मंगळवार, २६ मे, २०१५

सखे...

सखे,
दु:ख गोड असतं?
दु:ख सुंदर असतं?
दु:ख हवंसं असतं?
तुला काय वाटतं?
मला वाटतं, हो-
दु:ख- गोड, सुंदर, हवंसं असतं...
गडद संध्याकाळी
मारवा ऐकतो ना आपण
तेव्हा कळतं हे...
हरवलेल्या पंचमाला शोधत
सगळे स्वर फिरत असतात
जीवाच्या आकांताने
आणि पंचम मात्र नाहीच सापडत
जणू तंबूचा मधला खांब
असल्यासारखा पंचम
नसतो हाताशी, अन
तरीही साधायचा असतो तोल
उतरायचं असतं समेवर
...
...
...
जसा दर संध्याकाळी
मी उतरतो ज्ञात अज्ञाताच्या धरेवर
तोल सांभाळत, तुझ्याशिवाय...
...
...
...
प्रत्येकाचा एकेक पंचम असतोच ना,
कुणाला पिळवटून टाकणारा
मारवा गात
शोधावा लागतो आपला पंचम;
पण तेव्हाच कळतं
दु:खही- गोड, सुंदर, हवंसं असतं...

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २६ मे २०१५

मंगळवार, १९ मे, २०१५

बा लेकरा...

छे, काय उन आहे की काय?
कुठे दुकानही दिसत नाही
अन पाणपोईही
दोन घोट पाणी कोणाला मागावं
तर, सारी दारेखिडक्याही बंद
ठीकच आहे म्हणा
आपल्याला उन आहे
तसे लोकांनाही आहेच ना !!
बरं झालं पण,
हे वडाचं झाड तरी सापडलं रस्त्यात
थोडी सावली तरी सापडली
श्वास घ्यायला
दोन क्षणांची उसंत मिळाली...
@@@@@@@@@@@@
बा वडा...
तुला नाही का रे उन लागत?
अरे लेकरा काय सांगू?
मी ना ए.सी., कुलरमध्ये राहू शकत
तुमच्यासारखा,
ना छत्री धरू शकत, ना रुमाल बांधू शकत
मी तसं केलं तर
तुमच्यासारख्यांना कोण रे सावली देईल?
पण का तापतोस असा आमच्यासाठी?
अरे तेच काम दिलंय मला...
कोणी?
ज्याने जन्माला घातलंय तुला मला...
त्याला जाब का नाही विचारत पण
का असं तापत उभं केलंय म्हणून?
राग नाही येत तुला त्याचा...
कसं आहे लेकरा,
म्हटलं तर राग,
म्हटलं तर तृप्ती-
त्याचा थोडासा भार
घ्यायला मिळाला याची...
थोड्याच दिवसांनी तुला मला
हव्याहव्याशा जलधारा बरसवण्यासाठी
तो कुठे कसा किती
तापत असेल कोणाला ठाऊक?
आपणंच बसवलेलं नाटक आहे ना हे?
विसरलास?
तू, मी, तो...
फक्त भूमिका सतत बदलणाऱ्या,
कधी तू माझ्या जागी,
कधी मी तुझ्या जागी,
कधी तो आपल्या जागी,
कधी आपण त्याच्या जागी,
बस, असंच आणि एवढंच !!!

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १९ मे २०१५

रविवार, १७ मे, २०१५

सखे,

सखे,
बोगनवेल पाहिलीय ना तू?
मला आवडते खूप...
वेलीसारखी नसून आणि
झुडुपासारखी असूनही
बोगनवेल का?
हा प्रश्न मात्र मला सुटलेला नाही...
लाल, पिवळी, केशरी, पांढरी
गुलाबी, जांभळी... तिची फुलं,
दाट, भरगच्च, सुंदर, गुच्छेदार;
पाहिल्याबरोबर प्रसन्न वाटतं,
बोगनवेल फक्त आल्हादच वाटते...
तिची ही सुंदर फुलं मात्र
कोणी केसात माळीत नाही,
कोणी देवाला वाहत नाही,
कोणी शवावरही वाहत नाही,
की फुलदाणीत ठेवत नाहीत,
ना हारात वापरतात, ना रांगोळीत
कोटालाही लावत नाहीत,
तिची अन तिच्या फुलांची जागा
कुंपण किंवा फारच झाल्यास घराची भिंत,
तरीही फुलत राहते ती असोशीने...
का? ठाऊक नाही...
कधी कधी मी बाजूने जात असलो की,
सांगते ती कानात हळूच-
नको विचारत जाऊस प्रश्न,
कशाचं स्पष्टीकरण देऊ नकोस,
कशाचं स्पष्टीकरण घेऊ नकोस,
कशाचं स्पष्टीकरण मागू नकोस,
कशालाही काही कारण नसतंच मुळी
ना फुलण्याला, ना कोमेजण्याला
कशाचंही काही प्रयोजन नसतंच मुळी
ना फुलण्याचं, ना कोमेजण्याचं
फुलणं किंवा कोमेजणं - फक्त असतं,
फक्त असतं...

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १८ मे २०१५

शुक्रवार, १५ मे, २०१५

मौनात सोहोळे, लावण्याचे...

पावसाच्या सरी
आल्या माझ्या दारी
उन्हाचे घरटे
ठेवू कुठे...

सुखाची टोपली
अंगणी सांडली
लगबग झाली
वेचण्याची...

अंधारून आले
दिवसा उजेडी
परी मनामध्ये
उजाडले...

आभाळाचे पाणी
डोळ्यातून सांडे
मौनात सोहोळे
लावण्याचे...

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १५ मे २०१५

बुधवार, ६ मे, २०१५

हो, मला अपमान करायचा आहे...

अपमान करणं चांगलं नाही
हे मलाही मान्य आहे
आणि तरीही
मला अपमान करायचा आहे,
तो मी करतो आहे...
पैसा, नाव आणि प्रसिद्धीच्या
माजाचा अपमान,
दुसऱ्याला तुच्छ लेखण्याचा अपमान,
संवेदनहीनतेचा अपमान,
सगळ्या गोष्टींकडे पाहून
न पाहिल्यासारखं करणाऱ्या
वृत्तीचा अपमान,
`चलता है' म्हणणाऱ्यांचा अपमान,
विष्ठा वाट्याला आली तरीही
शांतपणे खावी असे सुचवणाऱ्या
शांतीदूतांचा अपमान,
संतत्वाच्या नावाखाली
षंढत्व खपवणाऱ्यांचा अपमान,
चीड अथवा राग येण्यासाठी
नातं विचारणाऱ्या मुर्दाडांचा अपमान,
जगातील सगळ्या गोष्टी
आपण दात काढावे यासाठीच असल्याचा
समज असणाऱ्यांचा अपमान,
या जगात अपयश आणि दुबळेपणाही असतो
आणि त्यासाठी केवळ संबंधित व्यक्तीच
जबाबदार नसते, हे मान्य करण्यास
नकार देणाऱ्या उथळपणाचा अपमान,
जीला खरे तर
लक्षावधी डोळे असायला हवेत
तरीही स्वत:च्या अंधत्वाचा
अपार गर्व बाळगते त्या
न्यायव्यवस्थेचा अपमान,
मान अपमान यातच धन्यता मानणाऱ्या
मानसिकतेचा अपमान,
न्याय अन्याय आणि माणुसकी
यापेक्षा कोट्यवधी रुपयांचे व्यवहार
आणि डोळ्यातील अश्रू
यांनाच महत्व देणाऱ्या विचारांचा अपमान,
`आपले' म्हणून
कशाच्याही पाठीशी उभे राहणाऱ्या
उद्धटपणाचा अपमान,
समाजसेवेच्या नावाखाली
स्वत:च्या पापाचा व्यापार करणाऱ्या
हलकटांचा अपमान,
ज्यांना खरे तर मानच देऊ नये
अशा सगळ्या गोष्टींचा अपमान...

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, ७ मे २०१५

(एकीकडे नि:शुल्क पाणपोई उभारून दुसरीकडे धान्यात खडे मिसळणारा व्यापारी आणि समाजसेवेचा बुरखा घेणारा सलमान यात काडीचाही फरक नाही.)
(आजकाल सोशल मिडियावरील लिखाणाचीही कधीकधी दखल घेतली जाते आणि कारवाई केली जाते. माझ्या या लिखाणाची दखल घेतल्या गेली आणि त्यासाठी मला सजा वगैरे मिळाली तरीही हरकत नाही; मात्र मी माझ्या भावना व विचार यांच्यावर ठाम आहे.)