गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

प्रार्थना


लताचा आर्त स्वर कानी येतो
'मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा'
पुढची ओळ ऐकायला
नकार देतात कान
डोळ्यांपुढे येतो
एक बालक, पाच वर्षांचा
रात्री झोपण्यापूर्वी
देवघरापुढे उभा असलेला
हात जोडून डोळे मिटून उभा
आईने सांगितलेले मागणे
देवाला मागणारा -
'देवबाप्पा बाबाला फक्त गोळी नको लागू देऊ'
'फक्त' शब्द मन भरून टाकतो
अन दिसू लागते
त्याचे, त्याच्या आईचे
अन आजी आजोबांचे
रोजचे जगणे
तुमच्या आमच्यासारखे
मनाच्या कुठल्या तरी चोरकप्प्यात
रात्रीचे मागणे लपवून ठेवत
सीमेवरच्या 'बाबाला' अदृश्य बळ देत राहणे;
त्यांचे आवरलेले कढ
मला अनावर होतात
मी मिटतो डोळे
अन करतो प्रार्थना -
'देवबाप्पा त्याच्या बाबाला फक्त गोळी लागू देऊ नको'
... ... ...
अचानक सावध होते मन
विचारते मला -
तो आणि त्याचा बाबा
तुझे कोणी आहेत म्हणूनच
करतोस ना प्रार्थना?
नकार देताच येत नाही
तेव्हा पुन्हा येते प्रश्नाची एक गोळी माझ्यावर
म्हणते - त्या सीमेवरचे बाकीचे कोणीच नाहीत तुझे?
ओशाळून मी पुन्हा प्रार्थना करतो
'देवा कोणालाही गोळी लागू देऊ नको'
मी पाहतो देवाकडे
त्याच्या डोळ्यात क्षणमात्र चमकलेले आदिदु:ख
त्याच्या मिटणाऱ्या पापण्यात
विरून जाते...
एकीकडे, अनेकांनी आवरून धरलेले आवेग
अंतरात अनावर झालेले
अन दुसरीकडे,
देवाच्या नजरेत तरळलेले
आदिदु:खाचे कवडसे;
मी डोळे मिटून घेतो
तयार करतो एक अंधारी गुहा
अन प्रार्थना करतो
त्या अविच्छिन्न ईश्वराला -
'आदिदु:खाचा एखादा कण मला दे'

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २८ डिसेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा