मंगळवार, २३ डिसेंबर, २०१४

चित्रांजली

मी जन्मलो न कधीही
ठाऊक मरण नाही
मी वाढलो न कधीही
ठाऊक क्षरण नाही

मी सर्वदा सदाचा
प्राचीन आणि नूतन
ना रूप, नाव कसले
अस्तित्व मात्र अनुपम

आलोच नाही येथे
जाणार येथून कोठे
चित्रांजलीच केवळ
माझ्यातुनी वहाते

मी शांत स्तब्ध कधीचा
ऐसाच राहणार
वेगात काळसरिता
असलीच धावणार

ती जन्मते अचानक
तैसीच लोपतेही
माझाच अंश तरीही
मज ठाव काही नाही

परिपूर्ण अंतरात
परिपूर्ण नाद आहे
जे जे गमे तुला रे
मी त्यात पूर्ण आहे

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २३ डिसेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा