
मी नाहीच पचवू शकत वास्तव
समुद्रमंथनातून
नाही हाती येत केवळ अमृत,
विषाचा कुंभही असतोच
अपरिहार्यपणे...
पण मी मनातही येऊ देत नाही
हे सारे
कारण...
मी नसतो विष पचवणारा नीलकंठ
मी फक्त घाबरट असतो...
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १ फेब्रुवारी २०१९

वाळवंट


होऊ दे वाळवंट मनाचं...
दिवसा तापणारं
रात्री थंड होणारं,
दिवसा पावलं पोळली
तरी रात्री दाह निवंवणारं,
कधीही चिखल न होणारं
कसलाही डाग न लावणारं,
कधीही कोणतीही
पाऊलखुण मागे न ठेवणारं,
वादळानंतरही
पूर्वीसारखं राहणारं,
सुकणं हीच नियती असलेली
शापित फुलझाडं न फुलवणारं,
पाणीही न मागणाऱ्या
काटेरी झाडांना माया लावणारं,
कशातही न गुंतणारं
कशालाही न गुंतवणारं,
होऊ दे वाळवंट मनाचं...
- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ४ फेब्रुवारी २०१९

अंधाराची मिठी


अंधाराची मिठी
आहे भलीमोठी
आयुष्याच्या गाठी
सुटलेल्या,
अंधारच सखा
नाही दुरावत
रोज उरभेटी
ठरलेल्या,
तारकांची दिठी
ज्याची असो त्यास
अंधार मिठीत
सुखावणे,
अंधाराची मिठी
आहे मोठी गोड
जगती या तोड
नाही त्यास,
अंधाराची मिठी
आहे खूप घट्ट
सोडविता यत्ने
सुटेची ना,
अंधाराची मिठी
आवळीते ज्यास
पाडते विसर
जगतीचा,
जगाचा धपाप
संपूनच जातो
ज्याला कवटाळे
अंधार हा,
जीवाचे धावणे
शांतवून जाये
एकदा का भेटे
अंधारासी,
मागणे काहीही
नाही त्याचे कधी
अंधाराची मिठी
निरपेक्ष,
सामावून घेई
विश्वची अवघे
अंधार अंधार
जीवलग
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १२ फेब्रुवारी २०१९