सोमवार, २४ नोव्हेंबर, २०१४

गोड मुक्तीचा प्रवास

एकतारी फकीराची
गीत विरहाचे गाते
ओसाडल्या गावासाठी
रोज चांदणे मागते

चारी दिशा झोपलेल्या
तिच्या पापण्या उघड्या
भर वसंतात जशा
जाईजुई गं नागड्या

एकतारीच्या शब्दांनी
फकिराचे मौन तुटे
सुनसान पारावर
दगडाला झरा फुटे

याचा साथ तिच्यासाठी
तिचा साथ याच्यासाठी
मुक्या शब्दांच्या गावात
फुले फुलतात ओठी

नको कल्लोळ शब्दांचा
नको पाल्हाळ अर्थाचा
मनातल्या मनातून
उतू जातो गं गारवा

हात नका लावू त्यास
दरवळू द्या सुवास
नका थांबवू तयांचा
गोड मुक्तीचा प्रवास

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २४ नोव्हेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा